चांगुलपणाचे ओझं

 चांगुलपणाचे ओझं

✍️ सौ. प्रतिभा परांजपे

सुषमाताईना झोप येत नव्हती. रात्रभर त्या या कुशीवरून त्या कुशीवर होत होत्या. डोळ्याला डोळा लागत नव्हता.

 नीताला, त्यांच्या सुनेला माहेरी जाऊन पंधरा दिवस व्हायला आले पण-- पण इतक्या दिवसात तिने स्वतःहून एकदाही फोन केला नव्हता.

सुषमा ताईंना नीता आणि नात छकुली  शिवाय घर सूनं सूनं वाटत होत. त्यांनी सौरभला आपल्या मुलाला विचारलं,"अरे नीताचा काही फोन आला कां, केव्हा येते..?"

सौरभ कामावर निघायच्या गडबडीत होता. 

"आई माहित नाही, राहू दे तिला निवांत.  बरेच दिवस म्हणत होती आईची आठवण येते आहे. कंटाळा आला होता ऐकून ऐकून जरा डोकं शांत होईल.आणी ठिकाणावर."

"अरेपण निदान फोन तरी?_

" मी संध्याकाळी विचारतो," म्हणत सौरभ कामावर निघून गेला.

 सुषमा ताईंना बरेच दिवसापासून निताचे काहीतरी बिनसले आहे अशी शंका येत होती. त्यांनी तिला विचारले. पण नाही असं काही म्हणून विषय टाळला. पण जेव्हा तिने माहेरी जायचे रिझर्वेशन केले तेव्हा त्यांनी विचार केला आईची आठवण येत असावी. पण-- तरीही आपल्या जवळ काहीही न बोलता अचानक जायच ठरवले हे त्यांना जाणवले. आणि वाईट ही वाटले.

पण तरीही काही तरी चुकतंय असं मनात येत होते.

रात्री सौरभच्या खोलीतुन नीताचा व सौरभचा व्हिडिओ कॉलवरील संवाद त्यांच्या कानावर येत होता.

“का ग कधी येणार ? मी येऊ कां घ्यायला?”

 "कां बरं काय गरज आहे, बरी आहे मी इथे," नीता रागारागात म्हणत होती. 
" तुझे काय अडले रे मी नसले तर?? आई आहेस ना सर्व करायला?"

 "असं का म्हणते?  तुझी आठवण येते. छकुली शिवाय घर सुनसुन वाटत.” सौरभ तिला समजवायचा प्रयत्न करत होता. 
"मग काय म्हणूं??" नीता अजुनही रागातच होती.  "माझं असं काय आहे त्या घरात?"

"मी आहे ना,"  सौरभने लाडीगोडी करून पाहिली.
पण नीता  दुर्लक्ष करत म्हणाली, “त्या म्हणतील ते करायचे. मला मनाने असे कुठे काय कराल देतात??  छकुलीला ही फार लाडावून ठेवले आहे, सगळ त्याच करणार." नीता रागारागाने बोलत होती.

पुढच बोलण सुषमा ताईंच्याने ऐकवेना. त्या खोलीत घेऊन पलंगावर पडल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी आले.

   काय  ऐकलं हे  मी? मी नेहमीच तिच्या सुखासाठी झटत होते. नीता नवीन आहे तिला कामाची सवय नाही असा विचार करून करायची. पण हे उलटच झालं? रात्र विचार करण्यात सरली.

 सकाळी  रोजची कामे आटोपून त्यांनी नीताला फोन केला.  रिंग बरेच वेळा गेली, फोन कोणी उचलला नाही. आत्ता कामात असेल असे समजून त्यांनी मग थोड्या वेळाने  परत फोन लावला .

"हैलो नीता."

"अहो मी आशा बोलते, नीताची आई."

 "अग बाई नमस्कार. कशा आहात??"

"मी ठीक आहे . तुम्ही कशा आहात? नीता  आंघोळीला गेली आहे, आणि छकुली खेळती आहे."

"काय म्हणते नीता? बरेच दिवस झाले फोन नाही म्हणून विचार केला आपणच बोलावं.  करमत नाही हो. हया दोघिंशिवाय. घर अगदी सुनसुन वाटत."


"हं बरोबरच आहे,"  आशाताई म्हणाल्या.

"एक विचारू का? काय झाले आहे नीताला? काही बोलली का तुमच्याजवळ? जरा अपसेट असते आजकाल," सुषमा ताईंनी विषयाला हात घातला.

"अहो चालायचंच. आज कालच्या मुलींना न सगळ्याच गोष्टींची घाई."

"म्हणजे --माझं काही चुकलं का हो? काही बोलली का ती?"

  "तुम्ही खूप चांगल्या मनाच्या आहात सुषमाताई. पण काय आहे ना, मी जरा स्पष्टच बोलते, नीताला आमच्या संसाराची, घर कामाची भारी हौस. तिला वाटतं हा तिचा संसार तिने स्वतः मनाने सर्व करावं.
पण काय तुम्ही तिला  काहीच सांगत नाही आणि मनाने करायचा धीर होत नाही. त्यामुळे तिला ते घर आपलेसे वाटत नाही. करु द्या तिला. अहो चुकत चुकत शिकेल आणि मी समजवेन तिला. तुम्ही नका फार काळजी करू," असे म्हणत आशाताईंनी फोन ठेवला.

आता सुषमा ताईंना घटनांची सुसंगती लागायला लागली. आपलं काहीतरी चुकतंय या जाणिवेने  त्या मनातून आणखीनच खट्टू झाल्या.

संध्याकाळी देवदर्शन व भाजी घेऊन यावे म्हणजे मन शांत होईल या विचाराने त्या बाहेर पडल्या. समोरून त्यांची दुरची भावजय कम मैत्रीण शोभा येताना दिसली.

"अगं, मी तुलाच फोन करणार होते. आम्ही महाबळेश्वर-पाचगणीला जात आहोत आठ दिवस. छान एंजॉय करू तुला विचारणार होते पण तुला जमेल की नाही? तू काय बाई सून, नातीमधेच गुंग असते. पण तरीही म्हटलं एकदा विचारून घ्यावे. सध्या तुझी सून माहेरी गेली आहे न?"

 सुषमाने विचार केला जावे फिरायला, मन तेवढच शांत राहिल.

"हो ,येते मी पण."

 "ठरलं तर मग परवाला निघतोय आपण."

घरी सौरभ  व त्याच्या बाबांनी म्हणजे पतीदेवांनी आनंदाने संमती दिली. जणू त्यांनाही अकेले है तो क्या गम है असे हवे असावे.

 सुषमाताईंनी टूरवर जायची तयारी केली,

आठ दिवस खूपच धमाल-मस्ती मध्ये गेले सुषमा ताईंचे.  समवयस्क मैत्रीणी, दिवसभर खूप फिरणे, गप्पा, खाणे. रात्री हॉटेलमध्ये स्टे, रात्री दोघी दोघी एका खोलीत अशी झोपायची सोय .

"सुषमा एक विचारू? आल्यापासून पाहतेय एक फोन नाही आला  नीताचा."  शोभाने विचारले.

 "इकडे यायचं कळवले आहे तिला. अग ती माहेरी गेली आहे. म्हणून, पण–"

"मग काही बिनसलं आहे का तुमच्यात?"

"बिनसलं  असं नाही ग,"

"मग?"

  सुषमाने मग झाले ते सांगितले. "माझं नेमकं काय चुकतंय हेच मला समजत नाही ग, तिला नेमकं काय हवं आहे. मी तिला अगदी मुलीसारखं वागवते." 

"तेच तर चुकतंय तुझं." 

 "कसं काय ?"

“म्हणजे, अगं तू जशी नाही तसं दिसायचा प्रयत्न करणं सोड. म्हणजे असं  "आदर्श  सासू  व्हायचा विचार सोड.  जशी आहेस तशी वाग".

"अग पण."

"वाईट  वाग असे म्हणत नाही मी पण ,-- तुझ्या अति चांगुलपणाच ओझं होतंय, तुलाही आणि तिलाही. त्याने सगळी गडबड होती आहे. नीताला करु दे जबाबदारीने , स्वतः च्या मर्जीने ."

"सांगते ग मी तिला."

"असं करू नको, तिला तिचं कळून सवरुन करू दे. तू थोडं थोडं कामातुन निवृत्त हो. जसा पतंग आकाशात मोकळेपणाने विहरतो जरी त्याची दोरी  हातात असली तरी, पण जर दोर सारखी ओढली तर पतंग उंच कसा जाईल? धाग्याला थोडी  ढील द्यायला हवी ना ?"

सुषमाला शोभाचे बोलणे लक्षात येत होते.

  "खरंच ग माझ्या लक्षातच नाही आले. मी आपले तिला त्रास नको म्हणून---"

" हो पण आता थोडं दुर्लक्ष कर .तूच बघ आता  इतर ठिकाणी आपण ऐकतो, पाहतो सुनांना काम करायला नको असतं. पण तुझ्या नीताला कामाची हौस आहे तिला प्रोत्साहन दे. करू दे म्हणजे तिला घर आपलस वाटेल."

शोभाच समजावणं सुषमाच्या लक्षात येते होते. 

"आणि झोप आता शांत."

 "उद्या आपल्याला निघायचे ना??"  सुषमाने विचारले.

नाही, माझ्या मैत्रिणीचा वाई मध्ये एक वाडा आहे. आपण दोघी तिथे दोन दिवस राहणार आहोत. तेव्हा घरी जाण्याची घाई करू नको. आपण मस्त मजा करु. तू नसल्यावर  घरकाम आणि छकुली दोन्ही कस सांभाळायचं ह्याची  सवय होईल आणि तुझं महत्व ही लक्षात येईल."

 निघायच्या दिवशी सुषमाला नीताचा  फोन. "आई मी परत आले आहे, तुम्ही केव्हा पोहोचता? घराची काळजी नका करू."

"अगं आम्हाला अजून दोन-तीन दिवस लागतील. आम्ही मजेत आहो. तू आहे त्यामुळे मला घराची ही चिंता नाही. छकुलीसाठी गंमत घेऊन येईन,"  म्हणत सुषमाने फोन बंद केला.

समाप्त

वरील कथा सौ. प्रतिभा परांजपे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

 Post a Comment (0)
Previous Post Next Post