कभी अलविदा ना कहना
लेखिका – सविता किरनाळे
पहाटेचे चार वाजले होते. मुग्धा आणि सौरभ घरी जात होते. मुग्धा कार चालवत होती. एफएम वर सुंदर, नॉस्टलॉजिक करणारी गाणी लागली होती. रेडिओबरोबरच मुग्धाही गात होती. पहाटेची थंड हवा, शांतता याचा परिणाम म्हणून मुग्धा छान, तरल मूडमध्ये होती तर सौरभ चिडक्या.
त्याला कारणही तसेच होते. ते दोघे भल्या पहाटे एका गाण्याच्या मैफिलीवरून येत होते. सौरभला हे गाणं, संगीत वगैरेमध्ये फारसा रस नव्हता. याउलट या गोष्टी मुग्धाच्या जीव की प्राण होत्या. आताही ती अजून मनाने मैफिलिमध्येच हरवली होती तर शनिवारची रात्र फुकट गेली म्हणून सौरभ चिडचिड करत होता. पण त्याला नाइलाजाने का होईना बायकोबरोबर जावावे लागे कारण या मैफिली रात्री उशिरापर्यंत असत. मग मुग्धा एकटी कशी घरी येईल. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर फक्त कंटेनरची वर्दळ होती. बाकी गाड्या अगदी तुरळक होत्या.
"या वेळेस नसतो गेलो तर चाललं असतं ना. काय गरज आहे प्रत्येक कार्यक्रम अटेंड करायची. मला कंटाळा येतो यार. ते गाड्या बरोबरच नाळ्याची जत्रा असं होतंय माझं."
"असं का म्हणतोय. आठवड्याचे पाच दिवस तर आपण कामातच असतो मग एक दिवस आपली आवड जोपासली तर काय होतं. आयुष्यात याच आठवणी राहतात." रस्त्यावर नजर रोखून मुग्धाने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला.
"हो पण ही तुझी आवड आहे, माझी नाही."
"ठीक आहे तर मग, यापुढे तू नको येत जाऊ सोबत. माझं मी येत जाईन." शांतपणे त्याला उत्तर देत ती एफएम बरोबर गाऊ लागली.
चलते चलते मेरे ये गीत याद रखना
कभी अलविदा ना कहना
कभी अलविदा ना कहना...
वैतागलेला सौरभ गप्पच बसला. रागाच्या भरात त्याचे मुग्धाकडे लक्षच नव्हते. मैफीलीसाठी नेसलेली अबोली रंगाची साडी, स्लीवलेस ब्लाऊज आणि केसांवर माळलेला मोगऱ्याचा गजरा. खूप सुंदर दिसत होती ती. गाण्याचा तालावर स्टिरींग व्हीलवर तिची बोटं नाजूकपणे टॅप करत होती.
बीच राह में दिलबर, बिछड जाये कहीं हम अगर
और सूनी से लगे तुम्हे, जीवन की यें डगर
हम लौट आयेंगे, तुम यूहीं बुलाते रहना
कभी अलविदा ना कहना
सौरभचा हात धरत मुग्धा गात होती. एक क्षणभर तिची नजर रस्त्यावरून ढळली आणि रस्ता ओलांडणारा कंटेनर रोरावत कारला उडवून उद्दामपणे पुढे निघून गेला. कार उलटी पलटी होत रस्त्याच्या कडेला फेकली गेली. सौरभची शुध्द हरपली. त्याही अवस्थेत मुग्धाचे काय झाले असेल हा विचार त्याच्या मनात डोकावला.
डोळे उघडले तेव्हा सौरभ दवाखान्यात होता. डोक्याला बँडेज आणि हात पाय प्लॅस्टरमध्ये.
"ओह, शुध्द आली तुम्हाला." एक मृदू आवाज कानावर पडला. ती पोक्तवयीन नर्स डॉक्टरांना बोलवायला गेली.
डॉक्टर आल्यावर सौरभने पहिला प्रश्न केला,
"मुग्धा.... माझी बायको मुग्धा कशी आहे? कुठे आहे ती?"
"आधी तुम्ही बरे व्हा मिस्टर मग इतर गोष्टी बोलता येतील. अहो, तीन दिवसांपासून बेशुध्द आहात तुम्ही... सो डोन्ट थिंक अबाऊट एनिथींग अँड गेट वेल सून." त्याच्या पापण्या उचलून डोळे तपासत डॉक्टर म्हणाले.
सौरभच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
चार पाच दिवसांत त्याला बरं वाटायला लागले. आणि आठवडाभराने डिस्चार्ज मिळू शकेल इतपत त्याची परिस्थिती सुधारली.
एक दिवस डॉक्टर त्याच्या बाजूच्या खुर्चीवर बसून काही तरी सांगण्यासाठी शब्द जुळवू लागेल.
"मिस्टर सौरभ, तुम्ही आता बरे झाले आहेत. जेव्हा तुम्हाला इथे आणले गेले तेव्हा एक्सटर्नलपेक्षा इंटर्नल डॅमेज जास्त होतं. तुम्ही शुद्धीवर येणं गरजेचं होतं नाहीतर तुम्ही कोमात जाऊ शकला असता. तुमच्या सुदैवाने तिसऱ्या दिवशी तुम्ही शुद्धीवर आलात आणि धोका टळला. पण तुमच्या मिसेस इतक्या सुदैवी नव्हत्या. त्या कोमात गेल्या आहेत."
"ती बरी होण्याचे किती चान्सेस आहेत?"
"काही सांगू शकत नाही. कोणत्याही अपघातानंतर सुरुवातीचा काळ गोल्डन अवर समजला जातो. जर या कालावधीत उपचार मिळाले तर अनेक कम्प्लिकेशन्स टाळता येतात. पण that was not the case with you people. तुम्हाला भरती केलं तेव्हा ती वेळ टळून गेली होती. त्यातून ड्रायव्हर सीटवर असल्याने मुग्धाला जोरदार मार लागला होता.त्याचा परिणाम म्हणून मुग्धा कोमात गेलीय."
"ठीक आहे, तुम्ही उपचार चालू ठेवा. I am sure, she will come out of it." वरकरणी शांतपणे सौरभने विश्वास व्यक्त केला. मनातून मात्र तो धास्तावला होता.
मग सुरु झाली एक लढाई. सौरभ रोज हॉस्पिटलला येई. दिवसभर मुग्धाच्या बाजूला बसे. तिच्याशी गप्पा मारे. ती धडधाकट असताना जेवढ्या गप्पा मारल्या नसतील तेवढ्या आता तो मारत असे. दिवस, आठवडा आणि महिने लोटले पण मुग्धाची स्थिती तशीच होती. सुदैवाने आर्थिक परिस्थिती बरी असल्याने सौरभला दवाखान्याचा खर्च झेपत होता.
एक दिवस सहज म्हणून सौरभने मुग्धाचा फोन चालू केला तर काही सेकंदात हजारो मेसेज येवून धडकले. बरेचसे गाण्याच्या मैफिलीत ओळख झालेल्या लोकांचे होते. सौरभ मनापासून अशा ठिकाणी रमायचा नाही म्हणून त्याची कोणासोबत फोन नंबरची देवाणघेवाण करण्याइतपत ओळख नव्हती. म्हणूनच या लोकांना मुग्धाचा अपघात झाल्याची माहिती नसावी.
काही वेळाने मुग्धाच्या फोनवर कॉल आला. सौरभने तो रिसिव्ह करून मुग्धाच्या अपघाताची माहिती त्या व्यक्तीला दिली. ती व्यक्ती म्हणजे हेरंब साठे. सगळं ऐकून घेऊन हेरंब म्हणाले, "मिस्टर सौरभ, कदाचित तुम्हाला माझं बोलणं पटणार नाही. तुम्ही मुग्धाला शुद्धीवर आणण्यासाठी इतके प्रयत्न करताय तर मी एक सुचवू का? नाही म्हणजे जरा dramatic वाटेल पण... करून बघायला काय हरकत आहे?"
"नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला साठे?" त्याच्या या भल्या मोठ्या प्रस्तावनेने किंचीत त्रासून सौरभने विचारले.
"मुग्धाला गाणी, मैफिली वगैरेची किती आवड होती याची मी तुम्हाला आठवण करून देत नाही. इन फॅक्ट तुमच्या म्हणण्याप्रमाणे जेव्हा अपघात झाला तेव्हाही ती गाणंच गात होती. तर आपण एक लहानशी, म्हणजे फक्त तुम्ही, मी आणि माझी बायको अशी मैफिल करु या का तिच्यासाठी? तिची खोली वेगळी आहे तर इतर पेशंटना त्रास होणार नाही."
"साठे, तुमच्या आवाजावरून तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे वाटताय. पण तरीही मी विचारतोय, तुमचं डोकं ठिकाणावर तर आहे ना? अहो माझी बायको कोमात गेलीय. गेले कित्येक महिने डॉक्टरांनी तिला कसं बसं जिवंत ठेवलंय. मी वाट बघतोय, ती बरी होण्याची. आणि तुम्ही तिच्यासमोर मैफील जमवायची सूचना देताय. मान्य आहे की संगीत, गाणे म्हणजे तिचा श्वास आहे. पण गाणं ऐकल्याने ती शुद्धीवर येईल असे म्हणणे मूर्खपणा आहे. अशा गोष्टी फक्त आणि फक्त परिकथांमध्ये आणि चित्रपटात घडतात. प्रत्यक्षात नाही." सौरभ रागाने लालबुंद झाला होता.
"शांत व्हा गोखले, मी काही आता लगेच तंबोरा घेऊन येत नाही आहे. मी फक्त एक प्रस्ताव मांडला. पण एक विनंती आहे, तुम्ही म्युझिक थेरपीबद्दल ऐकले नसेल तर थोडी माहिती मिळवा. हवं तर तुमच्या डॉक्टरांशी बोला. कधीही कुठल्याही प्रकारची मदत लागली तर जरुर संपर्क करा. मुग्धा मला मुलीसारखी आहे, ती लवकर बरी होवो हीच सदिच्छा." हेरंब साठेंनी फोन ठेवला होता.
थोड्या वेळाने डोकं शांत झाल्यावर सौरभ त्यांच्या बोलण्याचा विचार करू लागला. त्याने इंटरनेटवर म्युझिक थेरपीची माहिती मिळवायला सुरूवात केली. या विषयावर देशविदेशात अनेक प्रयोग झाले असल्याचे त्याला समजले. अनेक वेबसाइटवर आर्टिकल वाचून प्राणी, पक्षी आणि वनस्पतींवर मंद संगीताचा सकारात्मक परिणाम होतो हे समजले. मग मनाशी काही ठरवून सौरभने मुग्धावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांची भेट घेतली. त्यांना आपली कल्पना सांगितली.
"तुम्ही म्हणताय ते काही अंशी सत्य आहे मिस्टर गोखले. असे प्रयोग परदेशात झालेले आहेत. मी स्वतः कधी तसे प्रयत्न केले नाहीत. पण आता या केसमध्ये करायला काही हरकत नाही असे मला वाटते. आपण मंद आवाजात शांत संगीत लावून ठेवू त्यांच्या खोलीत आणि मॉनिटर करू. पाहू काय रिझल्ट येतो. पण एक गोष्ट आधीच सांगून ठेवतो, हा फक्त एक प्रयोग असेल. यशस्वी होईलच याची खात्री ठेवू नका. थोडं वाईट वाटेल पण या बाबतीत तुम्ही थोडं प्रॅक्टिकल राहावं असं माझं मत आहे."
प्रयोग सुरु झाला. खोलीत मंद आवाजात इन्स्ट्रूमेंटेेल संगीत लावून ठेवण्यात येऊ लागले. सुरुवातीला उत्साही असणारा सौरभ हळूहळू निराशेकडे वळू लागला. काही महिने गेले आणि मुग्धाला मॉनिटर करणाऱ्या डॉक्टरांना किंचीत आशेचा किरण दिसू लागला. पण त्यांनी खात्री करून सौरभला सांगण्याचे ठरवले.
एक दिवस मुग्धाच्या बाजूला बसून लॅपटॉपवर काम करताना सौरभने जुनी गाणी लावली. सहजच त्याचे लक्ष तिच्या चेहऱ्याकडे गेले तर तिच्या ओठांचे कोपरे हसण्यासाठी किंचीत वर गेल्यासारखे त्याला वाटले. पटकन उठून तो डॉक्टरांना बोलावण्यासाठी धावला.
"हो, या प्रतिसाद देत आहेत. गेल्या काही दिवसांपासून माझ्या हे लक्षात आलं होतं. आज तुलनेने बरीच सुधारणा दिसतेय." तपासणी करून झाल्यावर डॉक्टरांनी कन्फर्म केलं.
मुग्धाची बातमी ऐकून हॉस्पिटलमध्ये आनंदाची लहर पसरली. महिनोनमहिने कोमात असलेला पेशंट बरा होणे ही खरंच एक वेगळी गोष्ट असते.
त्या रात्री सौरभने हेरंब साठेंना कॉल केला.
"मी तुमची माफी मागायला कॉल केला आहे. मागच्या वेळेस आपलं बोलणं झालं तेव्हा मी तुमचं म्हणणं धुडकावून लावले होते. पण बॅक ऑफ दी माईंड विचार चालू होता. शेवटी डॉक्टरांचा सल्ला घेऊन मी तो प्रयोग सुरु केला. आणि... आणि मुग्धाने प्रतिसाद दिला." सौरभचा आवाज भावनावेगाने थरथरत होता.
"अभिनंदन, ती लवकर बरी होवो." साठे म्हणाले.
"मी काय म्हणतो, आपण खरंच ती मैफिल करु या का? मी डॉक्टरांची परवानगी घेईन."
हो ना करत डॉक्टरांनी परवानगी दिली. हेरंब साठे, त्यांची पत्नी आणि सौरभ. साठे दांपत्याने सोबत गाण्यांचे म्युझिकल ट्रॅक रेकॉर्ड करून आणले होते. मैफिल सुरु झाली. किशोर कुमार, रफी, लता दीदीची एकापेक्षा एक सुंदर गाणी ते दोघे गात होते. सौरभही नकळत त्यात गुंतला होता. अचानक त्याच्या मनात काय आले कुणास ठाऊक, एक गाणं मी ही गाणार अशी त्याने घोषणा केली.
चलते चलते, मेरे ये गीत याद रखना
कभी अलविदा ना कहना...
दाटल्या गळ्याने सौरभ गात होता.
बीच राह में दिलबर, बिछड जाये कहीं हम अगर
और सूनी से लगे तुम्हे, जीवन की यें डगर
हम लौट आयेंगे, तुम यूहीं बुलाते रहना
कभी अलविदा ना कहना...
आणि अचानक चमत्कार घडल्याप्रमाणे मुग्धाच्या बोटांची किंचीत हालचाल झाली. कुणाचाच स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. अखेर सौरभची हाक ऐकून मुग्धा परत आली होती.
समाप्त
सूचना : ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे याची नोंद घ्यावी. वास्तवात असे होईल की नाही याची मला कल्पना नाही. पण म्युझिक थेरपीबद्दल वाचल्यावर हे कथाबीज सुचले ज्याचा विस्तार करताना लेखन स्वातंत्र्य घेतले आहे.