सोहळा

 सोहळा

✍️ मिलिंद अष्टपुत्रे
" ताई, ..... बघ तुझ्या सारखं गोरं होण्याची माझी इतक्या वर्षापासूनची इच्छा आता पूर्ण झाली ......" स्वतःलाच आरशात निरखत प्रज्ञा बोलली आणि मला एकदम भडभडून आले. डोळ्यात गर्दी करणारे अश्रू कसेबसे थोपवत मी चटकन तिच्या खोलीबाहेर पडले, आणि मग व्हरांड्यात जाऊन अश्रूंना मनसोक्त वाट करून दिली.
प्रज्ञा ...... माझी सख्खी धाकटी बहिण ...... माझ्याहून तब्बल पाच वर्षांनी लहान ...... मी म्हणजे तिचा आदर्श !! आमच्या लहानपणी सगळं काही तिला माझ्यासारखं करायचं असे ..... फ्रॉक माझ्यासारखा .... केसांची वेणी माझ्यासारखी ..... पायातल्या चपला माझ्यासारख्या ..... सतत माझ्या मागे मागे असायची . मी धप्प गोरी आणि ती थोडीशी सावळी  ...... माझ्या रंगाच तिला मोठं अप्रूप होतं ..... कधीकधी माझ्या गालावरून हात चोळायची ....
" अगं काय करतीयेस ?? " मी रागावून विचारायची .... गोरीमोरी होत ती म्हणायची .....
" तुझा रंग पुसला जातोय का ते बघत होते ...."
सगळं सगळं आठवून मला पुन्हा पुन्हा दुःखाचे कढ येत होते. तिला चालू असलेल्या केमोथेरेपीच्या ट्रीटमेंटमुळे गेल्या काही दिवसांपासून ती चांगलीच गोरी दिसायला लागली होती.
" असलं गोरेपण नको ग राणी ..... तू आहेस तशीच मला प्रिय आहेस ......" मनातल्या मनात मी पुटपुटले.

सहा महिन्यांपूर्वी तिला कॅन्सर डिटेक्ट झाला तेव्हा आम्ही सारेच हादरून गेलो होतो. अवघ्या चाळिशीत तिला त्या भयानक रोगाने गाठलं होतं. निदान झालं त्यावेळी कॅन्सर लास्ट स्टेजला होता. तिच्या किडनी भोवती पसरलेला होता. आधी कुठलीच लक्षणे नव्हती. नाही म्हणायला गेल्या दोन-तीन महिन्यांपासून तिचे वजन चांगलेच कमी झाले होते. पण तो, ती करत असलेल्या डाएटचा परिणाम असावा, असं आम्हाला सगळ्यांना वाटलं होतं. गैरसमजुतीने झालेलं दुर्लक्ष चांगलंच भोवलं होतं. त्यानंतर मात्र चक्र वेगाने हलली. तिला लगेच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून तिची शस्त्रक्रिया करण्यात आली. बाधित झालेली किडनी काढून टाकून कॅन्सरवरील प्रचलित असलेली सर्वोत्तम औषधे तिला सुरू केली गेली. परंतु डॉक्टरांनी तिचं संभाव्य आयुष्य फक्त सहा महिने असेल असं जेव्हा सांगितलं, तेव्हा घरात अक्षरशः बॉम्बस्फोट झाल्यासारखी अवस्था झाली. अवघ्या आठ वर्षांचा मुलगा श्राव्य, जेमतेम त्रेचाळीस वर्षांचा तिचा पती राहूल या सगळ्यांना सोडून ती जाणार होती जेमतेम सहा महिने तिच्या हातात होते.......

" प्राची जरा इकडे येतेस का ?" प्रसादने मारलेल्या हाके मुळे मी भानावर आले. त्याने बँकेच्या कुठल्यातरी कागदावर सही करायला सांगितले. यांत्रिकपणे मी सही केली. प्रसाद तो कागद घेऊन निघून गेला, आणि पुन्हा एकदा भूतकाळाच्या आठवणीत मी ढकलले गेले.
चोवीस वर्षांपूर्वी माझ्या आणि प्रसादच्या लग्नात बेधुंदपणे नाचणारी प्रज्ञा माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली. जेमतेम सोळा वर्षांची होती ती तेव्हा ..... माझ्या लग्नातील प्रत्येक इव्हेंट तिनं मनापासून एन्जॉय केला होता. प्रसादशी तर तिची घट्ट मैत्री झाली होती. दोघांचं इतकं गूळपीठ जमलं होतं की मला सुद्धा काही वेळा असूया वाटे. त्यानंतर माझ्या संसारातील प्रत्येक घटनेचा ती एक अविभाज्य भाग होती. अथर्वचा जन्म ,आम्ही घेतलेली पहिली कार ,आमचं नवं घर, सगळं काही तिच्या साक्षीनं झालं होतं.
अथर्व म्हणजे तर तिचा जीव की प्राण ...... आणि त्याला सुद्धा लहानपणापासून मावशी अतिप्रिय ...... नुकतीच एम बी बी एस ची परीक्षा पास होऊन डॉक्टर झालेला माझा हा मुलगा, मावशीच्या कॅन्सर बद्दल डॉक्टरांशी बोलून त्यांच्या केबिन बाहेर पडला, तो एखाद्या लहान मुलासारखा रडतच ......
" का इतका जीव लावलास गं आम्हा सगळ्यांना ? आणि हे असं सगळं अर्ध्यावरच सोडून निघालीस जायला ....."
माझं मन आर्तपणे तिला जाब विचारत होतं. कशीबशी स्वतःला सावरून मी पुन्हा प्रज्ञाच्या खोलीकडे आले. प्रज्ञा शांतपणे खुर्चीत बसली होती. मला बघताच तिच्या चेहऱ्यावर हसू फुलले. माझे डोळे बघितल्यावर किंचित रुष्ट स्वरात ती म्हणाली,
" ताई अगं किती वेळा सांगितलं तुला ..... उगाचच रडायचं नाही म्हणून ..... तू रडलीस की मला त्रास होतो. कुणीही रडायचं नाही. तू ,आई-बाबा कोणीच नाही ..... मला जे काही बोनस आयुष्य यापुढे मिळणार आहे ना, ते मला पूर्णपणे एन्जॉय करायचं आहे. आता येणारा प्रत्येक क्षण हा मला आनंदाचा सोहळा म्हणून साजरा करायचा आहे. पुढच्या आठवड्यात श्राव्यची मुंज आहे ना, त्यात आपल्या दोघींसाठी मी एक डान्स बसवणार आहे. हा बघ त्याचा व्हिडिओ ..... "
माझ्या हातात तिने तिचा मोबाईल दिला. कुठल्यातरी सिनेमातील दोन बहिणींच्या नाचाचा व्हिडिओ त्यावर चालू होता .
"आणि तू व जिजाजीनी हा डान्स करायचा आहे बघ ...."
उत्साहाने माझ्या हातून मोबाईल खेचून घेत तिने दुसरा व्हिडीओ चालु केला. श्राव्यच्या मुंजीत कोणी कोणी काय काय करायचं हे तीनं पक्कं ठरवलं होतं. आणि त्याप्रमाणे तिने ते केलंही .... खूप मजा आली मुंजीत ...... मी मात्र एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात आसू अशा अवस्थेत होते.

हा हा म्हणता वर्ष सरलं. तिची जबर इच्छाशक्ती कॅन्सरला पुरुन उरली होती. मधनंच तिला कधीतरी खूप त्रास होई. दवाखान्यात ऍडमिट करायला लागे. पण आठवड्याभरात रिकव्हर होऊन ती पुन्हा परतत असे. पुन्हा एकदा मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा सोहळा साजरा करण्यासाठी......
या वर्षी आमच्या लग्नाला पंचवीस वर्ष पूर्ण होणार होती...... पण हा प्रसंग साजरा करण्याची इच्छाच उरली नव्हती. मी आणि प्रसादने साधंच काहीतरी करायचं ठरवलं होतं. सगळे मिळून कुठेतरी जेवायला जाऊ किंवा घरीच मागवू .... आदल्या दिवशीपासूनच प्रज्ञा राहायला आली होती. वाढदिवसाच्या दिवशी सकाळपासूनच ती खूप आनंदात होती. संध्याकाळी आपण जेवायला जाऊ म्हणाली. माझ्यासाठी तिने एक अतिशय सुरेख असा ड्रेस आणला होता. जेवायला जाताना तो तिने मला घालायला लावला. प्रसादलाही तिने आग्रहाने ब्लेझर आणि टाय लावायला लावला.
" आता कसे शोभतायं दोघं !! अरे यार तुमच्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस आहे. कमॉन लेटस एन्जॉय ..."
आम्ही सर्वजण गाडीतून निघालो. माझे आई-बाबा आणि सासू-सासरे दुसर्‍या गाडीतून येणार होते. प्रज्ञा ड्रायव्हिंग सीट शेजारी पुढे बसली होती.
" जिजाजी आपण जेवायला ना, त्या नवीन फाइव स्टार हॉटेल मध्ये जाऊ .... छान जेवण असतं तिथे ... " आमच्या ड्रायव्हरकाकांना खूण करत ती म्हणाली.
" तू म्हणशील तिथे जाऊ ..." प्रसाद पुटपुटला आणि मीही हुंकारत त्याला दुजोरा दिला. आम्ही हॉटेलात पोचलो आणि मी बघतच राहिले .... माझ्या सगळ्या मैत्रिणी, प्रसादचे मित्र ,आमचे नातेवाईक, लहानपणचे शेजारी, झाडून सगळे आमच्या स्वागताला उभे होते. गाडीतून उतरताच आम्हा दोघांना पंचारतीने ओवाळण्यात आले. त्या हॉटेलमधील एक पार्टी हॉल प्रज्ञाने व अथर्वने बुक केला होता. आमच्या लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवसाचा सोहळा सुरू झाला. प्रत्येकाने पुढे येऊन माझ्याबद्दलची व प्रसाद बद्दलची जुनी आठवण शेअर केली. जे कोणी हजर राहू शकत नव्हते त्यांचे व्हिडिओज दाखवले गेले. मी आणि प्रसाद दोघेही अक्षरशः दिग्मूढ झालो होतो. त्यानंतर जंगी जेवण झाले. जवळपास शंभरेक लोक हजर होते . संपूर्ण समारंभात प्रज्ञा इतक्या ऊर्जेनं वावरत होती की प्रसादच्या एका मित्राने मला हळूच येऊन विचारले,
" प्राची .... तुझी कॅन्सरने आजारी असलेली दुसरी बहीण आली नाही का ?"

"कसा विसरु शकेन मी माझ्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस ? आयुष्यातील सर्वात सुंदर संध्याकाळ तू आम्हा दोघांना बक्षीस दिलीस , प्रज्ञा .... "  माझे मन आर्तपणे रुदन करत होते. तिच्या शेवटच्या साऱ्या आठवणी भोवताली फेर धरून नाचत होत्या. आपला शेवट जवळ आल्याचं तिला कळलं होतं. खूप शारीरिक त्रास होई काही वेळा .... पण ओठ घट्ट मिटून ती सोसायची ...
" फार वेदना होतात का गं प्रज्ञा ?" काळजीनं कळवळून मी विचारायची.
" होणारच ना गं थोडाफार त्रास, एवढा मोठा आजार असल्यावर ....."
ती संयमानं म्हणायची. शक्यतो आपल्या वेदनांचा त्रास इतरांना होऊ नये म्हणून काळजी घ्यायची. जोडीदाराच्या बाबतीत ही खरी नशीबवान !!  राहूलची ती जीव की प्राण होती .... त्याने शेवटच्या दोन वर्षात तिच्यासाठी जे काही केलं, त्याला खरंच तोड नव्हती. तिच्या ट्रीटमेंटसाठी होणाऱ्या कोणत्याच खर्चाला त्याने ना केली नाही. शिवाय स्वतःचा उद्योगधंदा संभाळून तो जास्तीत जास्त वेळ तिच्यासाठी देई ..... गेल्या दोन वर्षात तब्येतीने निम्मा झाला होता राहूल .....
देव पण परीक्षा पाहतो एखाद्यावेळी ...
तिच्या वेदना काही वेळा पाहावत नसतं ... वाटायचं हे सगळं भोगण्यापेक्षा पटकन सुटली तर बरं होईल  .... पण म्हणतात ना काही गोष्टी आपल्या हातात नसतात .....

शेवटच्या काही दिवसात तिने तिचे इच्छापत्र करून घेतले. सासरच्या एकत्र कुटुंबावर तिचा फार जीव होता. तिच्या दोन जावा तिला सख्ख्या बहिणी इतक्या जवळच्या होत्या. स्वतःचे दागिने तिने जावांच्या मुलींना इच्छापत्राने दिले . स्वतःचे मंगळसुत्र चिमुरड्या श्राव्यच्या बायकोसाठी ठेवून दिले. त्रास खूप वाढला तेव्हा आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. तेथे फुफ्फुसात पाणी झाल्याने तिला व्हेंटिलेटर लावावा लागत होता. पण अखेर डॉक्टरांनीही हार मानली.
" आता काही उपयोग नाही .... तुम्ही तिला घरी घेऊन जा ." असं त्यांनी हताशपणे सांगितले . घरी आल्यावरही व्हेंटिलेटर शिवाय तिला श्वास घेता येत नव्हता. ती सारखी खुणा करून आम्हाला व्हेंटिलेटर काढायला सांगत होती.
महानिर्वाणाची वेळ आल्याचे तिने ओळखले होते.......
निडरपणे मृत्यूला आलिंगन द्यायला ती तयार झाली होती........
आई बाबा आणि आम्ही सगळे तिला शेवटचं भेटलो. माझे हात हातात घेत, खोल आवाजात ती म्हणाली,
" ताई, तुझ्यासाठी मला ब्रेसलेट करायचे होते, तेवढं मात्र राहूनच गेलं गं ...."
काय बोलावे ते मला कळेना. मी नुसतीच पाणावलेल्या डोळ्यांनी धूसर दिसणाऱ्या तिच्याकडे पाहत राहिले.
डॉक्टरांनी व्हेंटिलेटर काढला, आणि त्यांनी दिलेल्या वेदनाशामक इंजेक्शनच्या प्रभावाखाली हळू हळू ती शांत होत गेली.

आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंद सोहळा करून जगणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणीचा मृत्यू सोहळा मी भरल्या डोळ्याने पाहात असहाय्यपणे उभी होते. ती शांत झाली. आमच्या दबक्या हुंदक्यांचे आवाज त्या खोलीत भरून राहिले.
अचानक एक धीरगंभीर आवाज आम्ही सगळ्यांनी ऐकला .....  राहूल बोलत होता ......
" मी पाहिलं त्या भ्याड मृत्यूला !! चारीमुंड्या चीत झाला होता तो .... शेवटी तिची नजर चुकवत ओशाळलेल्या चेहऱ्याने घेऊन गेला तिला ...."
त्याचं बोलणं संपलं. इतका वेळ कष्टाने राखलेला माझा संयमाचा बांध फुटला, आणि आईच्या गळ्यात पडून मी माझ्या अश्रुंना मनसोक्तपणे वाट करुन दिली.

समाप्त

फोटोवर क्लिक करून वाचा एक अप्रतिम कथा 



वरील कथा श्री मिलिंद अष्टपुत्रे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखकाच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.

2 Comments

  1. Sir, dolyat paani ale. Kharach khup hridaybhedi ashi Katha ahe

    ReplyDelete
  2. सोहळा कथा हृदयस्पर्शी👌👌😊

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post