हार

 हार

✍️ मिलिंद अष्टपुत्रे


"जरा घरी येऊन जाशील का वेळ मिळेल तेव्हा ?" माझ्या चुलत काकूचा फोन आला त्यावेळी मी ऑफिसमध्ये होतो.

" हो ... संध्याकाळी घरी जाताना मारतो चक्कर ..." मी उत्तरलो.

" थोडं लवकर जमेल का ? अरे यांना थोडा त्रास होतोय त्याबद्दल सांगायचं होतं ..." काकूच्या स्वरातून काळजी जाणवत होती.

" मग आत्ताच थोड्यावेळाने येतो. तसंही ऑफिसमध्ये फार काही काम नाहीये आज !" एवढे बोलून मी फोन ठेवला. राधा काकू आणि सदा काका हे आमचे लांबचे चुलत सोयरे ! मी घरी पोहोचलो तेव्हा काका अंथरुणात झोपून होते तर काकू हॉलमध्ये टीव्ही पाहत होत्या. सदाशिव पेठेतील एका जुन्या इमारतीच्या तळमजल्यावरील दोन खोल्यात ते राहतात आणि मुलगा सतीश थोड्या अंतरावरील एका नव्या इमारतीतील टू बीएचके फ्लॅटमध्ये त्याच्या कुटुंबासोबत राहतो.

" चहा टाकू का रे थोडा तुला ?" लगबगीने उठत काकू म्हणाली.

" नको काकू, चहा नको .. काय झालं काकांना ?" मी चिंतेच्या स्वरात विचारले.

" अरे कालपासून यांना युरीन होत नाहीये ... होईल अशी भावना होते पण होत नाही." काकू म्हणाली.

" मग डॉक्टरांना दाखवलंत का ?" मी विचारले.

"अरे यांना आधी सारखे सारखे युरीनला जायला लागायचे. वयोमानानुसार ते होणारच, पण अलीकडे ते प्रमाण वाढले होते म्हणून हे आमच्या ओळखीतल्या जोशी वैद्यांकडे गेले होते. वैद्यांनी त्यावर औषधे दिली आणि कालपासून युरीन होणेच बंद झाले. नेमके वैद्य चार दिवस गावाला गेले आहेत. आता काय करावे काही कळत नाही." चिंतेच्या स्वरात काकू म्हणाली.

" पहिल्यांदा ती औषधे घेण बंद करा. आपण आजच युरोलॉजिस्टला दाखवू. माझा मित्रच यूरोलॉजिस्ट आहे." मी म्हणालो.

" सतीशला सांगितलंस का ?" मी विचारले. क्षणभर काकू गप्प झाली. सांगावे की नको अशा द्विधा मनस्थितीत असल्यासारखी !! मग म्हणाली,

"अरे त्याला सांगायची भीतीच वाटते आम्हा दोघांना ... एकदम वसकन ओरडतो ... नीट ऐकूनही घेत नाही ... म्हातारपण फार वाईट ! परावलंबी होतो माणूस ! योग्य वेळी मरण येणं चांगलं बघ. पण ते आपल्या हातात नाही रे  बाबा ..." खालमानेन काकू  पुटपुटली.

" ठीक आहे मी बोलतो त्याच्याशी. काकांना कपडे बदलायला सांग, मी डॉक्टरांना फोन करतो. लगेच नेतो त्यांना ..." एवढं बोलून मी डॉक्टर मित्राला फोन केला व लगेच येतो असे सांगून फोन ठेवला.


" बरं झालं लगेच आणलंस काकांना ..." मित्र म्हणाला. 

"आपल्याला त्यांना ऍडमिट करून घ्यावे लागेल. कॅथेटरही लावावा लागेल. ब्लँडरला सूज आली आहे. मी औषधे लिहून देतो तेवढी घेऊन ये." एवढे बोलून मित्र काकांना ऍडमिट करून घेण्यासाठी नर्सला बोलवायला निघून गेला. पुढे मग रीतसर प्रोसिजर सुरू झाली. मेडिकल मधून औषधे आणून ती नर्सच्या ताब्यात देऊन मी बाहेर रिसेप्शनला विसावलो. तेवढ्यात सतीशचा फोन आला.

" काळजी करू नकोस ... काका आता बरे आहेत, मी तुला हॉस्पिटलचे नाव, पत्ता आणि लोकेशन पाठवतो." एवढे बोलून मी फोन ठेवला. पंधरा मिनिटात सतीश हॉस्पिटलमध्ये पोहोचला.

" बर आहे आता काकांना चिंता करू नकोस." त्याच्या खांद्यावर हात ठेवत मी म्हणालो.

" मला काहीच बोलले नाहीत आई-बाबा ..." सतीश म्हणाला.

" अरे तुझा फोन लागला नाही म्हणून मला फोन केला काकूने." मी म्हणालो. आम्ही दोघेही काकांना ठेवलेल्या खोलीत गेलो. काका अर्धवट गुंगीत होते.

" सर्व काही ठीक आहे!" तिथे असलेली नर्स म्हणाली आणि सुटकेचा सुस्कारा टाकत आम्ही दोघे बाहेर आलो. 

"चल खाली हॉटेलात चहा घेऊ." सतीशच्या खांद्यावर हात टाकत मी म्हणालो. आम्ही दोघे चौकातील अमृततुल्य मध्ये आलो.

" दोन स्पेशल चहा द्या भाऊ ..." चहाची ऑर्डर देऊन आम्ही एकमेकांसमोर बसलो.

" दादा ... थँक्यू व्हेरी मच !" एकदम माझे दोन्ही हात पकडत सतीश म्हणाला.

" अरे आभार कसले मानतोस सतीश ... आपण काही परके आहोत का? जसे माझे बाबा तसेच काका ... " मी म्हणालो.

" एक गोष्ट सांगू तुला सतीश ? खूप वर्ष झाली या गोष्टीला ... मी अगदी लहान असतानाची घटना आहे ही. त्या वयात फार व्रात्य होतो मी .... रोज काहीतरी नवीन खोड्या करायचो ... आमचे बाबा अतिशय तापट होते. आम्ही भावंड चळाचळा कापायचो त्यांच्यापुढे ... एकदा गल्लीत खेळताना मी उगाचच एका भटक्या कुत्र्याची खोडी काढली. चवताळलेल्या कुत्र्याने माझी पोटरीच पकडली. चांगला लचका निघाला. पोटरी रक्तबंबाळ झाली. मी घाबरलो. आता जर का बाबांना कळले तर काही खरं नाही ! मी कोणालाच न सांगता रुमालाने जखम बांधली. मित्रांनी भरपूर हळद जखमेवर चोपडली होती. संध्याकाळी घरी आलो. जखम चांगलीच दुखत होती. सूजही आली होती. पण मी कोणालाच काही कळू दिलं नाही. मोठ्या बहिणीला मात्र ही गोष्ट माझ्या नकळत मित्रांनी सांगितली होती. रात्री झोपेत मला ताप भरला. शेजारी झोपलेल्या आईच्या लक्षात आलं. तुला माहीतच आहे ... त्यावेळी आम्ही भाड्याच्या दोन खोल्यात राहत असू. स्वयंपाकघर आणि बाहेरची खोली. बाहेरच्या एकाच खोलीत आम्ही तिघे भावंड आणि आई-बाबा झोपायचो. बाबा एकटेच लोखंडी कॉटवर झोपायचे आणि आम्ही सगळे खाली गाद्या टाकून झोपायचो.

" अहो छोटूला चांगलाच ताप भरलाय ..." आईने बाबांना उठवून सांगितले. मी ग्लानीतच होतो.

" बापरे !! खरंच की ... चांगलाच तापलाय छोटू ...." बाबा काळजीच्या सुरात म्हणाले.

" आणि पोटरीला हा रुमाल का बांधलाय ? त्याला लागलय का काही ?" बाबांनी आईला विचारले. आईने ताईला उठवले.

" ताई ... छोटूच्या पायाला काय लागलय ?" आईने विचारले. 

"त्याला कुत्र चावलय संध्याकाळी ... " घाबरून नजर चुकवत ताई म्हणाली.

" अगं सांगायचं नाहीस का मग मला ?" आई रागावून म्हणाली. ताई काहीच न बोलता खाली बघत राहिली. धाकट्या भावावर नीट लक्ष न दिल्याबद्दल आपल्यालाही बाबांच्या हातचा मार खावा लागेल ही भीती ताईला सतावत असावी बहुदा ! आता मात्र बाबा पटकन उठले. पँट शर्ट घालून त्यांनी सायकलवर टांग मारली. आमचे फॅमिली डॉक्टर आणि बाबांचे स्नेही पानसरे काका पलीकडच्या गल्लीत राहात होते. इतक्या रात्री सुद्धा ते बाबांबरोबर घरी आले. माझी जखम डेटॉलने धुवून त्यांनी ड्रेसिंग केले आणि मला दोन गोळ्या देऊन लिक्विड औषध पाजले.

" अप्पा ... त्या कुत्र्याचा शोध लाव. गल्लीतलच असेल ते. आठवडाभर लक्ष ठेवावे लागेल त्याच्यावर ... पिसाळलेलं नसेल अशी आशा करू ..." पानसरे काका बाबांशी बोलताना मी ऐकलं. डोळ्यावर प्रचंड गुंगी आली होती पण त्याही स्थिती जाणवलं की बाबांनी मला मांडीवर घेतलं होतं. मी बाबांच्या पोटाला घट्ट मिठी मारली. बाबा प्रेमाने मला थोपटत होते. रात्रभर आई आणि बाबा आळीपाळीने माझ्या कपाळावर थंड पाण्याने भिजवलेल्या पट्ट्या ठेवत होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पानसरे काकांनी पोटात रेबीजची चौदा इंजेक्शने घेण्याचा सल्ला दिला. त्याकाळी ही इंजेक्शन फक्त सरकारी दवाखान्यात मिळत असत. रोज मला घेऊन बाबा ससून हॉस्पिटलमध्ये  जात होते. पोटात इंजेक्शन घेतले की भयंकर वेदना होत असत. इंजेक्शन घेतलेला पोटाचा भाग टम्म फुगत असे. चौदा इंजेक्शनने मला पोटात घ्यावी लागली. मला चावलेल्या कुत्र्याचा तपास माझ्या गल्लीतील मित्रांच्या मदतीने बाबांनी लावला. नंतर आठवडाभर ते त्या कुत्र्यावर लक्ष ठेवून होते. नशिबाने कुत्रे पिसाळलेले नव्हते आणि त्याला काही झालेही नाही !!

" मला का नाही सांगितलंस कुत्र चावलेलं ?" एकदा बाबांनी मला विचारलं.

" तुम्ही माराल म्हणून नाही सांगितलं ..." त्यांची नजर चुकवत खालमानेन मी म्हणालो. दोन मिनिटं शांततेत गेली. अचानक बाबांनी मला त्यांच्या कवेत घेतलं. मीही त्यांच्या पोटाला बिलगलो. माझ्या मानेवर पाण्याचे दोन गरम थेंब पडलेले जाणवले ... बाबांचे अश्रू होते ते .... सतीश तुला खोटं वाटेल पण त्यानंतर आजतागायत मला बाबा कधीच रागावले नाहीत. रादर , आम्हा कुठल्याच भावंडांना ते रागावले नाहीत. अमुलाग्र बदल झाला त्यांच्यात त्या घटनेनंतर ... आम्हां बापलेकांमधील अदृश्य भिंत जणू वितळून गेली. नंतर कुठलीच गोष्ट मी कधीच बाबांपासून लपवली नाही. बाबा मला मित्रासारखे वाटायला लागले. आता ते ऐंशी वर्षांचे आहेत. पण जरा जरी काही दुखले खूपले की पहिल्यांदा मला सांगतात. आम्ही लगेच डॉक्टरांचा सल्ला घेतो. आई काय किंवा बाबा काय कुठलीही गोष्ट आमच्यापासून लपवत नाहीत. काहीही वेगळं झालं की पहिला फोन ते मला करतात.

  एक सांगू सतीश ...  आई-वडिलांशी त्यांच्या उतारवयात चांगलं वागणं फार महत्त्वाचं आहे. तुमच्याबद्दल त्यांना विश्वास वाटला पाहिजे हे लक्षात ठेव.

 त्यांनी आपल्याला घाबरणं ही आपली सगळ्यात लाजिरवाणी हार आहे हे कायम ध्यानात असू दे ... आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज ना उद्या कधीतरी आपल्यालाही म्हातारपण येणार आहे. म्हणतात ना .... 

"पेराल तसे उगवेल."

अचानक सतीश हमसून हमसून हुंदके देऊ लागला. माझे दोन्ही हात घट्ट धरून म्हणाला,

" दादा तू आज माझे डोळे उघडलेस  ... वचन देतो यापुढे असं नाही होणार !" मी त्याचे माझ्या खांद्यावरील डोके थोपटत राहिलो.

समाप्त

एक छान सकारात्मक कथा वाचण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा.वरील कथा श्री मिलिंद अष्टपुत्रे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखकाच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.


Post a Comment (0)
Previous Post Next Post