शापित भाग बारा

 शापित भाग १२

✍️सोनाली जाधव

मागील भाग इथे वाचा

👇

भाग अकरा

माधव  तसाच तडक घरी आला. तो सरळ मामाच्या रूममधे गेला.


"मामा राधा मला पत्र पाठवत होती का?"


त्याने एकदमच प्रश्न केला. त्याच्या प्रश्नाने मामा थोडे दचकून गेले.


"हो पाठवत होती."


"मग ती माझ्यापासुन का लपवली?" माधव रागातच बोलला.


"कारण तसं करायला मला तुझ्या बाबांनी सांगितले होते. तू बाहेर शिकत होतास. उगाच तुझ्या डोक्यात हे प्रेमाचं खुळ जायला नको म्हणून त्यांनी ती पत्रे तुझ्यापर्यंत पोहचू दिली नाही. तसंही ते तुमचं लग्न लाऊन देणारच होते. पण मधेच हे सगळं घडलं मग हा विषय पुन्हा नको म्हणून त्यांनी ती तुझ्यापासून लपवून ठेवली."


"मला हवी आहेत ती पत्र." माधव थोडा रागानेच बोलला.


मामांनी कपाटातून ती पत्रे काढून माधवच्या हातात दिली.


तो सरळ काही ही न बोलता त्याच्या रूममधे गेला. जमिनीवर  बसला. एक एक पत्र घेऊन तो वाचत होता. त्यातील एक एक शब्द त्याला राधाच्या आणखीनच जवळ घेऊन जात होता.


राधाने त्यात एकूण एक गोष्ट लिहीली होती. तिची शाळा, तीचे बालपण तारुण्य सगळ काही. त्याने एकदमात सगळं वाचलं. त्यात तिचा एक फोटो पण होता. तो हातात घेऊन त्याने छातीशी धरला आणि आता एक शेवटचं पत्र त्याने वाचायला घेतलं.


या पत्रात राधाने लिहले होते,


प्रिय माधव 


कसा आहेस तू, सध्या तुझी सतत खूप आठवण येते .माधव कदाचित हे माझे तुला शेवटचे पत्र असेल. माझ्या जीवाचे काही बरं वाईट झालं तर त्यात नवल  मानू नको. कारण ही तसेच आहे. मागच्या काही दिवसापासून सावकार आणि त्याचा मुलगा माझ्या मागे हात धुवून लागले आहेत. त्या मागे कदाचित मागे घडलेली एक घटना असू शकते. कारण मला त्यांच्यावर संशय आहे.


त्या दिवशी शेतात जात असताना मी एक आवाज ऐकला. त्या दिशेने  गेली तर समोर एका पडक्या खोलीत काही लोकांना डांबून ठेवले होते. मी खोलीच्या तुटलेल्या खिडकीतून आत डोकावून पाहिले. त्यांचे हात पाय बांधले होते तोंडाला कापड बांधले होते, ते सुटण्याची धडपड करत होते. त्यांच्या तोंडातून थोडा थोडा आवाज येत होता.


मी आजूबाजू बघितले तिकडे कुणीच नव्हते. मग मी हळूच कडी उघडुन त्यांना सगळ्यांना सोडवले. त्यात काही मुली पण होत्या त्यांनी मला सांगितले की त्यांना दुसऱ्या गावातून पळवून आणले आहे. कुणी हे ते सांगु शकले नाही. मी त्यांना रस्ता दाखवला आणि तिकडून पळून जा असे सांगितले. तेवढ्यात तिथे कुणी एक माणूस आला ज्याने आपला चेहरा पूर्ण बांधून ठेवला होता. त्याने मला आणि बाकी लोकांना पळताना बघून घेतले. पण आम्ही कसे तरी तिथून निसटलो. तो जास्त वेळ आमचा पिच्छा करू शकला नाही.


त्यानंतर सतत माझा कुणी तरी पाठलाग करत आहे मला वाटायचं. काही दिवसांनी सावकार आणि त्याचा मुलगा माझ्या घरी आले त्यांनी मला लग्नाची मागणी घातली पण मी साफ मना केलं.


आपल्या विषयी सगळ्यांना माहिती असतानाही त्यांनी मला मागणी का घातली? माझ्या नकाराने तो आणि त्याचा मुलगा दुखावला गेला.


त्याचा तो नक्की सुड घेईल याची मला आणि आई बाबाना पक्की खात्री आहे. त्यांनी मला गावातून पळून जा असेही सांगितले पण मी त्यांना सोडून नाही जाणार. त्यादिवसानंतर त्यांनी आम्हाला खूप त्रास द्यायला सुरूवात केली. मला त्यांच्यावर संशय आहे.


तुला हे पत्र मिळेल तेव्हा मी असेल किंवा नाही  माहीत नाही पण जाता जाता एक शेवटचं सांगते.


माझे खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि कायम राहील.



तुझी 


        राधा.


पत्र वाचून माधवचा बांध फुटला. त्याने तिचा फोटो हातात घेतला आणि पूर्ण अंतःकरणाने त्याने आवाज दिला. ' राधा' आणि जोर जोरात रडू लागला. इतका जोरात की त्याच रुदन मामा आणि आईलाही ऐकू येत होते. 


त्या बाबांनी सांगितले होते की ज्या दिवशी तू पूर्ण स्वतःला विसरून पूर्ण अंतःकरणाने तिला आवाज देशील त्यादिवशी ती नक्की येईल.


तो गुडघ्यात मान घालून रडत होता  की पूर्ण खोलीचे वातावरण बदलले खिडक्यांची उघडझाप होऊ लागली. खोलीभर पूर्ण धुकं पसरले. वारा वाहू लागला टेबलावरची पुस्तकांची पाने जोरात फडफडू लागली. राधाची सगळी पत्रे पूर्ण खोलीत पसरली . घड्याळाची टिकटिक बंद झाली.


आणि आज ते झाल जे कधी शक्य नव्हते. त्याच्या त्याआरोळीने नियतीचे ही नियम बदलले.


लक्ख असा प्रकाश सर्वत्र पसरला. एक मंद सुहास दरवळू लागला . राधाने माधवला आवाज दिला, ' माधव'. त्या आवाजाने माधव एकदम स्तब्ध झाला.


त्याने वर मान केली तर समोर सुंदर  एखादी परीच जणू, अशी  ती उभी होती. हो तीच ती राधा.


स्वर्गातल्या अप्सरा ही तिच्या सौंदर्यापुढे फिक्या होत्या. अप्रतिम सौंदर्याची ती राणी होती. जितकी सुंदर तितकीच पवित्र. अगदी नावाप्रमाणे. तिचे सौंदर्य बघून माधवचे डोळे दिपून जात होते. तो फक्त तिच्याकडे बघत होता. तिने पुन्हा त्याला हाक मारली 'माधव.'..


तिच्या आवाजाने माधव भानावर आला. त्याने तिला आवाज दिला पूर्ण अंतःकरणाने 'राधा ' ....


त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. चेहरा खुलून गेला. रडावं की हसावं हेच त्याला समजत नव्हते. 


जिला तो कधी भेटला नाही जिला त्याने कधी बघितले नाही अश्या त्या राधाच्या प्रेमात तो आकंठ बुडाला होता आज ती  समोर उभी होती. त्याला त्याच्या डोळ्यावर विश्र्वास होत नव्हता. त्याने पुन्हा हाक मारली.' राधा '......


त्याची ही हाक ऐकायला तर राधा आली होती. राधा आणि माधव आज समोरासमोर होते पण त्यात तरीही खूप अंतर होते.


जीवन आणि मृत्यू चे अंतर. माधव राधाला म्हणतो.


"राधा मला माफ कर. आपण एकमेकांना वचन दिलं होत कधीही मी तुला आणि तू मला विसरणार नाही असे. पण मी विसरलो ग! तुला का सहन केला हा विरह तू? का नाही आठवण करून दिली मला आपल्या प्रेमाची? मला जर आधीच हे सगळं कळले असते तर आज तू आणि मी सोबत असतो. तुला हा दुर्दैवी मृत्यू आणि मला हे अपराध्यासारख जीवन भोगावं लागलं नसते."


"जर तरच्या गोष्टी सोड माधव. तुझा यात काही दोष नाही. माझ्या नशिबात ते असेल तर त्याला तू किंवा मी काही ही करू शकत नाही. राधा आणि माधव हे गवताच्या पाती आणि दवबिंदू सारखे आहेत. न एक होऊ शकतात न विलग होऊ शकतात. राधा आणि माधवच्या नशिबी जणू काही विरह लिहला आहे. पण त्या पवित्र प्रेमाची सर कशालाही नाही." राधा बोलली.


"नको अस बोलुस ग! तुला अस बघून त्रास होतो मला. तू समोर असून तुला स्पर्श देखील करू शकत नाही मी. आज माझ्यासारखा अभागी कुणी नसेल. आपले प्रेम जरी उशिरा मला आठवलं असले तरी माझं आजही खूप प्रेम आहे तुझ्यावर." असे बोलून माधव रडायला लागला. माधवचे बोलणे ऐकून राधालाही गहिवरून आले.


"माधव सांभाळ स्वतः ला अजून तुला खूप काही करायचे आहे. मला आणि गावाला मुक्त करायचे आहे. मला न्याय मिळवून द्यायचा आहे."


माधव तिच्या कडे बघतो आणि दोन मिनिट विचार करून बोलतो.


"राधा गाव तर शापित झाले म्हणून मुक्त नाही झाले आजवर पण तू का अडकली आहेस."


त्याच्या या प्रश्नावर राधा किंचित हसून म्हणते.


"मी अडकली आहे कारण मरताना मी बदल्याची भावना मनात घेऊन मेली. माझ्या मनात राग होता, बदला होता आणि त्यामुळेच मी यात अडकली आहे. जोवर मला न्याय मिळत नाही मी मुक्त होऊ शकत नाही."


माधव तिचे बोलणे ऐकून उभा होतो तो एका निर्धारानेच.


"राधा माझ्या जीवनाचा उद्देश आता केवळ तुला यातून मुक्त करणे हाच आहे. तू नक्की मुक्त होशील राधा. हे माधवचे राधाला  वचन आहे."


त्याच हे बोलणे संपते न संपते तेवढ्यात राधा तिथून निघून गेली असते. पुन्हा सगळ वातावरण आधीसारखे होते. पुन्हा  घड्याळाची टीक टीक सुरू होते. माधव अजूनही तसाच खाली मांन घालून जमिनीवर बसला आहे. तो खाडकन उठतो जसं काही स्वप्नातून जागा झाला असेल तसा. आणि इकडे तिकडे बघु लागतो .


"राधा! राधा !राधे ! तो तिला आवाज देतो.


त्याला आठवत की त्याने तिला जोरात अंतःकरणापासून आवाज दिला होता आणि ती आली होती. त्यांच्यात जे बोलणे झाले ते ही त्याला स्पष्ट आठवते. "नक्कीच ते स्वप्न नव्हते. ते खरे होते. आज मी तिला प्रत्यक्षात पाहिलं. हो ती माझी राधाच होती". तो स्वतःशीच बोलत असतो.


माधव राधाचे सगळे पत्र उचलतो आणि सांभाळून एका कपाटात ठेवतो. त्यातले शेवटचं पत्र एक पुरावा म्हणून वापरता येईल असे त्याला वाटते.


तो डोळे पुसतो फ्रेश होतो आणि आकाशला भेटायला जातो.


पुढे काय होईल 


आकाश आणि माधव चां प्लॅन यशस्वी होईल का??


वाचा


पुढच्या अंतिम भागात 

पुढील भाग इथे वाचा

👇

भाग तेरा

क्रमशः


वरील कथा सोनाली जाधव यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित.

 




Post a Comment (0)
Previous Post Next Post