शापित भाग अंतिम

शापित भाग  १४ अंतिम 

✍️  सोनाली जाधव


आकाश आणि मोहनराव पोलिस गाडीतून पुढे निघाले. माधव ही त्यांच्या पाठोपाठ निघाला. आकाशने आधीच एक पोलिसांची टीम तिकडे रवाना केली होती. ते सगळे आता राधापूरच्या मार्गावर होते.

माधव मात्र मनातून थोडा दुःखी होता कारण आज राधा त्याला सोडून कायमची जाणार होती पण तू खुश ही होता कारण तिला आज मुक्ती मिळणार होती. एक वेगळीच बेचैनी त्याला जाणवत होती. अगदी त्या दिवसासारखी. संमिश्र भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटत होते.

इकडे आकाश सोबत मोहनराव आणि त्याचे दोघं अंगरक्षक बसले होते. जसजसा रस्ता पार होत होता मोहनरावला थोडी भीती वाटत होती. त्याला त्याचे पूर्वीचे पाप आठवत होते. त्याने एक दोन नाही तर हजारो लोकांचे प्राण घेतले होते. कुठेतरी  त्याची भीती मनात होतीच. आपण किती ही प्रयत्न केले तरी आपले कर्म आपला पिच्छा सोडत नाही.

"काय मोहनराव काय विचार करता आहेत"?

आकाशने मुद्दाम प्रश्न केला.

"नाही, नाही, काही नाही खूप वर्षानंतर गावी जातोय त्याचाच विचार करतोय."

"म्हणजे  मला थोडं फार माहिती आहे गावाबद्दल तरी विचारतो नक्की काय झालं होते गावात की अचानक पूर्ण गावच उद्ध्वस्त झाले?" आकाशने प्रश्न केला.

"मलाही नक्की माहित नाही. पण कोणता एक महाभयंकर आजार गावात पसरला होता ज्यामुळे माणसे आजारी पडू लागली. इलाज करण्याआधीच मरू लागली. तो आजार बघून कुणी डॉक्टर बी येईना आमच्या गावात. म्या सोता माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे माझ्या परिवाराला मरताना लई बेक्कार होतं."असं म्हणून तो खोटं खोटं रडायचं नाटक करू लागतो.

त्याच ते रडणं बघून खरं तर आकाशला खूप राग येतो पण तो गप बसतो.

"मग तुम्ही कसे वाचलात?" पुन्हा आकाश प्रश्न करतो.

"मी बी मेलोच असतो पण ते काय झालं मी कामासाठी बाहेर गावी गेलो होतो. तिकडून आलो तर बघतो सगळी लोक अशी मरता आहेत म्हणून. माझ्या बायकोने मला सांगितल इकडचं अन्न पाणी काही घेऊ नका आणि इकडून दूर कुठे तरी निघून जा. मी तिला नाय म्हणत व्हतो तुला आणि गावाला सोडून कुठे बी जाणार नाही. तिने मला तिची  शप्पत दिली आणि सगळं जे काही आहे ते घेऊन जावा इकडून दूर कुठे तरी निघून जा बोलली. माझा नाईलाज होता मी मग इकडून तीकडे तिकडून दुसरीकडे असं करत मग व्हिएतनामला गेलो."

आकाशला त्याची कहाणी माहीत होती. पण हा माणूस कोणत्या स्तरावर जाऊन खोटं बोलू शकतो तेच तो पाहत होता. तास दीड तासात ते राधापुरला पोहचतात. माधव थोडा दूरच गाडी पार्क करतो .

आकाश मोहनराव त्याचे दोघं अंगरक्षक आणि दोन हवालदार असे सगळे जण गावात प्रवेश करतात.

जसाच तो सावकार गावात पाय ठेवतो तसेच सगळे वातावरण बदलते. अचानक खूप अंधार होतो. वादळ सुटते, झाडाची पाने इकडे तिकडे उडायला लागतात. धुळीचे वादळ उठते असं वाटत असते की जणू काही पूर्ण गाव त्याला गिळंकृत करायलाच बसलंय.

हे बघून सगळे घाबरतात. माधव मागून लपून छपून येत असतो. आकाश बाकी चार जणांना तिकडेच थांबा अशी खूण करतो.

ते तसेच मागे निघून जातात. आता मोहनराव आणि आकाश त्यापाठोपाठ माधव असे तीनच जण गावात जातात.

वादळ अजून सुरूच असते. ते कसे बसे त्याच्या जमिनीपर्यंत पोहचतात. वादळामुळे समोरचे काही बघणे अशक्य होत असते तरी आकाश त्याला सांगतो हीच ती जमीन आहे जिथे आम्हाला धनाचे हंडे सापडले.

"अरे बरोबर ही माझीच जमीन आहे. ते बघा तिकडे एक घर आहे शेत मजुरांसाठी मी बनवलं होते. चला मी माझे घर दाखवतो ".

असे म्हणून तो आकाशला  घेऊन थोडं दूर घेऊन जातो. बाहेरूनच घर दाखवतो.

आकाश आणि सावकार परत यायला निघतात ते मागे वळतात तोच माधव सावकरावर पिस्तूल ताणून धरतो. त्याला असं बघून आकाश त्याला म्हणतो.

"माधव काय करतो आहे हे, सोड ते पिस्तूल कायदा हातात घेऊ नको. याला याच्या पापाची शिक्षा नक्की मिळेल."

त्यांचं बोलणे ऐकून सावकार काय समजायचं ते समजतो .

"अच्छा म्हणजे मला इथे बोलवण्यासाठी हा कट होता तुमचा. पण ते बघा मी आधीच माझी माणसे इकडे पाठवली आहेत ."

तो झाडाजवळ बोट दाखवतो. तिकडे काही बंदूकधारी माणसे उभी असतात. त्यांना बघून आकाश पुन्हा माधवला ओरडुन सांगतो,

"माधव ऐक माझे, सोड ते पिस्तूल."

"नाही आकाश ह्या नीच माणसाने माझ्या राधेला अत्यंत क्रूरपने मारलं आहे .मी याला अस जिवंत सोडणार नाही."

माधवच्या तोंडून राधेच नाव ऐकून सावकार बोलतो.

"अच्छा! तूच तो माधव आहेस का ज्यासाठी त्या मूर्ख राधाने माझ्या मुलाला नकार दिला होता. मूर्ख मुलगी (झाडा कडे बोट दाखवून)

याच झाडावर लटकवून मारलं होत मी तिला. तिलाच काय पण या सर्व गावाला मी पाण्यात विष घालून मारले. तिला मी मानवीय अवयवांची तस्करी करतो हे माहीत झाले होते. वाटले सून बनवून घेईल तर तोंड बंद ठेवेल. पण ती मूर्ख ऐकायलाच तयार नव्हती मग मीच दोन तीन पोरांना उचलून नेल आणि मारलं. सगळा आरोप तिच्यावर टाकला की ती डाकीण आहे लहान पोरांना खाते आणि या बिनडोक गाववाल्यांनी ही माझंच ऐकलं. मारलं बिचारीला दगडाने ठेचून ठेचून. तुम्ही कुणी ही काही बिगडवू शकणार नाही माझे."

असे म्हणून जोरजोरात तो हसू लागतो.

त्याचं बोलणे ऐकून माधव अजूनच संतापतो त्याच्याकडून एक गोळी फायर होते. तो आवाज ऐकून त्याची माणसे सावध होतात तसेच पोलिसांची टीम ही तिकडे येते.

एकीकडे सावकार त्याची माणसे दुसरीकडे आकाश त्याची टीम आणि मधे माधव. सूर्यास्ताची वेळ झालेली असते.

माधवच्या हमल्याला उत्तर द्यायला त्याची माणसे  पण समोरून गोळ्या झाडतात. त्यांच्या गोळ्या माधवच्या दिशेने  वेगाने येत असतात तोच त्याच्या मधे राधा येते आणि गोळ्या कुठल्या कुठे निघून जातात. एक ही गोळी माधवला किंवा इतर कुणाला ही लागत नाही.

अचानक मधे आलेल्या राधाला पाहून सगळे घाबरून जातात.

माधव राधाला म्हणतो, "राधा तू बाजूला हो याला आज मीच मारणार."

"नको माधव अश्या पापी माणसाला मारून तू आपले हात घाण करू नको. याला याचे कर्मच मारतील."

हे सगळ बघून सगळेच खूप घाबरले असतात की सूर्याची शेवटची किरणं डोंगराआड जाते आणि तोच दरवाजाचा आवाज येतो. पण या वेळी दरवाजा तोडण्याचा आवाज येतो. एक सोबत खूप सारे दरवाजे तोडले जात आहेत असा आवाज. जंगली प्राण्यांच्या रडण्याचा आवाज ,पक्ष्यांचा आवाज सगळी कडे एकच आवाज घुमतो. सगळा परिसर त्या आवाजांनी हादरून जातो.

हे सगळं काय होतय हे माधव आणि आकाशशिवाय कुणालाही समजत नाही. एक एक घरातून सगळी पिशाच्च बाहेर येऊ लागतात. त्यांना बघून त्याची माणसे गोळ्या झाडू लागतात पण त्यांच्यावर त्याचा काही ही परिणाम होत नाही हे बघून ते तिकडून पळत सुटतात. आकाश त्याच्या टीमला तिकडून पळा असे सांगतो तसे ते ही सगळे पळत सुटतात. आकाश माधवला सांगतो 

"चल इथून माधव हा ज्यांचा दोषी आहे तेच याला मारतील चल."

त्याच्या बोलण्याने माधव सावध होतो.

आता आपण काही वाचत नाही हे जेव्हा त्या सावकराच्या लक्षात येते तेव्हा तो माधवला सांगतो .

" ए माधव मी या कामात एकटा नव्हतो तुझा बाप माझा पार्टनर होता. तू ज्या पैश्यावर आज वर मोठा झाला तो पैसा याच पाप मार्गातून आलेला आहे. तुझा बाप आणि मी  दोघं मिळून ही कामे करत होतो. तुला काय वाटते तो नुसता स्टोअरवर एवढा मोठा माणूस झाला का? त्यासाठीच तर तो गाव सोडून शहरात गेला होता."

"नाही तू खोटं बोलतो आहेस हे शक्य नाही." माधव ओरडतो.

"खोटं वाटतं असेल तर विचार तुझ्या आई आणि मामाला."

त्याचे बोलणे ऐकून माधव जागीच स्तब्ध झाला. त्याला आत्ता एक मिनिट ही जगण्याची इच्छा राहिली नव्हती.

सगळी पिशाच्च आता माधवच्या अगदी जवळ आली होती. पण माधवला आज त्यांची भीती वाटत नव्हती. त्यांनी मला ही मारून टाकावे असे त्याला वाटत होते. आकाश त्याला ओढत होता पण तो काही केल्या जागेवरून हलत नव्हता शेवटी आकाश पण तिथून जातो.सगळे पिशाच्च माधव जवळून जातात पण त्यांनी त्याला स्पर्श ही केला नाही. ते सगळे पुन्हा त्या झाडाजवळ आले. राधा अजून तिथेच उभी होती तिने त्या सावकारकडे बोट दाखवून सांगितले

"तुमचा आणि माझा गुन्हेगार हाच आहे यानेच तुम्हाला पाण्यात विष कालवून मारले. तुमच्याकडून माझी हत्या यानेच करवून घेतली. आज वर ज्या गुन्ह्याची शिक्षा तुम्ही भोगत होता तो गुन्हा खरं तर याचा आहे."

तीच बोलण ऐकून  सगळे खूप रागात  गुरगुरत त्याच्या दिशेने जातात तो खूप पळण्याचा प्रयत्न करतो पण चहूबाजूंनी त्याला त्यांनी  घेरून घेतले असते. त्याला एक एक चेहरा दिसू लागतो. त्यात त्याची बायको पण असते. तो तिला विनवण्या करतो मला माफ कर म्हणतो पण आता काही उपयोग नसतो.

सगळे पिशाच्च त्याच्यावर तुटून पडतात काही सेकंद त्याच्या आरोळ्या ऐकू येतात नंतर ते ही बंद होते.जसा तो सावकार मरण पावतो तसेच सगळे पुन्हा आधी सारखे होतात. सारा परिसर आता शांत झालेला असतो. वादळ थांबले असते. सगळे जण राधाजवळ येतात ती पण आता शांत झालेली असते.

"माधव !माधव !" राधा त्याला आवाज देते तसा तो तंद्रीतून बाहेर येतो.

सगळ्यांना असं बघून त्याला ही आनंद होतो.

"माधव आम्ही तुझे आभारी आहोत. तू आम्हाला या नरकातून सोडवलंस". असं म्हणून सगळी पिशाच्च एक एक करून हवेत विरून जातात.

शेवटी फक्त राधा राहते ती त्याच्या जवळ येऊन त्याला अगदी प्रेमाने फक्त बघते आणि म्हणते, "माधव या जन्मी तर नाही पण पुढच्या जन्मी नक्की आपण एक होऊ. आता मला गेलं पाहिजे माझी वेळ झाली आहे."

"नको जाऊ राधा मी कसा जगू तुझ्याविना?"  माधव रडत असतो. तिच्या चेहऱ्यावर एक समाधानी स्मित असते. आणि ती पण तशीच हवेत विरून जाते..

माधव तिला  हाका मारतो, राधा ..राधा ..राधा .. पण राधा आता गेली असते कायमची. वरून आकाशातून एक मोरपंख हवेत उडून माधवच्या हातात येते. माधव वर बघतो तर राधा आकाशातून त्याला बघून स्मितहास्य करत असते. तो ते मोरपंख घेऊन घरी जातो .

तो सरळ आईच्या रूममधे जातो.

"आई राधाच्या मृत्यूमधे बाबांचाही हात होता का?"

आई त्याच्या प्रश्नाने आधी थोडी घाबरते पण आता उत्तर द्यावेच लागेल म्हणून ती त्याला फक्त नाही म्हणते.

"मग त्या सावकारसोबत ते ही या तस्करीच्या व्यापारात  सामील होते का?"

"हो." आई उत्तर देते.

आता माधवला समजते भीमा त्यादिवशी जे सांगत होता त्यात तो दुसरा मनुष्य दुसरा तिसरा कुणी नसून त्याचे बाबाच होते. माधव पुरता कोसळतो.


काही दिवसानंतर

माधव त्याची सगळी संपतीचा उपयोग राधापुर गावाच्या पुनर्वसन करण्यात करतो. तो तिथे एक शाळा आणि एक अनाथालय सुरू करतो. तिथल्या प्रत्येक मुलीचे नाव तो राधा  ठेवतो. त्या झाडाला लागून  एक सुंदर बगीचा बनवतो आणि तिथे एक मंदिर असते त्याचं नाव असते प्रेमाची देवी राधा राणीचे मंदिर.

आज ही तो जेव्हा केव्हा ते मोरपीस हातात घेऊन कुरवाळतो राधा त्याच्या आसपास  आहे असेच वाटते. आता ते गाव खूप सुंदर असते.

 समाप्त.

कथा आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.

वरील कथा सोनाली जाधव यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित 


फोटोवर क्लिक करा आणि पाहा ही सुंदर कथा 



Post a Comment (0)
Previous Post Next Post