सार्थक

 सार्थक

✍️ सौ.हेमा पाटील.


या चिमण्यांनो..परत फिरा रे..

घराकडे अपुल्या..

 मोबाईलवर लागलेल्या या गाण्याचे सूर त्या शांत वातावरणात मनाला अतिशय भिडत होते. हाॅस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी मधोमध गणपतीची सुबक मूर्ती बसवली होती. तिच्या चारी बाजूंनी काच बसवायची चालली होती. ते काम दोन कामगार अगदी निगुतीने करत होते. मोबाईलमुळे आता कधीही कुठेही कुणाशीही संपर्क साधता येतो तसेच विरंगुळा म्हणून गाणीही ऐकता येतात, गेम खेळता येतात. तसेच जिथे आहे तेथूनच अत्यावश्यक संदेश ही पाठवता येतात. चौथी पाचवी शिकलेले कामगार असोत की क्लास वन अधिकारी.. सर्वांकडेच ही आयताकृती पेटी असतेच! त्यातून बाहेर पडणाऱ्या गाण्याच्या सुरांमध्ये तल्लीन होऊन या दोन कामगारांचे तल्लीन होऊन एकसुरी मार्गाने काम चालू होते.


डॉक्टर सुमित आणि डॉक्टर सानिका यांच्या हाॅस्पिटलच्या अंतर्गत सजावटीचे काम अगदी जोमाने सुरू होते. तेथीलच हा प्रसंग...


    आईवडिलांकडून चालत आलेल्या डॉक्टरच्या पिढीजात व्यवसायात उतरताना आपल्या शैक्षणिक कौशल्याकडे लक्ष केंद्रित केले की इतर सगळ्या गोष्टी सुलभतेने उपलब्ध असतात. जसे एखाद्या डॉक्टर दांपत्याच्या मुलाला अभ्यासाकडे लक्ष दिले आणि डिग्री मिळवली की आईवडिलांची ओ.पी.डी.तयार असते. इतकेच काय शिक्षण सुरू असताना त्याबाबीतील व्यावहारिक ज्ञान आपसूकच मिळत असते. व्यवसाय सुरु करताना सुरवातीच्या काळात आर्थिक बाबीत गु़ंतवणूक करावी लागत नाही. आधीच शिक्षणासाठी भरमसाठ खर्च झालेला असतो, त्यामुळे लगेच हाॅस्पिटलचे स्वप्न पूर्ण करणे शक्य नसते. आईवडिल डॉक्टर असल्यास बहुतांशी सगळे तयारच असते. या क्षेत्रात नसलेल्या पालकांनी आपल्या मुलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हाडाची काडे करत जेव्हा मुलांना डाॅक्टर बनवलेले असते तेव्हा त्या मुलांपुढे स्वतःला सिद्ध करण्याच्या जबाबदारीसोबतच शुन्यातून सगळे विश्व उभे करायचे आव्हान असते.

"त्यात काय... कुणालाही तेच करावे लागते. आईवडिलांचा व्यवसाय असला तरीही स्वतः चे कौशल्य दाखवावे लागतेच ना".. असाच सर्वसाधारण सूर असतो. परंतु आर्थिक बाबीत आधीच सगळे तयार मटेरियल असल्यावर आयत्या पीठावर रांगोळी काढणे कधीही सुलभच जाते हे लक्षात घेतले जात नाही. पण मुरुम टाकून तो बडवण्यापासून शेणकाला टाकून अंगण गुळगुळीत बनवून मग रांगोळी काढणे या संघर्षात आयुष्यातील काही वर्षे निघून जातात. अर्थातच या संघर्षाच्या काळाचा ही आपला असा एक श्रमसाफल्याचा आनंद मिळतोच...

   

  असेच डॉ.सुमित आणि डॉ. सानिका यांचे गेले दोन वर्षे जोमाने सुरु असलेले हाॅस्पिटलचे बांधकाम आता पूर्णत्वाला गेले होते. खूप अडथळे पार करत आणि नवनव्या वाटा चोखाळत दोघेजण आपल्या स्वतःच्या हाॅस्पिटलचे स्वप्न पूर्ण करण्यात यशस्वी झाले होते. या दोन वर्षांत भाड्याच्या जागेत असलेल्या आपल्या हाॅस्पिटलमधील पेशंटस् सांभाळत डोळ्यात तेल घालून बांधकामावर लक्ष केंद्रित केलेल्या डॉक्टर सुमित व डॉक्टर सानिका यांनी बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सुटकेचा निःश्वास सोडला. कारण या कालावधीतील प्रत्येक दिवस हा नवनवीन आव्हाने घेऊन येत होता. आईवडिल शिक्षकी पेशात असून मुलाचे डाॅक्टर बनण्याचे स्वप्न पूर्णत्वाला गेले होते ही संपूर्ण कुटुंबासाठी अतिशय आनंदाची गोष्ट होती. मुलांचे स्वतः च्या जागेत होत असलेले हाॅस्पिटलचे काम पाहून आईवडिलांना आपण घेतलेल्या श्रमांचा परिहार झाला असे वाटत होते.मुलाबद्दल सार्थ अभिमान वाटत होता. आईवडिलांच्या नजरेतून मिळणारी सार्थकतेची पावती डॉ.सुमित यांच्या कष्टाला अधिक बळ देत होती. आपले स्वतः चे हाॅस्पिटलचे स्वप्न पूर्ण होतेय याचा आनंद तर होताच... पण आईवडिलांनी आपल्या शिक्षणासाठी घेतलेल्या कष्टांना आपण पूरेपूर न्याय देण्यासाठी बांधील आहोत याची जाणीव त्यांना होती.


    हाॅस्पिटलमध्ये आता फक्त अंतर्गत सजावट व फर्निचरचे काम बाकी होते. नावाजलेल्या इंटिरिअर डेकोरेटर्सकडे ते काम सोपवले होते. दोन महिन्यात सगळे फर्निचर आणि सजावट तयार होऊन इमारत ताब्यात येणार असल्याने दोन महिन्यांनंतरचा दिवस उद्धाटनासाठी ठरवण्यात आला व त्या दृष्टीने निमंत्रण पत्रिका, केटरर्स आणि इतर खरेदी यांची सुरवात सुरु झाली. हाॅस्पिटलच्या रुम, प्रवेशद्वार, काऊंटर किंवा ओ.पी.डी.साठी बसायची जागा... सगळीकडेच फर्निचरचे काम प्लॅननुसार सुरु होते. अगदी बारकाईने डाॅक्टरांचे डॅडी कामाकडे लक्ष पुरवत होते. डाॅक्टर मुलांनी दिलेल्या सुचनेबरहुकूम काम होतेय का याकडे डॅडी डोळ्यात तेल घालून लक्ष पुरवत असल्याने सगळी कामे हवी तशी होत होती.

डाॅक्टरांच्या केबीनचे काम सर्वात शेवटी करायचे असे ठरले होते. अतिशय आधुनिक पद्धतीचे बांधकाम, भरपूर नैसर्गिक प्रकाश व हवा खेळती राहण्यासाठीची उत्कृष्ट योजना यामुळे आधीच प्रसन्न वाटणाऱ्या इमारतीला सुबक व आकर्षक रंगसंगती मधील फर्निचरमुळे चार चांद लागले व ती अधिकच उठावदार दिसू लागली. सभोवताली असणारी मोठी जुनी झाडे आणि त्यावर किलबिलाट करणाऱ्या पक्षांचा आवाज ऐकून शहरात असूनही निसर्गाच्या सान्निध्यात आल्यासारखे प्रसन्न वाटत असे.


"डॉक्टरांची कन्सल्टिंग रुम... रुममध्ये बॅचलरची डिग्री घेतानाचा डाॅक्टरांच्या डॅडाचा फोटो"...


"काय..? डाॅक्टरांचा असेल".


"नाही हो.. डाॅक्टरांचा नाही. त्यांच्या वडिलांचाच आहे. मी याविषयी बोललोय डॉक्टरांशी"...


"आजवर असा अनुभव पहिल्यांदाच आला ना.. आजपर्यंत कितीतरी आॅफीसमध्ये आपण इंटिरिअर केलेय. हाॅस्पिटलमध्ये पण केलेय पण असा अनुभव इथेच आला. स्वत:चा किंवा देवाचा फोटो आॅफीसमध्ये दिसतो.बरेचजण आईवडिलांचा, निकटवर्तीयांचा फोटो बाहेर हाॅलमध्ये लावतात,पण जी स्वतः ची जागा आहे तिथे वडिलांचा फोटो डाॅक्टरांनी लावायला लावलाय हे पाहून मन अगदी हेलावून गेले".


"पण फोटो लावण्यापूर्वी फोटोवर कागद लावून फोटो पूर्णपणे झाकून टाकायचा अशी सक्त सूचना डॉक्टर साहेबांनी दिली आहे ती कशासाठी हे समजले नाही".


"अरे, उद्घाटनप्रसंगी या फोटोवरुन कागद हटवायचा असे ठरवले असेल... आईवडिलांना सुखद धक्का... आपलं ते काय म्हणतात.. सरप्राईज द्यायचे असेल".


"हो.. बरोबर".


हाॅस्पिटलचे सगळे काम ठरलेल्या वेळेत पूर्ण झाले. उद्घाटनप्रसंगी शहरातील मान्यवर मंडळी व डॉक्टर्स उपस्थित होते. दरवाजावरील रेशमी फीत ज्या डॉक्टरसाहेबांकडे प्रॅक्टिससाठी डॉ.सुमित जात असत त्या गुरुतुल्य व शहरातील सर्वात जुन्या डॉ.लिमये यांनी कापली. हाॅस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. बाहेरच्या लाऊंजमध्ये मंडप घालून स्टेज उभारले होते. प्रमुख पाहुणे, मा.अध्यक्ष यांनी स्टेजवरून थोडक्यात डॉक्टर सुमित व डॉक्टर सानिका यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. त्यानंतर डॉ.सुमित यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हे मनोगत व्यक्त करताना ते भावूक झाले होते. खरंतर डॉक्टरांनी पेशंट समोर आला की तो फक्त एक पेशंट आहे असे समजून आपल्या भावना कोरड्या ठेवायच्या असतात. पण डॉक्टरचा ॲप्रन काढल्यावर ते ही सामान्य व्यक्तीच असतात. त्यांनाही मन,भावना असतातच.. आपल्या यशाचे सगळे श्रेय सुमित यांनी आपल्या आईवडिलांना दिले. ते आपल्याबद्दलचे गौरवोद्गार ऐकून डॉ.सुमित यांच्या आईवडिलांच्या नेत्रात आनंदाश्रू तरळले.


यांनतर डॉ.लिमये यांना अदबीने हाताला धरून डॉ.सुमित केबीनमध्ये घेऊन आले. केबीनमध्ये कागदाने झाकलेल्या फ्रेमसमोर त्यांना डॉ.सुमित घेऊन गेले. त्यावेळी आपल्या डॅडी व मम्मीला डॉ.सुमित यांनी पुढे बोलावले व त्या कागदाने पूर्णपणे झाकलेल्या फ्रेमचे अनावरण करण्यास सांगितले.

"पण मी कशाला? डॉ.लिमये सरांना सांग ना"..असे डॅडी म्हणाले. यावर डॉ.सुमित यांनी सांगितले, "नाही डॅडी, हा मान तुमचा आहे. तुम्हीच याचे अनावरण करा". डॅडीच्या हातात छोटी कात्री देऊन त्या फ्रेमवरील कागदावर बांधलेली रेशमी पट्टी कापण्यास सांगितले. ती पट्टी कापताना डॅडींच्या मनात विचार आला," आज समजेल कुठली फ्रेम आहे ते.. खुपदा विचारले पण कुणीच सांगितले नव्हते कुठली फ्रेम आहे ते... झाकून ठेवल्यामुळे उत्सुकता वाटत होती".


डाॅक्टरांनी हलकेच फ्रेमवरील कागद हटवला. समोरील फ्रेमकडे पाहून डॉ.लिमये यांच्यासह उपस्थित सर्वांच्या नेत्रात अश्रू दाटून आले.डाॅक्टरांनी आपल्या भावनांना आवर घालायचा असतो, त्यांचे प्रकटीकरण करायचे नसते. पण एका यशस्वी मुलाने आपल्या वडिलांचा केलेला हा बहुमान पाहून तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्याच भावना दाटून आल्या. डाॅ. लिमये यांनी डॉ.सुमित यांच्या वडिलांच्या हाताला धरून त्यांना डाॅक्टरांच्या खुर्ची कडे नेले व खुर्चीत बसण्याची विनंती केली. पण डोळे भरुन आलेल्या त्या बापाने खुर्चीत बसण्यास नकार दिला. ते म्हणाले,"डाॅक्टर हा पेशंटसाठी देव असतो. या खुर्चीत मी बसू शकत नाही". 

"बाबा, मुलाला डॉक्टर बनवण्यासाठी आपण अपार कष्ट घेतले आहेत, त्या कर्तव्यपूर्तीचा आजचा दिवस आहे. या खुर्चीवर आपण बसलात तर मुलाला आनंद होईल". असे डॉ.लिमये उद्गारले.

"पण या खुर्चीवर बसून आपल्याकडे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांकडे सेवाभावी वृत्तीने पहाणाऱ्या माझ्या मुलाकडे पाहून मला जास्त आनंद होईल. या खुर्चीचा जो मान आहे तो त्याने कायम टिकावा एवढीच अपेक्षा आहे. त्याने आपल्या केबिनमध्ये माझा फोटो लावून मला बहुमान दिलेलाच आहे. यातच मी सगळे भरुन पावलो".


"पण सुमित, तुला एक प्रश्न विचारायचा आहे... बाबांचा डिग्री घेतानाचा फोटो का लावावासा वाटला तुला"?

 लिमये सरांना पडलेला प्रश्न उपस्थित बऱ्याच जणांना पडला होता. डाॅ.सुमित म्हणाले," माझ्या डॅडींना शिक्षणाचे महत्त्व समजले होते. त्यांना स्वतःला शिक्षण घेताना जी पायपीट करावी लागली होती ते त्यांच्या तोंडून अनेकदा ऐकले आहे. त्यामुळे आमच्या शिक्षणाच्या वेळी त्यांनी स्वतःला त्रास झाला तरी आम्हाला कमीत कमी त्रास कसा होईल व आम्हाला अभ्यासाला जास्त वेळ कसा मिळेल याकडेच नेहमी लक्ष दिले. एवढेच काय आमच्या अभ्यासासाठी कायमच त्यांच्या बेडरुमला त्यांनी अभ्यासिकेचे स्वरूप दिले होते. ते कामावरुन आल्यावर कितीही दमलेले असले तरी बाहेर हाॅलमध्ये सोफ्यावर बसत, क्वचित तिथेच आडवे होत. मुलांना अभ्यासासाठी शांतता व एकांत हवा हे जाणून त्यांनी कधी टिव्ही पाहिल्याचे ही मला स्मरत नाही. करमणूक सोडा पण बातम्या ही पाहत नसत. क्रिकेटची मॅच त्यांना फार आवडायची, परंतु ती मॅच ही त्यांनी कधीही टिव्हीवर पाहिलेली मला आठवत नाही. छोटा आवाज करुन ट्रांझिस्टरवर ते मॅच ऐकत. एवढा त्याग करणाऱ्या व्यक्तीला शिक्षणाचे किती महत्त्व होते हे आम्ही मुलांनी जाणले. यासाठीच त्यांचा हा फोटोच इथे योग्य आहे असे मला वाटले".


मुलाच्या तोंडून हे सगळे ऐकून कृतार्थतेचे भाव डॅडींच्या चेहऱ्यावर दाटून आले. तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनीच डॉ.सुमित यांच्या म्हणण्याला दाद देण्यासाठी टाळ्या वाजवल्या. त्या टाळ्यांच्या कडकडाटात नातू आपल्या आजोबांच्या बोटाला धरुन त्यांना जेवणाच्या टेबलकडे ओढून नेत होता... चला ना डॅडा आजोबा, तुमची डायबिटीस ची गोळी खाऊन घ्या. एक वाजला. जेवणाची वेळ चुकवायची नाही ". हे पाहून पुन्हा एकदा टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला. यावेळी डॉ.सुमित व डॉ.सानिका यांच्या संस्कारांसाठी हा कडकडाट होता.


समाप्त


वरील कथा सौ. हेमा पाटील यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.


Post a Comment (0)
Previous Post Next Post