कदर

 कदर

✍️ सौ.हेमा पाटील.

"खरंच कदरच नसते कुणाला! त्यात बाईचा जन्म म्हणजे... मी आहे म्हणूनच टिकले हो! दुसरी कुणी असती तर कधीच सोडून गेली असती.."

ही रोजची टेप सुरु झाली तसे अश्विन उठून बाल्कनीत आला.

काय यार रोज रोज तेच.. हे काय जीवन आहे? आणि म्हणे मनुष्यजन्म चौऱ्याऐंशी लाख योनी फिरुन आल्यावर मिळतो... कशासाठी? रोज उठून हे ऐकण्यासाठी? 

कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन.. असे भगवद्गीतेत सांगितले आहे, मान्य आहे .. अगदीच मान्य! कर्म करत रहा, फळाची अपेक्षा करु नका.. मला फळ नको पण ही बायकोची बडबड तरी आवरा हो भगवंता! आॅफीसमध्ये तो बाॅस मानगुटीवर बसलेला असतो, अन् घरी आल्यावर जरा उसंत खावी म्हंटले तर बायकोची बडबड सुरु... माझा थोडातरी विचार कुणी करतेय का? अशा निराश अवस्थेत तो उभा होता...

स्मिता किचनमध्ये कामे उरकत होती. पण तिचीही अवस्था वेगळी नव्हती. आज बॅंकेत एक हजार रुपयांचा घोळ झाला होता. तो शोधताना तिला फार त्रास झाला होता, आणि बराच वेळही गेला होता. त्यामुळे तिची चिडचिड झाली होती. घरी आल्यावर घरातील कामे आ वासून तिची वाट पहात होती. मुलांना भुका लागल्या असतील म्हणून ती आल्या आल्या हातपाय धुवून कामाला लागली होती. सकाळी जाताना तिने अश्विनला बजावून सांगितले होते की, येताना आठवणीने गिरणीतून दळण घेऊन ये.. आणि तो ते विसरुन आला होता. घरघंटी घेऊयात असा पुनरुच्चार आज पुन्हा त्याने केला तेव्हा तिचा संयम सुटला आणि ती रागावली...

काय हे रोज रोज उठून डबे बनवा, मुलांची तयारी करुन त्यांना शाळेत पाठवा, स्वतः चे आवरा आणि डबा घेऊन आॅफीसला पळत सुटा.. खरंच संसार म्हणजे तारेवरची कसरत आहे. रात्री अंथरुणावर पाठ टेकली न टेकली की झोप लागते इतके शरीर दमते रोज... आणि सुट्टी दिवशी सुद्धा वेगळी अवस्था नसते. आठवड्याची सगळी कामे उरकायची असतात.भाज्या आणणे, मसाला करुन ठेवणे, कपडे धुणे, बेडशीट बदलणे, घराची स्वच्छता, बाहेरची कामे, मुलांचे प्रोजेक्ट्स असतील त्यात लक्ष घालणे... पाहुणे आणि कार्यक्रमांना हजेरी लावणे हे ही अधूनमधून असतेच ... किती धावपळीचे झाले आहे आयुष्य! कशासाठी आपण ऊर फुटेस्तोवर धावतोय? आणि इतके धावून आपल्या हाती काय लागतेय? साधे दोन वेळचे जेवण तरी सुखाने, समाधानाने खाता येतेय का? घरात सकाळी तर गडबडच असते. आॅफीसमध्ये गडबडीत डब्यातील चार घास कसेतरी खायचे. कसली भाजी आहे आणि कशी चव आहे हे मेंदूपर्यंत पोहोचतच नाही. परत केबिनमध्ये येऊन मानेवर जोखड ठेवायचे... कारण बॅंकेत तोपर्यंत ग्राहकांची लाईन लागलेली असते. "नशीबवान आहेस लेका ! वहिनी कॅशिअर आहेत, कॅशिअर असणे म्हणजे हातात रोज पैसा खेळतो"... असे अश्विनचे मित्र नेहमी म्हणतात. खूपदा सांगून झाले की तो पैसा कितीही हातात आला तरी ते परक्याचे धन असते. आपण फक्त माध्यम असतो. त्यांची स्वप्ने अगर त्यांच्या गरजा या पूर्णपणे त्यांच्या असतात. पण तरीही ते वाक्य पुन्हा पुन्हा रिपीट होतच असते. या मानवी मानसिकतेची आता सवय झाली आहे. पण एखादे आज्जी आजोबा बॅंकेत पैसे काढायला आले आणि आधी पुस्तक मांडताना त्यांना पाहिले की लगेच लक्षात येते की, यांच्या अकाऊंटवर कमी बॅलन्स आहे. आपली कितीही इच्छा असली तरी आपण पाचशेच्या चार दोन नोटा त्यांना जादा देऊ शकत नाही.. याचे खूप वैषम्य वाटते.

काही काही अकाऊंटवर वर्षानुवर्षे लाखो रुपये पडून असतात. कधीतरी पुस्तक मांडण्यासाठी आणि अकाऊंट जिवंत रहावे यासाठी काही व्यवहार करतात. पण या पैशांची त्यांना फारशी गरज नसते. जेव्हा ऑडिट होते तेव्हा अशी अकाऊंटस् डोकेदुखीची कारण ठरतात. कधी कधी मनात विचार येतो की, ज्यांना पैशांची गरज आहे किंवा छोटे दुकानदार, टपरीवाले यांना भांडवलासाठी बॅंकेतून लोन घेऊन पैसे उभे करावे लागतात. अशा अनेक अकाऊंटवर पडून असलेला पैसा त्या गरजू व्यक्तींना वापरायला देण्याची मुभा आपणांस असती तर...

पण आपण असे करु शकत नाही. आपण फक्त माध्यम आहोत ...मालक नाही!

तिच्या मनात विचार आला, खरंच की! आपण आयुष्यात पण फक्त एक माध्यमच तर आहोत. एक पत्नी, सून, आई, मुलगी, बहिण, सासू , आणि अशीच खूप नाती... अशा विविध नात्यांमध्ये आपण एकाच वेळी वावरतो. आणि प्रत्येक नात्यात आपण अगदी वेगवेगळे वागतो. म्हणजे सून हे नाते असते तेव्हा सुनेसारखेच वागायचे असते, तिथे सासू बनून चालत नाही. तसेच मुलगी असतानाचे नाते हक्काचे असते. तिथे भीड वैगेरे बाळगण्याची गरज नसते. आपल्या मुलीशी आपले वागणे मात्र वेगळेच असते कारण इथे आपण तिची आई असतो. नवरा तर आपला हक्काचा असतो... पण या सगळ्यांपेक्षा ही महत्वाचे म्हणजे ह्या मानवी देहाच्या माध्यमातून आपल्या आत्म्याला मुक्ती देणे हे या नश्वर देहाचे सार्थक! हा विचार मनात आला आणि स्मिता एकदम शांत झाली. तिने बाहेरचा कानोसा घेतला. मुले शांतपणे अभ्यासाला बसली होती. अश्विन काय करतोय हे पहाण्यासाठी ती हाॅलमध्ये आली. तिथे तो नाही हे पाहून ती बाल्कनीत डोकावली. तिथे अश्विनला एकटाच विचारात हरवून उभा असलेला पाहून तिला वाईट वाटले. आपण मगाशी त्याला अगदी टाकून बोलायला नको होते असे तिला वाटले. ती अश्विनच्या जवळ गेली व त्याच्या हातावर हात ठेवून साॅरी म्हणाली.
"मी मगाशी खूपच रागावून बोलले ना रे...पण मी पण दमते रे! त्यात आज बॅंकेत हजार रुपयांचा घोळ झाला होता तो निस्तरता निस्तरता निघायला वेळ झाला.."

विचारांमध्ये हरवलेला अश्विन तिच्या हाताच्या स्पर्शाने भानावर आला. तिचे साॅरी म्हणणे आणि पश्चातापयुक्त स्वरांत बोलत माफी मागणे त्याच्या हृदयापर्यंत पोहोचले. खरंच, ही आपल्या घरासाठी किती कष्ट करते! त्याने तिच्याकडे पाहिले. तिचे डोळे पाण्याने भरले होते. त्याने तिला आवेगाने जवळ ओढले व तिच्या डोळ्यातील अश्रू टिपले. त्याच्या मिठीत शिरताच ती अगदी आश्वस्त झाली. दोघेही दोन मिनिटे एकमेकांच्या बाहुपाशात अगदी स्तब्धपणे उभे होते. त्यावेळी त्या स्पर्शाला स्त्री पुरुष असा भेदभाव नव्हता. तो असता तर वासना वेगाने उचंबळून आली असती. पण दिवसभराच्या कामाच्या रामरगाड्यातून दमलेल्या दोघांच्याही मनाला जी शांतता हवी होती ती एकमेकांच्या मिठीत आल्यावर मिळाली होती. त्यामुळे अतीव समाधानाने दोघेही शांतवले होते. अश्विनच्या मिठीतून कधीच दूर होऊ नये, असेच कायम त्याच्या बाहुपाशात विरघळून जावे असा विचार तिच्या मनात आला. तेवढयात समोरच्या इमारतीतील बाल्कनीमधून आवाज आला, "अहो साठे, बाल्कनी आहे ही... " हे ऐकताच स्मिता विजेच्या वेगाने अश्विनपासून दूर झाली व लाजून आत निघून गेली. ती गेली त्या दिशेने पहात अश्विनने एक उसासा सोडला व मनोमन तिच्या मिठीतील अमृतमयी क्षणांची तो मनाशी ऊजळणी करु लागला. मघाशी तिची दळण आणले नाही म्हणून केलेली चिडचिड आता त्याच्या खिजगणतीतही नव्हती. समोरच्या इमारतीमधील कदमाच्या भोचकपणाचा त्याला राग आला. आमच्या बाल्कनीत काय चालले आहे हे डोळे फाडून पहाण्याची याला काही गरज आहे का? पण त्याचवेळी त्याच्या लक्षात आले की, झाल्या प्रकाराने आपण खूप अस्वस्थ होतो, पण तिच्या मिठीत ती अस्वस्थता कुठेतरी विरुन गेली. शाब्दिक चकमकीमुळे दोघांमध्ये जे काही बिनसले होते, त्यामुळे जो तणाव निर्माण झाला होता, तो तिच्या प्रेमाने जवळ येण्यामुळे काही क्षणांतच दूर झाला होता. इथून पुढे आपणही आपली चूक मान्य करायला शिकले पाहिजे हे त्याने मनाशी कबूल केले. खरं तर आज अनवधानाने का होईना पण आपल्याकडूनच चूक घडली होती, पण साॅरी मात्र स्मिता म्हणाली... या तिच्या साॅरी म्हणण्याने तिला आपली किती कदर आहे हे दिसून आले. इथून पुढे मी स्वतः मध्ये बदल घडवून आणेन असा त्याने मनाशी ठाम निश्चय केला. यावेळी त्याच्या ओठांवर गाण्याचे शब्द उमटले, ये जीवन है | इस जीवन का यहीं है यहीं है, यहीं है रंगरुप...

समाप्त

वरील कथा सौ. हेमा पाटील यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

फोटोवर क्लिक करून पाहा एक नवी सुंदर कथा Post a Comment (0)
Previous Post Next Post