न्याय

न्याय

©मिलिंद अष्टपुत्रे


त्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आय सी यू मधील पेशंटच्या यादीत राहुल नितीन चे नाव शोधत होता. काल ऑफिसमध्ये नितीन चक्कर येऊन पडला आणि येथे त्याला आयसीयूत ठेवले होते. ऑफिसमधील कामाचा अतिताण नितीनला चांगलाच भोवला होता. यादीतील नावांवरून नजर फिरवताना देविकाचे नाव वाचून राहुल दचकला ! क्षणार्धात त्याचे मन इतिहासात भराऱ्या मारू लागले .


' देविका पतके ' म्हणजेच पूर्वाश्रमीची 'देविका फडके '!! वर्गातील मोस्ट चार्मिंग मुलगी ........ राहुल सकट खूप जण तिच्या मागे होते. ती मात्र ठराविक मुलांशीच बोलत असे ...... राहुल सुद्धा त्या थोड्या भाग्यवंतांमध्ये असल्याने त्याला त्याचे पहिले वहिले प्रेम फलद्रुप होण्याची खूप आशा होती. पण अखेर बाजी मारली सुनीलने ! 'सुनील पतके' वर्गातला गुणवत्ता यादीत कायम पहिला असणारा स्कॉलर !!


" च्यायला सुन्या हिच्या मागे होता ? कळले कसे नाही एवढ्या दिवसात ? साला छुपा रुस्तुम निघाला !! " प्रेमभंग झालेल्या अतुल लिमयेची प्रतिक्रिया अगदी बोलकी होती. हे कळलं तो दिवस राहुलसाठी काळा दिवस होता. घरी येऊन त्याने खोलीचे दार बंद केले आणि अश्रूंना वाट करून दिली. तिच्यासाठी लिहलेली सगळी प्रेमगीतं तो एकेक करून फाडत होता आणि तिच्या आठवणींनी मनसोक्त रडत होता . पहिला प्रेमभंग जिव्हारी लागतो म्हणतात ते काही खोटं नाही.


पुढे सुनील मेडिकलला गेला आणि प्रथितयश डॉक्टर झाला. त्याचे व देविकाचे लग्न यथासांग पार पडले. आमंत्रण असूनही राहुल लग्नाला गेला नाही. त्यानंतरची काही वर्षे कापरासारखी उडून गेली. नवनवीन क्षितिजे पार करताना प्रेमभंगाचे ते दुःख अगदी बोथट झाले . इंजिनिअर झाल्यावर चांगल्या कंपनीत नोकरी, सुस्वरूप आणि उच्चशिक्षित बायको, नक्षत्रासारखी गुणी मुलं, सगळं काही दृष्ट लागण्यासारखं घडलं होतं ...... खरंतर राहुल देविकाला विसरूनही गेला होता ,आणि आज इतक्या वर्षानंतर अचानक त्यानं तिचं नाव वाचलं होतं ...... आयसीयू मधील पेशंटच्या यादीत !!!


तिला भेटावं की नाही याबाबत राहुलच्या मनात निर्णय होत नव्हता ! एक मन म्हणत होतं की "काय संबंध ? इतक्या वर्षात तिने किंवा सुनीलने साधा फोन सुद्धा केला नाही !" तर दुसरं मन म्हणत होतं ,"काहीही झालं तरी ते तुझं पहिलं प्रेम होतं. अशा स्थितीत तिची आपुलकीने चौकशी करणं तुझं कर्तव्य आहे." 

शेवटी दुसरं मन जिंकलं ....... 

राहुल धडधडत्या हृदयाने आयसीयूत शिरला. प्रत्येक बेडवर दुर्धर अवस्थेतील पेशंट झोपले होते . सलाईन, ऑक्सिजन मास्क,शरीराला जोडलेल्या अनेक नळ्या ,शेजारी उभे असलेले चिंताग्रस्त नातेवाईक ...... सगळं काही भयाण होतं. 


राहुल देविकाच्या बेड पाशी आला आणि तिला पाहून त्याचे काळीज फाटून गेले ! बेडवर झोपलेल्या त्या हाडाच्या सापळया कडे पाहून तो हबकून गेला. त्याची चाहूल लागताच देविकाने डोळे उघडले. " राहुल ?" त्याला देविकाने अगदी क्षणार्धात ओळखले ! तिचा चेहरा आनंदाने उजळून निघाला. 

" अरेच्या !! म्हणजे हिच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी होते तर ! " अचानक मनात उमटलेल्या त्या निर्लज्ज विचाराने राहुल क्षणभर लज्जित झाला. 

" हे काय देविका ? इतकी आजारी आहेस आणि कळवलं का नाहीस तू मला ?" लगेच भानावर येत राहुल म्हणाला. काहीच न बोलता ती क्षीणपणे हसली .त्याचे हात तिने तिच्या कृश झालेल्या हातांनी घट्ट धरले. 

" काय झालंय देविका ? आणि सुनील कोठे आहे ?" एका पाठोपाठ विचारलेल्या त्याच्या प्रश्नावर देविका पुन्हा फक्त हसली.


" बस या खुर्चीवर !! सांगते तुला सगळं !! " आपल्या क्षीण झालेल्या आवाजात देविका म्हणाली .तिचे हात तसेच हातात ठेवून राहूल बेडच्या कडेवर टेकला .

" मला एडस झाला आहे राहुल!! ही शेवटची स्टेज आहे ....."

विजेचा झटका बसावा तसे आपले दोन्ही हात राहुलने देविकाच्या हातातून सोडवून घेतले . त्याच्या प्रतिक्रियेवर देविका उदासपणे हसली. 

" आय एम सॉरी देविका !" स्वतःच्या वर्तनाची लाज वाटून राहुल शरमेनं कसाबसा पुटपुटला.

"इट्स ऑल राईट राहुल ! अरे तुझी काही चूक नाहीये ! हीच लायकी आहे माझी !" देविका कुठेतरी शून्यात बघत म्हणाली !!


" दृष्ट लागण्यासारखा संसार होता रे आमचा !! सुनील आणि मी ...... त्याचं खूप प्रेम होतं माझ्यावर !! जीव की प्राण होते मी त्याची ........ पण कोणाची दृष्ट लागली कोण जाणे ! आम्हाला मूल झालेच नाही. खूप प्रयत्न केले. डझनाने डॉक्टर झाले .पण कशालाच यश आलं नाही. मग मात्र मी खचून गेले .खरं तर आमच्या दोघांच्यातही काहीच दोष नव्हता !!मग असं का ? मी वेडीपीशी झाली राहुल ........" बोलता-बोलता धाप लागून देविका थांबली. 

" खरंच मी वेडीपिशी झाले .मला वाटू लागलं की डॉक्टर खोटं सांगत आहेत .नक्कीच सुनील मध्ये काहीतरी दोष असला पाहिजे .या भयंकर विचाराने माझ्या मनाचा पूर्ण ताबा घेतला. सुनील मुळेच मी आई होऊ शकत नाही ....... रात्र रात्र मी जागून काढत असे. शेजारी झोपलेल्या सुनीलचा मला फार राग येत असे .झोपेतच त्याचा गळा घोटाळा अशी तीव्र इच्छा मला होत असे .आणि माझ्या अशा मनस्थितीतच राकेश माझ्या आयुष्यात आला ........."


" मला अजूनही आठवतेय ती संध्याकाळ. मी आमच्या बंगल्यातील हिरवळीत खुर्ची टाकुन बसले होते . आणि अचानक सुनील सोबत राकेश घरी आला . डॉ. राकेश !! आपल्या शहरातील प्रसिद्ध हार्ट सर्जन !! सुनील त्या संध्याकाळी अचानक त्याला घरी घेऊन आला आणि आमची ओळख झाली. " 

आठवणीत हरवून गेलेली देविका काही क्षणांसाठी थांबली. पाण्याचे दोन घोट घेऊन ती पुन्हा बोलू लागली.

" त्यानंतर एका पार्टीत माझी राकेशशी पुन्हा गाठ पडली. राकेश इतका देखणा पुरुष मी याआधी पाहिला नव्हता. माझ्या सौंदर्याची भुरळ त्याला पडली आहे हे मी लगेच ओळखले . नकळत आमची मैत्री वाढू लागली आणि थोड्याच दिवसात ती मैत्री एका नाजूक वळणावर येऊन ठेपली."बोलता-बोलता देविका थांबली . राहुल कडे बघत म्हणाली

" राहुल ,तुला कारवा सिनेमातलं ते हेलनचं गाणं आठवतंय ? आशा आणि आर.डी.ने गायलेलं ? 

'पिया तू अब तो आजा ....!!' 

त्या गाण्यात आर. डी. ने गायलेली एक ओळ आहे ... 

'मोनिका sss ओ माय डार्लिंग .....!!' हेलन त्या हाकेनं वेडीपिशी झालेली दाखवलीये .... ते गाणं ऐकलं ,की मला राकेशची आठवण येई. हेलनच्या जागी मी स्वतःची कल्पना करत असे. राकेशने मला वेड लावलं होतं. शेवटी व्हायचं तेच झालं !! आश्चर्य म्हणजे ,मला पश्चाताप, शरम वगैरे काही वाटलं नाही. त्यानंतर कितीतरी वेळा मी राकेशची शय्यासोबत केली. त्या गोष्टीचं जणू मला व्यसनच लागलं ...."


" अशीच एका पार्टीत माझी तुषारशी ओळख झाली तुषार म्हणजे तोच तो .... प्रसिद्ध टीव्ही सिरीयल आर्टिस्ट!! माझं सौंदर्य हेच माझं भांडवल झालं होतं .आता मला कोणाकडूनही मूल झालेलं चालणार होतं . निरनिराळ्या देखण्या पुरुषांच्या सोबतीच मला जणू व्यसनच जडलं !! निरनिराळ्या क्षेत्रातील नावाजलेले आणि लाईम लाईट मधले पुरुष !! 

अशा गोष्टी फार काळ लपून राहात नाहीत. सुनीलला ऐके दिवशी हे सर्व कळलंच !!" बोलता-बोलता देविका थांबली पूर्वीच्या आठवणीत हरवून गेली थोडा वेळ वाट पाहून राहुल खाकरला आणि तिची तंद्री भंग पावली .


" मोठा विचित्र दिवस होता तो !! सुनीलचं तसलं रूप मी कधीच पाहिलं नव्हतं !! मला त्याने सगळ्याचा जाब विचारला . बहुदा मी सगळ्या गोष्टी नाकारेन अशी त्याची अपेक्षा असावी .पण त्याच्या डोळ्याला डोळा भिडवून मी कबुली दिली.' तू मला मूल देऊ शकत नाहीस ,तेव्हा हे विचारायचा अधिकार तुला नाही..' असं मी त्याला स्पष्टपणे म्हणाले. तो क्षणभर अक्षरशः दिग्मूढ झाला , पण दुसऱ्याच क्षणी राग अनावर होऊन हातात येईल त्या वस्तूने त्याने मला मारायला सुरुवात केली. बहुदा मी त्याच्या पौरूष्यावर घेतलेला संशय त्याच्या जिव्हारी लागला असावा ...... कसाबसा जीव वाचवून मी घराबाहेर पडले आणि सरळ राकेश कडे निघाले."


" कार ड्राइव्ह करत असताना मी राकेशला फोन केला आणि सगळी हकीकत सांगितली . मी त्याच्या घरी येत आहे हे कळल्यावर राकेशची पाचावर धारण बसली. बहुदा मी घरी गेले तर स्वतःच्या बायकोला कसं तोंड द्यावं हा प्रॉब्लेम त्याला सतावत असावा. त्याने मला 'हॉलिडे इन' ला जायला सांगितले . त्याने बुक केलेल्या रूम मध्ये मी ती रात्र घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळीच येवून राकेश मला भेटला ... 'या पुढे मी तुला भेटू शकणार नाही ' हे सांगण्यासाठी !! माझ्या स्वप्नातल्या ' हि - मॅन ' चा घाबरलेला उंदीर झाला होता. माझ्या वर जणू आभाळच कोसळलं !! माझे इतरही मित्र राकेश पेक्षा वेगळे वागणार नाहीत याची मला खात्री पटली, आणि वस्तुस्थितीचे भान येऊन मी जमिनीवर आले . मी सुनीलला फोन केला आणि रडून भेकून त्याची माफी मागितली. माझ्या सगळ्या चुका मान्य करून मी पुन्हा अशी वागणार नाही याची खात्री मी त्याला दिली . शेवटी काहीही झाले तरी सुनीलचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. मोठ्या मनाने त्यानं मला माफ केलं आणि मी पुन्हा घरी परतले !!"


" त्यानंतर सुनील पुढे मी एखादे मूल दत्तक घ्यायचे प्रपोजल ठेवले. पण सुनीलचे आई वडील मूल दत्तक घ्यायच्या विरुद्ध होते. एक वेळ मूल झाले नाही तरी चालेल, पण कुठलेतरी अनोळखी मूल नातवंड म्हणून स्वीकारण्याची त्यांची तयारी नव्हती. काही दिवस असेच गेले. हळूहळू मी पुन्हा अस्वस्थ होऊ लागले. मित्रांबरोबरचे जुने दिवस आणि केलेली मजा आठवून माझ्या जुन्या व्यसनाने पुन्हा डोके वर काढले . आता अधिक सावधपणे , सुनीलला अंधारात ठेवून माझे जुने उद्योग पुन्हा सुरू झाले !!" 


देविका बोलताना थांबली. राहुल कडे रोखून बघत म्हणाली, 

"राहुल ............. 'निंफोमॅनिया' हे नाव कधी ऐकलंयस् ? ...... मला झालेल्या भयंकर व्याधीचं ते नावं आहे . या व्याधीत स्त्रीला सतत शरीरसुखाची अनावर ओढ लागते आणि मग त्यासाठी ती कुठल्याही थराला जाऊ शकते. या दुष्ट चक्रात अडकल्याने कोणाकडून आणि कधी एड्सची लागण झाली हे मला कळले सुद्धा नाही. आणि कळले तेव्हा खूप उशीर झाला होता. झपाट्याने माझी तब्येत बिघडली, आणि सुनीलने मला या हॉस्पिटलमध्ये भरती केले. मी येथे ॲडमिट झाल्यापासून एकदाही भेटायला, तो किंवा इतर कोणीही नातेवाईक कधी आले नाहीत ..... सगळ्यांनी मला वाळीत टाकले आहे ." देविकाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या . सुन्न होऊन राहुल उभा होता . धीराचे चार शब्द बोलायची ताकदही त्याच्यात राहिली नव्हती.


" येथे मला येऊन भेटलेला तू पहिला आहेस राहूल !! मला वाटलं होतं की मी बहुदा नर्स आणि डॉक्टरांकडे बघतच मरणार !! माझ्या भावना कोणीच समजावून घेतल्या नाहीत ...... मी हे सगळं पाप मुद्दाम करत नव्हते ......' आय वॉज सिक '...... मी खूप आजारी होते रे !!! जगा वेगळा आजार !! पण निदान, सुनीलने तरी मला समजावून घ्यायला हवे होते ...... डॉक्टर आहे तो !! भावनेच्या अतिरेकाने गहिवरलेली देविका बोलायची थांबली. थोड्या वेळाने भावनांवर ताबा ठेवून तिने स्वतःला सावरले . 

" राहुल माझं एक काम करशील ?" स्थिर आणि निश्चयी आवाजात देविका विचारत होती ..... 

भरलेल्या डोळ्यांनी राहुलने नुसतीच मान हलवली .

" सुनीलला माझी झालेली ही अवस्था सांग ... माझं मन मी तुझ्याकडे मोकळं केलं आहे .... हे सगळं सगळं त्याला कळलं पाहिजे. त्याला म्हणावं देविकाने खरं प्रेम फक्त आणि फक्त तुझ्यावर केलं होतं ..... मरण्या आधी तिला एकदा, फक्त एकदाच, तुला भेटायचंय.... सांगशील ना राहूल त्याला ?"

अश्रूंना थोपवण्याचा व्यर्थ प्रयत्न राहुलने सोडून दिला होता .तिचे पुढचे शब्द तो कानात प्राण आणून ऐकत होता.

" आणि राहूल ....... जर मी मरणापूर्वी त्याला भेटू शकले नाही तर ...... तर त्याला म्हणावं , निदान माझे अंत्यसंस्कार तरी तुझ्या हाताने कर !"

दुःखातिशयाने देविका चे बोलणे थांबले होते. मनाचा बांध फुटून वाहणाऱ्या राहुलच्या अश्रूंचा अभिषेक तिच्या हातांवर होत होता. 


तो तिचं काम करणार होता ...... तिची अखेरची इच्छा पूर्ण करून ,त्याच्या पहिल्या प्रेमाला न्याय देणार होता .......

समाप्त


वरील कथा श्री. मिलिंद अष्टपुत्रे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखकाच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत. 


Post a Comment (0)
Previous Post Next Post