शापित भाग दहा

 शापित _भाग_१०

माधव आज खुश होता. पहिला टप्पा पार झाला होता. घरी पोहचल्या पोहचल्या  त्याने आधी आकाशला भेटायला बोलवले.

आकाश आणि माधव त्यांच्या नेहमीच्या जागी भेटले.

"आकाश तुला खूप महत्वाचं सांगायचं  आहे." माधव खूपच उत्साहित होऊन सांगत होता.

तिथे जे काही घडले त्याने आकाशला सगळे काही सांगितले. आकाश हे सगळं ऐकून खूप थक्क झाला .

"माधव आपण अस करू पुन्हा एकदा त्या गावात जाऊ अजून काही पुरावे मिळतात का ते बघू."

आकाशचे बोलणे ऐकून माधव एकदम विचारात पडला.

"पुन्हा तिथे !"

"का रे घाबरलास का?" आकाशने मस्करी केली.

"अरे नाही! पण तिथे जाणं धोक्याचे आहे आम्ही कसे वाचलो आम्हालाच माहीत."

"आई नो! पण जावं तर लागेलच" आकाश बोलला.

"आपण उद्या जाऊया. तू तुझी गाडी घे. सोबत काही हत्यार पण ठेव. मी माझी रिव्हॉल्व्हर पण घेतो. मी आहे सोबत घाबरु नको." असे म्हणून आकाश निघून गेला.

माधव काही बोलू शकला नाही. त्याला पुन्हा तिथे जाणं जरा धोक्याचे वाटत होते पण जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

दुसऱ्या दिवशी माधव आणि आकाश पुन्हा एकदा राधापूरकडे रवाना झाले ..

आता ते दोघं गावात येऊन पोहचले होते. गाडी त्यांनी थोडी दूरच ठेवली होती. सोबत काही हत्यार घेतले. आकाशने कॅमेरा आणला होता सोबत तो ही घेतला .

दोघं ही गावाच्या हद्दीत प्रवेश करतात. प्रवेश करताच त्यांना वातावरणात बदल जाणवतो. बाहेरच्या तापमानात आणि इथल्या तापमानात खूप बदल झालेला त्यांना जाणवतो. माधवने या आधी हे सगळं अनुभवलेले असते पण आकाश साठी नवीनच होते.

आकाश वरून जरी दाखवत नसला तरी मनातून तो ही घाबरलेला असतो. दोघं ही त्या झाडाजवळ जातात जिथे राधाचा मृत्यू झाला होता.

माधव एकटक त्या झाडाकडे बघत असतो. एक थंडगार वाऱ्याची झुळूक त्याला हळुवार स्पर्श करून जाते.

माधवला अस बघून आकाश त्याला आवाज देतो, 

"माधव  कुठे हरवलास. चल आपल्याला पुरावे शोधायचे आहेत."

दोघं ही गावात आत मधे जातात .

तिथे एक  घर बाकी घरापेक्षा एक बरे  दिसते. अंगणात एक गाडी जीर्ण अवस्थेत पडलेली असते. घरावरून ते सावकाराचे घर असावे असा कयास ते लावतात .

घरामधे जाऊन त्याचा काही फोटो वैगरे भेटतो का हे शोधत असतात.

घराचा दरवाजा उघडताच तिथे खूपच घाणेरडा वास येतो. आकाश आणि माधव दोघं ही तोंडावर रुमाल लावतात. थोडं शोधल्यावर त्यांना भिंतीवर एक फोटो दिसतो .

आकाश त्याचे दोन तीन फोटो काढतो.

"चल आकाश! इथून माझा जीव गुदमरतो आहे". असं म्हणून माधव त्याला तिकडून घेऊन जातो.

दोघांना बराच वेळ झाला होता इथे येऊन.

 दोघं ही पुन्हा राधाचे घर शोधू लागतात. माधवच्या माहितीनुसार राधा आणि तिचा पूर्ण परिवार त्या दिवशी मरण पावले होते. तिचा एक मानलेला भाऊ होता ज्याचा काही थांगपत्ता नव्हता. म्हणजे तीच घर रिकामंच असणार. ज्या घरात कुणी ही नसेल तेच तीचे घर असणार असे म्हणून दोघं पुन्हा शोध मोहीम सुरू करतात .

"प्रत्येक घरात जाऊन बघणे जरा जिकिरीच आहे." माधव म्हणतो. "कारण प्रत्येक घरात मेलेले लोक आहेत त्यांचा कुबट सडलेला वास असह्य होतो. कसं शोधायचं आणि आता उशीर पण होतोय ."

पण आकाश ऐकत नाही. माधव पैंजण खिशातून बाहेर काढतो तसे त्याला त्याचे जुने घर आठवते. तो आकाशला घेऊन तिकडे जातो "आम्ही शेजारी शेजारी राहत होतो जर हे माझं घर होतं तर हे बाजूला नक्की राधाचं घर असेल." असं म्हणून ते दोघं पण तिकडे त्या घराकडे जातात.

दार उघडताच तिथे इतर घरासारखा घाणेरडा वास येत नाही आणि आश्चर्य म्हणजे एवढ्या वर्षापासून बंद असून ही घर अतिशय स्वच्छ आणि नीटनेटके असते. जणू काही कुणी इथे राहत असणार. आतमधे सुंदर असा मोगर्याचा सुंगध येत असतो. समोर राधा आणि तिच्या आई वडिलांचा फोटो लावलेला असतो.

दोघं ही हे बघून खूप आश्चर्यचकित होतात की राधा आणि तिच्या आई वडिलांच्या फोटोला हार घातलेला असतो .

"कसं शक्य आहे? इथे तर कुणीच राहत नाही मग हे हार कसे काय?" आकाश बोलतो.

पण माधवचे तिकडे लक्ष नसते. तो फक्त राधाचा फोटो बघत असतो.

"किती सुंदर होती रे राधा. माझी राधा!"  त्याचे डोळे ओले होतात. आकाश त्याच्या खांद्यावर हात ठेऊन त्याला सांत्वना देतो.

"चल माधव आपल्याला इकडून आता गेलं पाहिजे. संध्याकाळ होत आली आहे.. आकाश  माधवला सांगतो. आकाश तिथले ही फोटो घेतो आणि दोघं ही घर बंद करून पुन्हा गाडच्या दिशेने यायला लागतात. माधवची नजर सूर्यास्ताकडे असते तर पाऊले झपाझप चालत असतात.. पण गाव नवीन असल्याने रस्ता काही सापडत नाही. दोघं खूप वेळा फिरून फिरून एकच ठिकाणी येतात चकवा लागल्यासारखे.

शेवटी दोघं ही ठरवता की ज्या दिशेला सूर्यास्त होतो आहे आपण त्याच्या विरुध्द दिशेने जाऊ कारण आपण आलो तेव्हा त्या बाजूने सुर्योदय झाला होता. दोघं तसेच करतात. सूर्याची शेवटची किरण डोंगराच्या आडून दिसत असते ..

माधव खूप घाबरतो कारण त्याने याचा अनुभव आधीही घेतला होता. दोघं ही भराभर चालत असतात पण आज काही केल्या अंतर संपतच नाही वाटत असते.

आणि पुन्हा तोच दार उघडण्याचा कर्र !!! असा आवाज काळजाला चर्र करून जातो .

माधव आकाशला म्हणतो, "आकाश मागे वळून बघू नको. जितके जोरात पळता येईल तेवढे जोरात पळ."

दोघं ही सुसाट वेगाने गाडीच्या दिशेने पळतात.

गाडी जवळ पोहचतात पण गाडीची चावी मात्र सापडत नाही. 

एव्हाना सगळे लोक घराबाहेर पडलेले असतात. ते त्यांच्या दिशेनेच येताना माधवला दिसतात. माधव आकाशला म्हणतो, "आकाश गाडी सोड इथून पुढे ५००मी अंतरावर एक देऊळ आहे आपल्याला काही ही करून तिकडे जायचं आहे."

आकाश मानेनेच हो अस म्हणतो आणि दोघं ही जीव मुठीत घेऊन पळत सुटतात. ते पिशाच त्यांच्यापर्यंत पोहचणार असतात तेवढ्यात ते दोघं ही तिकडून निसटलेलं असतात .देऊळ येईस्तोवर मागे न बघता ते पळतच असतात.अखेर देऊळ येते. समोर मारुतीरायाला बघून दोघांचाही जीवात जीव येतो. दोघं मंदिरात जाऊन लपून बसतात.

आकाश गावाकडे बघतो. ते सर्व पिशाच्च त्यांना खुनशी नजरेने बघत असतात..

"तिकडे बघू नको." माधव आकाशला सांगतो.

दोघांही खूप दम लागलेला असतो. आज आपण मेलोच असे त्यांना वाटते पण पुन्हा एकदा नशिबाने माधवची साथ दिली आणि ते दोघंही  वाचले.

ते पिशाच माधवच्या गाडी जवळच घिरट्या घालत असतात.लकाही रागाने त्यावर नख ओरबडत असतात. माधव दुरून ते बघत असतो. आकाशची तर हिंमतच  होत नाही बघण्याची. पूर्ण रात्र हा लपंडाव सुरू असतो. दोघं ही जीव वाचला म्हणून मारुतीला नमस्कार करतात.

रात्र भर ते दोघे मंदिरातच बसून असतात. दिवस उजाडलेला असतो. माधव बाहेर डोकावून बघतो तर सगळं पुन्हा शांत झालेलं असते.

तो आकाशला उठवतो. दोघेही गाडीकडे जातात गाडीची फार दुर्दशा झालेली असते. माधव त्यांना शिव्या हासडतो. त्याची गाडी खराब केली म्हणून.

दोघं ही गाडीत बसतात गाडी सुरूच करतात की कुणी तरी गाडीच्या काचेवर जोरजोरात हात मारत असतो. त्याला बघून माधव आणि आकाश थोडे दाचकतात. अश्या निर्मनुष्य ठिकाणी कोण असेल बरं! दोन मिनिटं ते त्याच्याकडेच बघत असतात. अश्या ठिकाणी कुणावरही त्यांना विश्वास करावा वाटत नाही. तो मनुष्य अजून ही जोरजोरात काच वाजवत असतो. गाडी थांबवावी म्हणून विनवण्या करत असतो. माधव थोडा विचार करून गाडीची काच खाली करतो. तो इशार्याने काही तरी सांगत असतो. माधव आणि आकाश दोघंही गाडी बाहेर येतात.

त्याच्या डोक्याचे आणि दाढीचे केस खूपच वाढलेले असतात. कपडे मळलेले आणि फाटलेले असतात. डोळ्यांचे खोबणे खोल गेलेली असतात. चेहऱ्याचे हाड दिसत असतात. पोट खपाटीला गेलेले असते. एकूण एक तो खूप दिवसांपासून उपाशी आहे असे जाणवते. तो बोलण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याला बोलता येत नाही. तो फक्त इशार्यानी गावाकडे बोट दाखवून काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्याची अवस्था बघून माधव आणि आकाशला त्याची दया येते. ते त्याला थोडे पाणी प्यायला देतात आणि आपल्या सोबत गाडीत बस असे सांगतात.

माधव आणि आकाश त्या अनोळखी व्यक्तीला घेऊन शहरात परत येतात. ते त्याला एका हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. तिथे त्याची योग्य व्यवस्था करून त्याचावर नजर ठेवतात.

दोन दिवसानंतर माधव आणि आकाश त्याला तिथे भेटायला जातात. आता त्याची अवस्था बऱ्यापैकी सुधारलेली असते
त्याचा अवतार सुधारलेला असतो, स्वच्छ कपडे घातलेले असतात. तो कुणी मनोरुग्ण नसून एक साधारण व्यक्ती आहे हे त्यांना समजते. आता तो थोडं थोडं बोलू शकत होता. त्याची प्रकृती आता ठीक आहे आणि तो तुमच्याशी काही बोलू इच्छितो असे डॉक्टर त्यांना सांगतात. माधव त्याला भेटायला आत मध्ये जातो. तसा तो माधवला बघून गळ्यात पडून रडायला लागतो आणि माधवला सांगतो,

"माधव तू मला ओळखलं नाहीस का? कसा ओळखशील? तू गाव सोडून गेलास तेव्हा खूप लहान होतास पण मी तुला ओळखतो".

कोण आहे हा अनोळखी मनुष्य?तो माधवला कसा ओळखतो?

वाचा पुढच्या भागात..!

क्रमशः

    

Post a Comment (0)
Previous Post Next Post