नजर

नजर (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ बीना बाचल

"राधे, काहीतरी शंका असतात बघ तुझ्या! म्हणे मुलाने अंगठी घालताना डोळे वर करून पाहिलं ही नाही तुला! अग मुलगा असला तरी त्यालाही संकोच वाटूच शकतो की आणि आज कालच्या टवाळ पोरांपेक्षा हे बरं! स्वतः च्या होणाऱ्या बायकोकडेही मान वर करून न बघणारा असा हा 'संस्कारी' राजेंद्र कितीतरी पटीने गुणी नाही का?" राधेला आईचा मुद्दा मुळीच पटत नव्हता.आई कितीही समजूत घालत असली तरी राधेला मनातून काहीतरी वेगळं च वाटत होतं.


        राधा लहानश्या गावात राहणारी तरीही बऱ्यापैकी व्यावहारिक ज्ञान बाळगून असणारी, नंदकुमार आणि श्यामला ताईंची थोरली लेक.तिच्या पाठच्या तीन बहिणी ही तिच्या सारख्याच गुणी पण राधा थोरली; शिवाय मध्यम वर्गात जन्मल्यानं   आपोआप आलेला समजूतदारपणा तिच्या अंगी होताच.त्यामुळे आज आलेल्या ह्या स्थळाला ती काही आढेवेढे न घेता सामोरी गेली खरी पण मनात नाही त्या शंका येऊ लागल्यावर मात्र तिला स्वस्थ बसवेना, पण तिच्या मनाची चलबिचल आईपर्यंत काही पोहोचली नाही.


उलटपक्षी  आईनं त्या लोकांचीच बाजू कशी जास्त 'उजवी' आहे हे राधाला समजावून सांगितलं.


         त्यामुळे "आपल्या पेक्षा कितीतरी श्रीमंत घराणं शिवाय लग्न आपल्या गावी लावून देण्या पलीकडे कुठलीही अट नाही की कसली मागणी नाही. काहीतरी चुकतंय का?की चांगली माणसं ही भेटू शकतात ह्यावर विश्वास बसत नाही आपला!काय खरं कोण जाणे?" अशी राधाच्या मनाची  अवस्था झाली.


राधाला अजूनही विश्वास बसत नव्हता की तिला  बघायला तालुक्यातील बऱ्यापैकी नाव कमावून असलेल्या राजे कुटुंबातील सर्वात धाकटे चिरंजीव ;राजेंद्र राजे ह्याचे स्थळ सांगून आले .मुलगी बघायला येत असतानाच एवढा लवाजमा होता, त्यात सर्वात पुढे होते ते मुलाचे भैरव काका, अत्यंत कडक आणि दरारा वाटावा अशी मुद्रा, राजेंद्र राजेंचे वडील हयात नसल्यानं सगळी जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर असल्यासारखे ते वावरत होते. बाकी समस्त 'राजे'परिवार जणू ह्यांच्या अधिपत्याखाली असल्यासारखा वागत होता.भैरव काकांनी आल्या आल्याच राधेकडे पाहिले. पाहिले म्हणजे अगदी आरपार!! राधाला ती तीक्ष्ण नजर ही नको झाली, पण सांगते कोणाला! बरं ही मंडळी नुसती सांगून आली नाही तर मुलगी बघताच पसंती ही झाली आणि मुलाकडचे जणू तयारीनिशी आल्यासारखे राधाला अंगठी घालून लग्न जमवूनच परतले.


राधाचे आई बाबाच काय आजूबाजूच्या लोकांना ही राजें प्रस्थ ऐकून माहिती होतेच त्यामुळे राधाच्या आई बाबांनी  ह्या ताबडतोब साखरपुड्यासाठी कसलेच आढेवेढे घेतले नाही अर्थात 'चार लेकींपैकी पहिलीच सुरुवात ईतक्या सहज होतेय तर का सोडा हे स्थळ असा व्यवहारी हिशोब ही होताच!


पण राधाच्या मनाला मात्र काहीतरी खटकत होतं, काय ते नक्की सांगता येत नव्हतं. 'मुलगा नाकी डोळी ठीक, ना  कसलं व्यंग ना ईतर काही फक्त त्याचे डोळे अगदी विझून गेल्या सारखे; कसलाच जिवंतपणा नाही! तिच्या बोटात अंगठी घालताना ही घरातल्या बायकांनी त्याला मदत केली, एवढं ही जमू नये मुलाला!! आता हे नकार देण्याचं कारण कसं द्यायचं म्हणून राधा शांत राहिली आणि त्या शांततेचा अर्थ सर्वांनी आपल्या सोयीने 'होकार' असा ठरवून ही टाकला.


महिनाभरात राधेची 'सौ राधा राजेंद्र राजे' झाली!!


घरात सगळं आलबेल असलं तरी सर्वात महत्वाचं म्हणजे राजेंद्रचं वागणं. नाव राजेंद्र असलं तरी घरात शेती कामात जी अगदीच फुटकळ कामं असावीत तेवढीच तो करायचा. ना कसला आत्मविश्वास ना कामाचा उत्साह; पण राधा 'आपली' आहे ही भावना मात्र अगदी त्याच्या वागण्यातून जाणवायची जणू एखादं आवडतं खेळणं असल्या सारखं तो सतत तिच्या आसपास काळजी घेत वावरायचा. भैरव काकांनी कधी घरी फेरी मारली तर मात्र तो अक्षरशः तिच्या मागे मागेच राहायचा जणू ते त्याला खाऊनच टाकणार आहेत! एरवी मात्र शेतातून येताना तो  तिच्यासाठी कधी अबोली कधी शेवंतीची वेणी तर कधी एखादा गुलाब आठवणीनं आणायचा , बस्स इतकंच!! कारण तिच्यासमोर एकांतात असताना मात्र तो अगदी विझून जायचा, कसली तरी भिती असल्यासारखा, फार जिव्हारी लागायचं राधेला. काय चुकतंय आपलं? आपण आवडत नाही का ह्यांना? की जबरदस्ती आहे कोणाची?म्हणूनच कदाचित लग्न असं घाईने उरकले असेल का? राधाच्या प्रश्नांना अंत नव्हता पण माहेरची एकूणच परिस्थिती बघता तिकडचे दोर कापल्यातच जमा होते.


मग हळूहळू राधाने 'पदरी पडलं नी पवित्र झालं' हे व्रत अंगिकारलं .आता तिला राजेंद्रच वेंधळेपण अंगवळणी पडलं , उलट तीच त्याची लहान मुलासारखी काळजी घेऊ लागली. राधेन त्याला स्वीकारलं म्हणता  घरातले ही सैलावले. राधाला घरात थोडा मान मिळू लागला, तिची मतं विचारली जाऊ लागली. पण नेहमी शेतावर वास्तव्य असलेले भैरव काका मात्र ह्या गोष्टीला अपवाद होते.त्यांना राधेच घरातलं वाढणारं महत्व मुळीच मान्य नव्हतं. ते घरी आले की असा जळजळीत कटाक्ष टाकायचे की राधा जागीच थिजून जायची. पण ईलाज नव्हता. घरतल्या लोकांसाठी  भैरव काका म्हणजे घरातले थोरले शिवाय लग्न न करता  सर्वांची जबाबदारी घेणारे व्यक्तिमत्त्व  होते. त्यामुळे त्यांचा दरारा सर्वांना मान्य होता.


राधा त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिकली, तसंही राजेंचा वाडा, शेती भाती सगळा व्याप सांभाळायचा तर पन्नास माणसं कमी पडावीत इतकं काम होतं मग राधाने मन रमाव म्हणून त्यातच गुंतवून घेतलं स्वतःला! घरच्यांचं आणि बाहेरचं करता करता दिवस कुठे सरायचा ते कळायचं ही नाही.


अशातच एक दिवस सर्व गडी माणसं शेतात, कोणी गावच्या बाजरी धाडल्याने भैरव काकांना डबा द्यायचं काम राधावर आलं. राधाने साफ नकार दिला पण कोणीच हाताशी नसल्यानं अखेर तिलाच जावं लागणार होतं.


अखेर एकटं जाण्यापेक्षा राजेंद्रला सोबत नेऊ असं मनाशी ठरवत राधानं विचारलं, "अहो,येताय न सोबत शेतावर?भैरव काकांना डबा द्यायचाय."


राजेंद्रला शेतावर तेही  भैरव काकांकडे जायचं म्हणता घामच फुटला. तो तिथून अक्षरशः पळूनच गेला.


राधाला ईतका राग आला त्याचा की बस्स!' देवा, काय चुकलं म्हणून असा जोडीदार गळ्यात बांधलास! साधं शेतात जायला साथ मिळाली नाही तर आयुष्यात मला काय साथ देणार माझा नवरा! गरीब माहेर म्हणून खाली मान घालून सगळं मान्य केलं पण अशा अवघड प्रसंगात तरी साथ हवी होती. असो, मी आणि माझं नशीब !"


राधा नाईलाजाने आणि मनातून घाबरत शेताकडे निघाली.


शेतावर पोहोचताच तिला शेतातल्या घरात शांतता जाणवली. तिनं आत डबा ठेवून पटकन तिथून निघण्याचा विचार केला आणि ती मागे वळणार तोच मागून एक  पुरुषी  ताकदवान हाताचा वेढा तिच्या भोवती पडला आणि ती अक्षरशः गुदमरली, तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली.


काय करावं असा विचार करायला ही वेळ नव्हता.


"ह्या राजे खानदानावर फक्त माझीच सत्ता राहील, हे सगळं मी उभं केलंय आणि तू एक दीड दमडीची पोर इथे येऊन सगळं आपल्या ताब्यात घेणार म्हणतेस ! काही वर्षांपूर्वी तुझ्या सासऱ्यांनं ही असाच प्रयत्न केला होता पण तो तर जिवंत राहिला नाहीच पण त्याच्या त्या अडनिड्या वयातल्या मुलाला; तुझ्या राजेंद्रला असा कुस्करून टाकला मी की पुन्हा ह्या जन्मात घरातलं इतर कोणी मान वर करून बघणार नाही. तू ते धाडस केलंस पण आज तुझी गत ही तुझ्या नवऱ्यासारखी केली की मग काम झालं!" भैरव काकांच्या जागी एखादा विषारी साप फुत्कार टाकतोय असा भास झाला राधेला आणि राजेंद्रच्या विझून गेलेल्या डोळ्यांचं रहस्य ही समजलं, घरातल्या सर्वांचा मान खाली घालुन वागण्याचा उलगडा ही झाला.


पण आता बाकी कशालाच वेळ नव्हता, झटपट त्याच्या तावडीतून सुटणं महत्वाचं होतं.


तिनं जोरजोरात हाका मारून मदत मागायला सुरुवात केली, राजेंद्रलाही आर्त साद घातली.


झटापट झाली खरी पण राधाला त्याच्या कचाट्यातून सुटता येईना. अखेर आता संपलं सगळं म्हणून तिनं डोळे मिटले,अश्रूंची धार लागली.


पण पुढच्या क्षणात एक तीव्र किंचाळी आणि तिला बसलेला त्या हिंस्त्र पुरुषी हातांचा विळखा सैल झाला.


तिनं डोळे उघडून पाहिलं तो राजेंद्रच्या हातात खुरप आणि त्यावर रक्त लागलेलं पाहिलं आणि बाजूला त्या भैरव काकांचा डोळा फुटल्यानं गडबडा लोळणारा देह ही दिसला.


तिनं भर्रकन जाऊन राजेंद्रला मिठी मारली आणि तिला पहिल्यांदा जाणवलं की राजेंद्रच्या हातात  गेली कित्येक वर्षे हरवलेली हवी ती ताकद परत आलीये. विझून गेलेल्या डोळ्यात अक्षरशः अंगार फुलून आलाय. स्वतः वर झालेला अत्याचार जेव्हा स्वतः पेक्षाही प्रिय व्यक्ती सोबत घडताना पाहून त्याच्यातला हरवलेला तो पुन्हा बाहेर आला. दुपारी राधा शेतावर येणार हे समजताच घरातून पळून आलेला राजेंद्र इथे तिच्या आधीच इथे येऊन ठेपला होता. आजवर स्वतः वर झालेला अन्याय कुठेतरी दाबून टाकला होता त्यानं पण आज काही केलं नाही तर आयुष्यात आपल्याला आहे तसं स्विकारणारी आपली जवळची व्यक्ती आपण गमावून बसू हे त्याच्या डोक्यात बसलं आणि पुढचा अनर्थ टळला.

एका वाईट नजरेचा पुरता आणि कायमचा नायनाट होऊन एका स्वच्छ आणि पवित्र नजरेचा नुकताच जन्म झाला!

राधेच्या प्रार्थनेला देवानं अगदी वेळेत उत्तर दिलं.

सौ. बीना समीर बाचल©®

ही कथा तुम्हाला आवडेल 👉 प्रेमाचा सोहळा

Post a Comment (0)
Previous Post Next Post