गुंतता हृदय हे

 गुंतता हृदय हे

सौ.प्रतिभा परांजपे

         सानिका घाईघाईने आर्ट्स आणि काॅमर्स काॅलेजच्या गेटमधे  शिरली. स्पर्धा बरोबर अकरा वाजता सुरू होणार. आता पावणे अकरा वाजत आले. हातातल्या मोबाइलमध्ये स्पर्धेच्या विषयावर बोलायचे काही पॉइंट्स नोट केलेले होते त्यावर नजर फिरवत ती घाईघाईने पुढे जात होती, तेवढ्यात-- कोणीतरी तिच्यावर आदळले.


      "... दिसत नाही कां हो?" असे म्हणत तिने वर पाहिले. दोन काळेभोर डोळे तिच्यावर रोखलेले.......


"सॉरी सॉरी" म्हणत तो सुद्धा घाईघाईने पुढे निघून गेला.


          स्पर्धा बरोबर 11 वाजता सुरू झाली. विषय जुनाच असला तरी कालानुरूप होता,  "स्त्रियांनाही पुरुषांच्या बरोबरीचे हक्क असायला हवे की नको".


      सानिकाच्या नांवाची  घोषणा होताच ती स्टेजवर आली. "स्त्रियांना हक्क असावे पण बरोबरी करताना त्यांना अतिमहत्व दिले जाते. मग त्या त्याचा गैरफायदा घेऊन पुरुषांना त्रासात पाडतात, तेव्हां हक्कही  मिळाले पाहिजे पण त्याच बरोबर त्यांना जबाबदारीची ही जाणीव असायला हवी."


आपल्या भाषणात ती विचार मांडत होती तिचा तो अविर्भाव, बोलताना तिची  केसांची  चुकार बट चेहऱ्यावरून मागे करण्याची लकब, ते घारे डोळे.


"हीच ती........" आदित्यला बसल्याजागी जणू करंट लागल्यासारखे झाले. थोड्या वेळापूर्वी जी आपल्यावर येऊन आदळली ती हीच!!! मग मात्र तिच्याच विचारात बुडलेला आदित्य टाळ्यांच्या आवाजाने  भानावर आला.


     "आता शेवटचा प्रतिस्पर्धी कॉमर्स कॉलेजचा आदित्य प्रधान" अशी नांवाची घोषणा होताच आदित्य स्टेजवर आला. त्याने त्याचे  प्रभावी विचार मुद्देसूद मांडून आधीच्या प्रतिस्पर्ध्यांना चीत केले.


"स्रियांनाही समान हक्क हवाच" असे बोलून प्रेक्षकांच्या टाळ्या घेत त्यांने आपले भाष्य पूर्ण केले.


       निर्णायकांनी विषयाची सांगता करत निकाल जाहीर केला. 'दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये बरोबरी झाल्याने पहिले पारितोषिक आदित्य प्रधान व सानिका कर्णिक  या दोघात समसमान वाटले जात आहे.' समारोपाचे अध्यक्षीय भाषण होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. 


                कार्यक्रम संपल्यावर  आदित्य हॉलबाहेर मित्रांशी बोलत उभा होता. त्याला सानिका तिच्या मैत्रिणीबरोबर येताना दिसली. त्याने, पुढे येऊन  "अभिनंदन" म्हणत हात पुढे केला पण त्याच्याकडे न पाहता "सेम टू यू....." पुटपुटत  सानिका पुढे निघून गेली .


    "अगं , -- अगं, सानू....."  म्हणत तिची मैत्रीण रेखा तिच्या पाठीमागे भरभर गेली.  पाठमोर्‍या सानिकाला पाहत आदित्य मनाशी हसला व घरी जाण्यास वळला.     


                  दोन दिवस आदित्यचे मन कशातच लागत नव्हते. सारखे हॉलमध्ये पाहिलेल  ते  सानिकाचे रूप आठवत होते. एक मुलगी असून स्त्रियांच्या विरोधात बोलणारी  सानिका काही वेगळीच वाटत होती आणि म्हणूनच तो बेचैन होता कां.... कि आणखी काही कारण होते....? त्याचे त्यालाच कळत नव्हते . 


                  दुसर्‍या दिवशी आदित्य  सानिकाच्या कॉलेजात पोहोचला. तो रेखा, सानिकाची मैत्रीण त्याला भेटली. तिने विषय काढला. 


   "आदी, सॉरी हां,..... सानूचे वागणें तू मनावर घेऊ नको. ती मनाने आणि वागण्यात तशी खूप चांगली आहे. पण......"


   "पण मग तिचे हे असे टोकाचे स्त्री विरोधी विचार ....... ?"  


    "अरे,.... तेच तर.... ती एक सॅड स्टोरी आहे. तिची आई खूपच हेडस्ट्रॉंग आहे आणि स्त्री मुक्ती संघटनेची सेक्रेटरी असल्याने तिच्या बाबांना तिच्या अतिरेकी विचारांचा  खूपच त्रास भोगावा लागतो.  हे तिने लहानपणापासून पाहिले त्यामुळे बहुतेक तिचे विचार असे झाले असावे."  


     "ओ के,.... पण मला तिला एकदा भेटायचे आहे. कॅन यू हेल्प मी ?"  


   " क्या बात है आदी... ?" रेखा किंचित मस्करीच्या स्वरात म्हणाली.


      ".... अगं, अगं  तसं काही नाही ..... तरी पण एकदा प्लीज..."            


    "बरं,बरं ..... व्हाय नॉट, उद्या दुपारी तू तीनच्या सुमारास,  काॅलेज कॅन्टीनमध्ये ये. मी तिला घेऊन येते."                 


              कॅन्टीनमध्ये आदित्य पोहोचला, तेव्हा दुरूनच त्याने सानिका व रेखाला पाहिले. गुलाबी सुंदर ड्रेसमधली  घारे डोळेवाली सानिका त्याला आणखीनच मोहक वाटली.  


     "हाय आदी,.... तू इथे कसा ?" असे खोटे आश्‍चर्य दाखवत रेखाने त्याला इनव्हाइट केले . 


        कॉफी पिता पिता आदित्य आणि रेखा गप्पा मारत हसत होते. पण  सानिका मात्र गप्प गप्पच होती. 


         काल स्टेजवर पाहिलेला  व नंतर आज कॅन्टीनमध्ये भेटून दिलखुलास बोलणारा आदित्य तिला खूपच इंप्रेस करून गेला. पण दुसरीकडे त्याची व आपली मतभिन्नता या दोन परस्पर विरोधी विचाराच्यां जाळ्यात ती गुंतत गेली. 


              फायनल ईयर एक्झामची तारीख डिक्लेअर होताच कॉलेजमध्ये जागो जागी मुले आणि मुली अभ्यासाच्या गोष्टी करू लागली.  रेखाला नोट्स काढायला लायब्रेरीत चलतेस का म्हणून सानिकाने फोन लावला.


 रेखाने  आम्हाला आदित्यकडे पार्टी करता जायचे आहे, म्हणून मला जमणार नाही, असे तिला सांगितले. त्या वर सानिकाने, बरे संध्याकाळी बोलूं, असे म्हणून फोन कट केला. 


        लायब्ररीत  सानिका बराच वेळ बसली. पण तिचे मन काही तिथे लागले नाही. 


         संध्याकाळी रेखाला भेटताच  सानिकाने  "कसली पार्टी होती ग ?" असे विचारले. 


     "अगं, आदीची बहीणच माझी वहिनी आहे. ती यू एसला असते. तिच्या माहेरी पार्टी होती, सहजच."    


     ".....आणि ती, आदित्यला, तिकडे पुढे शिक्षणाकरता चल असं म्हणत होती."  


    "मग जाणार आहे का ग तो --" असे विचारताना सानिकाचा स्वर किंचित कापरा झाला. 


  "अगं.... अजून नक्की असे काही नाही. पण जाऊ ही शकतो" -- वगैरे वगैरे रेखा बरेच आणखी काही सांगत होती. पण  सानिका  वेगळ्याच विचारात गुंग झाली होती. 


      फायनल परिक्षा संपताच रेखाचे लग्न ठरले, लग्नाच्या पार्टीत सानिकाला आदित्य भेटला पण त्याच्या आजूबाजूला अनेक सुंदर मुलीचा घोळका होता.  रेखाने सानिकाला मुद्दाम दाखवून म्हटले.


    "बघ बाई..‌‌ विचार कर, काल आदीने तुझा फोन नंबर माझ्याकडून घेतला आहे...... काय??" आणि ती किंचित मिस्किलपणे हसली.


              सानिकाला रात्री बिछान्यात पडल्यावर झोप येत नव्हती. काही तरी हरवले आहे, असे जाणवत होते. आदित्य यू. एस ला जाणार असे ऐकून तिचे मन बावरे झाले होते. आदित्य आवडायला लागला हे कबूल करताना ह्रदय धडधडत होते.


            दुसऱ्या दिवशी सकाळी ती थोड्या थोड्या वेळाने मोबाइल चेक करत होती. काही वेळाने तिच्या बाबांना  तिने विचारले  


      "माझ्यासाठी काही फोन होता का बाबा ?"  


   "कोणाचा येणार होता का ?" 


   "हो , -- नs , -- नाही, नाही..." असे म्हणत सानिका थोडी अडखळली. 


      "आदित्यच्या फोनची वाट पाहत आहेस काय सानू?" किंचित हसून बाबांनी विचारले.


    बाबांचा हा प्रश्न ऐकून सानिका दचकली व लाजून खाली पाहत म्हणाली,   


  "बाबा, तुम्हाला कसे माहित ?...."        


      "अगं, हा आदित्य, सुधाकर  प्रधान..... माझ्या जुन्या मित्राचा मुलगा. मी ओळखतो त्यांच्या फॅमिलीला. तो घरी येऊन गेला होता. तू नसताना, रेखा सोबत. खूप छान मुलगा आहे. त्याला तू आवडतेस असे वाटते." 


      "पण बाबा, आमचे विचार खूप वेगळे आहेत." 


    "वेडाबाई,.... तुमचे विचार प्रेमाने बदलू शकतात ना ? विचार कर, तसे तुम्ही दोघे या बाबतीत एकमत आहात की नाही?" 


      "पहा सोनू, मग तू फोन करतेस की मी करू?".....  "नंबर आहे, कि मी तुला सेंड करूं," बाबा मिश्किलपणे म्हणाले. 


      "काही तरीच काय बाबा" --- असे म्हणत सानिका लाजून पळाली.


      संध्याकाळी सानिका व आदित्य समुद्र किनाऱ्यावर वाळूत बसलेले होते. समुद्राच्या लाटांचा  गाज, मावळतीचा सूर्य, आजूबाजूचे वातावरण मनाला धुंद करत होते आदित्यने सानिकाच्या समोर गुडघ्यांवर बसून लाल गुलाबाचे फूल  देत विचारले.......    


     "सानिका, आय लव यू, --- तू माझी व्हॅलेंटाईन होशील का ?" लाजेने चूर होऊन सानिकाने फूल हातात घेत मानेने आणि लाजर्‍या डोळ्यांने  होकार दिला.      ..... खूप लांब कुठे तरी गाण्याचे मंद स्वर वार्‍याबरोबर त्यांचे मनोगत सर्वांना सांगत भिरभिरत होते.......


    'गुंतता हृदय हे कमलदलाच्यापाशी  


 हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी


  या इथे जाहला संगम दो सरितांचा....


प्राक्तनी आपुल्या योग तिथे प्रीतीचा‌..


अद्वैत आपुले घडता या तीर्थाशी............  

समाप्त 

फोटोवर क्लिक करून वाचा एक अप्रतिम कथा  वरील कथा सौ प्रतिभा परांजपे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. 


Post a Comment (0)
Previous Post Next Post