Moving on
लेखिका - सविता किरनाळे
"कस्तुरी बस ना बेटा, अजून किती त्रास करून घेशील स्वतःला... गेला तो, मागे वळूनही न बघता... अशा मुलाचा विचार तू अजून किती दिवस करणार आहेस?” वडील पोटतिडीकीने कस्तुरीला समजावत होते. अनिकेत, कस्तुरीचा मित्र, दोघेही शिक्षण संपल्यावर लग्न करणार होते. पण परदेशी उच्च शिक्षणाची संधी मिळाली म्हणून तिच्या मैत्रिणीकडे निरोप ठेवून कस्तुरीचा न भेटता तिचा निरोपसुध्दा न घेता अनिकेत निघून गेला. त्याचे धाडस नाही झाले तिला तोंडावर तो सांगण्याचे. निरोप सुध्दा काय तर, ‘कस्तुरी मला नाही वाटत आपले जमेल म्हणून... मी तुझ्यासारख्या अल्पसंतुष्ट मुलीसोबत आयुष्य घालवू शकत नाही. मी पुढील शिक्षणासाठी परदेशी जात आहे. आता आपले मार्ग वेगळे आहेत. जमलं तर मला विसरून जा.’
मैत्रिणीने ती चिट्ठी आणून दिली आणि कस्तुरीचे जीवन एकशे ऐंशी कोनात फिरले. हसरी, उत्फुल्ल, उत्साहाने सळसळणारी कस्तुरी जणु अस्तित्वातच नव्हती. आई बाबांना आपल्या मुलीचे हे दुःख बघवत नव्हते. म्हणूनच आज बाबा तिला समजावयाला आले होते.
“तू अल्पसंतुष्ट नाहीस कस्तुरी, तो कमनशीबी आहे. तुझ्यासारख्या मुलीला नाकारणारा मूर्खच म्हणावा लागेल, यू मस्ट मूव ऑन बेटा.”
सततच्या या समजावण्याचा परिणाम म्हणून कस्तुरी खरंच मूव्ह आॅन झाली. वर्षभरात पालकांच्या, मैत्रिणींच्या मदतीने कस्तुरी परत पहिल्यासारखी झाली, हसरी, खेळकर... आपले शिक्षण चांगल्या पद्धतीने संपवून तिने एक चांगलीशी नोकरीही पटकावली. अनिकेत तिला आता आठवतसुद्धा नव्हता. मनाचा तो कप्पा तिने कायमचा बंद केला होता. त्याचे अस्तित्व आता फक्त तिच्या डायरीच्या पानांपुरतेच उरले होते.
एकदा आईसोबत कुठल्यातरी लग्नाला गेली असताना पुष्करच्या आईने कस्तुरीला पाहिले आणि लग्नासाठी मागणी घातली. सर्व गोष्टी मनासारख्या जुळून आल्या आणि चार महिन्यात कस्तुरीचा साठेंच्या घरी गृहप्रवेश झाला. पुष्कर आणि त्याचे कुटुंबिय सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाप्रमाणेच होते.
सूनेने घरदार, नोकरी, देवधर्म, व्रतवैकल्य, सणवार, पै पाहुणा सगळं एकहाती सांभाळावं, मी फक्त उपदेश करणार, मनात आलं तरंच आणि तेवढीच मदत करणार अशा ॲटिट्यूडची सासू, काही सांगायला गेलं तर आईने आधी खूप कष्ट केले आता तिचे आराम करण्याचे दिवस आहेत म्हणून उडवून लावणारा नवरा, आपण आणि आपली रूम इतकेच जग असणारी बाकी कशालाच हात न लावणारी नणंद, स्थितप्रज्ञ कुठल्याच गोष्टीत न पडणारे सासरे असा एकंदर प्रकार. अगदी मन मोकळं करायलाही कुणी नसल्यासारखं झालं कस्तुरीला. पण पदरी पडलं पवित्र झालं, जावू दे जमेल तसं करावं बाकीचं सोडावं या विचाराने कस्तुरीने या सगळ्यांचा विषय सोडून दिला. थोडक्यात परत मूव्हींग आॅन...
यथावकाश नणंदेचे लग्न झाले. तोपर्यंत कस्तुरी आणि पुष्करच्या संसारवेलीवर आध्या आणि आराध्य अशी दोन गोंडस फुलं उमलली. दोन्ही मुलांचे संगोपन, नोकरी, घर सांभाळताना तारांबळ होवू लागली म्हणून कस्तुरीने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. आपल्या इच्छा आकांक्षाशी फारकत घेतली. पण आताही कुणी तोंडदेखलं ही म्हणालं नाही की कशाला सोडतेस नोकरी आपण सगळे मिळून थोडं अडजस्ट करू. उलट सगळे टेंभा मिरवू लागले की आमच्या घरात तुला सगळं स्वातंत्र्य आहे. तुला करावीशी वाटली नोकरी तर कर सोडावी वाटली तर सोड. तुझी मर्जी. कस्तुरीला म्हणावेसे वाटले, अरे खोटं खोटं का होईना पण काळजी दाखवा माझ्यासाठी. पण प्रत्यक्षात काहीच न बोलता ती परत या फेजमधून मुव्ह ऑन झाली.
काही महिन्यांनी पुष्करला प्रमोशन मिळाले आणि त्याने वडिलांच्या सल्ल्याने प्रोपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. एक छानसा टू बीएचके फ्लॅट बुक केला. दोन वर्षांनी पझेशन मिळाले, खूप आनंद झाला दोघा नवरा बायकोला कारण ते त्यांचे पहिले स्वतःच्या हिमतीवर घेतलेले घर होते. वास्तुशांतीसाठी बरेच पाहुणे जमले होते. काही वस्तू घ्यायला म्हणून कस्तुरी आतल्या खोलीकडे गेली तर मावससासूचा आवाज कानी पडला, “सुचित्रा पोराकडे लक्ष ठेव बाई, आता स्वतःचे घर घेतले त्याने, सून काही कुरापत काढून वेगळं राहायला भाग पाडेल हां त्याला.”
तिथुनच माघारी फिरली कस्तुरी. जरा वेळाने धाडस करून परत सासूबाईंकडे गेली, “आई पुरणासाठी हरभऱ्याची डाळ किती घेवू, उद्या सवाष्णी जेवू घालाव्या लागतील ना?”
“घे तुला वाटेल तितकी, तुझ्या घरची पूजा तूच बघ ते. मला काही विचारु नको.” त्या फटकन जमलेल्या लोकांसमोर बोलल्या. इतक्या लोकांसमोर, त्यात कस्तुरीचे आईवडीलही होते. सासूचे तोडून बोलणे ऐकून कस्तुरीच्या डोळ्यात पाणी आले. आपल्या मुलीचे अश्रु पाहून कस्तुरीची आई उठली, चल मी सांगते म्हणत. पण सासूबाईंचे तुझे घर, तूच बघ या शब्दांनी ती मनातून खचून गेली. असं बोलून त्यांनी तिला जसं परकं केलं होतं. या प्रसंगापासून तिला वर्षानुवर्षे राहत आलेल्या वास्तूबद्दल आपुलकी वाटेनाशी झाली. कारण ते तर तिचे कधी नव्हतेच. again she moved on emotionally...
पुढे काही वर्षांनी सासूसासरे वयोमानामुळे निर्वतले. राहते घर त्यांनी आपल्या मुलीच्या नावे केले होते. मग कस्तुरी शरीरानेही मूव ऑन झाली त्या घरातून...
यथावकाश मुलं मोठी झाली. कस्तुरी पुष्करने त्यांना त्यांचा स्वतंत्र संसार मांडून दिला. आध्या नवऱ्याबरोबर बंगलोरला राहायची तर आराध्य गुडगावला. दोन्ही मुलं आपल्या आईवडिलांना रोज कॉल करत असत. आताशा पुष्करलाही आपल्या बायकोने संसारात केलेली तडजोड लक्षात येवू लागली होती. तो तिचे मन जपण्याचा प्रयत्न करत असे पण आता वेळ निघून गेली होती. कस्तुरी मनाने खूप दूर निघून गेली होती त्याच्यापासून. फक्त मुलांसोबत ती इमोशनली ॲटॅच होती.
पण सूनेला आपल्या नवऱ्याचे रोज उठून आईला कॉल करून बोलत बसणे पसंद नव्हते. एक दिवशी ती बोलून गेलीच, ‘काय तुझ्या आई अजूनही मुलांच्या संसारात लक्ष घालतात. आता त्यांचे या सगळ्यातून मूव्ह आॅन होवून देवधर्माला लागायचे दिवस आहेत आणि बसल्या पोरांच्या घरच्या उचापत्या बघत.’ खरंतर कस्तुरीने कधीच आध्या आराध्यला खाजगी गोष्टी विचारल्या नव्हत्या की न मागता कसले सल्ले दिले नव्हते. पण हा आरोप ऐकून तिच्या हृदयात कळ आली. कधीपासून ती फक्त मूव्ह आॅनच करत आली होती, कुणा ना कुणासाठी. पण आज ही कळ तिला मनाने नाही तर शरीरानेही या जगातूनच मूव्ह आॅन करून गेली.
समाप्त