आक्रित

 आक्रीत 

✍️ मिलिंद अष्टपुत्रे 

फोटोवर क्लिक करून पाहा एक सुंदर कथा परीक्षा संपली आणि गावाकडे जायचे वेध लागले. वर्षभराची तपश्चर्या संपून सुखाची चाहूल लागली आणि गावाकडच्या आठवणींनी अंगावर रोमांच उठू लागले. खरंच ! काही माणसं फार सुखी असतात. वर्षानुवर्षे आपल्या माणसातच रहात असतात उदाहरणार्थ भैरू ! गावाकडला माझा जीवलग सखा ! मी मात्र सुट्टीच्या दोन महिन्यांसाठी वर्षभर इकडे शहरात झुरत असतो. इथल्या कृत्रिम झगमगाटात आंधळ्यासारखा चाचपडत असतो. भैरू माझा लहानपणापासूनचा सखा. वयाने माझ्याएवढाच. त्याचं खरं नाव राम ! पण त्याला सगळे भैरुच म्हणत.

आम्हाला दुसरी-तिसरीत एक धडा होता. आम्ही त्याला भैरूचा धडा म्हणत असू ! 'पहाट झाली भैरू ऊठला' अशी या धड्याची सुरुवात होती. त्यात ' झुणका-भाकर, कैरीचे लोणचे, भैरू झाडाखाली बसला आवडीने जेवला.' अशा ओळी होत्या. त्या तालात वाचताना आम्हा मुलांच्या तोंडाला पाणी सुटे व सर्वजण भैरूला ," भैऱ्या लेका मजा आहे तुझी !" असे म्हणत असत. आमच्या गावातली शाळा सातवी पर्यंत होती. पण मी पाचवीतच शाळा सोडली व शिकण्यासाठी पुण्यात काकांकडे येऊन राहिलो. त्यामुळे गावाला मी मे महिना व दिवाळी याशिवाय येत नसे. भैरूने कशीबशी सातवी पास केली आणि शिक्षणाला रामराम ठोकला. शेतीवाडी मध्ये तो रमून गेला.

मागच्या सुट्टीत गावाकडे गेलो तेव्हा भैरूशी भरपूर गप्पा झाल्या. भैरू बद्दल गावात बर्‍याच कंड्या होत्या. भैरूला ही ते माहित होतं. त्यामुळे तो काहीसा घुमा बनला होता. पण मला सगळं काही त्याच्याकडूनच ऐकायचं होतं. मी गावी गेल्यावर आमच्या दोघांचा सकाळचा कार्यक्रम ठरलेला असे. दूरवर मळ्यातून फिरून यायचं ! या गोष्टी इतकी मजा सकाळच्या बाकी कुठल्याच गोष्टीत नसते. अर्थात शहरा कडल्या माझ्या मित्रांना ती कधीच समजली नाही. पण आम्हा गावंढळांची ' मजे ' बाबतची मजल एवढीच होती. त्या दिवशी आम्ही असेच फिरायला निघालो होतो. बराच वेळ मूकपणे चालल्यावर मी बोलायला सुरुवात केली. " फार प्रसन्न वाटतयं नाही ?"
" हो " त्याचं उत्तर. बस्स ! पुन्हा शांतता. भैरू स्वतःतच गुंग झाला होता. आमच्या संभाषणाला दिशा मिळत नव्हती.तेवढ्यात समोरून एक बापई गडी येताना दिसला. चांगला थोराड व डबल हाडाचा ! तो आम्हाला ओलांडून गेल्यावर मी विचारलं, " कोण रे हा ?"

" अरे हा नारायण ... निमीचा भाऊ !" भैरू उत्तरला .
" चांगलाच मोठा झालाय की ! निमी सध्या कोठे असते ? " मी विचारले.
भैरू चमकून म्हणाला ," म्हणजे, तुला माहित नाही वाटतं ?"
" काय " मी भयचकितपणे विचारले.
" निमी जाऊन चार महिने उलटले !" मी एकदम सुन्न झालो. निमी गेली? आमच्या दोघांबरोबर भातुकली खेळणारी, सारख्या पुढे येणाऱ्या केसांच्या बटा मनगटाने मागे सारणारी, लाघवी गोड बोलण्यानं, खळ्या पडून हसण्यानं सर्वांना मोहवणारी निमी गेली ? 

" अशी एकदम अचानक ?" मी विचारले .

" वर्षापूर्वीच तिचं लग्न झालं होतं ." दुरून बोलल्यासारखा भैरूचा आवाज आला. खोल कोरडा !
" ते माहित आहे रे ! आईनं लिहिलं होतं पत्रात ." मी उत्तरलो.
" चांगल्या तालेवार घराण्यात दिली होती तिला. नवरा इंजिनीयर होता !" उदासपणे भैरू हसला. 

" त्याचं आधीच एकीशी जुळलं होतं. पण त्याच्या वडिलांना पसंत नव्हतं. टाकले दोनाचे चार हात करून. पण पोरगा बहकलेला. आपल्या निमीचे कोवळे हात मात्र कष्टच उपसत होते. नवरा मारी, छळ करी, सिगरेटचे चटके देई, रात्रीमागून रात्री कोपऱ्यात बहुलीसारखी उभी करून ठेवी. पण सोसलं ! निमीनं सगळं सोसलं ! शेवटी तर कहरच झाला. त्यानं निमी समोर त्या दुसऱ्या पोरीबरोबर चाळे करण्यास सुरवात केली. त्या जबरदस्त आघाताने मात्र खंबीर, पण कोवळी निमी कोलमडली. आता सुखाच्या सर्व वाटा बंद झाल्याचं तिनं ओळखलं आणि विहीर जवळ केली रे आनंद, विहीर जवळ केली !"

भैरू गदगदला होता. माझ्या डोळ्यातलं पाणी गालांवर उतरलं होतं.
" फक्त एकोणीस वर्षाचं आयुष्य ! चौऱ्यांशी कोटी जन्मांच्या फेऱ्यातून गेल्यानंतर मिळणारा दुर्मिळ मनुष्य जन्म आणि त्यामध्येही पिचून टाकणाऱ्या यातना ! काय पाप केलं होतं तिनं ? वाटतं की दुसऱ्याच्या अनमोल आयुष्याची क्रूरपणे खेळणाऱ्या अशा नराधमांना छळून छळून मारलं पाहिजे."
भैरू रागाने थरथरत होता.
" तूच सांग आनंद एखाद्याच्या जीवनाशी, आयुष्याशी, भावनांशी असा निष्ठुर खेळ ? असेल त्याचं प्रेम दुसर्‍या कोणी वर ! पण म्हणून काय एका निष्पाप मुलीचे आयुष्य बळी द्यायचे ? अशांनी लग्नच करू नयेत. बापापुढे तोंड उघडायची हिंमत झाली नाही आणि लग्नाला ठाम नकार देण्याचे धैर्य अंगी नव्हते, पण अश्राप जीवाशी खेळण्याचा पराक्रम मात्र केला. पुरुषार्थ धन्य झाला !!"
धाप लागल्यामुळे भैरू बोलायचा थांबला. एक विचित्र शांतता पसरली.
" आता काय करतो तो ?" नकळत माझा आवाज घोगरा झाला होता.
" त्या मुलीशी लग्न केलं त्यानं. सालं या स्त्री जातीचं असंच आहे. कुठेच सुख नाही प्रत्येकीची कहाणी वेगळी ! मला आश्चर्य हे वाटतं नंदू , की या स्त्रीयाचं एकमेकींच्या दु:खास कारणीभूत होतात. त्या मुलीमुळे निमी संपली. थोड्या दिवसांनी तीही संपेल... त्या नराधमाचा काय भरवसा ?"

"आमच्या घरात तरी दुसरं काय झालं? थोरल्या आजोबांचा एकुलता एक मुलगा म्हणजे आमचे भाऊ ...." भैरू आपल्या वडिलांना 'भाऊ' म्हणत असे. "आजोबांचे आणि आजीचे फारसे पटत नव्हते. भाऊं नंतर त्यांना मूलही झालं नाही. आजोबांना स्त्रियांचा भारी षौक ! आजीला हे अजिबात पसंत नव्हते पण करतीये काय बिचारी ... सहन करत करतच संपून गेली, नवरा बायकोत कधी सुसंवाद घडलाच नाही. दुरावा मात्र पदोपदी वाढला. आजी गेल्याचे फारसे दुःख आजोबांना झाले नाही. त्यांचे रंग-ढंग चालूच होते. भाऊंचे लग्न झाले. आई गृहलक्ष्मी झाली. पण पहिल्‍याच रात्री तिला समजून चुकलं की आपण फसलो ! पैशांकडे बघून बापाने पोरगी दिलेली. भाऊ तिसऱ्या वर्गात मोडत होते, त्यांना स्त्रीबद्दल कसलंच आकर्षण नव्हतं. आईची कुचंबणा होऊ लागली. सासऱ्याबद्दलची कुजबुज तिने ऐकली होती. ती फार सावध आणि स्वतःला जपून होती. पण शेवटी व्हायचे ते झालेच ! कोणालाही पत्ता न लागता ! आणि माझा जन्म झाला."

"लहानपणापासूनच मला अनुभव होता, मी दिसलो की लोक कुजबुजत ! मी बावरे . वय वाढल्यावर कुजबुजीत आजोबांचं नाव निघे, तर कोणी आईला बदफैली ठरवीत. पण शेवटी मला कोडं उलगडलं.
दोन वर्षे झाली त्या गोष्टीला. घरातील आम्ही सर्व हुरडा खायला मळ्यावर एक संपूर्ण दिवस जाणार होतो. मी, भाऊ ,माझे काका ,काकू त्यांची मुले आणि सुजाता ! " सुजाताचं नाव घेताना भैरूचा आवाज किंचित हळुवार झाला होता. मी चोरून त्याच्याकडे पाहिलं, त्याच्या डोळ्यात क्षणभर निराळीच चमक दिसली. भैरू बोलला नसला तरी मला बाहेरून समजलं होतं. सुजाता भैरूच्या आईच्या लांबच्या बहिणीची मुलगी होती. म्हणजे खरंतर भैरूची लांबची बहीणच ... पण त्यांच्यात एक हळुवार नातं निर्माण झालं होतं. तिचे आई-वडील तिच्या लहानपणीच स्वर्गवासी झाले होते. म्हणून ती आश्रयाला मावशीकडे आली होती .सुज्ञास अधिक सांगणे न लगे !!
" मजा येणार होती " भैरू पुढे बोलू लागला. " सगळ्यांबरोबर आईसुद्धा येणार होती पण ऐनवेळी तब्येत बिघडल्याने ती घरातच राहिली. आजोबांचा तर प्रश्नच नव्हता. ते वेगळ्याच विश्वात असत. आम्ही बैलगाड्यांतून निघालो, वाड्यापासून थोडं दूर गेलो आणि रवी सातपूते भेटला. म्हणाला ,' तुझ्याकडेच चाललो होतो. क्रिकेटची मॅच ठरवली आहे. ' तुला माहीतच आहे आनंद क्रिकेट माझा वीक पॉईंट, मी बैलगाड्या समवेत न जाता चार वाजेपर्यंत मॅच संपवून मळ्यावर जायचे ठरविले."

"पाच वाजता मॅच संपली. आम्ही हरलो ,माझा मूड खराब झाला होता. मळ्यावर जायचा कंटाळा आला. घराकडे निघालो.वाडा सुस्त व शांत वाटत होता. माझ्या खोलीकडे जाताना आईच्या हुंदक्यांचा आवाज आला. आत शिरणार एवढ्यात कोणीतरी बोलत असल्याचे लक्षात आले. आईचा चिडखोर आवाज आला,' माझ्या मनाविरुद्ध त्यावेळी तुम्ही जबरदस्ती केली पण आता मात्र मी साऱ्या जगाला ओरडून सांगेन. दूर व्हा आधी !'
' जा गं जा ! मोठी आली शीलवती ! भाऊचे लग्न काय पैसा वर आला होता म्हणून केलं होतं ? ती तर माझी घरच्या घरी होणारी सोय होती ..... समजलं ?" नशेनं तर्रर्र झालेला हा आवाज नक्कीच आजोबांचा होता. मी रागाने बेभान झालो. सरळ दार लोटून आत घुसलो. अंगचटी आलेल्या आजोबांना आई सर्वशक्तीनिशी दूर लोटत होती. मी एकच ठोसा त्यांच्या तोंडावर दिला आणि आजोबा झटक्यात कोसळले. मी आलो आहे हे सुद्धा त्यांना कळले नाही. आईची आणि माझी नजरानजर झाली. दोघांचेही डोळे भरून आले होते. आई माझ्या खांद्यावर डोके घुसळून रडू लागली. कसला तो प्रसंग ! आजा आणि बाप एकच असलेला मी, माझ्या दुर्भागी आईला सावरत असहाय्यपणे उभा होतो. शरमेने मन काळवंडलं, आजोबांबद्दल तिरस्कार दाटून आला. दोन दिवस डोकं ठिकाणावर नव्हतं. त्या प्रसंगाबद्दल कोणालाच काही कळलं नाही. खुद्द आजोबांना देखील ! मी त्यावेळी सोळा वर्षांचा होतो, डोकं ठिकाणावर ठेवून कोणतीही गोष्ट करण्याचं सुचत नाही असं वय !"

" मी दोनदा आजोबांचा सूड घेण्याचा प्रयत्न केला, आणि नशिबाने मीच बचावलो. पहिल्यांदा जंगलात आजोबांच्या नकळत मी त्यांच्यावर सुरा फेकला, व दुसऱ्यांदा त्यांच्या जेवणात धोत्र्याचे विष कालवून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. सुराबाजीच्या वेळी माझा नेम चुकला ! एवढेच काय पण आजोबांना कोणीतरी आपल्या दिशेने सुरा फेकला हे सुद्धा कळले नाही. नंतर मात्र मी जरा डोकं लढवून योजना आखली. आजोबांच्या रात्रीच्या जेवणात धोत्र्याचे विष कालवून मी डाव साधला. पण आजोबांचे दैव बलवत्तर ! विषबाधेने उलट्या होण्यास सुरुवात झाली, पण गावातील निष्णात 'लेले' वैद्यांनी ताबडतोब उपचार करून त्यांचा जीव वाचवला. हा घातपाताचा प्रकार कोणी केला हे कसून चौकशी करूनही आजोबांना कळले नाही. हे गुपित आता तुलाच प्रथम मी सांगितले, आईला सुद्धा माहित नाहीये ! या प्रकरणानंतर मात्र मी थंड झालो. आजोबांचा दुस्वास मी आजही करतोय पण त्यांना जिवे मारण्याच्या टोकाचा विचार आता येत नाही. ते मात्र मनापासून माझ्यावर प्रेम करतात, हवं-नको बघतात. आई, आजोबा आणि मी एक विचित्र त्रिकोणाची टोकं बनलो आहोत. आता याचा शेवट काय ते परमेश्वरच जाणे !" भैरू बोलता बोलता भानावर आला. माझा हात हातात घेऊन म्हणाला, " आनंद, तू मला सगळ्यात जवळचा ... म्हणून ही कहाणी तुला सांगितली. मनावरचं जड ओझं आता थोडं हलकं झाल्यासारखं वाटतय. बऱ्याच दिवसांपासून हे सारं तुला सांगायचं होतं. चल उशीर झाला. सुजाता वाट पहात असेल !" घराकडे परतताना विचारबुद्धी घायाळ झाली होती. आक्रितच ऐकलं होतं मी !!

" आनंद तुझं पत्र आलयं बघ !" काकूच्या हाकेने मी भानावर आलो. लगबगीने दाराकडे धावलो . पत्र आईचं होत. अधीरपणे वाचू लागलो सर्व काही खुशाल आणि आनंदी होते. शेवटचा मोठा परिच्छेद मी वाचू लागलो ... ' अरे हो! शेजारच्या रामला परवाच पोलिसांनी पकडून नेले. त्याच्या आजोबांचा दोन आठवड्यापूर्वी खून झाला होता. तो त्यानेच केला असा पोलिसांचा कयास आहे. या खुनाच्या आदल्या रात्रीच दोन दिवस बेपत्ता असलेल्या सुजाताचं प्रेत त्यांच्या मागच्या अंगणातील विहिरीत सापडले होते. तिने आत्महत्या केली असं लोक म्हणतात. रामची आई तर त्याला पोलिसांनी पकडून नेल्यापासून भ्रमिष्टासारखी करत आहे. काय भोग असतात एकेकाच्या नशिबी ! असो भाऊजी व वहिनींना नमस्कार सांग.

माझ्या हातून पत्र गळून पडले. काय हा नशिबाचा खेळ ! सुजाता आजोबांकडून भ्रष्ट झाली हे निश्चित ! हा धक्का मात्र भैरू सहन करु शकला नसणार. आणि ...... आणि तिसरा प्लॅन न आखता तडीस गेला असणार !!!

समाप्त

वरील कथा श्री मिलिंद अष्टपुत्रे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखकाच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित
फोटोवर क्लिक करून वाचा एक नवी कथा 


Post a Comment (0)
Previous Post Next Post