अबोली

 अबोली

✍️ सौ. अमृता देशपांडे


अबोली, हो अबोलीच होती ती तिच्या नावापमाणेच! अगदी शाळेच्या पहिल्या दिवसापासून ती कशातच नसायची. टिचरने खूप वेगवेगळ्या प्रकारे तिला बोलतं करण्याचा प्रयत्न केला, पण ती तोंड उघडायचीच नाही... शेवटी तिच्या आईला बोलावून हिला शाळेतून काढून टाकले. मानसोपचार तज्ज्ञांकडे नेले असता हि थोडी मतिमंद असल्याचे त्यांनी निदान केले, आणि तसल्या मुलांच्या शाळेत घालण्याविषयी सुचवले.

'हे बघ मृदुल, तुला जर तिला माझ्या शाळेत टाकायचंच असेल तर माझी काही ना नाही, पण मला असं वाटतं की आपण थोडी घाई करतोय... खरं सांगू का? मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात तशी मला अबोली मतिमंद वगैरे वाटत नाही. तिला फुलाचं चित्र कुठेय म्हटलं तर आधी गोंधळते, पण बरोबर शोधून दाखवते, खाली पडलेली वस्तू स्वत:हून उचलत नाही, पण उचल म्हटल्यावर उचलते. म्हणजे तिला सुचना कळतात. ती अर्थपूर्ण चित्र काढते. ती थोडी आपल्या दृष्टीने हळू आहे इतकंच! ''हसरे तारे' (मतिमंद मुलांच्या) शाळेच्या प्रिंसिपल प्रमिलाताई म्हणाल्या.

'म्हणजे? नक्की काय म्हणायचंय तुम्हाला?' अबोलीची आई मृदुल न समजून म्हणाली.

  'म्हणजे, हे बघ, प्रत्येक फुलाची जशी उमलण्याची आपली-आपली वेळ असते, तशी प्रत्येक मुलाच्या वाढीची आपली-आपली एक गती असते. सध्या अबोली थोडी उशीरा रिस्पॉंस देते, किंवा कधी कधी देतही नाही, पण ती काही वेड्या-वाकड्या हालचाली किंवा विचित्र पद्धतीने तर रिस्पॉंस देत नाही. इथे राहून इथल्या मुलांचं बघून कदाचित ती तेही शिकून जाईल. त्यापेक्षा तिला नॉर्मल मुलांच्या शाळेत घालशील तर त्यांच्यासोबत राहून कदाचित ती सुधारेलही. कदाचित परिक्षांच्या,मार्कांच्या शर्यतीत ती इतर मुलांच्या तुलनेत थोडी मागे राहिलही, पण तिचं वागणं-बोलणं तरी सामान्य नक्कीच होईल. फक्त त्यासाठी तुम्हाला थोडा पेशंस तेवढा ठेवावा लागेल...'


एकदिवस तिची सकाळची शाळा होती, ती लवकर उठलीही होती शहाण्या मुलीसारखी. तिची  ताई आधीच शाळेत गेली होती. तेव्हा तिच्या आई बाबांना इन्टीमेट व्हायचं होतं म्हणून जबरदस्ती तिला झोपायला लावलं. आणि नंतर आजी आजोबांकडे ही लवकर उठलीच नाही असं सांगून सोडून ऑफिसला निघून गेले. दिवसभर मावशी, मामा, सगळी भावंड तिला त्यावरून चिडवत होती, पण अबोली काय सांगणार? अबोलीच ती! 


तिचे बाबा अतिशय संतापी, आदळ-आपट करणारे... त्यांचा तो अवतार बघून ती अधिकच आक्रसून जायची. शाळेत तिला मुली हसायच्या, चिडवायच्या ही सगळं सहन करायची. मुलांची ओरडा-आरडी, धक्का-बुक्की मात्र आवडायची नाही. त्यामुळे ती कोणातच मिसळायची नाही. झाडावरची फुलं, त्यावर भिरभिरणारी फुलपाखरं बघत रहायची. वाळूवर बसून शंख-शिंपले वेचणे, तिच्या आजोबांच्या घराच्या अंगणात पसरलेली पारिजातकाची फुलं फ्रॉकच्या ओच्यात जमा करुन त्यासोबत खेळणं आवडायचं तिला. शांत, संथ जीवन आवडायचं तिला... शाळेत हिचा डबा कळकट्ट,मळकट्ट असायचा, कपडे व्यवस्थित नसायचे. म्हणून मुलीही जवळ यायच्या नाहीत अबोलीच्या. आधी आई नोकरी करायची म्हणून तिला अबोलीकरता वेळ नसायचा, नंतर नोकरी सोडल्यावर झोपा काढायच्या असायच्या दुपारी, मुलीकडे द्यायला वेळच नसायचा तिच्या आईकडे! मोठी बहिण मुळातच हुशार, मावशीकडे शिकायला असल्यामुळे शिकली मावशीकडून सगळं...

पण आयुष्य एवढं संथ थोडीच असतं? ते त्याच्याच गतीनं पुढे सरकणार... चौथीत ती नापास झाली, त्याची घरी खूप खिल्ली उडवली गेली, अगदी त्यानंतर तिची जेव्हाही परिक्षा असेल, तेव्हा 'काय, यावेळी पास होणार की नापास?' असं बोलून तिला घरच्यांनीच खूप खिजवलं. कशीबशी काठावर पास होत ती पाचवीत आली. घर बदललं, शेजारी राहणा-या तिच्या वयाच्या प्रणोतीने  तिला थोडं बोलतं केलं, मैत्री केली, पण पाठीमागे तीही हिला हसायचीच... हळूहळू अबोली मोठी होत होती, वयात यायच्या एका टप्प्यावर तिच्या घरी एक काका आले, त्यांनी तिला चॉकलेट देऊन तिच्याशी सलगी करण्याचा प्रयत्न केला... त्यांची दाढी तिच्या गालाला खूप रुतली, आणि एक वेगळीच जाणीव झाली... काय झालं माहित नाही, पण ती झटकन बाजूला झाली...

ही गोष्ट तिने कोणालाच संगितली नाही, आईलाही नाही... अबोलीच ना ती! एकदा आईने एका काकूला काही निरोप द्यायला पाठवले, ती अर्धवटच निरोप देऊन आली. बाबा केवढ्यानी ओरडले आईवरच, ती मुर्ख आहे, तिला काही कळत नाही, तुला अक्कल नको?'... 'हो, आपण मुर्खच! आपल्याला काय कळतं?' अबोली मनाशीच म्हणाली. एके दिवशी ती आणि बाबा टिव्ही बघत बसले होते हॉलमध्ये, आई किचनमध्ये पोळ्या करत होती. अचानक बाबाने हात तिच्या छातीवर ठेवला, ती दचकली... हा तसाच स्पर्श होता, त्या काकांसारखा! ती घाबरली पण क्षणभरच, सगळं बळ एकवटून धावत गेली आईकडे, पण आईला नेमकं काय सांगावं ते कळलंच नाही तिला... अबोली ना ती!

त्यानंतर ती पुरुषांशी थोडी दूरच राहू लागली. मध्ये एक-दोनदा रात्री अर्धवट झोपेत आई-बाबांना तिने काही करताना पाहिले, पण घाबरून डोळे बंद करून पडून राहिली. एकदा तर आईला बरेही नव्हते, तेव्हाही बाबा आईवर जबरदस्ती करत असल्याचे तिने बघितले. किळस आली तिला या सगळ्याची... 

 अबोली मोठी झाली, त्यावेळी पाळीत कपडा वापरायची पद्धत होती. आईने समजावलं होतं, हे कपडे कोणाला दिसणार नाहीत असे वाळत घालायचे. तेव्हा एकदा कपडे वाळत घालताना 'मला दाखव, दाखव' म्हणून बाबा मागे लागले. कळेचना तिला  काय करावे कोणाला सांगावे? अबोलीच ती!


आता अबोली आठवीत गेली. तशी तिची ताई तिला सायकल शिकवण्याच्या मागे लागली. मुळचीच घाबरट अबोली ते डूगडुगणारे हॅंडल बघून खूपच घाबरली. तरी मागे ताईने धरलंय हे बघितल्यावर शांत झाली खरी... पण जसं तिला कळलं की ताईने हात काढलाय, तिने भीतीने भोकाड पसरले. झालं! आले तिचे बाबा तणतणत बाहेर, 'आता यापुढे तिला सायकल शिकवायची नाही' त्यांनी नवीन फर्मान काढलं. मग एके दिवशी घरची सगळी मंडळी जमली असताना विषय नेहमीप्रमाणे अबोलीच्या टिंगलटवाळीवर उतरला. आणि अचानक अबोलीचा एक दूरच काका म्हणाला, 'चल, मी तुला सायकल शिकवतो...'

अबोली भीतभीतच त्या काकाबरोबर बाहेर गेली. ती एक टळटळीत दुपार होती. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते. काकानी अबोलीला सायकलवर बसवले, स्वत: मागे बसला, बसला नव्हे अबोलीला मागून चिकटला. पुन्हा तोच, तसाच स्पर्श! यावेळी अबोलीला उतरताही येत नव्हते, जवळपास तासभर काकाने तिला तसेच चिकटून फिरवले. ती रडत होती, पण त्याची त्याला पर्वाच नव्हती. शेवटी खाली उतरल्यावर घरी सांगशील तर खूप मारीन अशी धमकी देऊन काका निघून गेला. त्यादिवशी सायकल आणि पुरुष या दोन्हीविषयी तिच्या मनात घृणा उत्पन्न झाली, ती कायमचीच!

ती दहावीही कशीबशी पास झाली. कॉलेजला बसने जाऊ लागली. बसने जाताना असंख्य वेळा पुरुषांचे तसले स्पर्श झेलले आणि एक विचार तिच्या मनात पक्का झाला, पुरुषाला सगळे असेच मिळवायचे असते, ओरबाडून! एकदा तर तिने स्वत:च्या बापाला ती अंघोळ करत असताना दाराच्या फटीतून तिला न्याहाळताना बघितले, आणि त्याहीपुढे जाऊन जेव्हा तिला हे समजले की आपल्या आईला हे माहित असून ती आपल्या नव-याला केवळ भीतीमुळे काही बोलू शकली नाही, तेव्हा तिला चीड आली आपल्या पितृसत्ताक संस्कृतीची अन आईच्या लाचारीची... तिला त्याच क्षणी घर सोडून जावेसे वाटले, पण घरात हा एकच लांडगा आहे, लोकलाजेस्तोर हा काही करत तर नाही, बाहेर असंख्य लांडगे लचके तोडायला तयार असतील या विचाराने तिने पाय मागे घेतला...

कॉलेजात सुद्धा तिच्या कोणी मैत्रिणी नव्हत्याच, किंबहुना तीच मुलींशी बोलायला घाबरायची. कॉलेजमधील मुली व्यवस्थित कपडे, थोडा मेकअप करून यायच्या, अनेक मुलींकडे मोबाईल होता. त्या रोज कॅंटिनमधून काहीबाही घेऊन खायच्या. हिला ना व्यवस्थित रहायला घरी कोणी शिकवलं, ना हिला धड त्यांच्यासारखा मेकअप जमायचा, मोबाईल तर तिच्या घरीही कुणाकडे नव्हता, अन कॅंटिनमधून काही घ्यायला कधी तिच्याकडे पैसेच नसायचे. घरून बसच्या तिकिटापुरते पैसे तेवढे मिळायचे. सुरवातीला वीस रुपये जास्त देऊन ठेवलेही होते, कधी अडचण आली तर असावे म्हणून. पण एकदा तिने मुलींनी आग्रह केला म्हणून ठेल्यावरून एक हेअरपीन त्या पैश्यातून घेतली, आणि तिला घरून जास्तीचे पैसे मिळणं बंद झालं! आपल्या लेकीलाही कधी कॅंटिनमधून एखाददिवशी काही घ्यावेसे वाटत असेल हा विचार ना तिच्या बापाच्या मनाला शिवला, ना तिने कधी तो बोलून दाखवला... अबोलीच होती ना ती! मग तिला कोण आपल्या ग्रुपमध्ये घेणार? घरी मात्र हिला साध्या चार मैत्रिणीही जमवता येत नाही म्हणून घरचे तिच्यावर खिल्ली उडवणार! त्याव्यतितिक्त तिला इतर मुलींसारखी रंगोळी, मेहंदी येत नाही, टिपिकल मुलींसारखं राहता येत नाही हे विषय तर ठरलेलेच होते टिंगलटवाळीचे!


नंतर तिच्या आयुष्याने नवीन रंग तिच्या आयुष्यात भरले, तिला हवेहवेसे वाटणारे. तिच्या एका चुलत बहिणीने तिला एका सत्संगात नेले. तिथे तिचे मन रमू लागले. मुळातच गोड गळा असल्याने तिला तिथे भजन म्हणायची संधी मिळाली. तिच्या आवाजाचे कौतुक झाले. आपणही काही करू शकतो हा आत्मविश्वास तिच्यात रुजू लागला. अन त्याला खतपाणी घातले तिथल्या काकांनी. ती इतरांपेक्षा वेगळी आहे हे त्यांनी लगेच ओळखले, पण इतरांसारखे झिड्कारले नाही. उलट लोकांशी कसे वागावे-बोलावे हे शिकवले, मुख्य म्हणजे तिला बोलते केले. कुणीही मित्र-मैत्रिण नसलेल्या तिला तिथे मात्र अनेक मैत्रिणी भेटल्या ज्या तिला घरच्यांपेक्षा जवळच्या वाटल्या. कारण त्यांनी तिला तिच्यातल्या कमीपणावरून चिडवले नाही, तर तो कमीपणा कसा दूर होईल यासाठी मदत केली. मुख्य म्हणजे त्या तिला आपल्यापेक्षा ही कोणी वेगळी मंद म्हणून वागवत नव्हत्या, तेच तर अबोलीला हवं होतं. पण तिची त्यांच्याशी झालेली ही जवळीक घरच्यांना खपत नव्हती, तर डोळ्यांत खुपत होती. घरच्यांशी झगडून ती तिथे जात होती. तिथून एखादी चांगली गोष्ट शिकून आल्यावर ती घरच्यांना सांगितली तर तेही त्यांना आवडत नसे. ती एखाद्या बाबतीत बरोबर बोलत असली, तर ही कालपर्यंत मंदबुद्धी असलेली मुलगी इतकं कसं बोलू लागली हे त्यांना सहन होत नव्हते.  त्यांचा हकाचा जोकर हिरावला होता ना त्यांच्यापासून!

तिथेच तिला भगवद्गीता भेटली, तिने कृष्णसख्याशी मैत्री केली. तिथेच तिला अनुभूती झाली, की ईश्वराने प्रत्येक जीवाला वेगळं बनवलंय, आणि तो प्रत्येक जीवाचा मित्र पाठीराखा असतो! त्यासोबतच कॉलेजमध्ये ती साहित्य शिकत होती, जे हळूहळू तिच्या शब्दांतून झरू लागलं. कालपर्यंत अबोली असलेली ती लेखणीच्या माध्यमातून बोलू लागली. मात्र तिच्या आईने जेव्हा ते वाचलं, तेव्हा ते तिनं लिहिलंय यावर तिने विश्वास ठेवला नाही...

मुलींच्या कॉलेजात साहित्यात पदवी घेतल्यानंतर तिची आई तिच्या लग्नाच्या मागे लागली. पण वयात यायच्या आधीपासून तिने जो काही पुरुषांचा अनुभव घेतला होता, आईबाबांचे आपसांतले जे संबंध बघितले होते, ते बघून पुरुषासोबतचे हे नवे नाते सहज स्विकारायला तिचे मन धजेना. त्यावर मार्ग म्हणून तिने पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे ठरवले. तिथे काही मुलांशीही मैत्री झाली आणि त्यांच्याबद्दल थोडं आकर्षण वाटू लागलं... तरीही कुठल्या बंधनात बंधायला मन तयार होईना...

तिच्या मनातील गोंधळ तिने तिच्या कृष्णसख्यालाच सांगितला. त्यानेही तो समजून घेतला. आणि भगवद्गीतेतूनच संदेश पोहोचवला. 'अगं वेडे, सगळ्यांच्या अंतरात मीच बसलोय, काही लोक त्याचे स्मरण ठेवून नेहमी सत्कर्म करतात, तर काही मला विसरून वाईट मार्गाला लागतात. जो पुरुष नशिबाने तुझ्या आयुष्यात येणार आहे, त्याला माझा अंश समजून त्याच्यावर प्रेम कर. तुझे कर्तव्य समजून संसार कर, तुझ्यासोबत मी सदैव असेन...'

सुदैवाने अबोलीला समजून घेणारा, तिच्यातील कलेचा आदर करणारा जोडीदार अनिकेत ला मिळाला. त्याने तिचे साहित्य लोकांपुढे आणायला कायम तिची साथ दिली. तिला लिखाणाला वेळ मिळावा म्हणून कधी स्वयंपाकघर सांभाळलं तर कधी तिच्या लिखाणात अजुन काय सुधारणा होऊ शकते याबद्द्ल मार्गदर्शन केलं. तिनेही नोकरी करून आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा त्याने कधीच ठेवली नाही. उलट तिला आनंद मिळेल तेच तिने करावं असं त्याला नेहमी वाटतं.

तरीही अबोलीला अस्वस्थ बघून त्याने तिला विचारले, 'अबोली, सगळीकडे तुझ्या लिखाणाचं कौतुक होतंय. अनेक स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळाली, अनेक नावाजलेल्या वृत्त्पत्रांतून तुझ्या कविता, लेख प्रसिद्ध होतायत. तरी तू अस्वस्थ का?'

 'अनिकेत, माणसाचा वर्तमान कितीही सुरेख असला, तरी त्याचा भूतकाळ त्याला सतावतोच नं' अबोली

'म्हणजे? नक्की काय म्हणायचंय तुला? मी तुला कितीदा समजावतो, की नको नं  जुन्या आठवणी काढून स्वत:ला त्रास करून घेऊ...'

'अनि, जोपर्यंत मला त्रास देणा-या, माझं शोषण करणा-या लोकांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळणार नाही, तोपर्यंत माझं मन कसं शांत होईल? माझं बालपण हिरावलं रे या लोकांनी, स्वत:च्याच घरात कधी शांतपणे झोपू शकली नाही मी. सतत भीती, सतत सावधपणाने रहावं लागायचं मला... आणि त्या लोकांना त्याची साधी जाणीवही करून द्यायला नको का?'

'तुझं म्हणणं समजू शकतो मी, पण या सगळ्याचा काही पुरावा नाही तुझ्याकडे, त्यामुळे यांना तशी शिक्षा देणं कठीण आहे... पण त्यांनी केलेल्या चुकीची जाणीव त्यांना नक्कीच करून देऊ शकतेस तू...' 

'कशी?'

 'तुझ्या लिखाणातून! सगळं लिही तू, कुठलाही संकोच न ठेवता. स्वत;च्या डोळ्याने जेव्हा स्वत:चे कुकर्म वाचतील नं ते, तेव्हा तुझ्या नजरेला नजर नाही भिडवू शकणार ते...'

  'खरं बोलतोयस अनि, हाच मार्ग आहे त्यांना त्यांच्या चुका दाखवण्याचा. अन यातून काही निष्पाप, कोवळ्या मुलीही सावध होतील अन समाजाला अशप्रकारचीही विकृती असते हे कळेल,...'

'चला तर मग, मी आपल्या दोघांसाठी कडक कॉफी बनवतो, मग तू लिहायला सुरवात कर...' अबोलीला टाळी देत अनिकेत स्वयंपाकघराकडे वळला, आणि अबोलीने आपला लॅपटॉप ऑन केला…

(समाप्त)

खालील फोटोवर क्लिक करून ऐका एक सुंदर सकारात्मक कथा 



Post a Comment (0)
Previous Post Next Post