इथेच

 इथेच (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ राधा गर्दे


"अरे! आता तरी ये रे माझ्या सोबत. ह्या प्रेम डोहात दोघं डुंबू, एकमेकांच्या साथीने. धर घट्ट हात माझा आणि घेऊन चल मला."


संपूर्ण हॉलचे प्रेक्षक उभे राहून अविरत टाळ्या वाजवत होते.विभावरीच्या ह्या संवादावर नेहमीच टाळ्यांचा कडकडाट ठरलेला होता. विभावरी दिसायला सुंदर तर होतीच पण तिला अभिनय प्रतिभा भरभरून मिळाली होती. त्यामुळे ती सध्या अनेक नाटकात आणि मालिकेत नाव कमवत होती.


आज ही सर्व प्रेक्षक तिचं कौतुक करत होते.पण दोन डोळे मात्र तिच्या नकळत तिचा पाठलाग करत होते.ते डोळे होते मोठ्या उद्योगपती राजाराम गणपुले ह्यांचा मुलगा सिद्धार्थ ह्याचे. 


सिद्धार्थ नाटक बघायला आला होता मित्रां बरोबर पण हरवून बसला होता आपले हृदय. हॉल मधून बाहेर निघाल्या


निघाल्या त्याने विभावरी बद्दल आपल्या मित्रांना विचारालं. मित्रांनी लगेच त्याची गंमत केली


"काय रे ! तुझं प्रेम बीम बसलं की काय ?"


" अरे! नाही , नाही सहज विचारत होतो. अभिनय अतिशय सुंदर केला ना? म्हणून."


म्हणतच सिद्धार्थ ने वेळ मारून नेली.


खरं तर सिद्धार्थ आपलं हृदय गमावून बसला होता.


सिद्धार्थ, राजाराम गणपुले ह्यांचा लहान मुलगा. त्याने परदेशी एम. बी. ए. ची डिग्री घेतली होती आणि आता वडिलांच्या व्यवसायात मदत करण्याच्या हेतूने परत भारतात आला होता. मोठा भाऊ नितीन आणि त्याची बायको स्नेहा हे देखील वडिलोपार्जित व्यवसायात चांगलेच मुरले होते.



त्या दिवशी सिद्धार्थ एका पार्टीला आला होता. ह्या पार्टीत मोठमोठाली लोकं आली होती. सगळीकडे वैभव, सौंदर्य,सजावट ह्याचा खजिना पसरला होता. स्वर्ग जणू खाली अवतरला होता.


 तितक्यात राजाराम ह्यांनी सिद्धार्थला बोलवून घेतलं आणि मि. कारेकरांशी ओळख करून दिली. त्यांच्या जवळच उभी असलेली त्यांची कन्या नंदिता हिची ओळख ही ओघाने झालीच. पण सिद्धार्थला कळलं होतं ही ओळख कां करून दिली जाते आहे. त्याने औपचारिक ओळख करून घेतली आणि 


" मी आलोच एक मिनिटात" म्हणत काढता पाय घेतला.तो आपलं हातातील ड्रिंक घेऊन वळला आणि दाणकन् आपटला. त्याने "सॉरी" म्हणत त्या व्यक्तीला बघितलं आणि त्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. 


"ओ…ही तर विभावरी." मनातल्या मनात तो पुटपुटला.


"सॉरी! खरं तर माझंच चुकलं. मी मैत्रिणीला बाय म्हणत उलटीकडे बघत पुढे चालत होते. तुमच्या अंगावर सांडलं का ड्रिंक?"


"अहो! नाही. थोडक्यात वाचलं." ( ड्रिंक.पण मी?)मनातच परत म्हणून घेतलं.


"बाय द वे, तुम्ही अप्रतिम अभिनय करता. मी तुमचं नाटक बघितलं त्या दिवशी आणि प्रेमातच पडलो."


"अं? काय म्हणालात?" विभावरीने विचारताच सिद्धार्थ ने सावरत म्हटलं


" तुमच्या अभिनयाच्या.असं म्हणायचं होतं मला." विभावरी जोरात हसली. तिचं तसं भरभरून हसणं , सिद्धार्थला खलास करायला पुरेसं होतं.  


पार्टी संपवून घरी येताच त्यांने जाहिर केलं 


" मला विभावरी अतिशय आवडली आहे. तिने जर हो म्हटलं तर मी तिच्याशीच लग्न करणार."


राजाराम थोडे नाराज झाले


"कारेकरांची नंदिता तुझ्यासाठी उत्तम आहे. हे नवीन खूळ कसं तुझ्या डोक्यात शिरलं?"


"हो सिद्धार्थ! नंदिता एका व्यावसायिक घराण्यात लहानाची मोठी झाली आहे.ती आपल्याकडे आली तर आपल्या व्यवसायात तिची चांगलीच मदत होईल. तसं विभावरी बरोबर नाही ना? तिचं क्षेत्रच वेगळं आहे. हा ही विचार तुम्ही करायला हवा ना?" त्याच्या वहिनी स्नेहाने आपला विचार मांडला.


पण आई आणि मोठा भाऊ नितीन ह्यांनी सिद्धार्थचे मत उचलून धरलं.


"त्याला जर विभावरी आवडत असेल तर फक्त ती आपल्या क्षेत्राची नाही म्हणून तिच्या बरोबर लग्न करु नको हे म्हणणं पटलं नाही. कशाला हवे सगळे एकाच क्षेत्रातले, एका घरात. जरा दुसऱ्या क्षेत्रात ही डोकावून बघा ना?"



नंतर सुरू झालं विभावरीचं आणि सिद्धार्थ चं भेटणं. सुरवातीला काही कारणं काढून ,नंतर भेटल्यावाचून चैन पडत नाही म्हणून.


विभावरी नाटकांच्या निमित्ताने बाहेर गावी गेली की अनेकदा सिद्धार्थ ही काहीतरी निमित्त काढून तिच्या बरोबर जायचा‌. 


शेवटी दोन्हीं घरात रीतसर बोलणी झाली आणि विभावरी सिद्धार्थ ची परिणीता म्हणून गणपुल्यांकडे आली. 



काही दिवसांतच तिनं आपल्या वागण्याने सगळ्यांना आपलंसं करून घेतलं. नाटकाच्या तालिमा नसल्या किंवा उशीराने असल्यातरी ती स्वयंपाक घरात एका पेक्षा एक चविष्ट पदार्थ करायची. बाग कामाची आवड असल्याने माळी काकां बरोबर कामाला लागायची. वाचन तर दांडगं. घर ही तिने खूप छान सजवून घेतलं होतं. घरात सगळे तिच्यावर खुश होते.



दोन वर्ष कशी गेली ते कळलंच नाही.एकदा प्रेमातच सिद्धार्थ म्हणाला


"आता आपण बाळाचा विचार करायचा का?"


त्यावर लाजतच विभावरी ने होकार दिला. तरी ही दीड वर्ष उलटून गेलं. आता विभावरी आणि सिद्धार्थ ला थोडी काळजी वाटू लागली. आणखी वर्षभर वाट पाहून त्यांनी डॉक्टरांची भेट घेतली. औषधं झाली पण परिणाम काहीच नाही. आता त्यांनी IUI ही उपचारपद्धती घेतली. वाट पाहून पाहून दमले पण परिणाम शून्य. 


नंतर IVF हा प्रयत्न करून पाहिला. आशा वाटली. जरासा आनंद येतो म्हणे पर्यंत सगळं संपलं. परत प्रयत्न केला पण फोल ठरला.


आता विभावरी विचार करून करून थकू लागली होती. तिचं धड नाटकात मन लागेना की घरात मन रमेना. शून्यात बसून असायची तासन् तास. सगळ्यांनी खूप समजवण्याचा प्रयत्न केला.


" अगं! जगात कितीतरी जोडपी असतात ज्यांना मूल नसते. इतकं काय त्यात? नाही तर नाही."


पण विभावरीला तसा विचार करता येत नव्हता. शेवटी सरोगेट मदर हा उपाय तिनेच शोधून काढला. सुरवातीला घरात कोणीच तयार होईना. पण विभावरी अडूनच राहिली आणि नाइलाजाने सगळे तयार झाले.


डाॅक्टरांनीच सुचवलेल्या एका बाईची निवड झाली. सारं काही व्यवस्थित पार पडलं आणि आनंदाची बातमी मिळाली. ती बाई प्रेग्नेंट झाली. विभावरी सगळ्यात जास्त आनंदी झाली. तिने त्या बाईला आपल्या घरातच ठेवून घेतलं. तिचं हवं नको, औषधं, पथ्यपाणी सगळं ती आनंदाने करु लागली. विभावरीचा उत्साह पाहून सिद्धार्थ आणि घरातील सगळेच समाधानी होते.


पण नियतीला विभावरीचा हा आनंद बघवला नाही. बाथरूम मध्ये पाय घसरून ती बाई पडली आणि त्याच बरोबर विभावरीचं स्वप्न ही संपलं. ह्या धक्याने विभावरी डिप्रेशन मध्ये गेली. ती काही बोलेनाशी झाली. तासनतास खिडकीच्या गजा धरून ती उभी असायची. दिवस दिवस झोपून असायची. नाटकात तिला रस उरला नाही. घरकाम बागकाम ह्यांचा उबग येऊन लागला. सिद्धार्थ हे सगळं बघत होता आणि मनोमन धास्तावला होता. घरची मंडळी ही घाबरली होती. 


अचानक एके दिवशी विभावरी म्हणाली


 " मला नैनीतालला घेऊन चल. माझी कोणीतरी वाट बघत आहे."


हे ऐकून तर सगळेच दचकले. तिला टाळण्याचा प्रयत्न केला पण छे! ती ऐकायला तयारच नव्हती. शेवटी 


"मी एकटीच जाते." हा तिने हट्टच धरला. 


शेवटी मानसोपचारतज्ञांचा सल्ला घेतला. आणि तिला नैनीतालला घेऊन जाण्याचे ठरलं.


सिद्धार्थ आणि विभावरी नैनीतालला पोहोचले खरे पण विभावरी भिरभिरत्या डोळ्यांनी सतत काही तरी शोधत असायची. फिरायला गेली की तिची नजर कोणाचा तरी शोध घेत असायची, हाॉटेल वर असेल तर खिडकी बाहेर बघत बसायची. सिद्धार्थ तिला परोपरीने आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होता पण ती त्याकडे लक्षच देत नव्हती. सारखी हरवल्या सारखी असायची. 


संपूर्ण आठवडा उलटला पण विभावरी होती तशीच होती. दोन दिवसाने त्यांना परत निघायचे होते.


" आपण परवा निघायला हवं ना, विभा?" सिद्धार्थने विचारताच ती एकदम जोरात ओरडली 


"नाही शक्य नाही. जो पर्यंत ती मला भेटत नाही तोपर्यंत मी जाणार नाही."असं म्हणत खिडकी जवळ जाऊन उभी राहिली.


सिद्धार्थ ने आज पहिल्यांदाच तिला विचारलं


" कोण भेटणार आहे तुला इथे?"


आणि विभावरी लगेच हसत त्यांच्या जवळ येऊन बसली. 


"सिद्धार्थ! ‌तुला खोटं वाटेल पण एका नाटकात असं दृश्य होतं की नायिकेला मूल होत नाही. ती एकदा नैनीतालला जाते आणि तिला एक मुलगी आई म्हणून हाक मारते आणि नायिका तिला आपली मुलगी म्हणून वाढवते. मला माहित आहे माझ्या बरोबर असंच घडणार आहे. आपण थांबूया काही दिवस. ती मुलगी मला भेटेल. ती आपलीच होईल. आपण तिला आपल्या बरोबर नेऊया.पटतंय ना तुला माझं म्हणणं?" 


सद्धार्थने मान हलवली आणि तिला थोपटल्या सारखं केलं. त्याने मानसोपचारतज्ञांना फोन लावून हे सगळं सांगितलं. त्याने नैनीतालच्या एका डॉक्टरांचा फोन नंबर देऊन त्यांना भेटण्याचा सल्ला दिला.


त्या रात्री विभावरीने भाजलेले मासे खाण्याचा हट्ट धरला. तिला भाजलेल्या मास्यांची एलर्जी आहे, हे सिद्धार्थ ला माहित होतं.त्याने परोपरीने तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकेना आणि तिने स्वतः च ऑर्डर केले ते.


सिद्धार्थ डोक्याला हात लावून बसून होता. त्याला माहीत होतं पुढे काय होणार आहे.


अर्ध्या रात्री विभावरी धडपडत उठली तिला मळमळत होतं. तिने सिद्धार्थला सांगितलं. खरं तर हे सारं होणार हे त्याला माहित होतं. त्यामुळे त्याने विभावरीला एंटी एलर्जी गोळी ही दिली होती. पण तरी तिला मळमळ आणि उलटी हे नेहमी प्रमाणे सुरू झालं. पण देव कृपेने एकदाच झालं आणि नंतर शांत झोप लागली तिला, आणि त्यामुळे सिद्धार्थला ही.


सकाळी त्याने विभावरीला विचारलं


" कसं वाटतंय?" 


"तसं बरं वाटतं आहे पण थोडी मळमळ अजून ही वाटते आहे. होईल ती ही ठीक."


म्हणत तिने उठण्याचा प्रयत्न केला.तिला जोरात गरगरत होतं. ती तशीच खाली बसली. थोड्याच वेळात ती बाथरुममध्ये धावली. 


सिद्धार्थला हे नवीन नव्हतं पण दुसरी वेळ असती तर तो भडकला असता.पण सध्या विभावरीची मानसिक अवस्था पहाता न बोलणंच रास्त होतं. तो दिवस त्यांचा अशातच गेला. 


सिद्धार्थला खरं तर आता परत निघण्याची घाई झाली होती पण विभावरीला हे कसं सांगावं कळत नव्हतं. बरं इथल्या डॉक्टरांना दाखवायचं होतं ते ही तिच्या तब्येतीमुळे जमत नव्हतं.


दुसऱ्या दिवशीही तब्येत नरमच होती तरीही विभावरी ने बाहेर चालण्याचा हट्ट धरला.


"आज मला माझी मुलगी नक्कीच भेटणार." हे म्हणतच ती सिद्धार्थला घेऊन बाहेर पडली. 


ती दोघं रमत गमत चालत होती. विभावरीला म्हणावं तसं बरं वाटतं नव्हतं तरी तिचे डोळे काहीतरी शोध घेत होते आणि शरीर ढकलत ती चालत होती. अचानक एक मोर्चा तिथे आला. गर्दी चुकवण्यासाठी दोघं बाजूला झाले. आणि? आणि एक छोटुकली मागून "आई" म्हणत विभावरीला बिलगली. तिने वळून बघितलं आणि आश्चर्य आणि आनंद दोन्ही संमिश्र भावना दाटून आल्या


" बघ बघ सिद्धार्थ ! मी म्हणाले होते ना मला माझी मुलगी मिळणार ती भेटली बघ." म्हणत तिनं त्या मुलीला मिठी मारली. ती मुलगी दचकून लगेच बाजूला झाली. मागून धावतच एक बाई आली.


" अगं माझी बबडी गं! कुठे हरवली होतीस. जीव अगदी गेल्यातच जमा होता." म्हणत तिने सिद्धार्थ आणि विभावरी दोघांचे आभार मानले


" देवा सारखे तुम्ही दोघं होतात म्हणून बचावली माझी पोर. नाहीतर ह्या गर्दीत तिचं काय झालं असतं तो विचारच नकोसा वाटतो." म्हणत त्या पोरीचा हात धरून ती निघून गेली. विभावरी मात्र चक्कर येऊन पडणार होती. सिद्धार्थने तिला सावरलं आणि एक रिक्षा थांबवत तिला बसवलं आणि "जवळपास दवाखाना असेल तिथे चला." म्हणत स्वतः ही बसला.


दवाखान्यात डॉक्टरांनी तिला तपासले. सगळं व्यवस्थित तपासून झाल्यावर ते हसतच बाहेर आले.


"अहो ! अभिनंदन! गोड बातमी आहे. तुम्ही दोघं आई बाबा होणार."


विभावरी आणि सिद्धार्थ फक्त एकमेकांकडे पहात होते. नंतर विभावरीच म्हणाली


" डॉक्टर! तुम्ही नीट तपासले आहे ना? म्हणजे काही शंका वगैरे असं नाही ना?"


डॉक्टर हसू लागले


"तसं असतं तर ते मी बोललोच नसतो ना? पण तसं काही नाही. शंभर टक्के बातमी खरी आहे."


सिद्धार्थ विचार करत होता ' इतक्या वर्षा नंतर ही बातमी नैनीताललाच मिळावी आणि इथेच आपली मुलगी भेटेल हे विभावरी बोलत असायची ह्याचा ताळमेळ कसा काय बरोबर बसला?'


हे कोडचं होतं.


राधा गर्दे 







1 Comments

  1. छान..अंत आवडला,👌👌

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post