पठाण

 पठाण 

✍️  मिलिंद अष्टपुत्रे


नेहमीप्रमाणे डायनिंग टेबलवर सकाळचा चहा घेता घेता अनिल वर्तमानपत्र चाळत होता.

" राजकीय बातम्यांशिवाय दुसरं काही नाही पेपरात ..." वर्तमानपत्राची पाने उलटत तो स्वतःशीच पुटपुटला. शेजारच्या खुर्चीत आर्या तिच्या मोबाईल मध्ये डोके खूपसून बसली होती. पलीकडे अथर्व कानाला हेडफोन लावून गाणी ऐकत होता. अनिता, त्याची बायको किचन ओट्यापुढे ब्रेकफास्टची तयारी करत होती. 

खांडेकर म्हणजे नवरा बायको आणि दोन मुले असे टिपिकल चौकोनी मध्यमवर्गीय कुटुंब !! त्यातून अनिल खांडेकर तर अगदी सरळमार्गी मनुष्य ... नाकासमोर बघत रोज बस मधून ऑफिस मध्ये जायचे आणि दिवसभर काम करून संध्याकाळी उशिरा घरी परतायचे असा त्याचा टिपिकल नित्यक्रम ... रविवारी सुट्टीच्या दिवशी बायकोबरोबर सार्वजनिक उद्यानात भेळ आणि खारे दाणे खात संध्याकाळ घालवायची हा त्याचा शिरस्ता. आणि कधीतरी एखादी फॅमिली फिल्म किंवा नाटक बघायचे ... त्याची चैनीची व्याख्या यापेक्षा वेगळी नव्हती.


  आर्या उठून वॉशरूमच्या दिशेने गेली. अथर्वही काहीतरी कारणाने उठून गेला. एकटा अनिलच चहाचे घोट सावकाशपणे घेत पुन्हा पुन्हा वर्तमानपत्राचे कानेकोपरे धुंडाळत आणखी काही इंटरेस्टिंग वाचायला मिळते का ते पहात होता. टिंग - टिंग आर्याच्या टेबलावर पडलेल्या मोबाईलचा आवाज आला आणि अनिलचे लक्ष तिकडे गेले. व्हाट्सअप मेसेजचे नोटिफिकेशन आले होते. सहजच अनिल आर्याच्या फोन मध्ये डोकावला. R.R. Pathan नावाने मेसेज फ्लॅश होत होता. 

"नक्की भेटू मग संध्याकाळी. 🌹🌹"

  क्षणभर आपण काय वाचलं हेच अनिलला समजेना. पटकन त्याने मोबाईल उचलला पण तो लॉक होता. भानावर येत इकडे तिकडे बघत त्याने मोबाईल पुन्हा टेबलवर ठेवला. अनिता अजूनही किचन ओट्यासमोरच होती. एकाग्रपणे ती गॅसवरील कढईकडे पाहत होती. कोण असेल हा पठाण ? 

आर्याच्या कॉलेजमधला कोणी मित्र, की ओळखी पाळखीचा कोणी ? 

त्याने भेटण्याचा मेसेज आर्याला कशासाठी केला आहे ? 

प्रेमा बीमात पडली की काय ही ? बापरे ... आणि पठाण म्हणजे मुसलमान !! वर्तमानपत्रात वाचलेल्या आणि टीव्हीवर पाहिलेल्या लव जिहादच्या बातम्या अनिलच्या मनात फेर धरून नाचू लागल्या. नकळत त्याचे तळहात घामाजले. कानशिले गरम झाली. घामाचा ओघळ त्याच्या मानेवरून पाठीकडे सरकला. 

विचारावं  का आर्याला कोण हा पठाण म्हणून ? 

पण नको ... तिला राग येईल. काहीही माहीत नसताना उगाच संशय घ्यायला नको. अनिलने विचार केला. एवढ्यात आर्या वॉशरूम मधून बाहेर आली. किचनमध्ये जाऊन सिंक जवळच्या पिंपातले पाण्याचे दोन घोट तिने ग्लास मधून प्यायले आणि कुठले तरी गाणे गुणगुणत तिने टेबलवरचा मोबाईल उचलला. चोरट्या नजरेने अनिल लक्ष ठेवून होता. सराईतपणे फोन अनलॉक करून आर्या मेसेजेस पाहू लागली. मेसेजेस वाचून निर्विकार चेहऱ्याने ती बेडरूमकडे निघून गेली. पठाणचा मेसेज वाचूनही तिच्या चेहऱ्यात काहीच बदल झाला नव्हता. अनिल विचार करू लागला ... जर त्याच्याशी प्रेम वगैरे असते तर तिचा चेहरा नक्कीच बदलला असता. 

मग हा काय ब्लॅकमेल करतोय की काय आर्याला ? या विचाराने अनिल चमकला. 

आत्ताच विचारावे का आर्याला ? हा विचार येताच अनिल चटकन खुर्चीतून उठला.

" अहो आज ऑफिस मधून येताना आठवणीने एक किलो साखर आणा. उद्या सकाळच्या चहापूरती सुद्धा साखर शिल्लक नाहीये ..." रुक्षपणे अनिता बोलली आणि अनिल भानावर आला. त्याने मान वळवून अनिताकडे पाहिले. अजूनही तिचे सारे लक्ष गॅसवरील कढईतच होते. ऑफिसला जायला खूप उशीर होतोय हे अनिलला जाणवलं. आत्ता आर्याशी या सगळ्या गोष्टी बोलण्यात खूप वेळ गेला असता. त्यापेक्षा संध्याकाळी तिच्याशी हे सर्व विस्तृतपणे बोलता येईल असा विचार करून अनिलने अंघोळीसाठी बाथरूमकडे आपला मोर्चा वळवला.


  ऑफिसमध्येही अनिल अस्वस्थच होता. जेवणाच्या सुट्टीत फेसबुकवर त्याने R.R.Pathan नावाने सर्च केला. दाढी मिशा राखलेल्या अनेक तरुणांचे प्रोफाइल त्याच्या नजरेस पडले. त्यातील काही तरुण देखणे होते काही उग्र तर काही अगदी सामान्य कॅटेगरीतील दिसत होते. यातील आर्याच्या संपर्कातील पठाण कोणता असावा याचा काहीच अंदाज अनिलला येईना. त्यातील बऱ्या वाटणाऱ्या काहींचे प्रोफाइल त्याने उघडून बघितले पण त्यांच्या कोणाच्याच फ्रेंड लिस्ट मध्ये आर्याचे नाव नव्हते. बरीचशी नावे मुस्लिम दिसत होती. एकदम त्याच्या मनात एक विचार चमकला. त्यापेक्षा आर्याचेच प्रोफाइल बघितले तर ? तसेही बाप आणि मुलगी एकमेकांचे फ्रेंड होतेच. त्याने आर्याची फ्रेंड लिस्ट बघितली. पण तिचे आणि त्याचे फक्त म्युच्युअल फ्रेंड्स त्याला दिसत होते. आर्याने त्याप्रमाणेच सेटिंग ठेवले असावे. मग त्याने तिच्या पोस्ट बघितल्या. पण कुठेही पठाणचे नामोनिशाण नव्हते. तिची कुठलीही पोस्ट सुद्धा पठाण नामक त्या इसमाने लाईक केली नव्हती.

" खांडेकर तुम्ही येणार ना आमच्याबरोबर आयोध्येला ?"  मिसेस गोखलेंनी विचारलेल्या प्रश्नाने अनिल भानावर आला. कोणताच रेफरन्स नसल्याने तो मख्ख चेहऱ्याने मिसेस गोखलेंकडे पाहू लागला.

" एकत्र गप्पा मारत असताना सुद्धा खांडेकर मोबाईल सोडत नाहीत ... काय एवढं बघतात देव जाणे ?" मिसेस जोशींनी मारलेल्या टोमण्यावर सर्वजण हसू लागले.

" अरे अनिल ... अयोध्येतील श्रीराम मंदिर पाहायला पुढच्या महिन्यात जायचं प्लॅनिंग चालू आहे. आपल्या ऑफिसची ट्रीप तिकडेच काढायची ठरतीये. येशील ना तू ?" सचिन सानेने विचारलेल्या प्रश्नावर अनिलने नुसतीच मान हलवली. सर्वजण पुन्हा गप्पांमध्ये दंग झाले. आता या महिन्यात नवीन मंदिरात प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे, अर्थात पुढच्या महिन्यात प्रचंड गर्दी असणार. अशा गर्दीत जाण्यात काय पॉईंट आहे ? 

खरं तर हा प्रश्न विचारायचं त्याच्या मनात होतं, पण या पठाणी चिंतेमुळे त्याने तो मनातच ठेवला.


 सारा दिवस असाच अस्वस्थतेत गेला. मुसलमान मुलाशी लग्न ... नंतर मुलीचा छळ ... तिचा खून ... तिचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवणे ... 

एक ना दोन नाना विचारांनी त्याचे मन सैरभैर झाले होते. अखेर संध्याकाळी एकदाचे ऑफिस संपले आणि तो बस पकडण्यासाठी झपाट्याने बस स्टॉप कडे निघाला. घरी आल्यावर कपडे बदलून तो फ्रेश झाला आणि मुलांच्या खोलीत आला. अथर्व खुर्चीत बसून टेबल वरील अभ्यासाचे पुस्तक वाचत होता. आर्याचा पत्ता नव्हता. अनिताही घरात नव्हती.

" आर्या कुठे आहे अथर्व ?" त्याने मुलाला प्रश्न विचारला. 

"माहित नाही बाबा ... आणि तसेही मला ती कुठे जाते हे कधीच सांगत नाही.? अनिच्छेने अथर्वने उत्तर दिले.

" आणि आई कुठे आहे ?" थोड्या चिडक्या आवाजात अनिलने पुढचा प्रश्न केला.

" ती गेली आहे चौकात भाजी आणायला." पुस्तकातील नजर न हलवता अथर्वने उत्तर दिले. अस्वस्थपणे अनिल हॉलमध्ये आला. सोफ्यात बसून त्याने टीव्ही ऑन केला. अयोध्येतील राम मंदिराबाबतचा रिपोर्ट त्या चॅनेलवर चालू होता. सारा देश कसा श्रीराममय झाला आहे यावर चर्चा झडत होती.


 तोच मेन डोअरचे लॅच उघडून आर्या आत आली. तिच्या पाठोपाठ अनिताही भाजीची पिशवी सांभाळत घरात शिरली. दोघी किचनकडे जात असतानाच अनिलने त्यांना थांबवले. 

"थांब आर्या ... हा पठाण कोण आहे ?" त्याने तीव्र स्वरात आर्याला विचारले. कपाळांवर आठ्या घालून काहीच अर्थबोध न झाल्यासारखी आर्या त्याच्याकडे पाहू लागली.

" कोण पठाण ?" तिने बुचकळ्यात पडल्यासारखे विचारले.

" तोच तो ... ज्याने सकाळी तुला व्हाट्सअप वर आज संध्याकाळी भेटू असा मेसेज केला होता. आणि तोच पठाण ज्याला भेटून तू आत्ता घरात येत आहेस ... तोच R.R.Pathan." चढ्या आवाजात तो म्हणाला. रागाने त्याचा चेहरा लालबुंद झाला होता. त्याच्या ओरडण्याच्या आवाजामुळे आतील खोलीतील अथर्वही आता हॉलमध्ये आला होता. अनिताही दिग:मूढ होऊन अनिलच्या अवताराकडे पाहत होती. पाच दहा सेकंद अशीच शांततेत गेली. 

अचानक आर्या खो-खो हसायला लागली. काही केल्या ती हसायची थांबेना. हसता हसता तिने अनिताला मिठी मारली आणि पोट धरून हसत हसत तिने दुसऱ्या सोफ्यावर स्वतःला झोकून दिले. चक्रावलेला अनिल विस्फारीत नजरेने आर्याकडे बघत राहिला. तिच्या हसण्याचा कोणताही अर्थबोध त्याला होत नव्हता.

" यात हसण्यासारखं काय आहे आर्या ? नीट उत्तर दे माझ्या प्रश्नाचं ..." अनिलने गुरकावत तिला विचारले. एव्हान अथर्वने ग्लास भरून पाणी आणून आर्याला दिले होते. कसेबसे हसू आवरत आर्याने अर्धा ग्लास पाणी प्याले.

" बाबा, अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर बांधलेल्या नवीन मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना बावीस जानेवारीला होणार आहे. त्यानिमित्त आपल्या सोसायटीतील लहान मुलांची रामरक्षा आवर्तने करण्याचा संकल्प आम्ही मैत्रिणींनी केला आहे. त्यासाठी रामरक्षा पठण असा व्हाट्सअप ग्रुप बनवला आहे. त्यावरचा मेसेज होता तो ... आणि आता मी तेथूनच घरी येते आहे." 

येणारे हसू मोठ्या मुश्किलीने आवरत आर्या म्हणाली.

"अग गधडे ... मग त्या ग्रुपचे नाव तू इंग्रजीत R.R. Pathan असं ठेवण्याऐवजी शुद्ध मराठीत रामरक्षा पठण असे का नाही ठेवलेस ? मूर्ख कुठची ..." 

सर्व गोष्टींचा उलघडा झाल्याने शरमलेला अनिल नमत्या आवाजात डाफरला. सगळा प्रकार समजल्याने अनिता आणि अथर्व ही आर्याच्या हास्यात सामील झाले.

" तरी मी सांगत होते ... मुलांना मराठी मिडीयम मध्ये घाला. इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेली मुले कशी ग्रुपचे नाव मराठीत ठेवतील ?" अनिताने तेवढ्यात टोमणा मारण्याची संधी सोडली नव्हती.

" आणि साखर आणलीत का सकाळी सांगितलेली ?" 

तिने विचारलेल्या प्रश्नावर अनिलने नकारार्थी मान हलवली.

" आता उद्या सकाळी प्या बिन साखरेचा चहा. वय वाढलं तरी तुमचा वेंधळेपणा काही कमी होत नाही ..." अनिताच्या झोंबणाऱ्या टोमण्याचा राग आज अनिलला आला नव्हता. दिवसभरात पहिल्यांदाच तो स्वतःवरच मनमोकळा हसला होता. पटकन उठून तो देवघरासमोर आला. हात जोडून मनोभावे देवाचे आभार मानताना देव्हाऱ्यातील प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेकडे त्याचे लक्ष गेले. प्रभू रामचंद्र यांच्या चेहऱ्यावरचे दैवी आणि सात्विक हास्य का कोण जाणे पण आज त्याला मिश्किल वाटत होते.


समाप्त

वरील कथा श्री मिलिंद अष्टपुत्रे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखकाच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत. 


1 Comments

Post a Comment
Previous Post Next Post