गझल

 


गझल


✍️ सौ.हेमा पाटील.


तेरी निगाह सें ऐसी शराब पी मैंने |


के फिर ना होश का दावा किया कभी मैंने ||


वो और होंगे जिन्हें मौत आ गयी होंगी |


निगाहे यार से पायी है जिंदगी मैंने ||


ऐ गमें जिंदगी कुछ तो दे मशवरा |


एक तरफ उसका घर एक तरफ मैकदा ||


ही गझल ऐकत असताना त्याचे डोळे भरुन आले. तिची आठवण ऊरात दाटून आली. आठवण आली असे म्हणायला तो विसरलाच कधी होता तिला...


ती म्हणजे त्याचे सर्वस्व होती हे त्याला ती जेव्हा दूर गेली तेव्हा समजले.. काही गोष्टी जेव्हा आपल्या जवळ असतात ना तेव्हा आपल्याला त्यांची इतकी सवय झालेली असते की, त्यांची आपल्या आयुष्यात काय किंमत आहे तेच आपल्याला समजत नाही. आपण आपल्या आयुष्यात त्यांना गृहीत धरलेले असते... पण जेव्हा ती व्यक्ती आपल्यापासून दूर होते तेव्हा त्याची जी किंमत आपल्याला चुकवावी लागते ती खूप जास्त असते.


असेच अनिल आणि रेश्माच्या बाबतीत घडले होते. दोघेही अगदी अचानक एकमेकांच्या आयुष्यात आले होते. पण दोघांमध्ये अगदी जवळचे मैत्रीचे संबंध जुळले होते. आॅफीसमध्ये एकत्र काम करत असताना, बोलताना अगदी सहजपणे दोघांच्या आवडीनिवडी एकमेकांना समजल्या होत्या आणि त्या जवळपास सारख्याच होत्या.दोघांनाही जुनी किशोर लताची गाणी फार आवडायची. आॅफीसमध्ये दोघांनाही आऊटडेटेड असे संबोधले जायचे, पण त्यांना त्यासाठी आपली आवड बदलावी असे कधीच वाटले नाही. तशीच दुसरी सेम गोष्ट म्हणजे दोघेही चहाचे वेडे होते.. चहाचे आशिकच म्हणा ना! कुठेही चहाचा छान सुवास आला की हे गाडी थांबवणार म्हणजे थांबवणारच! शहरात कुठे चांगला चहा मिळतो अन् कुठली चव कशी असते हे यांना अगदी तोंडपाठ! या चहाच्या कपामुळेच ते दोघे एकमेकांकडे ओढले गेले हे वास्तव होते...


  ‌ पण दुर्दैवाने हे वास्तव स्विकारायला अनिलला फार वेळ लागला. आज ही गझल ऐकताना रेश्मा सोबतचा घालवलेला काळ त्याच्या नजरेसमोरून झरझर सरकत होता.

रेश्मा जेव्हा त्याच्या आॅफीसमध्ये जाॅईन झाली तेव्हा एक कलीग या दृष्टिकोनातून अनिल तिच्याकडे पहात होता. ती मनमिळाऊ स्वभावाची असल्याने अल्पावधीतच आॅफीसमध्ये सर्वांशी तिची छान ओळख झाली तशीच अनिलशीही झाली. पण आपले दोघांचे नाते इतर सर्वांपेक्षा वेगळे आहे हे लक्षात आल्यावर दोघांचा वेळ एकमेकांसोबत जास्त जाऊ लागला. आवडत्या गाण्यांवर चर्चा होऊ लागली. चहा पिण्यासाठी दोघे एकत्र जाऊ लागले. यामुळे एकमेकांचा संपर्क वाढला आणि यातून जवळीक अधिकच वाढली तेव्हा आपली दोघांचीही आवडनिवड समान आहे हे समजले. मग तर सगळ्या गोष्टींत अन् प्रत्येक ठिकाणी त्याला रेश्माच हवी असायची. रेश्मालाही त्याचा सहवास आवडत होता.आपण अनिलच्या प्रेमात पडलोय हे रेश्माला जाणवले होते, पण ते बोलून न दाखवता ती कृतीतून व्यक्त करत होती. परंतु अनिलच्या ते कधीही लक्षात आले नाही.


गेल्या वर्षी आॅफीसची ट्रीप गेली होती तेव्हा रात्री प्रत्येकाने आपापल्या कला सादर करायच्या होत्या, तेव्हा दोघांनी दिल क्या करे जब किसीसे किसीको प्यार हो जाये हे duet गायले होते. ते दोघांनीही इतके समरसून गायले होते की, आॅफीसमधील सर्वांना या दोघांमध्ये प्रेमाचे बंध बांधले गेले आहेत अशी जाणीव झाली. रेश्माच्या मैत्रिणींनी तिची अनिलवरुन चेष्टा करणे सुरु केले होते. तिला मनापासून त्यांचे असे चेष्टा करणे आवडत होते, पण प्रत्यक्षात ती लटकेच मैत्रिणींवर रागावून असे काही नाही असे म्हणत असे. पण तिच्या चेहऱ्यावर तेव्हा जो लज्जेचा लालिमा पसरायचा तो पाहून मैत्रिणी गालातल्या गालात हसत.


रेश्मा ने गृहीत धरले होते की, अनिलचीही अवस्था वेगळी नाही. ट्रीपवरुन आल्यापासून ती मनाने अनिलच्या अधिकच जवळ आली होती. दुपारी आपल्या टिफीनसोबत त्याच्यासाठी ही काहीतरी आणायची. ती खूप दिवस झाले तो आपल्याला प्रपोज करेल म्हणून वाट पहात होती. पण तो दिवस आलाच नाही म्हणून जेव्हा तिने अप्रत्यक्षपणे त्याची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपल्या लग्नाचा विषय अनिलसमोर काढला तेव्हा अनिलची प्रतिक्रिया तिच्यासाठी खूप धक्कादायक होती.तो तिला म्हणाला होता.. "मग कर ना सुरवात लग्नासाठी मुले पहायला"!


हे ऐकल्यावर ती म्हणाली, "अरे, चेष्टा करु नकोस. मी सिरीयसली बोलतेय".


यावर तो म्हणाला, "मी ही सिरीयसलीच सांगतोय तुला.. फार तर तुला एखादा मुलगा आवडला तर मला आधी भेटव त्याला.. आपली दोघांची मते किती जुळतात! मलाही तो आवडला तर बेशक त्याला हो म्हणून सांग".


हे ऐकल्यावर ती चक्रावून गेली. तिने त्याच्या डोळ्यात डोळे घालून तिथे चेष्टेचा भाव दिसतोय का ते अजमावण्याचा प्रयत्न केला पण तो खरंच मनापासून बोलतोय याची तिला खात्री पटली आणि तिच्या भावविश्वात प्रचंड प्रमाणात उलटापालट झाली. आपले म्हणणे त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा तिने खूप प्रयत्न केला पण तो फोल ठरला...


त्यानंतर ती एखाद्या कोमेजलेल्या गुलाबासारखी दिसू लागली. तिच्या चेहऱ्यावरुन हास्य गायब झाले. त्याच्या सहवासात असताना उत्साहाने सळसळणारी ती फक्त निर्जीवपणे आपल्या सोबत आहे असे त्यालाही जाणवले. हळूहळू तिने स्वतःला त्याच्यापासून दूर करणे सुरु केले. एक दिवस तिने सांगितले की, डाॅक्टरांनी सांगितले आहे म्हणून मी चहा पिणे बंद केले आहे. हे ऐकून त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. तू चहा कसा सोडू शकतेस या त्याच्या प्रश्नावर तिने फक्त त्याच्याकडे हसून पाहिले. चहा हा दोघांमधील दुवा अशा पद्धतीने निखळल्याने आता दोघे एकत्र चहा पिताना दिसायची बंद झाली.


पुढच्याच महिन्यात तिने बाॅसशी बोलून शहरातील दुसऱ्या शाखेत आपली बदली करवून घेतली. हा ही त्याच्यासाठी धक्काच होता, पण ती शाखा जवळ पडते असे कारण सांगून तिने आॅफीसमधील सर्वांना पार्टी दिली, पण तिच्या नजरेतील भाव मात्र विझलेलेच होते. तिला काय झाले आहे, ती अशी का कोमेजून गेली आहे असा प्रश्न त्याला पडला होता, पण तिचे खासगी कौटुंबिक काही प्रश्न असतील आणि तिला ते आपल्याशी शेअर करायचे नसतील तर कसे विचारायचे म्हणून तो गप्प राहिला. पण तिच्या चेहऱ्याकडे त्याला पहावत नव्हते. आता तर तशी वेळ ही रोज येणार नव्हती कारण उद्यापासून ती भेटणे दुरापास्त होणार होते. तिची बदली घरापासून जवळ झाली त्यामुळे तिचा येण्याजाण्याचा वेळ व त्रास वाचेल याचा खरं तर आपल्याला आनंद झाला पाहिजे पण आपल्याला खूप वाईट वाटतेय हे त्याला जाणवले. तिच्या सहवासाची सवय झाल्याने आपल्याला असे वाटत असेल, चार दिवस गेले की आपल्याला ही तिच्या नसण्याची सवय होईल असे म्हणत त्याने आपल्या मनाला समजावले.


तिला तिकडच्या शाखेत बदलून जाऊन वर्ष झाले होते. ती जोपर्यंत समोर होती तोपर्यंत त्याला तिच्या सोबत असताना जी जाणीव झाली नव्हती ती आता तिच्या अनुपस्थितीत झाली होती. चार दिवस गेले की आपण तिला विसरुन जाऊ हा आपला ग्रह किती चुकीचा होता हे त्याच्या लक्षात आले. आपण तिच्या सहवासात खूप आनंदी असायचो हे त्याने स्वतःशी कबूल केले. आपण तिच्या प्रेमात पडलोय. तिच्याशिवाय आपण अपूर्ण आहोत हे गझल ऐकताना त्याच्या मनावर पुन्हा एकदा बिंबले. न राहवून त्याने त्याक्षणी मोबाईल उचलला आणि तिला फोन लावला...


आज वर्षानंतर अशा अवेळी त्याचा नंबर मोबाईलवर पाहून तिला आश्चर्य वाटले. तसा सुरवातीला रोज आणि नंतर दोन चार दिवसांनी त्याचा खुशाली विचारायला फोन आजही येतो, पण आॅफीसमध्ये असताना.. आणि प्रत्येक वेळी तो आपल्याला पहायला येणाऱ्या स्थळांबाबत चौकशी करतोच हे तिला तोंडपाठ झाले होते. पण आत्ता रात्री यावेळेस त्याचा पहिल्यांदाच आलेला फोन पाहून तीने पटकन फोन उचलला.


"हॅलो"..


"सगळे काही ठीक आहे ना"...

असे ती म्हणताच तो म्हणाला, " मला तुझ्याशी काही बोलायचं आहे.उद्या रविवार आहे, भेटशील का"?ती हो म्हणाली. 


"काय बोलायचय"? या तिच्या प्रश्नाचे उत्तर त्याने दिले नाही.


"उद्या संध्याकाळी भेटू" असे म्हणत त्याने फोन ठेवला.


गेले वर्षभर तिने खूपदा त्याच्या फोनची वाट पाहिली होती.त्याचा फोन यायचाही... पण तिला जे अपेक्षित होते ते त्याने आजवर कधीच उच्चारले नव्हते. त्यामुळे तिची आशा धूसर झाली होती...


दोघांच्या समोर चहाचे ग्लास होते. त्याने चहाचा ग्लास हातात घेऊन त्याचा एक घोट घेतला व तिच्याकडे बघितले. तिनेही चहाचा ग्लास उचलला. तिच्या प्रश्नार्थक मुद्रेकडे पहात त्याने थेट विचारले,"माझ्याशी लग्न करशील?" तिने नुकताच चहाचा ग्लास ओठांना लावला होता. इतके दिवस आतुरतेने वाट पहात असलेला प्रश्न त्याच्याकडून असा अचानक आल्याने ती एकदम बावचळली व ग्लासमधील चहा हेंदकाळून तिच्या हातावर सांडला. प्रश्नाचे उत्तर देणे बाजूलाच राहिले व ती उठून बेसीनकडे गेली. ड्रेस धुवून हातावर चहा सांडल्याने थोडेसे भाजले होते तिथे गार पाणी ओतून ती परत आली तेव्हा तो बील देऊन काऊंटरपाशी उभा होता. तिला चल असे खुणावून तो पटकन बाहेर पडला. मेडिकल शोधून तिथून तिच्या हातावर लावण्यासाठी क्रीम घेतले व तिथेच खोलून तिच्या हातावर हळूवारपणे लावले. त्याची ही सगळी लगबग, आपली काळजी घेणे ती डोळ्यात साठवून ठेवत होती. आपण गेले वर्षभर दूर झालो म्हणून याला जाणीव झाली. जवळच असतो तर याच्या कधी लक्षातच आले नसते असे तिला क्षणभर वाटून गेले.

मेडिकलच्या बाहेर रस्त्यावर उभे राहून तिने त्याला सांगितले, "तुझ्या प्रश्नाचे उत्तर हो असे आहे". आधी तर मिनिटभर त्याला ती काय बोलतेय याचे आकलनच झाले नाही. पण जेव्हा त्याचा अर्थ त्याच्या मेंदूपर्यंत पोहोचला तेव्हा त्याच्या डोळ्यात जे भाव उमटले ते पाहून रेश्माला वाटले हेच भाव पाहण्यासाठी आपण या क्षणाची किती आतुरतेने वाट पाहत होतो ...


समाप्त 

वरील कथा सौ. हेमा पाटील यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. 

Post a Comment (0)
Previous Post Next Post