तोडी सोन्याचा पिंजरा
✍️ चित्रा अविनाश नानिवडेकर
मी जेंव्हा वसुधाला भेटले तो दिवस अगदी माझ्या लक्षात आहे. आमच्या हॉस्पिटलचा दिव्यांग व्यक्तींसाठी कॅम्प होता. त्यासाठी समाजसेवेच्या इन्स्टिटयूटमधून ज्या चार पाच जणी आल्या त्यात चुणचूणीत वसुधा सगळ्यांना आपलंस करून बोलतं करीत होती. माझ्याच वयाची असेल. माझी लगेच तिच्याशी मैत्रीच झाली.
मोठे मोठे बोलके डोळे, लांब केसांच्या दोन वेण्या कानामागून पुढे घेण्याची तिची स्टाईल मला फारच आवडली. समाजसेविका सरोजा मॅडम पण तिची खूप स्तुती करत असत. खूप लटपटी खटपटी वसुधा सतत काही नी काही शिकत राहायची. आपल्या समाजसेवेला आवश्यक ते सर्व शिकायचं असा जणू ध्यासच तिने घेतला होता.
उत्तम मार्क्स मिळवून लगेचच तिला लेबर ऑफिसर म्हणून मोठ्ठ्या इन्स्टिटयूटमध्ये सर्व्हिस मिळाली. आमच्या वर्तुळात आम्ही स्त्रियांच्या प्रश्नांविषयी, त्यांच्या समस्या वगैरेसाठी सतत सेमिनार, कुठे प्रदर्शन, स्त्री मुक्तीचं पथनाट्य इत्यादी बघत असू. युनोने ते दशक “स्त्री मुक्ती”साठी जाहीर केलं होतं आणि आम्ही दादरला असल्यामुळे सतत काही न काही चर्चा, परिसंवाद अटेंड करायला मिळायचे. वसुधा खूप हिरीरीने त्यात बोलत असे. पुष्कळदा तिचे लेख वगैरे वर्तमानपत्रात येत असत.
तिच्या घरी सुद्धा सगळ्यांना तिचं भारी कौतुक होतं. ती उपनगरात राहायची बऱ्याचदा तिला उशीर होई. पण कधीही तिने आम्हाला तसं दर्शवलं नाही. कारण कणखरपणा, स्वतः खंबीर असणं ह्यावर तिचा ठाम विश्वास होता.
जेवढ्या मनापासून ती आमच्यात असे. तेवढ्याच मनापासून ती कामावरच्या केसेस पण सहृदयीपणे सोडवत असे. एखाद्या मजुरावर अन्याय होतोय असे लक्षात आले की मिटिंगमध्ये मॅनेजमेंट कमिटीवर तुटून पडत असे. नंतर आम्ही भेटलो की आम्हाला एकेक किस्से सांगत असे. आम्ही मात्र काळजीने तिला सावध राहायला सांगत असू. पण आपले बोलके डोळे आमच्यावर रोखून ती हसून म्हणत असे,
“काळजी करू नका… मला कोणी काही करणार नाही. अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवला नाही तर तो बिचारा मजूर अजून चिरडला जाईल. मी त्याचसाठी त्या पोस्टवर आहे ना? त्यांना न्याय मिळवून देणं माझं कामच आहे.”
स्वतःचं काम करता करता तिच्या एकेक गोष्टीं लक्षात आल्या की कामगार बरेचसे दारूच्या आहारी गेलेत. तिने परेलच्या “अल्कोहो्लिक आनोनिमस” च्या ग्रुपला आपल्या कंपनीत बोलावलं आणि बऱ्याच कामगारांना दारूपासून कसं नुकसान आहे. तुमच्या कुटुंबाची कशी धुळधाण होऊ शकते. भविष्यात काय घडू शकतं. ह्याचं चित्र उभं केलं. आणि एक ग्रुप स्थापन केला.
कामगारांच्या बायकांना एकत्र आणून त्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी छोटे मोठे कोर्स शोधून त्यांना शिक्षित करायला ग्रुप केला.
गुटखा खाऊन काम करणाऱ्याला गुटखाच्या किमतीचा खर्च दिवसात जितका येईल तितका एका डब्यात जमा करून त्या बदल्यात किती पैसा खर्च होतोय. हे दाखवून जागरूकता आणली.
दररोज तिच्या धडाकेबाज गोष्टीं ऐकून आम्हाला पण वसुधा म्हणजे आमची रोल मॉडेल वाटायला लागली. आम्हीसुद्धा आमच्या परीने तिला मदत करीत असू.
हे सगळं होत असताना तिच्या घरी तिच्यासाठी लग्नाचे वारे वाहू लागले. आणि ते साहजिकच होतं. तिची पंचवीशी उलटली होतीच की.
तिला एका डॉक्टरचं स्थळ आलं आणि आम्हाला सुद्धा खूप आनंद झाला. हिऱ्याला शोभेल असे कोंदण मिळणार म्हणून आम्हीसुद्धा तिची मस्करी करू लागलो.
पण सगळं काही इतकं सरळ व्हायला ती काही कादंबरी किंवा चित्रपट नव्हे. नियतीच्या मनात वेगळं असतं.
पुढे आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात वळणं आली. आमचे मार्ग बदलले…. आणि
10 वर्षांनी एका समारंभात वसुधाला भेटले आणि तिला पाहून मी चकित झाले. एकदम रया गेली होती. विझलेले डोळे,कपड्याची रंगसंगती नव्हती. समोरच्या बरोबर वरवर हसून बोलत होती पण त्यात पूर्वीचा मी पाहिलेला तडफदारपणाचा लावलेश नव्हता. सोबत 5/6वर्षाचा मुलगा होता. त्याला मात्र खूप छान उंची कपडे घालून मिरवत होती. तिचं माझ्याकडे लक्ष गेलं नी क्षणभर तिचे डोळे आनंदाने लकाकले.
“बापरे..!दहा वर्षांनी भेटतोय. कशी आहेस तू? तुझ्यात काहीच बदल दिसत नाही ग.”
म्हणताना एक उदास लकेर तिच्या डोळ्यातून दिसली.
मी म्हटलं, “पण वसुधा तू मात्र पूर्वीची वसुधा नाही दिसत. डॉक्टरसाहेब दिसत नाहीत कुठे आहेत? हा गोड छोकरा तुझा का?”
आजूबाजूला पहात ती म्हणाली, “हळू बोल कोणी ऐकेल…नंतर भेटते तूला. सावकाश. “
तेवढ्यात शिरीष आलाच खेकसून म्हणाला, “वसू… लक्ष कुठेय ताई कधीची शोधतेय तूला. धंदरटपणा संपतच नाही तुझा. चल लौकर.”
माझ्याकडे केविलवाणा कटाक्ष टाकून पाय ओढत ती त्याच्या मागे गेली.
जेवण्याच्या टेबलवर मी तिच्या बाजूची खुर्ची घेत म्हटलं, “काय दशा करून घेतलीस वसू? कधीच परत भेटली नाहीस लग्नानंतर. आपल्या ग्रुपचं कोणी भेटत का? सरोजा मॅम नेहमी तुझी आठवण काढत असतात.”
ती काही सांगायला जाणार तोच शिरीष प्लेट घेऊन येत म्हणाला,
“अरे…! तुम्ही आमच्या लग्नात आला होतात त्याच ना? बरं झालं भेटलात सांगा तुमच्या मैत्रिणीला… आजकाल काय झालं तेच कळत नाही. बघा बाहेर कशी पडते. धड कपड्याचा ठिकाणा नाही. माझी प्रतिष्ठा राखत नाही. ऐकतच नाही काही.”
तिने कसनुस हसत टेबलखालून मला एक टीश्यू पेपर देत हात दाबला. आणि मान झटकत म्हणाली, “चल ग निघते… चिंटू कंटाळला आहे. भेटू कधीतरी.”
“हॊ…घरीच या एकदा.” शिरीष घाईने उठत म्हणाला.
तिने दिलेल्या नंबरवर फोन लावून भेटायचं ठरवलं.
त्या दुपारी आम्ही एका कॉफी शॉपमध्ये भेटलो… तिने लग्न ठरल्यापासूनच्या सर्व घटना सांगितल्या.
डॉ. शिरीष पाटील. रुबाबदार आणि आकर्षक. त्यांची पुण्याजवळ एका खेड्यात खूप शेतीभाती, मोठ्ठा वाडा. गावात नुकतेच हॉस्पिटल सुरू केलं होतं. वसुधाला नव्या गावात नविन क्षितिज खुणावू लागलं. भावी नवऱ्याबरोबर बोलताना तिने उत्साहाने आपली स्वप्नं त्याला सांगितली. त्यानेसुद्धा खूप उत्साह दाखवला.
इकडे ते बोलत असताना घरी लग्नाची बोलणी सुरू होती. त्यांनी हुंडा नको. म्हटलं ह्यातच वसूला आभाळ ठेंगण झालं. परंतु जसं लग्न जवळ आलं वरचेवर त्यांचे निरोप यायचे… नविन हॉस्पिटलचा सेटअप करायला इतका खर्च झाला. निदान प्रत्येक रूमला AC. तुम्ही बसवून द्या. पाण्याच्या टाक्या प्रत्येक रूमला पाहिजेत, आधुनिक शस्त्र आजकाल लाखांच्या खाली नसतात वगैरे म्हणून वरती मानभावीपणे त्याचा दादा म्हणत असे, “सोय जाणतो तोच सोयरा” शेवटी हे सगळं तुमच्या लेकीच्या भविष्यासाठीच असतंय वगैरे सांगून खूप काही डिमांड केल्या .
तिथेच खरं तर वसुधाने निक्षुन वडिलांना नकार द्या म्हणून सांगितलं.
शिरीषबरोबर ती बोलली तर त्याने कानावर हात ठेवत म्हटलं, “यार मी डॉक्टर आहे… सर्जरी करणं माझं काम आहे. आर्थिक गणितं दादा बघतात. त्यांच्याशी बोल. आपल्याला त्यातलं काही कळत नाही.”
लग्न ठरल्याचा बोलबाला झाला होता. त्यात डॉक्टर मुलाचं स्थळ सोडायचं नाही म्हणून घरच्यांनी तिचं मनावर घेतलं नाही. अण्णांनी कर्ज काढून त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या. हिने आधीच मी करिअर करणारे हे कबूल करून घेतलं होतं. तरीही लग्न झाल्यावर सतत तिच्यावर नोकरीं सोडण्याचा दबाव सगळे करत असत. शिरीष मोठया भावाच्या आधीन आहे. त्याचा शब्द घरात प्रमाण मानत कारण वडिलांच्या मागे त्यांनीच शिरीषला डॉक्टर केलं. चार भावंडांचे शिक्षण, लग्नकार्य त्यांनीच लावलं.
वसुधाने हिमतीवर पुण्यात नोकरीं मिळवली पण त्यासाठी सकाळी चारला उठून सगळ्या घरा दाराचा स्वयंपाक करून जेमतेम ती ऑफिसला पोहचायची. मुंबईपेक्षा खालच्या पातळीवर इकडे तिला काम करावं लागायचं ह्याचा सल होताच. शिवाय तिच्या कामाला जाण्याबद्दल सारखं टोचून बोलणं असे. जिद्दीने वसुधाने नोकरीं सुरू ठेवली. शिरीषने मात्र चिंटूच्या जन्मानंतर तिला पॅथॉलॉजीचा कोर्स करायला लावून हॉस्पिटलमध्येच काम करायला भाग पाडलं.
उदास स्वरात वसुधा म्हणाली, “एकेक पिसं छाटून टाकल्या पाखराला सोन्याच्या पिंजऱ्यात दाणा पाणी दिल्यासारखी अवस्था आहे माझी. केवळ उच्चविद्याविभुशीत नवरा आहे हया एका मुद्यावर माझ्या अण्णांनी मला कोणत्या घरात लोटलं बघ… त्यापेक्षा कमी हुद्याचा पण स्वतंत्र मुलगा मिळाला असता.”
खरंच लग्न जमवताना आपल्या मुलीला उजवण्याची घाई न करता तिच्या मनाचा विचार करणं गरजेचं असतं.
त्या भेटीनंतर आम्ही दोघी वारंवार भेटलो. हळूहळू तिला त्यातून कसं बाहेर पडता येईल ह्याचा विचार करू लागलो.
“पण वसू… तू ह्यातून सहज बाहेर पडू शकली असतीस. तुझ्यात काय कमी आहे. कोणे ऐके काळी तू लोकांना समुपदेशन करून त्यांना मार्गांवर यायला मदत करायचीस… मग तू कच का खाल्लीस?”
उदास हसत ती म्हणाली, “आपण स्त्रियां खूप स्तरावर वाटल्या गेल्या असतो ग. सतत दुसऱ्याचा विचार, लोकं काय म्हणतील हयांचा विचार, धाकट्या बहिणींची लग्न. एक ना दोन सगळी कारणं डोळ्यासमोर यायची.
दुसऱ्यांना वाट दाखवताना मी त्रयस्थ होते… तूला सांगू? एका रात्री मी भरपूर झोपेच्या पिल्स घेऊन मरण्याच्या दृष्टीने झोपायचा प्रयत्न केला… पण नवरा डॉक्टर हेच विसरले ग. त्याला लगेचच समजलं…मग काय तेंव्हापासून माझ्यावर खडा पहारा बसला. गुडघ्याएवढी पोरं पण माझ्या पाळतीवर बसवली जायची. खूप वाईट दिवस होते ते.
मी खरं तर सगळ्यात धाकटी सून. नोकरीसाठी बाहेर जाऊ नये म्हणून सगळे कुळाचार माझ्या गळ्यात अडकवले. मी जिद्दीने पुरणावरणाचा सगळा स्वयंपाक करून ऑफिसात जात असे. मान मोडून कामं करून रात्रीच्या कामासाठी पदर बांधून सज्ज. पण कोणालाच त्याचं काही वाटत नसे.… शिरीषला काही सांगायला जावं तर एकच… नोकरी सोड हॉस्पिटल जॉईन कर. मी म्हटलं माझं शिक्षण वेगळं आहे. हॉस्पिटलला येऊन काय करू? एकदा कडेलोट झाला. मला म्हणाला,
“तुझ्यात ती कॅपॅसिटीच नाही. साध्या 12 वी झालेल्या मुली डी. एम. एल. टी. (Pathology कोर्स ) करून स्वतः ची लॅब उघडतात. तू कसली करणार… वशिल्याने डिग्री घेतली असशील…”
इतकं तिरमिरलं मला…मी घेऊनच टाकली डिग्री. चांगली पहिली आले. घरचं सगळं करून… पण कौतुक कोणालाच नव्हतं. अशीच मिटत गेले. जगाला दाखवायला डामदौल आहे.
‘मेणबत्तीचा उजेड दिसतो सगळ्यांना पण मेणाच्या आतली वात किती चटके सोसते ते दिसत नाही…’
चिंटूच्या जन्मामुळे अजून अडकले… नशीब मुलगा झाला… गर्भजल परीक्षेला पण सामोरी गेलेय… आणि आपण “मुलगी झाली हॊ” हे पथनाट्य करत होतो.. किती विरोधाभास ना?”
असंच एका भेटीत मात्र…!
“पण वसू, असं किती दिवस चालणार?”
उदास हसत ती म्हणाली, “कोण जाणे… कदाचित मी असेपर्यंत."
“वेडी आहेस? तू स्वतः स्वतः ची मदत करायची ठरवली तरच काहितरी होऊ शकतं. आपण करू काहीतरी. मी काही ठरवलं आहे. तुमच्या हॉस्पिटलमध्येच कॉन्सीलिंग सुरू का नाही करत? हळूहळू सुरू तर कर. मी सरोजा मॅम मदत करू तूला. आजकाल ऑनलाईन समस्या पण सोडवायला खूप जणांना गरज असते.”
आणि खरच तो दिवस उजाडला.
एकदा दोन अल्पवयीन मुलांनी प्रेमाखातर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि दोन्हीही पालकांनी शिरीषच्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं. शर्थीचे प्रयत्न करून दोघांना वाचवलं. नंतर सगळी सूत्र वसुधाने स्वतःच्या ताब्यात घेतली. त्यांना समुपदेशन, त्यांच्या पालकांना समजावून सांगितलं.
हळूच तिने शिरीष आणि दादांकडे आपला बेत सांगितला. आपल्यासाठी एक दालन तयार करून त्यावर आपली पाटी लावली. आणि जोरदार उदघाटन केलं. त्या कार्यक्रमाला मी आणि सरोजा मॅमनी तिच्या जुन्या बऱ्या झालेल्या क्लायन्टना बोलावून त्यांची सक्सेस स्टोरी सांगायला लावली. त्याचा असा परिणाम झाला की पहाडा सारखे निश्चिल दादा एकदम द्रवले. रात्री आम्हाला खास त्यांच्या घरी मेजवानीला बोलवलं आणि म्हणाले,
“खरंच आम्हाला फक्त शरीराचे आजार दिसत होते. मनाच्या आजारावर काही ईलाज असतो हेच ठाऊक नव्हतं. तुम्ही आमचे डोळे उघडले. सुनबाईंनी इतके संसार उभे केले होते हे आम्हाला कळलेच नसते.”
रात्री अंगणात गप्पा मारताना वसुधा भाऊक होऊन म्हणाली, “त्या दिवशी तू भेटल्यापासून मला स्वतःला थोडी थोडी ‘मी’ सापडत गेले. तूला पाहून शिरीषसुद्धा चपापला जरा. आपलं सर्कल त्यावेळी त्याला पण माहित होतंच. तू भेटल्यावर सरोजा मॅमचा फोन आला.”
“हॊ मीच सांगितलं त्यांना…मला पण वाईट वाटलं ग. तुझ्यातली तू हरवलीच आहेस.”
“हम्म…त्या रात्री मी खूप रडले. दादांना पण सांगितलं. दादांचा शब्द अंतिम असतो आमच्याकडे. मी शेवटचं अस्त्र “वेगळं” राहण्याचं काढलं. तेंव्हा कुठे ते तयार झाले. मला माहित आहे की इतकं सरळ सगळं होणार नाही. अजून खूप अडचणी असणारेत. पण मला स्वतःला काहीतरी उभं केल्याचं, माझ्या शिक्षणाचा उपयोग झाल्याचं समाधान मिळेल.”
खरंच अशा वसुधा आजूबाजूला असतात. त्यांचं स्वत्व हरवलेल्या. त्यांना त्यांचा पैस निर्माण करायला मिळावा.
समाप्त
वरील कथा चित्रा अविनाश नानिवडेकर यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.
फोटोवर क्लिक करा आणि पाहा ही सुंदर कथा
Nice
ReplyDeleteGreat.
ReplyDelete