लग्नाच्या बाजारातील तो

लग्नाच्या बाजारातील तो

लेखिका- सविता किरनाळे 

(कथालेखिकेने सर्व कथांचे copyright हक्क रजिस्टर केले आहेत. लेखिकेची कोणतीही कथा कोणत्याही स्वरूपात अगदी नावासकटही कुठल्याही वेबसाईट, सोशल मीडिया किंवा यूट्यूब चॅनलवर आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)


“मिनाक्षी आवर पटापट. इतका नट्टापट्टा करायची गरज नाही. फक्त भेटायला जातोय आपण , ठरवायला नाही.” सुभाष आपली मुलगी मिनाक्षीला म्हणत होते. आज ते सगळे मिनाक्षीसाठी मुलगा पाहायला एका वधुवरसूचक मंडळात जात होते. तिथे एका कुटुंबासोबत त्यांची मीटिंग ठरली होती.

 
सुभाष आणि वैजंती या जोडप्याची मिनाक्षीही कन्या. त्यांचा मुलगा वैभव नोकरीनिमित्त गुडगावला राहत होता. चोवीस वर्षाची मिनाक्षी नावाप्रमाणेच एखाद्या सुवर्णपुतळी सारखी सुंदर होती. तिला आपल्या सौंदर्याचा खूप अभिमान होता. सौंदर्याच्या जोरावर आपण कुणालाही वाकवू शकतो असा तिला गर्व होता. तिच्यासाठी स्थळ पाहणे ही तिच्या आईवडिलांसाठी एक भलीमोठी समस्या झाली होती कारण तिच्या अपेक्षा. मिनाक्षीच्या आपल्या होणाऱ्या नवऱ्याकडून, सासरच्या मंडळींकडून काही अपेक्षा होत्या. त्या पुर्ण करणाऱ्या मुलाशीच लग्न करण्याचा तिचा निर्धार होता. सुरूवातीला तिचे रूप, नोकरी पाहून प्रभावित होणारी मंडळी तिच्या अपेक्षांची जंत्री ऐकताच माघार घेत. अशा कित्येक स्थळांकडून नकार आल्यावर वैजंतीने मुलीला आपल्या मागण्यांचा पुनर्विचार करण्यास सुचवले पण त्याचा काही फायदा झाला नाही.

 
आजचे स्थळ सुभाष आणि वैजंतीला अनुरूप वाटत होते. मुलगा चांगल्या कंपनीत चांगल्या पदावर होता. गावाकडे शेती, घर होते. मुंबईमध्ये तो कंपनीने दिलेल्या थ्री बीएचके घरात राहत होता. एक बहीण दिल्या घरी सुखी होती. नाव ठेवायला कुठे जागा दिसत नव्हती पण मिनाक्षीचा काही भरवसा नव्हता. मागे एका मुलाला तिने फक्त यासाठी नकार दिला होता, की त्याची स्माईल चांगली नाही. म्हणून आताशा कुठल्या मंडळामधून बोलावणे आले की या दोघांना धडकीच भरायची. पण काय करणार लाडकी लेक होती ती त्यांची.

 
सांगितलेल्या वेळेपेक्षा अर्धातास उशिरा हे कुटुंब तिकडे पोहोचले. ‘मुद्दाम उशिरा जायचे थोडे म्हणजे आपण गरजू आहोत असे समोरच्यांना वाटत नाही आणि बाहेर उभ्या असलेल्या गाडीवरून त्यांची आर्थिक स्थिती समजते.’ इति मिनाक्षी. दुसरे कारण म्हणजे मिनाक्षीला तयार व्हायला लागणारा वेळ. समोरच्यावर आपला प्रभाव पडावा अशी पुरेपूर दक्षता घ्यायची ती.

 
तर तिथे जाताच तिने पाहिले, की बाहेर कुठलीच गाडी दिसत नाही. ‘ओह, म्हणजे यांच्याकडे चारचाकी नाही तर!’ मनात ती उद्गारली. आत, जिथे बैठकीची व्यवस्था केली होती तिथे, एक सावळा पण सतेज मुलगा, डोक्यावर पदर घेतलेली, हातात पाटल्या, गळ्यात बोरमाळ, मोठे मंगळसूत्र घातलेली साधीशी स्त्री आणि रुबाबदार व्यक्तीमत्वाचे उतारवयीन गृहस्थ बसले होते. त्यांच्या हावभाव, कपडे यावरून ते सुसंस्कृत दिसत होते. मिनाक्षीची फॅमिली आल्यावर ते लोक उठून उभे राहिले आणि त्यांनी हात जोडून नमस्कार केला.

मिनाक्षी मुलासमोर आणि तिच्या दोन्ही बाजूला आई आणि वडील बसले. आता ती मुलाचे सहज निरीक्षण करू शकत होती. त्याने पीच कलरचा चेक्सचा शर्ट, काळी पॅंट घातली होती. काळ्या फ्रेमचा चश्मा त्याचे व्यक्तिमत्व भारदस्त बनवत होती. आईचा तेजस्वीपणा आणि वडिलांचा रुबाबदारपणा होता त्याच्यात. थोडक्यात टाॅल, डार्क आणि हॅंडसम होता तो. डार्क हा शब्द मनात येताच मिनाक्षी थोडी घुटमळली. आपण लख्ख गोरे आणि हा असा, आईही खेडवळच वाटते. मनातच तिने त्याला नकार द्यायचे ठरवून टाकले. तिला असे खेडवळ सासर नको होते.

 
“हं सुरू करूयात मग,” मंडळाचा माणूस किंचित हसत बोलला. “विचारा तुमचे प्रश्न.” 
“मी मोहन सुरवसे, वय अठ्ठावीस... मूळ गाव सांगली आता नोकरीनिमित्त अंधेरीला असतो. हे माझे बाबा आणि ही आई.” त्याने रितसर ओळख करून दिली. 
‘मोहन, सो ओल्ड स्कूल नेम,’ मिनाक्षीच्या नाकाला किंचित मुरड पडली. तिने त्याला नाकारायचे ठरवले होते म्हणून तिला त्याच्या प्रत्येक गोष्टीत खोट दिसू लागली. मग तिनेही आपली ओळख करून दिली. तुम्हाला दोघांना काही बोलायचे असेल तर तिथे एक केबिन आहे तिकडे जावू शकता, मंडळाच्या पदाधिकाऱ्याने सुचवले.
“नाही, त्याची गरज नाही. आम्ही इथेच बोलू तुमच्यासमोर,” मिनाक्षी पटकन बोलली. तिला हे लवकर संपायला हवे होते. समोरच्या लोकांमध्ये तिला आता फारसा रस उरला नव्हता. “ठीक आहे,” मोहन बोलला. “सांगा तुमच्या अपेक्षा, भविष्याच्या कल्पना वगैरे,” तो पुढे बोलला. 
“होणाऱ्या वराकडून, त्याच्या घरच्या लोकांकडून माझ्या काही अपेक्षा आहेत. अर्थात सगळ्यांच्या असतात. तुमच्याही माझ्याकडून काही असतीलच.” मिनाक्षी बोलू लागली.

 
“पहिली अट अशी, की मुलाचा स्वतःचे निदान टू बीएचके तरी घर असावे. जर त्याची फॅमिली मोठी असेल तर अजून मोठे so that everyone can get their space. एखादी चार चाकी गाडी असावी. दुसरी अट ही त्याचा पगार माझ्यापेक्षा थोडातरी जास्त असावा. तिसरी अशी आहे, त्याने विवाहपुर्व वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. मी एक वर्किंग वुमन आहे, जास्त सणवार, रितीभाती पाळणे मला तितके जमणार नाही. याचा अर्थ असा नाही की मी काही करणारच नाही, मी करेन पण एकदम कडक वगैरे नाही. मी स्पष्टवक्ती आहे म्हणून माझी एक कमजोरी सांगते, मला फारसा स्वयंपाक जमत नाही पण मी शिकण्याचा प्रयत्न करेन.
माझ्या पालकांनी मला शिकवून स्वतःच्या पायावर उभे केले म्हणून माझ्या पगारातील अर्धा हिस्सा मी त्यांना देते आणि पुढेही देत राहीन. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट... कदाचित मी फारच स्पष्ट बोलत असेन पण हे मला आधीच सांगायचे आहे, I am an independent girl so I really like my space. मला असं वाटतं, की आपल्या संसारात जास्त कुणाची लुडबुड नसावी. मला माफ करा जर मी खूप जास्त बोलले असेन तर पण हा आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून सुरूवातीला जेवढी स्पष्टता असेल तितकी चांगली.”

 
तिचे बोलणे मोहन लक्षपूर्वक ऐकत होता तर त्याच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर अविश्वास झळकत होता. इतकी स्पष्टवक्ती मुलगी त्यांनी पहिल्यांदा पाहिली होती. 
“मिस मिनाक्षी, तुम्ही बोललात त्यातील काही मुद्दे मला पटले.” मोहन बोलू लागला आणि त्याच्या पालकांच्या चेहऱ्यावर अविश्वास प्रकटला. पण मोहन पुढे बोलत राहिला. 
“मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, तुमचे वय किती? आणि पगार किती आहे?”
“चोवीस वर्ष आणि पगार पन्नास हजार महिना,” काय मूर्ख आहे. हे तर बायोडेटा मध्ये आहेच की या विचारात ती बोलली. 
“अच्छा, मग इतका पगार असताना आणि तुमचे वय माझ्यापेक्षा चार वर्षाने कमी आहे हे लक्षात घेतले तर तुमचा स्वतःचा निदान वन बीएचके घर तर असेलच ना?” मोहनने प्रश्न केला. 
“अं, नाही माझा फ्लॅट वगैरे.” त्याच्या बोलण्याचा रोख समजून घेण्याचा प्रयत्न करत मिनाक्षी बोलली.
“तुमचे स्वतःचे वन बीएचकेसुद्धा घर नाही, इतका पगार असूनही मग तुमच्यापेक्षा फक्त तीन ते चार वर्षाने मोठ्या असलेल्या मुलाकडून तुम्ही निदान टू बी एच के किंवा त्याहून मोठे स्वतःचे घर असावे, एखादी चारचाकी असावी अशी अपेक्षा तुम्ही कशी करू शकता. आम्ही मुलं काय एखादी बँक लुटतो काय इतके पैसे असायला? By the way तुमचे घर नसले तरी चारचाकी तर असेलच ना, अर्थात स्वतःची?” मोहन हसत बोलला. 
मिनाक्षी निरुत्तर झाली.
“आता तुमची पुढील अट, माझा पगार तुमच्यापेक्षा जास्त आहे. तिसऱ्या अटीबद्दल, विवाहपुर्व वैद्यकीय तपासणीबद्दल सांगायचे तर ही अतिशय योग्य आहे. अशा अटीबद्दल मला तुमचे कौतुक वाटते.” थोडंसं हसत तो बोलला. 
“सणवार, रितभात याबाबत बोलायचे झाले तर माझी आई गावंढळ दिसत असली तरी पुढारलेल्या विचारांची आहे. तिचे याबाबत काही कडक धोरण नाही. स्वयंपाक कुणी आईच्या पोटातून शिकून येत नाही. तुम्ही मोकळेपणाने आपल्याला तो जास्त जमत नाही पण शिकून घेवू असे सांगितले ते मला आवडले. In fact मी ही थोडाफार स्वयंपाक करायला शिकत आहे, गरजेला उपयोगी पडावं म्हणून.”
“पुढे बोलू... पालकांना अर्धा पगार देण्याबाबत, जर समजा आपले लग्न झाले तर मीही असेच माझा निम्मा पगार माझ्या आईवडिलांना देईन कारण त्यांनीच मला स्वतःच्या पायावर उभं राहण्याइतपत शिक्षण दिले ना.” विचार करत तो बोलला. 
“जर तसे केले तर घर कसे चालेल?” मिनाक्षी अनावधानाने बोलून गेली. 
“का, तुम्हीही त्याला हातभार लावाल ना कारण संसार काय माझा एकट्याचा आहे का?” खट्याळपणे मोहन बोलला.

 
“हां बरोबर आहे तुमचे.” विचार करत ती बोलली. 
“आता शेवटचे,” गंभीरपणे मोहन म्हणाला. “माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे आणि आपण भारतीय कुटुंबप्रिय. आपण एकमेकांना दुःखात, संकटात आधार देतो. पण त्याला एकमेकांच्या पर्सनल स्पेसमध्ये लुडबुड वगैरे समजत नाही. तुम्हाला भाऊ आहे, पुढे जावून वहिनी येईल. जर तुम्ही किंवा तुमचे आईवडील यांनी हक्काने त्यांना काही सांगितले आणि त्यांनी तुम्हाला ‘लुडबुड करू नका, रिस्पेक्ट अवर स्पेस’, असं म्हटलं तर तुम्हाला आवडेल का?”
“नाही आवडणार. यू आर राईट मोहन. मी मुलांच्या बाजूने कधी विचार केला नाही. लग्न मुलगी किंवा मुलगा एकटे करत नाहीत तर मग जबाबदारी तर कुणी एकटा कसा घेवू शकतो. ज्याप्रमाणे माझे पालक मला महत्वाचे तसे त्याचे पण त्याच्यासाठी महत्वाचे असतात. मी जर काही नवीन नाती जोडत असेन तर तोही जोडतोच की. मी स्वतःची मालमत्ता या वयात नाही निर्माण करू शकली तर त्याला कसे ते शक्य आहे. पुर्णपणे रेडीमेड संसार कसा मिळेल आणि मला आता असं वाटू लागलंय, की स्वतः कष्ट करून दोघांनी एकत्र तो उभा करण्यात जास्त मजा आहे, ते जास्त चॅलेंजिंग आहे.”

 
विचारमग्न अवस्थेत मिनाक्षी आपले विचार नकळत मोठ्याने बोलून दाखवत होती आणि तिला त्याची कल्पनाही नव्हती.  बाकीचे अचंभित होवून ऐकत होते. ती आपल्या बाबांकडे वळून बोलली, “बाबा, यांचा जर होकार असला तर मलाही हे मान्य आहे.” 
आता तिला मोहनचा सावळेपणा मोहक वाटत होता आणि त्याची आई सोज्वळ... 

समाप्त

फोटोवर क्लिक करून पाहा एक भावनाप्रधान कथा वरील कथा सविता किरनाळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. 


Post a Comment (0)
Previous Post Next Post