चूक
लेखिका - सविता किरनाळे (शब्दचाफा)
तिचे आणि त्याचे ठरवून, रितसर कांदेपोहेचा प्रोग्राम करून झालेले लग्न.
तिला पाहायला तो आला आणि बघता क्षणी आवडून गेला.
सावळा वर्ण,
उंच, ॲथलेट्स बाॅडी.
पण तिचे लक्ष वेधून घेतले ते तरतरीत नाक, विस्तृत कपाळ यांनी,
बहुतेक.
कारण खरे कारण तिला सांगता येत नव्हते पण
एक छान पाॅझिटिव्ह फील आला तिला त्याच्याकडे पाहून.
आणि तिने ठरवून टाकले,
याला होकार द्यायचा.
खरं सांगायचं झालं तर मुलगी पाहण्याची त्याची ही कितवी वेळ होती हे त्याला पण आठवत नव्हते.
आणि डिट्टो हिच्याबाबतीत ही बरं.
इथे मात्र काही अजब घडले.
आख़िर जोड़ियाँ आसमानमें बनती हैं।
तर या रब ने बनाईं जोड़ीचे हात इथे भूलोकी पिवळे झाले.
प्रॅक्टिकली विचार केला तर दोघे दोन ध्रुव होते.
तो डोक्याने विचार करणारा,
तर ती दिल का कहा माननारी.
तो प्रचंड कामसू,
ही थोडीशी आळशीच.
तो मारधाड टाईप्स सिनेमे बघणार
तर ही अजून हॅरी पाॅटरमध्ये रमणारी.
ही दिवसभर गाणी ऐकायची
तर तो जणू आपल्या बोटाला डिंक लावून लॅपटाॅपला चिकटलेला.
म्हटलं ना दोन विरूद्ध ध्रुव होते ते,
पुढे हे ही ऐका, ओपोझिट ॲट्रॅक्ट्स.
प्रेम होतं त्यांचे एकमेकांवर.
त्याला तिचा बालीशपणा प्रचंड आवडायचा.
हट्टाने आईसक्रीम खाणे,
रात्री झोप लागत नाही म्हणून त्याच्याकडून थोपटून घेणे वगैरे.
छानच चाललं होतं सगळं.
पण तिला हळूहळू या सगळ्यांचा कंटाळा येवू लागला.
घरात दोघे,
मग किती आणि कुणाशी बोलणार?
आणि हा असा आपली व्यवसायिक व्यवधानं सांभाळत बसलेला.
काही सांगितलं, बोललं तरी हा ऐकतो तरी का असा संशय यायचा तिला.
मग तिने जाहीर केलं,
जोरात ओरडून.
“ऐक गं भिंती, मला घरी बोर होतंय,
किती बोलू तुझ्यासोबत,
तू तर काही रिस्पोंस पण देत नाहीस.
म्हणून मी नोकरी करणार आहे.”
भिंत गप्पच राहिली,
पण तो मात्र जोरात हसला.
“काय हे मिनू?
ठीक आहे, शोध तू नोकरी.”
मग सुरू झाले तिचे मिशन शोध ऑफ नोकरी...
मिळाली तिला नोकरी.
आणि सुरू झाले एक चक्र.
ती आता पहिल्यासारखी त्याच्या मागे मागे फिरत नव्हती.
कारण आता तिचे सर्कल वाढले होते.
नवीन लोक मिळाले होते,
गप्पा ऐकवायला, ऐकायला.
दोन चार वर्ष निघून गेली.
आधी ऊतू जात असलेल्या प्रेमाला थोडी थोडी ओहोटी लागायला सुरू झाले.
कुठेतरी वाचले होते,
लग्नानंतर आधी प्रेम उकळतं, मग ऊतू जातं आणि शेवटी करपायला लागतं...
इथे करपायची स्टेज नव्हती आली
पण ओढ थोडी कमी झाली होती.
ती आपल्या बाहेरच्या जगात वावरत होती.
आणि तो नेहमीप्रमाणे घरातून काम करायचा.
(तो साॅफ्टवेअर प्रोग्रॅमर होता.)
रूटीन तर मस्त चालू होते.
सकाळी उठून ती नाश्ता दुपारचे जेवण बनवायची,
त्याच्या मदतीने.
तो कपडे मशीनला लावणे,
वाळायला टाकणे,
दूध, भाजी आणणे इत्यादि छोटी मोठी कामं न सांगता करून टाकायचा.
तर ती सोसायटीचा मेंटेनेन्स भरणे,
लाईट बिल, पेपरचे बिल भरणे अशा पद्धतीने त्याला घर चालवायला हातभार लावायची.
असो,
सांगायचा मुद्दा हा,
की आॅल वाॅज वेल,
फक्त एक गोष्ट सोडली तर.
तीही तिला अगदी अपघातानेच समजली.
त्याचं काय झालं,
एका रविवारी ती दुपारी पुस्तक वाचत बेडवर पहुडली होती.
तोही होताच बाजूला,
मोबाईलवर कुठलासा गेम खेळत.
त्याचा फोन वाजला.
दोन मिनिटे बोलून तो गॅलरीमध्ये गेला.
तिला थोडा थोडा त्याचा कुणाला तरी समजावण्याचा आवाज येत होता.
तो काही सांगण्याचा प्रयत्न करत होता
आणि समोरची व्यक्ती बहुतेक तसा प्रतिसाद देत नसावी.
पाच मिनीटं, सात मिनीटं
पण तो अजून बोलतच होता.
ती गोंधळली.
काय विषय असावा?
स्त्रियांना उपजत सहावे इंद्रिय असते,
ते तिला सांगू लागले,
कुछ तो गड़बड़ है, मनू.
ती गॅलरीत आला,
“अहो काय झाले?”
त्याने काही न बोलता फोन तिच्या हाती सरकवला.
तिने फोनवरील नाव वाचून तो कानाला लावला.
ती ओळखत होती, त्या व्यक्तीला.
“हॅलो?”
पण समोरून पुरूषाचा आवाज आला.
फोन नंबर तर त्याच्या एका स्त्री सहकारीचा होता ...
तिने विचारले,
“कोण बोलतंय ते समजेल का? आणि काय झाले आहे?”
“मी अजित बोलतो आहे, संगीताचा मित्र.
तुम्ही कोण?”
“तुम्ही ज्याला फोन लावला आहे त्याची बायको आहे मी,
सांगा काय झाले?”
“मॅडम तुमचा नवरा माझ्या मैत्रिणीला मेसेज करत असतो, अधून मधून कॉलही करतो. काय संबंध त्याचा हिच्यासोबत?
हिच्या मागे लागला आहे तो.
त्याला सांगा हिला मेसेज आणि कॉल करू नको म्हणून, नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत.”
उर्मट आवाजात तो बोलत होता.
तो स्वर ऐकून ती तडकली.
“एक मिनीट, तुम्ही जे कोण असाल ते असा पण एक सांगा
संगीता तुमची कोण लागते?”
“आम्ही एका ऑफीसमध्ये काम करतो.”
तो म्हणाला.
“अच्छा, म्हणजे तुम्ही फक्त तिच्या ऑफीसमध्ये काम करता, मग तुम्हाला कशाला पाहिजे या चांभारचौकशा,
तिला कोण कॉल करत आणि मेसेज करत?
कुणी कुणाला कॉल केले, मेसेज केले म्हणजे
काय लगेच तो तिच्या मागे लागला का?
आणि खरं सांगू का, तुमच्या बोलण्याच्या पद्धतीवरून मला असं वाटतं,
की तुमच्या दोघांचे काही तरी चालू आहे.
आणि म्हणून तुम्हाला माझ्या नवऱ्यावर संशय येतोय.”
“तसं काही नाही,”
तो म्हणाला खरा पण आता त्याच्या आवाजात जोर नव्हता.
“काही नाही तर कशाला इतके पझेसिव होताय, तेही दुसऱ्याच्या बायकोबद्दल?
आणि दुसरं एक सांगायचं राहिलं,
तुमच्या संगीताने माझ्या नवऱ्याकडून मागच्या वर्षी वीस हजार रूपये उसने घेतले होते,
मुलीची फी भरायला म्हणून.
ते जरा परत करायला सांगा.
ते सांगण्यासाठी माझा नवरा तिला कॉल, मेसेज करत होता.
पण तुमचा ॲटिट्यूड पाहून वाटतंय,
की मदनला, संगीताच्या नवऱ्याला, एक कॉल करावा मी समोरून.
अहो घाबरू नका,
फक्त पैसे परत मागायचे आहेत हो,
पण आता कमी जास्त बोललं गेलं तर सांभाळून घ्या.
हां, नाव काय म्हणालात तुमचं?
अजित ना.
ठीक आहे.”
“अहो मॅडम ऐका हो,
माझी खरंच चूक झाली.
तुमच्या मिस्टरांना मी असं बोलायला नको होतं.
कदाचित तुम्ही म्हणता तसे पैसे मागायला कॉल केला असेल.
पण तुम्ही संगीताच्या घरी नका कॉल करू.
आणि तुमचे पैसे मी लगेच दोन मिनीटात ट्रानस्फर करतो.”
आता तो गयावया करत होता,
मघाची गुर्मी पार उतरली होती.
फोन बंद करून सोफ्यावर टाकून तिने त्याच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला,
आणि बेडरूममध्ये निघून गेली.
तिच्या त्या नजरेनेच तो थंड पडला होता.
ती मात्र आपल्याला वेळेवर संगीताने पैसे घेतलेले आठवले या विचारात होती.
काहीसं आठवून तिने बाहेर येवून त्याला मोबाईल मागितला.
तो घेवून ईमेलमध्ये जावून त्याच्या फोनचे कस्टमाईज्ड बिल चेक करू लागली.
तो अजित सांगत होता ते खरं होतं.
रोज संध्याकाळी सहा वाजता संगीताचा इनकमिंग किंवा आउटगोइंग कॉल दिसत होता.
आणि प्रत्येक कॉल कमीतकमी अर्ध्या तासाचा होता.
म्हणजे मी घरी नसल्याचा असा गैरफायदा घेतला याने....
तिच्या मनात फसवले गेल्याची भावना निर्माण झाली.
चार दिवस तिने अबोला धरला,
त्याच्या सॉरीला उत्तर म्हणून त्याच्या तोंडावर दार लावले.
पण घरात दोघेच.
मग असे एकेएकटे किती दिवस राहणार!
मग हळूहळू ती फसवल्याची भावना बोथट झाली
आणि एक अलिप्तता वाटू लागली.
दोन-चार महिन्यात सगळं पहिल्यासारखं झालं.
म्हणजे निदान तसे वाटत होते खरे!
तो परत तिला रात्री थोपटू लागला,
तीही आधीसारखीच त्याच्या कुशीत शिरु लागली.
परंतु काही घटनांचे ठसे आपल्या मनावर असे काही उमटले असतात,
की वरकरणी ऑल इस गुड वाटत राहते पण खोलवर कुठेतरी त्या उद्रेकाचा लाव्हा धुमसत असतोच,
फक्त त्याचा ट्रिगर आपल्या नजरेपल्याड असतो...
जीवनाचे रहाटगाडगे वर खाली होत होते.
ती नेहमीप्रमाणे आपल्या सहकाऱ्यांमध्ये, घरकामामध्ये मन रमवायची आणि तो आपल्या कामामध्ये.
काहीच हैपनिंग नव्हते घडत,
आखलेल्या सरळ रेषेसम आयुष्य.
वर्षअखेर
म्हणजे कंपनीमध्ये वार्षिक गेटटूगेदर,
विथ फॅमिली.
छान नटुन थटून जायचं,
जोडीदाराबरोबर मिरवायचं.
तिला आवडायचा तो कार्यक्रम.
कारण माणसांमध्ये मिसळायला, बोलायला तिला खूप आवडायचं.
जरी तिने कधी मनातील ओठावर आणले नसले तरी तिचा मानसिक कोंडमारा होत होता.
म्हणून तर तो नोकरी करण्याचा हट्ट होता तिचा.
त्यानिमित्ताने का होईना, चार नवीन लोक भेटायचे.
आणि म्हणूनच कदाचित संसार अजून टिकून असावा.
तर त्याने तिला आधीच तारीख सांगून ठेवली होती.
तिने सुट्टी घेतली होती.
तिने छानसा वनपीस खरेदी केला.
ब्यूटीपार्लरला जावून आली.
ती काही अगदीच सौंदर्यपुतळी नव्हती,
पण रेखीव, आकर्षक नक्कीच होती.
चार लोक नक्की वळून पाहायचे तिच्याकडे.
शेवटी पार्टीचा दिवस उजाडला.
तिने नवा ड्रेस घातला,
पोटऱ्या झाकतील इतक्या लांबीचा काळा स्लीवलेस फ्राॅक,
त्यावर गुलाबी, चेरी ब्लाॅसमसारखी फुलं,
छातीवर डाव्या बाजूला थोडासा मोठा सॅटीनचा लाल गुलाब.
केसांचा बॉबकट,
साईडला भांग पाडून थोड्या केसांना चमचमती छोटी क्लिप लावलेली,
गुलाबी गोबरे गाल,
लहानसे नाक,
नाजूक ओठांवर लाल लिपस्टिक,
पायात एक इंच हिल्स असलेले बॅलेरिना शूज.
खांद्यावर मॅचिंग पर्स लटकवून ती त्याच्यासोबत बाहेर पडली.
तो रांगडा, ती नाजूक
आज तर सोळा -सतरा वर्षाची मुलगीच वाटत होती.
पार्टी छान रंगात आली होती.
लोकांसाठी निरनिराळे इव्हेंट्स आॅर्गनाइज केले गेले होते जसे
नेल आर्ट, टेम्पररी टॅटूईंग, मुलांसाठी जादूगाराचा कार्यक्रम, कराओके वगैरे.
ती भरभरून सगळं ऐंजाॅय करत होती.
त्याचे काही सहकारी तिच्या ओळखीचे होते तर काहींच्या त्याने आता ओळखी करून दिल्या होत्या.
ती खुर्चीवर बसून समोर चालू असलेला जादूचा कार्यक्रम बघत होती.
जादूगाराने प्रेक्षकांमधून दोन लोकांना स्टेजवर बोलावले,
तिला आणि एका तरुणाला.
दोघेही स्टेजवर गेले.
जादूगाराने तिच्या हातावर चाफ्याचे अत्तर लावले,
त्या तरुणाला दूर उभं करून.
तिच्या हातावर कपडा टाकून काही मंत्र पुटपुटल्यासारखे केले आणि त्याला स्वतःच्या हाताचा वास घ्यायला सांगितले.
त्या मुलाने तसे करताच त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटले.
“अरे माझ्या हाताला चाफ्याचा सुवास येतोय!”
तो उद्गारला.
लोकांनी टाळ्यांचा कडकडात केला आणि दोघे स्वयंसेवक स्टेजवरून खाली उतरले.
तिची आधीची खुर्ची कोणीतरी बळकावली होती म्हणून ती त्या मुलाच्या बाजूच्या खुर्चीवर जावून बसली.
त्याची तिच्याकडे नजर वळताच तिने स्मितहास्य केले.
“हाय, मी शैलेश.” तो म्हणाला.
“मी मान्यता.” तिने स्वतःचे नाव सांगितले.
तिने त्याच्याकडे नजर टाकली,
खूप देखणा होता तो.
जास्त कोणाशी बोलत नव्हता,
बहुतेक या कंपनीचा एम्प्लॉई नव्हता,
तिच्यासारखा कुणाचा तरी प्लस वन म्हणून आला असावा.
उरलेला पुर्ण कार्यक्रम त्यांनी एकत्रच पाहिला.
बुफेच्या क्यूमध्ये शैलेश तिच्या मागेच उभा होता.
आपली प्लेट घेवून ती नवऱ्याजवळ जावून बसली.
त्याचे काही सहकारीही त्याच टेबलावर येवून बसले.
सगळ्यांच्या गप्पा रंगल्या होत्या,
पण त्या कामाबद्दलच होत्या.
तिला त्या संभाषणात भाग घ्यायला वावच नव्हता.
शेवटी कंटाळून ती उठली आणि दूरच्या टेबलावर जावून बसली,
एकटी.
पाण्याच्या काऊंटरवर परत तिला शैलेश भेटला.
“हे if you don't mind, मी तुला फेसबुक रिक्वेस्ट पाठवू का?”
तिची नजर नवऱ्याकडे वळली.
तो आपल्याच नादात गप्पा मारत होता.
‘म्हणजे किती वेळ झाला तरी मी बाजूला नाही हे ही याच्या लक्षात येवू नये.’
तिरिमीरीत ती शैलेशकडे वळली.
“हो पाठव ना,”
गोड हसून तिने उत्तर दिले.
दोन मिनीटात आलेली रिक्वेस्ट तिने ऐक्सेप्ट पण करून टाकली.
पार्टी संपल्यावर घरी जाताना ती एकदम शांत होती.
पुढचे काही दिवस नव्हे महिनेही ती गप्पच होती.
आपलं काम उरकून आॅफिसला जाणे,
घरी आल्यावर यंत्रवत काम करणे.
अगदी गरज असेल तरच बोलायला तोंड उघडायची.
त्याच्या लक्षात हे आले पण याचा त्याला आनंदच झाला.
कारण तिच्यासारख्या धो धो बरसणाऱ्या घनाची त्याला थोडी भीतीच वाटायची.
ते संगीता प्रकरण घडल्यापासून त्याला तिच्या नजरेला नजर भिडवायची लाज वाटत होती.
पण त्याला वाटत होते तशी ती शांत, निर्लिप्त नव्हती झाली.
तर तिचा प्रवाह आता दुसरीकडे वळला होता.
आधी मनातील सगळ्या गोष्टी याच्यासोबत शेअर करायची,
तेव्हा शून्य प्रतिसाद मिळायचा.
आता त्याच गोष्टी शैलेशला ऐकवायची तर
तो तसल्याच अजून चार गोष्टी सांगायचा.
कधी कधी फक्त ऐकायची.
किती भारी वाटायचं तिला.
एक दिवस तिने शैलेशला संगीता प्रकरण सांगून टाकलं.
“बघ ना रे, कसा धोका दिला याने.
त्यांचे अफेअर होते बहुतेक.”
खिन्न होवून ती म्हणाली.
“आपलं दोघांचे आहे तसं?”
तो चटकन म्हणाला.
“ऐ काहीही काय बोलतोस,
मित्र आहोत आपण.”
बावरुन ती म्हणाली.
“का? आपणही तर दिवसभर फोनवर बोलत असतो, चॅटिंग करत असतो.”
“अरे आपले तसं काही नाही.”
तिने स्वतःचे म्हणणे पुढे रेटण्याचा प्रयत्न केला.
“हे बघ मनू, कसं आहे काय आहे ते फक्त आपल्या दोघांनाच माहीत आहे.
पण बाहेरून पाहणाऱ्याला तर हेच वाटेल,
की आपले अफेअर आहे.
फ्रँकली सांगायचे झाले तर मलाही आवडेल अफेअर करायला, तुझ्यासोबत.
पण जावू दे.” त्याच्या डोळ्यातील खट्याळ भाव तिला फोनवरूनही दिसले...
“तर मनू, फोनवर तासनतास बोलणे, चॅट करणे, मनातील गोष्टी एखाद्यासोबत शेअर करणे या गोष्टी अफेअर असल्याच्या ठोस पुरावा नाहीत.
तू तुझं मन माझ्याजवळ मोकळं करतेस,
तोही तसंच करतो असं समजायला काय हरकत आहे.
मी तुझा हक्काचा मित्र आहे,
मग त्याला एखादी मैत्रिण असली तर काय हरकत आहे.”
“तू त्याला संशयाचा फायदा देतो आहेस असं नाही वाटत तुला, शैलू?”
किंचित रागावून तिने विचारले.
“हवं तर तसंच समज...
ठीक आहे तुझ्या समाधानासाठी एक क्षण आपण असं समजू त्यांच्यात काहीतरी होतं.
मग तो ते लपवूही शकला असता,
पण त्याने तसे केले नाही.
सरळ तुझ्या हातात मोबाईल दिली,
चेक करण्यासाठी.
त्यानंतर किंवा त्याआधी त्याची वागणूक बदलली होती का?
तुझ्या वाट्याचे प्रेम कुणा दुसऱ्याला देत असल्याचे जाणवले तुला,
तो कॉल येईपर्यंत?”
“नाही, कधीच नाही.
पण आता तर तो जास्तच शांत झाला आहे.
आधी थोडा तरी बोलायचा,
आता ते ही नाही.
कदाचित मी ही बदलली आहे,
पहिल्यासारखी ओढ वाटत नाही मला.
मला असं वाटतंय मी त्याला मनातून माफ केलेच नाही.”
विचार करून तिने उत्तर दिले.
“एग्झॅटली मनू,
त्याने चूक केली हे गृहीत धरले तरी त्याने ती चूक सुधारली आहे असे दिसते.
पण तू त्यातून इमोशनली बाहेर यायला तयार नाहीस.
एकदा, फक्त एकदा मनाला विचार,
तू तरी काय वेगळं करत आहेस?
त्याला शह देण्यासाठी तर माझ्याशी मैत्री केली नाहीस ना?
जर तसं असेल तर अजून वेळ आहे तुला सावरायला.
मी काही साधूसंत नाही जो तुझ्या मोहात पडणार नाही,
अन् फॅक्ट आय ॲम आॅल रेडी अन् इट.
तरीही मी तुला एकदा तुझ्या नवऱ्याला संधी देण्यास सांगतो आहे,
कारण मला वाटत जरी तो तुझ्यासारखा नसला तरी तुझ्यासाठीच बनला आहे.
दुसऱ्याला दुःखात लोटून माणूस कधीही सुखी होत नाही.
म्हणून सध्या तरी हे फक्त माझ्या बाजूने आहे
तेव्हाच सावरू आपण.
एकदा जर गोष्टी हाताबाहेर गेल्या की अवघड होईल सगळं.
म्हणून तू खरंच त्याच्या बाजूने विचार कर.
मेबी तू साप म्हणून भुई थोपटत असशील.”
विषयाला अतिशय गंभीर वळण मिळाले होते.
काही न बोलता तिने फोन ठेवला.
तब्बल दोन दिवस ती शैलेशच्या बोलण्याचा विचार करत होती.
नेहमीचे रूटीन तर चालूच होते.
ती नव्याने त्याला न्याहाळत होती.
येस, तो तसाच होता.
अगदी लग्न झाले तेव्हासारखा.
बदलली तर ती होती.
मनाच्या खोल तळाशी राग दडवून बसली होती....
शैलेशचा विचार करता तिला जाणवले,
तो म्हणतो तसं तिने नवऱ्यावरील रागानेच तिने त्याच्यासोबत मैत्री केली होती.
‘बापरे,
किती मोठा धोका होता त्यात.
जर हा शैलेश वाईट असता तर...’
आजकाल असे कित्येक किस्से ऐकायला येतात.
असा विचार मनात येताच अंतर्बाह्य थरारली ती.
‘मलाही शैलेश आवडतो,
नाही...
मला त्याचे बोलणे आवडते,
माझे बोलणे ऐकून घेणे आवडते.
आमची दोघांची वेवलेंग्थ जुळते.
कदाचित त्याच्या आकर्षक व्यक्तीमत्वाचीही मला भुरळ पडली असावी.
पण प्रेम?
छे! कदापि नाही.
कारण...
कारण नवरा भलेही सिद्ध करू शकत नसला तरी त्याचे माझ्यावर जीवापाड प्रेम आहे.’
रात्रीच्या अंधारात पाठमोऱ्या नवऱ्याकडे पाहत ती विचार करत होती.
पहाट होत आली होती तरीही हे विचार निद्रेला पापण्यांच्या जवळही फिरकू देत नव्हते.
वैतागून तिने कूस बदलली.
त्याला बहुतेक ते जाणवले असावे.
वळून त्याने तिच्या डोक्यावर थोपटले.
“का गं मनू झोप येत नाही का?”
काळजीने त्याने विचारले.
“नाही रे,”
त्याने हात लांब केला.
मनू हळूच त्याच्या कुशीत शिरली.
तो तिला हळुवारपणे थोपटू लागला.
‘शैलेश बरोबर सांगत होता.’
झोप लागण्याआधी तिच्या मनात शेवटचा विचार उमटला.
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे तिने शैलेशला कॉल केला.
“शैलू, तू बरोबर होतास.
आपण थांबू इथेच,
खूप उशीर होण्याआधी.
मला तू एक मित्र म्हणून आवडतोसच.
पण हे आवडणं जास्त पुढे जावू नये म्हणून
काही निर्णय घेतलेच पाहिजेत.
आपण टचमध्ये राहूच,
हो कारण तुझ्याशिवाय दुसरा कोण आहे माझा व्हेंटिंग कॉर्नर.
प्रत्येकाला गरज असते ना,
आपलं मन मोकळं करण्याची.
मग इतका छान मित्र कुठून मिळेल मला?”
कातर आवाजात ती म्हणाली.
“हो गं बाई,
आणि सगळे माझ्यासारखे निरागस, सद्गुणी थोडेच असतात.”
ताण कमी करण्यासाठी त्याने विनोद करण्याचा प्रयत्न केला.
“मनू आय ऐम हैपी
तुला नेमकं काय करायला हवं याची जाणीव झाली.
तू म्हणतेस तसे राहू आपण कॉंटैक्टमध्ये.
मी करेन तुला कॉल,
पण रोज नाही तर महिन्या दोन महिन्यातून एकदा.
तोपर्यंत आपल्याकडे बोलायलाही खूप काही असेल, नाही का?
मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे.
काळजी घे.”
किती पटकन संपलं हे सगळं,
अगदी स्वप्नवत...
तिला मात्र समजलं होतं,
तिचा राजकुमार मात्र तिचा नवराच होता,
आणि शैलेश फक्त एक चांगला मित्र.
काही गोष्टी वेळेवरच सावरलेल्या आणि समजून घेतलेल्या चांगल्या असतात,
हो ना...
समाप्त
Copyright ©️ Savita Kirnale