शापित भाग नऊ

 

शापित भाग ९

✍️ सोनाली जाधव

मागील भाग इथे वाचा

👇

भाग आठ

माधवने चेहऱ्यावरचे भाव बदलले.त्याने दार उघडले.आई तिथेच उभी होती.

"माधव किती वेळ लावतो रे ! कधीपासून आवाज देते आहे तुला. चल जेवायला."


एवढं बोलून आई निघून गेली. माधवने स्वतःला सावरलं आणि तो पटकन गेला. रात्री  तो झोपायला रूममधे आला तेव्हा त्याला थोडी भीती वाटत होती. पुन्हा ते सगळं दिसलं तर. माधवला खरं तर जिज्ञासा होती जाणून घ्यायची पण भीती वाटत होती. त्याने विचार केला बघू काय होईल ते आणि तो झोपून गेला.


मध्यरात्र झाली होती सर्वत्र शांतता होती. घड्याळाची टीक टीक तेवढी ऐकू येत होती. माधवला आता अंधार नाही लक्ख प्रकाश दिसत होता इतका की त्या प्रकाशने त्याचे डोळे दिपून जात होते. त्याने डोळ्यांवर आपला हात ठेवला आणि थोडं थोडं मिणमिणत्या डोळ्यांनी बघण्याचा प्रयत्न केला. समोर एक अतिशय सुंदर ,शुभ्र वस्त्र परिधान केलेली एक स्त्री त्याला दिसत होती. प्रकाशाचा झोत इतका होता की तो स्पष्ट काही बघू शकत नव्हता. त्याला फक्त एक स्त्री जिने सुंदर असे शुभ्र वस्त्र परिधान केले आहे. पण ती दुःखी दिसतेय तिचे हात साखळदंडांनी बांधले आहेत, तिचे केस विखुरले आहेत आणि ती स्वतःला यातून सोडवण्यासाठी विनवण्या करते आहे, रडते आहे, एवढंच काय ते दिसत होतेे.


तेवढ्यात  वाऱ्यामुळे खिडकी जोरात उघडते आणि तिच्या आवाजाने माधव खडबडून जागा होतो. त्याचा चेहरा पूर्णपणे घामेजलेला असतो. तो उठून बसून राहतो त्याला या आधी कधीच असे स्वप्न पडले नव्हते पण आज दोनदा असे स्वप्न पडले. तो थोडा विचार करतो आज काय काय घडलं ते.


त्याला आठवत की मला जेव्हापासून ती पैंजण भेटली तेव्हापासूनच हे सगळे घडते आहे. तो झटकन ती पैंजण उशी खालून काढतो थोडा वेळ तिला बघतो आणि पुन्हा ड्रॉवर मधे ठेऊन देतो. माधव विचार करतो की हे सगळं काय आहे नक्कीच हे राधाशी संबंधित आहे. ती मला संदेश तर नाही ना पाठवत. कदाचित तिला मला काही तरी सांगायचं आहे.


माधव विचार करत करत पुन्हा झोपून जातो. आता त्याला कोणतेही स्वप्न येत नाही. सकाळी उठतो तो हॉर्नच्या आवाजानेच. खालून आकाश जोर जोरात हॉर्न वाजवत असतो. त्याला पाहून माधव लगेच खाली येतो.

"अरे माधव तू तर बिनधास्त झोपला आहेस. आपल्याला पुढे काही करायचं की नाही"? आकाश त्याला विचारतो.


"अरे हो मी कालच सर्च केलं असे टाईपचे अघोरी बाबा हे गिरनार पर्वाताकडे राहतात. आपल्या तिकडे लगेच जायला हवं."

माधव दबक्या आवाजात आकाशला सांगतो तेवढ्यात आई तिथे येते.


"काय कुठे जायचं आहे दोघांना?"आई विचारते.


"अरे कुठे नाही मी आणि आकाश जरा फिरून येऊ असा विचार करतो आहे." माधव आईला सांगतो.


"हो जाऊन या तुला ही थोड फ्रेश वाटेल." आई पण परमिशन देऊन टाकते.


आई गेल्यावर माधव आकाशला गिरनारबद्दल सांगतो.

दोघं पण लगेच जायला तय्यार होतात . माधव लगेच दोन विमानाची तिकीट बुक करतो त्याला थोडा ही वेळ वाया घालवायचा नसतो.


गिरनार पोहचता पोहचता त्यांना रात्र होते. गिरनार रात्रीच्या वेळी अतिशय सुंदर दिसत होता. तिथे शिखरावर दत्ताचे स्थान आहे. नाथपंथीय लोक  इकडेच राहतात. दोघांचा शोध सुरू झाला. अघोरी बाबांबद्दल तिथल्या लोकल लोकांना ते विचारू लागले पण निराशाच पदरी पडली. त्यांच्या बाबतीत कुणी ही काही सांगण्यास तयार नव्हते. थकून भागून ते एका चहा क्या टपरी वर बसले.दोघंही शांतच होते.


तसाच एक घोघरा आवाज आला. "तुम्ही ज्यांना शोधता आहात ते पर्वतच्या पलीकडे गुफेमधे राहतात."

एक कच्छी बांधणीचे भले मोठे पागोटे घातलेला माणूस तिकडे बसलेला होता. त्याच्या मिश्या लांब आणि झूपकेदार होत्या. डोळे थोडे लाल होते. वयोमानानुसार साधारण सत्तरीचा असावा. कानात भले मोठे चांदी सोन्याचे रिंग्ज होते. हातात जाडजूड चांदीचे कडे होते. सफेद शर्ट आणि सफेद धोती असा त्याचा पोशाख होता. तोंडाने जोर जोरात हुक्का ओढत गुद्गुड आवाज करत होता. एकूण एक तो तिथलाच रहिवासी असल्याचं समजत होते. माधव उठून त्याच्याजवळ गेला.

"तुम्ही काही बोललात का?" असा प्रश्न त्याने केला.


"तू शोधतोय ना त्या अघोरीला."


"हो हो!पण तुम्हाला कसं माहीत?" माधवने विचारलं.


"तो तुझीच वाट बघतोय कित्येक वर्ष. जा पलीकडे राहतो तो."


"पण मी त्याला कसा ओळखू ?" माधवने शंका विचारली.


"तो ओळखतो ना तुला." असं म्हणून पुन्हा हुक्का ओढत ओढत तो निघून गेला.


माधवला एक लिंक भेटली होती पण आता तिकडे जाणं शक्य नव्हते 

खूप रात्र झाली होती. ते दोघं ही खूप दमले होते. त्यानी रात्री आराम करून मग उद्या तिकडे जाण्याचे ठरवले होते.


दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून त्यांनी पलीकडे जायचं ठरवलं पण आकाशला काही कारणाने परत जावं लागलं. माधव एकटाच पलीकडे जायला निघाला. दिवसा तर गिरनार अजून  सुंदर दिसत होता. पलीकडे जायचा मार्ग अतिशय बिकट होता. गिरनार प्रदक्षिणा करणारे लोक अधून मधून त्याला भेटत होते. तो ही त्यांच्या मदतीने अखेर पलीकडे पोहचला.


पलीकडे अतिशय घनदाट जंगल होते. आता  संध्याकाळ झाली होती. हवेत गारवा वाटत होता. माधव चालत जात होता  कुठे जायचं आहे काही माहीत नव्हते दिशाहीन जातच होता.

दिवसभर चालून तो खूप दमला थोडा वेळ एका झाडाखाली बसला.

खिशातून त्याने पैंजण बाहेर काढली. तिला बघितले आणि पुन्हा आतमधे ठेवली. थोड्याच वेळात त्याला तिथे झोप लागून गेली.


माधव डोळे चोळत उठला तेव्हा तो एका अंधाऱ्या गुफेत होता. सर्वत्र घाण वास येत होता. मानवी हाडाचा खच इकडे तिकडे पडला होता. काही लोक तोंडावर भस्म लाऊन एका हवन कुंडाच्या आजूबाजू बसून काही तरी पुटपुटत होते. माधव हे सगळं बघून घाबरला आणि पटकन उठून उभा राहिला.


त्याला बघून एक बाबा बोलले, 

"घाबरु नको माधव तुला इथे काहीही होणार नाही, आमचे गुरुजी तुझी वाट बघत आहेत चल."

असं म्हणून तो माधवला सोबत घेऊन गेला.


माधव त्या बाबासोबत  एका गुफेत गेला. तिथे अतिशय म्हातारे जवळ जवळ १०० च्याही वर वय असलेले एक बाबा झोपलेले होते.

त्यांनी डोळे ही उघडले नाही आणि जेमतेम ते उठून बसले.

"ये माधव तुझीच वाट बघत होतो."


"माझी?" माधवने आश्चर्याने विचारले.


माधव काही बोलणार तेवढ्यातच बाबांनी त्याला सांगण्यास सुरुवात केली.


"काही वर्षा पूर्वी मला त्या गावकऱ्यांनी बोलावलं होते. ते गाव नाव काय त्याच?.... हा शक्तिपुर. मीच त्याच नाव राधापूर करायला सांगितलं होते. मी जेव्हा त्या गावात गेलो पूर्ण गाव पिशाच्च झाले होते. त्यांना मुक्ती देण्याचा मी खूप प्रयत्न केला पण ते मला शक्य झालं नाही. मी माझ्या शक्तीचा वापर करून फक्त त्यांना ते दिवसा झोपून राहतील अशी व्यवस्था केली. त्यात माझी सगळी शक्ती संपली. त्या गावाने एका पवित्र स्त्रीवर जो अन्याय केला तिचाच श्राप त्यांना लागला होता. तीच नाव राधा होते हो ना?"


  "हो बाबा" माधव बोलला.


"राधाच्या आत्म्याला मी जेव्हा बोलवलं तेव्हा ती खूप रागात होती. तिने यांना सगळ्यांना माफ करायला साफ मना केलं. ती म्हणाली, मी माझी हत्या तर माफ केली असती पण माझे आई वडील यात मारले गेले त्यांची हत्या मी कदापि माफ करणार नाही."


"मी तिला तिच्या मुक्तीसाठी काय करू असं विचारलं तर तिने मला सांगितले जोवर तो सावकार इकडे येत नाही त्याला त्याची शिक्षा मिळत नाही तोवर मी मुक्त होणार नाही. तुझी काही अपूर्ण इच्छा असेल तर तेही सांग. त्यावर तिने मला सांगितले माझी मुक्ती फक्त आणि फक्त माधवच करू शकेल. बस एवढं बोलून ती निघून गेली.

तिने आजवर कुणालाही त्रास दिला नाही. जो त्रास तुम्हाला झाला तो त्या पिशाचानी केला."


"बाबा मी तिला बघू शकेल का कधी?"माधवने विचारलं.


"खरर्या मनाने प्रयत्न करशील तर नक्कीच बघू शकतो. यासाठी पवित्र मन असावं लागत. ईश्वराच्या चरणी मन एकाग्र केलं तर अश्या पारलोकिक शक्तीशी संपर्क करता येतो. तुझ्याकडे जी पैंजण आहे ती तुला यात मदत करेल."

बाबांची शक्ती बघून माधव थक्क झाला. तो तिथून त्यांना नमस्कार करून निघायला लागला तेवढ्यातच त्यांनी त्याला मागून आवाज दिला.

"माधव बेटा प्रत्येक मनुष्य जन्म हा काही तरी कार्य करण्यासाठीच झाला असतो. तुझा जन्माचा उद्देश्य हाच आहे तो नक्की पूर्ण कर माझा उद्देश्य पूर्ण झाला आहे. माझा आशीर्वाद आहे तुला." असे म्हणून त्यांनी तिथेच देहत्याग केला.


माधवला वाईट वाटले. गेल्या काही दिवसात त्याने किती तरी मृत्यू डोळ्यांनी पाहिले होते. तो तिकडून निघून पुन्हा परतीच्या मार्गी निघाला. तो अगदी बरोबर दिशेने जातोय याचा त्याला विश्वास झाला होता. त्याने पुन्हा ती पैंजण काढली आणि तिच्यावर ओठ टेकवले आणि पूर्ण मनाने राधा! असे बोलून तो पुढे निघाला.


आता माधव काय करेल पुढे? राधाची मुक्ती कशी होईल ?

पुढच्या भागात

पुढील भाग इथे वाचा

👇

भाग दहा

क्रमशः 


वरील कथा सोनाली जाधव यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत.  ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित.

Post a Comment (0)
Previous Post Next Post