फसलेला मेकअप आणि उमजलेले प्रेम

 फसलेला मेकअप आणि उमजलेले प्रेम

लेखिका – सविता किरनाळे 


आज सखीला पाहायला पाहुणे येणार होते. घरात सगळ्यांची एकच लगबग चालू होती. आई ठेवणीतील क्रोकरी सेटला पुसून स्वच्छ करत होती. स्वयंपाकाच्या मावशी पोहे आणि शिरा बनवण्याची तयारी करत होत्या. भाऊ सोफा कव्हर, टेबल क्लॉथ, फुलदाणीमधील फुलं पुन्हा पुन्हा नीट करत होता. आजोबा आरामखुर्चीत पेपर वाचत बसले होते तर बाबा गॅलरीतून घरात सारख्या फेऱ्या मारत होते. एकटी आजी मात्र शांतपणे होणारी धावपळ पाहत भिंतीला टेकून बसली होती.



 सगळं काही व्यवस्थित असल्याची खात्री पटल्यावर सर्व सदस्य डायनिंग टेबलाच्या खुर्च्यांवर विसावले. तसे पाहुणे कुणी परके नव्हते तर सखीच्या आईच्या बालमैत्रिणीचा मुलगाच होता. दोन्ही कुटुंबात चांगला घरोबा होता. पण त्याचे नात्यात रूपांतर होणार म्हणून मनात किंचीत धाकधूक होती आणि त्याचेच फलित म्हणून ही धावपळ चालू होती. सखी तर कधीपासून आरश्यासमोर बसली होती ती उठायचं नावच घेत नव्हती. शेवटी आजीला ते पाहून कंटाळा आला.



"अगं बस की बाई आता ती रंगरंगोटी. किती म्हणून करशील. जास्त केलंस तर नीलिमा आल्या पावली लेकाला घेवून पळून जाईल."



"काय ग आजी, रंगरंगोटी काय म्हणतेस... मेकअप म्हण ना." नाक मुरडत सखी म्हणाली आणि लगेच तिने उत्सुकतेने विचारले, 

"तू कधी मेकअप केला आहेस का ग आजी?"



सखीचा प्रश्न ऐकून आजोबा जोरजोरात हसायला लागले. आजीने आधी डोळे मोठे करून त्यांच्याकडे पाहिले आणि नंतर तीही त्यांच्या हसण्यात सामील झाली.


"असे का हसताय तुम्ही दोघं? आम्हाला पण सांगा ना." सखी हट्ट करू लागली. 


आजी सांगू लागली. 

"माझं माहेर अगदीच खेडेगाव होतं. तिथे ना दुकान न बाजार. शिवाय चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले. उन्हाळ्यात झळा तर पावसाळ्यात चिखलराडा. थंडीच्या दिवसांत तर डोंगरावरून गार वारा असा भणणायचा की सगळं अंग उलून निघायचं. अशा वातावरणात त्वचेची नुसती वाट लागून जायची. भरीस भर शेताला जाणे, गावभर हुंदाडणे यातून स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच मिळायचा नाही. माझी आई दिसायला छान होती तर वडील काळे, धिप्पाड शेतकरी. मी वडिलांचा सावळा रंग आणि आईचे कुरळे केस घेतले. विचार कर, पिंजारलेले केस आणि ओबधोबड रूप हे असले माझे ध्यान कसे दिसत असेल."



"थोडी समज येऊ लागली तेव्हा आईने बाजूला बसवून व्यवस्थित, टापटीप राहण्याचे महत्व पटवून दिले. ती रोज माझ्या केसांना तेल लावून घट्ट दोन वेण्या बांधून देऊ लागली. अंघोळ झाल्यावर अंगाला तेलाचं बोट लाव म्हणून मागे लागू लागली. त्याचाच परिणाम म्हणून मी थोडी माणसात आले. आईच्या हाताखाली काम केल्याने गृहकर्तव्यदक्ष का काय ते पण झाले. थोडं फार लिहिता वाचता येत होतं. येवढ्या भांडवलावर तुझ्या आजोबांनी मला पसंत केलं."



"खरं तर यांच्या समोर मी दिसायला कुठेच नव्हते. हे पोलिसात असल्याने उंचेपुरे, रुबाबदार होते. शहरी वातावरणात राहिल्याने, योग्य आहार, स्वतःची नीट काळजी घेणे यामुळे टापटीप आणि सुदृढ होते. तुलनेत मी अगदीच बावळट, गावंढळ वाटायची. माझा तर विश्वास बसायचा नाही कितीतरी दिवस की यांनी मला पसंत केलंय आणि आमचं लग्न झालंय. त्याकाळी घरचे वातावरण ही आजच्या सारखे मोकळे नव्हते. एका घरात राहूनही लग्नानंतर चार दिवस एकमेकांचे तोंड नव्हतं पाहिलं आम्ही."



"आठवडाभराने आम्ही वसईला म्हणजे यांच्या नोकरीच्या ठिकाणी आलो. राहायला क्वार्टर मिळाली होतीच. माझ्यासोबत आई आली होती महिनाभरासाठी. तिच्या मदतीने मी घर लावले. आई गेल्यावर करमेनासे झाले. यांचे कामाचे तास ही काही फिक्स नसायचे. एकटीला घर खायला उठायचं. मग हळूहळू आजूबाजूच्या बायका ओळखीच्या झाल्या. दुपारी गप्पागोष्टी, शिवणटिपण यात वेळ जाऊ लागला. मी अजूनही तशीच अजागळासारखी राहायची. कधी बाहेर खरेदीला वगैरे गेल्यावर फ्रॉक घातलेल्या, केस कापलेल्या, छान मेकअप करून फिरणाऱ्या ख्रिश्चन बायका दिसायच्या.


 रविवारी सकाळी तर त्यांचे जत्थॆच्या जत्थे चर्चमध्ये जाताना येताना दिसत. ते पाहून मला स्वतःच्या रुपाबद्दल अजूनच वाईट वाटायचे. मग मी थोडं घाबरतच यांना विचारायची, "तुम्ही हे लग्न राजीखुशीने केलंय की कुणाचा दबावाखाली येऊन?"



"मग आजोबा काय म्हणायचे?" सखीला कुतूहल वाटले.



"कधी हो राजीखुशीने झालंय म्हणायचे तर कधी चक्क दुर्लक्ष करायचे. तो जमानाही असा की स्वतःच्या नवऱ्याबरोबर एखादा शब्द जास्त बोलायचं म्हणजे भीती वाटायची आणि नवरेही कधी पुढाकार घेऊन बायकांसोबत मोकळेपणाने बोलणे, अवांतर गप्पा मारणे असं काही करत नसत. हां म्हणजे प्रेम नव्हतं असं नाही पण ते व्यक्त करायला जमत नसे. आमचे हे रोजचं घरी येताना गजरा आणत पण तो कधी स्वतःच्या हाताने माळत नसत किंवा माळलेला पाहिल्यावर कौतुक करत नसत."



"एकदिवस दुपारी शेजारणीबरोबर गप्पा मारत बसली असताना तिने एक किस्सा सांगितला. तिच्या मामाची मुलगी  परत माहेरी आली होती म्हणे कायमची. कारण काय तर तिच्या नवऱ्याला ती आवडत नव्हती. शेजारीण सांगत होती, की दिसायला जरा दोन नंबरच आहे ताई पण बाकी गोष्टीत एक नंबर आहे. लग्न होवून चार वर्षे झाली आणि आता त्याला समजलं बायको सुंदर नाही म्हणून.... मला जाम भीती वाटायला लागली. मग मी ही यांचं लक्ष वेधून घेण्याचं ठरवलं नाहीतर माझा नवराही कुणी देखण्या बाईने पळवला तर..."



"सुंदर दिसण्यासाठी काय करावं याचा मी विचार करु लागेल. त्याकाळी आतासारखी बघेल तिकडे ब्युटीपार्लर वगैरे नसायची आणि असली तरी चांगल्या घरातल्या मुली मेकअप वगैरे करायला तिकडे फिरकत नसत. ते मुलीचं लक्षण चांगलं नसल्याचं प्रतीक मानलं जायचं. मेकअप म्हणजे स्वच्छ साबणाने तोंड धुवायचं, आणि कपाळावर मेणावर लालभडक कुंकू लावायचं.  एकच पावडर आपली - मीना खाकी पावडर ती असली तर चिमुटभर लावायची नाहीतर नाही. बाकी ते तुम्ही लावता ना हल्ली ओठाला वेगळं, डोळ्याला वेगळं आणि तोंडाला वेगळं असलं काही नाही. मग मी सुंदर दिसायला काय केलं असेल?" आजीने एक पॉज घेतला. 



"आठवडी बाजारात एक माणूस केसांना लावायच्या पिना, रिबिनी, चेहऱ्याला लावायच्या पावडरचे डबे, ओठाला लावायच्या लाल कांड्या वगैरे बायकांचं सामान घेवून बसायचा. मी त्या दिवशी बाजारात गेल्या गेल्या कुणी ओळखीचं बघत नाही असं बघून एक लाल कांडी आणि काही पिना घेतल्या. घरी आल्यावर गुपचूप त्या वस्तू साड्यांच्या खाली ठेवून दिल्या. आता मी वाट पाहू लागले योग्य संधीची. तब्बल आठवड्याने मला ती संधी मिळाली. हे कामानिमित्त चार दिवसांसाठी बाहेरगावी जाणार होते. घरी येताच त्यांना मी आश्चर्याचा धक्का देणार होते."



आता आजोबा परत हसायला लागले. "आश्चर्याचा? मला तर वेगळाच धक्का बसला हिला पाहून!" ते उद्गारले.



"थांबा हो तुम्ही, मला आधी पुर्ण कथा सांगू तर द्या." आजी परत सांगू लागली.



"हां तर मला माहीत होतं हे कुठल्या वेळेस परतणार ते. मी सलग दोन दिवस रिठ्याने केस धुतले. त्यामुळे केसातील सगळं तेल निघून गेलं. सगळं घरकाम आवरून, यांचा आवडता स्वयंपाक बनवून मी फुलाफुलाची फॅन्सी साडी नेसले."



"रंग सांग ना साडीचा!" इति आजोबा



"पोपटी होता रंग... साडी नेसून चेहऱ्याला थोडी जास्त पावडर लावली. बाजारातून आणलेली लाल कांडी ओठावरून फिरवली. केस फक्त कानाच्या दोन्ही बाजूला पिना लावून वर डकवलॆ. आणि मी तयार झाले यांची कौतुक भरली नजर झेलायला... आता पुढचं आजोबा सांगतील." आजीने चेंडू आजोबांच्या कोर्टात सरकवला.



"मी त्या दिवशी थोडा लवकर घरी आलो. म्हणजे तसं सांगुनच गेलो होतो. घरी येवून पाहिलं तर पुढचं दार उघडं होतं. आत येवून नेहमीप्रमाणे ते लावलं. रोज दाराचा आवाज ऐकून ही पाण्याचा ग्लास घेवून बाहेर यायची. आज आली नाही म्हणून आत डोकावून पाहिलं तर ती स्वयंपाकघरात नव्हती. मी मग झोपायच्या खोलीत गेलो. ही पाठमोरी खिडकीजवळ उभी होती. माझी चाहूल लागून ही मागे वळली आणि मला हार्ट अटॅकच आला.  इतका शूर शिपाई मी पण चक्क तोंडून किंकाळी निघाली. समोरच ध्यान होतंच इतकं भयानक."



"गडद पोपटी साडी, पिंजारलेले केस, सावळ्या अंगावर पांढरा चेहरा आणि लालभडक, ओठाच्या कडातून बाहेर येणारी लिपस्टिक.... बाबा परमेश्वरा... मला घाबरलेला पाहून ही पुढे आली. मला ओळख पटली. अग काय करून घेतलं तू? मी तिच्यावर ओरडलो. ते पाहून बाईसाहेब रडायला लागल्या.


"का मी छान दिसत नाही का? तुम्ही माझं कौतुक करावं म्हणून मी इतक्या मेहनतीने तयार झाले आणि तुम्ही उलट मला रागावताय."



"तिचं रडणं पाहून मला काही सुधरेनासे झाले. मी तिला जवळ घेतलं आणि समजूत घालू लागलो. बऱ्याच वेळाने मला त्यात यश आले आणि ही तोंड धुवायला निघून गेली. तेव्हा कुठे मी सुटकेचा निःश्वास सोडला."



"आजी असं काय सांगितलं ग आजोबांनी?" सखीला कुतूहल वाटत होते.



"खरंतर चुक माझीच होती ग, कावळ्याने बदकाची पंख लावली म्हणून तो बदक होत नाही. उगाच दुसऱ्या बायकांचं पाहून मीही मेकअप करायला गेले. आधीच त्यातलं काही ओ का ठो माहीत नाही आणि स्वस्तातलं सामान, ते कसं वापरायचं काही पत्ता नाही....


 अगदीच फसला माझा मेकअप. यांनी सांगितलं, मी समजते तशी दिसायला एकदम वाईट नाही. उलट माझे नीट चोपून विंचरलेले केस, कपाळावर लावलेल्या कुंकवाने मी अजून सुंदर दिसते. फक्त गोरा रंग म्हणजे सौंदर्य नव्हे तर सोज्वळ रूप आणि उत्तम गुण म्हणजे सौंदर्य. त्या दिवशी पहिल्यांदा त्यांनी मला त्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे ते सांगितलं आणि मला ते जाणवलं ही. तर बेटा, माझ्या फसलेल्या मेकअपमुळे मला यांचं प्रेम उमगलं."



 आजीने समारोप केला. तेवढ्यात खालून गाडीचा हॉर्न ऐकू आला. "आले वाटतं पाहुणे" म्हणत सगळे जागेवरून उठले आणि सखी पुन्हा टच अप करण्यासाठी ड्रेसिंग टेबलसमोर जाऊन बसली. ते पाहून आजीने डोक्याला हात लावला आणि घर हास्यकल्लोळात बुडाले.


समाप्त 


#शब्दचाफा 


Post a Comment (0)
Previous Post Next Post