ती खंबीर होती म्हणून

 ती खंबीर होती म्हणून

लेखिका - सविता किरनाळे 

(सदर लेखिकेने आपल्या सर्व कथांचे copyright हक्क register केले असून यांच्या कथा कोणत्याही प्रकारे (लिखीत किंवा यूट्यूब चॅनलवर) वापरल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी.)


“मॅडम आपल्या ऑफीसवर इन्कमटॅक्सची धाड पडली आहे, लवकर ऑफीसला या.” शुभांगीच्या घरच्या लँडलाईनवर जाधव घाबऱ्या आवाजात सांगत होते. सकाळचे फक्त साडेनऊ वाजले होते. त्यांना माहीत होते शुभांगी अजून देवपूजा करत असेल म्हणून त्यांनी लँडलाईनवर फोन केला होता.

 

“जाधव, आधी शांत व्हा. काहीही होणार नाही. कदाचित कुणीतरी खोडसाळपणे खोटी टीप दिली असेल म्हणून असे झाले असेल. आपण कुठेही काहीही चुकलो नाही. आपले सगळे हिशोब स्वच्छ आणि स्पष्ट आहेत, म्हणून काळजी करण्याचे काही कारण नाही. त्या ऑफिसर्सना पुर्ण सहकार्य करा. मी पोहोचते अर्ध्या तासात.” शांत स्वरात जाधवना मार्गदर्शन करून शुभांगी आवरायला लागली. पुढील सात मिनिटांत ती घराबाहेर होती.


ड्रायवर कार चालवत होता आणि मागील सीटवर बसलेली शुभांगी विचारात बुडाली होती.  तिच्या मिस्टरांचा, सुधाकररावांचा, तयार कपड्यांचा एक्स्पोर्ट इंपोर्टचा बिजनेस होता. वीस वर्षाची शुभांगी लग्न होवून घरी आली आणि बिजनेस दिवसागणिक वाढतच गेला. अधूनमधून संकटं यायची पण सुधाकर आणि शुभांगी त्यांना धैर्याने सामोरं जायचे. शुभांगी एकहाती संसाराचे सुकाणू सांभाळायची म्हणून सुधाकररावांना व्यवसायाचे शिवधनुष्य पेलणे सोपे गेले.

 

पण सर्व दिवस सारखे नसतात. एका टूरवर असतानाच हृदयविकाराच्या जोरदार झटक्याने सुधाकररावांचे निधन झाले. ऐन पंचेचाळिशीच्या उंबरठ्यावर शुभांगीच्या भाळी वैधव्य आले. नवराबायकोचे नाते जरी मनमोकळे असले तरी सुधाकरराव शक्यतो व्यवसायासंबंधी चर्चा घरी करत नसत. म्हणून शुभांगीला त्यातील खाचाखोचा माहीत नव्हत्या. व्यवसायाची सूत्रं मग त्यांच्या पुतण्याने आपल्या हाती घेतली. सुधाकररावांनी एक गोष्ट मात्र आपल्या जिवंतपणीच केली होती ती म्हणजे आपल्या सर्व इस्टेटीची एकमेव वारसदार म्हणून  शुभांगीचे नाव नमूद केले होते. म्हणून जरी व्यवसाय पुतण्या पाहत असला तरी कोणताही व्यवहार शुभांगीच्या सहीशिवाय पुढे सरकत नव्हता. पुतण्यावर शुभांगीने पूर्ण विश्वास ठेवला होता. तो म्हणेल तिथे ती फारशी खळखळ न करता सही करायची. परंतु दोन वर्षात त्याने अशा पद्धतीचा कारभार केला की जोरात चालणारा व्यवसाय बुडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली.

 

एक दिवस शुभांगी घरी बसली असता चार पाच बायका आल्या आणि आपल्याला तिच्यासोबत बोलायचे आहे म्हणू लागल्या. त्या तिच्या फॅक्टरीत काम करणाऱ्या कामगारांच्या पत्नी होत्या. त्यांनी तिला फॅक्टरीत होणाऱ्या गैरव्यवहाराची, कामगारांवर होत असलेल्या अन्यायाची आणि आता डबघाईला आलेल्या परिस्थितीची माहिती दिली. उद्योगाची सूत्रं तिने आपल्या हाती घ्यावी अशी त्या गळ घालू लागल्या. आधी तर शुभांगीने आपल्याला जमणार नाही असे स्पष्ट सांगितले. पण ‘मॅडम, साहेब असताना त्यांनी रक्ताचे पाणी करून हा उद्योग वाढवला आहे, तुम्ही तो असा सोम्यागोम्याच्या हातून रसातळाला जाताना कसा पाहू शकता. जर आता तुम्ही काही केले नाही तर हजारो कामगार उध्वस्त होतील,’ असे समजावून सांगितले. ही मात्रा बरोबर लागू पडली आणि शुभांगी तयार झाली.

 

पहिल्या दिवशी तयार होवून सकाळी अकरा वाजता शुभांगी जेव्हा ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा पुतण्या अजून आलेला नव्हता. शुभांगी सरळ सुधाकररावांच्या केबिनकडे गेली. आधी उच्च अभिरुचीचे दर्शन घडवणारी केबिन आता बटबटीत दिसत होती. आता तिथे तिच्या नवऱ्याची एकही निशाणी दिसत नव्हती.

शुभांगीच्या डोक्यात तिडीक गेली पण तिने शांतपणे मामला हाताळण्याचे ठरवले. एक तर तिला सध्या व्यवसायातील काहीच माहीत नव्हते आणि जर पुतण्याला उगाच बिथरवून ठेवले तर अडचणींमध्ये अजून वाढ झाली असती. शुभांगी आत जावून सरळ सुधाकररावांच्या खुर्चीवर बसली. ती एकच गोष्ट होती जी अजून बदलली नव्हती. तिने सेक्रेटरीला आत बोलावले आणि स्टाफपैकी सगळ्यात जुन्या व्यक्तीला बोलवण्यास सांगितले. तिने जाधवांना बोलावले. त्यांनी शुभांगीच्या सर्व प्रश्नांची खरी आणि प्रामाणिक उत्तरे दिली. त्यांनी दिलेली सर्व माहिती शुभांगीने नोटपॅडवर उतरवुन घेतली. आता ती रोज ऑफीसला येणार होती, शक्य तितके हातपाय मारून चांगल्या स्टाफच्या मदतीने व्यवसाय वाचविण्याचा पुर्ण प्रयत्न करणार होती. तिने मिळालेल्या माहितीच्या आधारे काही योजना लिहिल्या. ती लिहित असतानाच दार उघडुन पुतण्या आत आला, आपल्या काकूला तिथे पाहून तो चपापला.

 

“अरे काकू, तुम्ही इथे कशा! काही हवे असते तर काॅल केला असता तर मी आलो असतो ना.”


“का रे बाबा, मी नाही येवू शकत का माझ्या ऑफीसमध्ये? अजून किती दिवस घरी बसू, आता बस झाले. मी आता रोजच येणार आहे ऑफीसला. आणि तू रोज यावेळेसच येतोस का?” हातातील घड्याळ पाहत शुभांगी म्हणाली. दुपारचा दीड वाजत आला होता.

 


“तसं नाही काकू, कधीही येवू शकता तुम्ही. मी आपलं सहज बोललो. आता जर तुम्ही रोजच येणार असाल तर तुमच्यासाठी दुसरी केबिन बनवून घेतो.”


“त्याची काही गरज नाही. ही तुझ्या काकांची, कंपनीच्या मालकाची केबिनच मी वापरेन. तसेही मी मालकीणच आहे की याची. तू नाराज होऊ नकोस. तू ही इथेच बसत जा. आपण एक नवीन खुर्ची आणवू. आपण एकत्रच बसू आणि काम करू.”


ही इतकी वर्ष घरी बसलेली बाई, हिला काय समजत धन्द्यातील गोष्टी असा सगळ्यांचा विचार खोटा ठरवत शुभांगी पटापट सगळं शिकत गेली. तिने कामगारांच्या बायकांनाही हाती घेवून कपड्यांवर हँड ऐंब्राॅयडरी, निरनिराळ्या प्रकारची कशिदाकारी वगैरे करून घेवून अतिशय सुंदर अशा कपड्यांचा ब्रॅंड लाॅंच केला, ज्याला तुफान प्रतिसाद मिळाला.


हळूहळू शुभांगीने मरणासन्न अवस्थेत असलेला व्यवसाय ऊर्जितावस्थेत आणला. तसे तर आधीही तो चांगलाच चालत होता पण पुतण्याने अनेक गैरव्यवहार करून करोडो रूपये ढापले होते. शुभांगीने त्याला रंगेहाथ पकडून कडक शब्दात समज दिली. शुभांगीला काय समजते, आपणच या साम्राज्याचे वारसदार आहोत या भ्रमात राहणाऱ्या त्याच्या बेतांना सुरूंग लागले. हातातोंडाशी आलेला घास असा निसटताना पाहून तो रागाने वेडा झाला. म्हणून शुभांगीला खाली खेचण्यासाठी तो अनेक क्लृप्त्या लढावू लागला.

एकदा माल एक्स्पोर्टसाठी तयार असताना ‘अचानक’  ट्रान्सपोर्ट कंपनीचे ड्रायव्हर आजारी पडले, कधी गोदामात चोरी झाली, कधी महत्वाचे कागदपत्र गहाळ झाली... एक ना अनेक गोष्टी घडत होत्या. काही वेळेस नुकसान होत होते तर काही वेळेस बालंट टळे.

या सर्वांमागे कोण आहे हे न कळण्याइतकी शुभांगी दुधखुळी नव्हती पण जास्त कठोर होणे तिच्या स्वभावात नव्हते. पण दिवसेंदिवस त्याच्या कारवाया वाढत चालल्या होत्या. आता याचा निकाल लागलाच पाहिजे असा शुभांगीने निर्णय घेतला.


विचाराच्या नादात शुभांगी ऑफीसमध्ये येवून पोहोचली. पटापट पायऱ्या चढत ती ऑफीसमध्ये शिरली. इन्कमटॅक्स डिपार्टमेंटचे अधिकारी सगळ्या फाइल्स, काॅम्प्युटरवरील नोंदी पडताळत होते. सर्व व्यवहार स्वच्छ असल्याने त्यांना कुठेच काही खोट सापडत नव्हती. ज्याने टीप दिली त्याच्यावर ते वैतागले होते. त्यांचा बहुमूल्य वेळ वाया गेला होता. आत येताच शुभांगीने हात जोडून नमस्कार केला आणि तपासात काही अडचण तर येत नाही ना अशी विचारणा केली. परत एकदा तिने आपल्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना पुर्ण सहकार्य करण्याची सूचना केली आणि ती केबिनमध्ये निघून गेली.

 

आत जाताच तिने जाधव साहेबांना बोलावून घेतले. ज्या अडचणी पुतण्याकडून उभ्या केल्या गेल्या असण्याच्या शक्यता वाटत होती त्यांच्या नोंदी केल्या. त्यात माल आणि कागदपत्रांची चोरी सारख्या अनेक गोष्टी निघाल्या. शुभांगीने जाधवांना कंपनीचे वरिष्ठ अधिकारी या नात्याने पोलीसांत या घटनांची अज्ञात व्यक्तीविरूद्ध तक्रार नोंदवण्यास सांगितले. त्यानुसार सर्व औपचारिकता पार पाडून तक्रार नोंदवण्यात आली. यावेळी शुभांगीने आपले वजन वापरुन पोलीसांना वेगाने तपास पुर्ण करण्यास सांगितले.


काही महिन्यांनी पोलीस तपास पुर्ण  झाला. पुतण्या दोषी आढळून येवून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. त्याच्या कृत्याची त्याला शिक्षा मिळाली परंतु शुभांगीला मात्र त्याची दया येत होती. कारण जेव्हा ती दुःखात होती तेव्हा त्यानेच कंपनी चालू ठेवली होती. तिने त्याची शिक्षा कमी व्हावी प्रयत्न सुरू केले. तिच्या अथक प्रयत्नांनी त्याची शिक्षा कमी करण्यात आली. पण वर्तमानपत्र आणि न्यूज चॅनलवर त्याची यथेच्छ बदनामी झाली होती. या सर्व प्रकरणामुळे शुभांगीचे नेतृत्व झळाळून उठले. तिच्या खंबीरतेनेच ती सुधाकररावांची खरी वारसदार असून व्यवसाय पुढे नेण्यास पात्र आहे हे सिध्द झाले. 


शुभांगीसारख्या संसार असो वा व्यवसाय सर्वत्र आपली छाप सोडणाऱ्या कर्तृत्ववान स्त्रियांना समर्पित... 


समाप्त

वरील कथा सविता किरनाळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.


Post a Comment (0)
Previous Post Next Post