अस्तित्व

 अस्तित्व

✍️ मिलिंद अष्टपुत्रे

श्रीरंग मराठ्यांच्या साईटवर आज कामाचा मुहूर्त करायचा होता. मराठे गेली पंचवीस वर्षे उच्चभ्रू लोकांचे बंगले असलेल्या 'सार्थक' सोसायटीत राहात होते. त्यांच्या तारुण्यात त्यांनी हा बंगला बांधला होता. काळ गेला तशा कुटुंबाच्या गरजा बदलत गेल्या. मराठ्यांची दोन्ही मुलं आता नावाजलेल्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर काम करत होती. मुलांच्या लग्नानंतर कुटुंब मोठे झाले. नातवंडांच्या आगमनामुळे पूर्वी मोठ्ठा वाटणारा बंगला आता पुरेनासा झाला. मराठे माझ्या ऑफिसला आले आणि पुढची चक्रे वेगाने हलली. थोड्याच दिवसात मी नगरपालिकेकडून पार्किंग प्लस फोर फ्लोअर्स चा नकाशा मंजूर करून घेतला. नवीन इमारतीचा प्रत्येक मजला एखाद्या बंगल्याइतका प्रशस्त होणार होता. लिफ्टसह सर्व नवीन प्रचलित सुखसोयी होणाऱ्या  इमारतीत असणार होत्या.आज जुना बंगला पाडायचे काम सुरु करायचे होते. मराठे कुटुंब गेल्या आठवड्यातच जवळच्याच दुसऱ्या इमारतीतील एका अपार्टमेंट मध्ये भाड्याने जागा घेऊन शिफ्ट झाले होते.

मी साईटवर पोहोचलो आणि पाडापाडी करणाऱ्या ठेकेदाराचा फोन आला. त्याची स्कूटर पंक्चर झाली होती. साईटवर पोहोचायला त्याला थोडा वेळ लागणार होता . "नेमकं आत्ताच याच्या स्कूटरला पंक्चर व्हायचं होतं !!" रागानं मी पुटपुटलो. पुढच्या सगळ्या अपॉईंटमेंट्स आता लेट होणार होत्या. पण वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. वातावरणात प्रचंड गरमी होती. मी कार मध्ये बसलो आणि एसी चालू केला. रेडिओवर रफीची गाणी चालू होती. गार हवेत आणि मस्त गाण्याच्या उडत्या चालीवर पाचच मिनिटात मी पेंगू लागलो.

कोणीतरी गाडीच्या काचेवर टकटक केले आणि मला खडबडून जाग आली. बाहेर पिवळी साडी आणि लाल ब्लाऊज घातलेली कोणीतरी बाई कडेवर लहान मूल घेऊन उभी होती . प्रथम मला भीक मागणारीच वाटली. मी पुढे जाण्याची खूण करूनही ती जागची हलली नाही. उलट्या खुणा करून ती मलाच काच खाली करण्यास सांगत होती. काहीशा अनिच्छेनेच मी गाडीची काच खाली केली. गरम वाऱ्याचा झोत आत घुसला.
" काय पाहिजे ?" खेकसत मी विचारले .
"साहेब समोरच्या बंगल्याच्या जागी बिल्डींग बांधायचं काम आज पासून सुरू होणार आहे का?" तिने हलक्या आवाजात मला विचारले .
"होय....... पण तू कशाला चौकशी करतीयेस ?" रागानं मी विचारलं.
" साहेब तुम्हाला कामावर पाणी मारणाऱ्या माणसाची गरज असेल ना ? मला कामावर ठेवाल का ? मला पाणी मारण्याचा चांगला अनुभव आहे .मी पाणी मारेन आणि माझा नवरा वॉचमन म्हणून देखरेख करेल."
तिचे हे बोलणे ऐकल्यावर मी विचारात पडलो . आज काल लेबर प्रॉब्लेममुळे छोट्या प्रोजेक्ट्ससाठी साईटवर राहून अशी कामे करणारी माणसं दुर्मिळ झाली होती. माझा तिच्याशी बोलण्याचा टोन आता बदलला.

" तुझा नवरा कुठे आहे ?" मी विचारले .
" तो गेलाय बिगारी कामाला सकाळीच ." तिने उत्तर दिले.
" बरं ... किती पगार घेशील ?" मी तिचा अंदाज घेऊ लागलो. ती थोडीशी गोंधळली. डोळे मिटून तिने थोडा विचार केला.
" तुम्ही द्याल तेवढा पगार घेईन साहेब! मला कामाची लई गरज आहे." तिच्या डोळ्यातील करूण भाव आणि तिच्या कडेवरच्या पोराचं खपाटीला गेलेलं पोट पाहून मी गलबललो .
" ठीक आहे .... दोन दिवसांनी याच वेळी पुन्हा ये .नवर्‍यालाही बरोबर आण. मग तुला राहण्यासाठी पत्र्याची कोठी मारण्याची सोय करू!!" तिचा चेहरा आनंदाने फुलून गेला. "लई उपकार झालं साहेब! किती दिवस झाले ..... अशीच फिरतीयेे .... पण साहेब माझ्या कोठीत लाईट मीटर मात्र बसवू नका. मला त्याची लई भीती वाटते ." तिने काळजीयुक्त आवाजात सांगितले.

" ठीक आहे बघू ते नंतर !" बेफिकीर आवाजात मी म्हणालो आणि गाडीचे दार उघडून बाहेर आलो .मी गाडी बाहेर येताच तिने रस्त्यावर अक्षरशः लोटांगण घालून मला नमस्कार केला. माझ्या पायांना तिच्या हातांचा स्पर्श झाला आणि मी शहारलो. बर्फासारखा थंडगार स्पर्श होता तो !! घाईघाईने मी मागे सरलो . सावकाशपणे ती उठली, कडेवरच्या पोराला सावरत ती वळली आणि शेजारच्या झाडाखालील सावलीच्या दिशेने निघाली. तिच्या कडेवरील पोराच्या हातातील बोटांमध्ये पिवळ्या रंगाचं काहीतरी ओवलेलं होतं .' काय बरं म्हणतात याला ?'  मी विचार करू लागलो.

स्कूटरचा हॉर्न वाजला आणि मी वळून बघितले. आमचा पाडकाम करणारा ठेकेदार घाईघाईने येत होता.
" सॉरी साहेब ! नेमकी स्कूटर पंक्चर झाली ... चला आपण आत जाऊ !" अपराधी भावनेने तो बोलला. आम्ही फाटक उघडून आत गेलो. दहा मिनिटात बंगला कसा आणि किती दिवसात पाडायचा याची आमची चर्चा पूर्ण झाली. फाटकाबाहेर आलो तर दरवाज्यात मराठे पती-पत्नी उभे !! बरोबर त्यांचा इलेक्ट्रिशियन होता.
" नमस्कार ...  तुमचं काम उद्यापासून सुरू होईल म्हणून आज आमच्या वायरमनला घेऊन आलो. आतला लाईट मीटर कंपाउंड शेजारी हलवून घेतो. घर उद्यापासून पाडलं जाईल .... म्हणून शेवटचं एकदा बघायला हि सुद्धा बरोबर आली आहे ." मराठ्यांचा आवाज थोडासा गहिवरला होता. ज्या वास्तूत आयुष्यातली पंचवीस वर्षे काढली ती उद्या पडणार या कल्पनेने वाईट वाटणं सहाजिक होतं . मी फक्त मान डोलावली. मराठे इलेक्ट्रिशियनला घेऊन आत गेले.

मराठी वहिनी पाणावलेल्या नजरेने बंगल्याकडे बघत उभ्या होत्या. हातातल्या पिशवीतून त्यांनी फोटोचा जुना अल्बम बाहेर काढला. त्याची पाने उलटत त्या त्यातील फोटो पाहू लागल्या. मी मान तिरकी करून अल्बम मध्ये डोकावलो. अल्बम पुढे करत वहिनी म्हणाल्या ,
" पंचवीस वर्षांपूर्वी केलेल्या वास्तुशांतीचा अल्बम आहे हा .... पहा ना !! " मी अल्बम हातात घेतला. उत्सुकतेने जुने फोटो पाहू लागलो. मराठे पती पत्नींचे ऐन तारूण्यातले हसरे फोटो होते त्यात !! त्यांची त्यावेळची लहान मुले बाजूला उभी होती. मी पाने उलटत होतो. कार्यक्रमाला जमलेल्या पाहुण्यांचा एक ग्रुप फोटो होता .त्यात कडेला उभी असलेली पिवळी साडी आणि लाल ब्लाऊज घातलेली बाई पाहून मी दचकलो. तिच्या कडेवर पोट खपाटीला गेलेलं पोर होतं !! माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता .......

तेवढ्यात मराठे बाजूला येऊन उभे राहिले .
" मराठे साहेब...  या ग्रुप फोटोत ही पिवळ्या साडीतील बाई कोण आहे ?"  मी विचारले. माझ्या या प्रश्नावर मराठे पती-पत्नी चांगलेच दचकले. त्यांचे चेहरे गोरेमोरे झाले . हलक्या आवाजात मराठे मला म्हणाले,
" सॉरी .... पण तुमच्या पासून एक गोष्ट आम्ही लपवून ठेवली होती. पंचवीस वर्षांपूर्वी  वास्तुशांतीच्या रात्री वादळी पाऊस झाला होता. बाहेरील पत्र्याच्या कोठीत, कामाला पाणी मारणारी वॉचमनची बायको आणि तिचं पोर झोपले होते . प्रचंड पावसात कोठीतील लाईट मीटरमधून करंट लीक झाला, आणि विजेच्या धक्क्याने दोघांचाही मृत्यू झाला. तिचा नवरा दारू प्यायला गेला असल्याने वाचला. आमच्या ठेकेदाराने पोलिसांच्या साथीने कसेबसे प्रकरण मिटवले. सॉरी ........ तुम्हाला सांगितले नाही. उगीच काही गोष्टी मनात राहतात आणि कामावर त्याचा परिणाम होतो म्हणून .... " अपराधी स्वरात मराठे बोलत होते. माझ्या पाठीवरून घामाचा ओघळ खाली सरकला .अस्वस्थपणे घामाजलेले तळहात रुमालाला पुसून मी चटकन बाहेरील झाडाच्या दिशेने नजर टाकली. झाडाच्या  आजूबाजूला चिटपाखरूही नव्हते.

" पण मग मघाशी माझ्याशी बोलणारी ती पिवळी साडी नेसलेली आणि कडेवर पोर घेतलेली बाई कोण होती ?" कापऱ्या स्वरात स्वतःशीच बोलल्यासारखे मी विचारले .
" कसं शक्य आहे ? आमच्या सोसायटीत गेटवर एन्ट्री  केल्याशिवाय कोणीच आत येऊ शकत नाही. परक्या माणसांना वॉचमन कधीच आत सोडत नाहीत ."  मराठे वहिनी बोलल्या. मला आठवले .... मी आत येतानाही एंट्री करण्यात आली होती.
" अहो ....  आत्ता पंधरा वीस मिनिटा पूर्वी एक बाई येथे माझ्याशी बोलली. थेट या फोटोतल्या बाई सारखीच दिसत होती. असेच मूल तिच्या कडेवर होते .लाईट मीटर वॉचमन कोठीत लावू नका... मला भीती वाटते ... असे म्हणाली. बाप रे ... आणि हे काय ?"  फोटो बारकाईने न्याहाळत मी म्हणालो ,
" या कडेवरील पोराच्या हातातील बोटात पिवळ्या रिंगा कसल्या आहेत ?" मराठे वहिनींना तशा प्रसंगातही हसू फुटले.
" अहो त्याला फुंकण्या म्हणतात ... त्या काळी मुलांच्या खाऊच्या दुकानात अशा फुंकण्या मिळायच्या.... पोरांना गप्प बसवण्यासाठी आया, पोरांच्या हातातील प्रत्येक बोटात फुंकण्या ओवायच्या .... त्या चोखतं पोरं गप्प रहायची ... हल्ली नाही मिळत म्हणा अशा फुंकण्या !!! "
खरं तर भुताखेतावर माझा अजिबात विश्वास नाही .....  तरीही माझ्या पायांना किंचित कंप सुटला. चेहऱ्यावरचा घाम पुसत मी अस्वस्थपणे कारकडे निघालो.
" आज ऊन आणि गर्मी थोडी जास्तच आहे. मला जरा बरं वाटत नाहीये ! मी निघतो आता .... " घाईने मराठे दाम्पत्याचा निरोप घेऊन मी निघालो. मराठे  पती-पत्नी अचंब्याने माझ्याकडे पाहात होते. " तरी मी तुम्हाला म्हणत होते .... आधीच त्यांना  सगळं सांगून टाका म्हणून .... " मराठे वहिनी नवऱ्याला म्हणताना मी ऐकले. पटकन गाडीत बसून मी पाण्याची बाटली तोंडाला लावली. घटाघट पाणी पीत अर्धी बाटली संपवून मी गाडी स्टार्ट केली आणि वेगाने ऑफिसकडे निघालो. मला आठवले, ती मला भेटली त्यावेळी तिच्या कडेवरील पोराच्या हातातील बोटांमध्ये ओवलेल्या त्या पिवळया वस्तू म्हणजे फुंकण्या होत्या ......  हल्लीच्या काळी खाऊच्या दुकानात मिळत नसलेल्या ........ फुंकण्या !!!!
" लौकिकदृष्ट्या नसलेल्या ... पण अभौतिकपणे तिथेच वावरणाऱ्या तिने .... तिचं अस्तित्व तर नसेल ना दाखवून दिलं ?? " जोरजोरात डोके हलवून मी मनात येणारे अभद्र विचार झटकून टाकले !!!

दोन दिवसांनी मी तिला पुन्हा भेटायला बोलावले होते. नवर्‍याला सुद्धा घेऊन ती येणार होती. त्या दिवशी सकाळपासूनच मी साईटवर खुर्ची टाकून बसून राहिलो...  वेळ पुढे सरकत होती. पण तिचा पत्ता नव्हता. एकीकडे जुनी वास्तू पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत होती आणि दुसरीकडे मी वेड्यासारखा तिची वाट पाहत बसून होतो....... आजपर्यंत कुठल्याही अमानवी गोष्टीवर मी कधीच विश्वास ठेवला नव्हता !!  संध्याकाळ झाली. अंधारात समोरील झाडाची सावली आणखीनच भयाण वाटत होती ... शेवटपर्यंत ती आलीच नाही .... मी निघालो .... मनात तिच्या अस्तित्वाबाबतचा अनुत्तरीत प्रश्न घेऊन ....
समाप्त

वरील कथा श्री मिलिंद अष्टपुत्रे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखकाच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post