प्री-वेडिंग

प्री-वेडिंग

✍️ सौ.हेमा पाटील.

मनीषची आज सकाळपासूनच खूप गडबड सुरू होती.गेले दोन दिवस मेन्स पार्लरच्या चकरा मारण्यात गेले.मनासारखे रिझल्ट्स दिसले तेव्हा त्याचे समाधान झाले.

"मम्मा, माझ्या बॅगेत अजून एक टाॅवेल टाक गं "! 

"अरे,कशाला ओझे ! एक पुरेसा आहे".

"नो नो.ती विसरुन आली तर काय करु"?

मग मम्माने आणखी एक टाॅवेल बॅगेत टाकला.

तिकडच्या पक्षात तर कमालीची गडबड चालली होती. "हा वनपीस घेऊ का गं? जीन्स कुठली घेऊ? की थ्रीफोर्थ घेऊ? टाॅप हे चार सिलेक्ट केलेत यातले कुठले शाॅर्टलिस्ट करु?पार्टीवेअर घेऊ की लाॅंग?

 अन् गाॅगल कुठला बघ..हा चांगला आहे की तो मगाशी ट्राय केला होता तो?

मेकअप चे सगळे कीट नेऊ की फक्त फाऊंडेशन अन् बेस कीट घेऊ"?

या आणि अशा अनेक प्रश्नांसह निकिताचे पॅकींग सुरू होते.

लग्नाला अजून अवकाश होता,पण निकीताचा गेला पूर्ण आठवडा शाॅपिंग करण्यात गेला होता.सोबत मैत्रिणींचा घोळका होताच.कारण एकमेकींच्या सल्ल्याने खरेदी करणे चालू होते.उगाच काही विसरायला नको म्हणून लिस्ट काढून त्याप्रमाणे जोरदार खरेदी करण्यात आली होती.मनिषकडेही अशीच खरेदी सुरू होती.

मनीष व निकिताचे लग्न ठरले होते.साखरपुडा झाला होता, लग्न पुढच्या महिन्यात होते.मनिष इंजिनिअर असून साॅफ्टवेअर कंपनीत नोकरी करत होता.अन निकीता M.D. मेडिसिन होती.सध्या भलताच ट्रेंड असलेल्या प्री-वेडिंग साठी दोघांनी अनेक पर्यायांपैकी राजस्थानला पसंती देऊन या वीकेंडला शूटसाठी जायचे नक्की केले होते.त्याचीच खरेदी आणि पॅकींग सुरू होती.

दोघांच्याही मम्मा मुलांपेक्षा ही जास्त एक्सायटेड होत्या.आजकाल लग्नाच्या हाॅलवर प्रवेशद्वारापासून ते अगदी स्टेजपर्यंत नवरा नवरीचे अगदी बारशापासून, रांगणारे, शाळेतील, काॅलेजमधील आणि त्यासोबतच नवरानवरीचे लग्नापूर्वी खास विवाहाच्या वेळी हाॅलवर लावण्यासाठी विविध पोझमधील काढलेल्या फोटोंचे मोठाले बॅनर झळकत असतात.याच फोटोशुटला प्री-वेडिंग शुटिंग म्हणून जरा जास्तच महत्व प्राप्त झाले आहे.आपल्या मुलांचे प्री-वेडिंग फोटो शूट इतरांपेक्षा हटके झाले पाहिजे यासाठी दोघांच्या ही मम्मांनी राजस्थानला मुलांना जाण्यास संमती दिली होती.

पण I am the best घ्या नादात किती वाहवत जायचे असे सुशीलरावांना म्हणजेच निकिताच्या वडिलांना वाटत होते.त्यांनी मनीषच्या वडिलांशी याबाबत चर्चा केली.वसंतरावांचेही मत सुशीलरावांसारखेच होते.

पण मुलांच्या आया मात्र डामडौलात अन् आजच्या पद्धतीप्रमाणे लग्न झाले पाहिजे या मतावर ठाम होत्या.लग्नाआधी मुलांनी भेटू नये असं वाटण्याइतके सुशीलराव किंवा वसंतराव आर्थोडाॅक्स नव्हते.आणि ते शक्यही नव्हते. पण लग्नाआधी एकत्र दिवसरात्र रहाणे त्यांना पसंत नव्हते.आजच्या पिढीचे डेटवर जाणे हे आपल्या भारतीय संस्कृतीत बसत नाही.आपण कितीही सुधारलो, विचारांमध्ये बदल झाला,आधुनिकता अंगिकारली तरीही आपल्या संस्कृतीची मुल्ये पूर्णपणे सोडणे योग्य नाही असेच दोघांचेही मत होते. राजस्थानला प्री- वेडिंगसाठी जाणे यामुळेच दोघांनाही पसंत नव्हते.त्याऐवजी जवळपासचे एखादे ठिकाण निवडावे व दिवसभर जे काय शुटिंग करायचेय ते करुन रात्री आपल्या घरी परतावे अशा मताचे ते होते.म्हणजे हौस ही होईल अन् ....

पण आयांच्या पाठिंब्यानंतर आपण काय बोलतो याला महत्त्व उरत नाही हे स्वानुभवाने दोघांनाही माहिती होते.त्यामुळेच दोघांनी मिळून ठरवले की,मुलांना एकेकटे पाठवण्यापेक्षा आपणही त्यांच्यासोबत जाऊयात.तसा प्रस्ताव अगदी खुबीने दोघांनीही आपापल्या पत्नीसमोर मांडला. आपण त्या दोघांचे प्री- वेडिंग शूट प्रत्यक्ष पाहू शकतो या कल्पनेने दोघीही मम्मा हुरळून गेल्या.आणि प्रस्तावास लगेच मान्यता मिळाली.त्यामुळे आता सुशीलराव व वसंतराव सपत्नीक आपापल्या मुलांसोबत राजस्थानला प्रस्थान करणार होते.कहाणीमध्ये हा ट्विस्ट आल्यामुळे बऱ्याच गोष्टी बदलल्या,रादर बदलाव्या लागल्या. आता मुलांसोबत आयांचीही स्वतः साठी व आपापल्या नवऱ्यांसाठी शाॅपिंग सुरु झाली ‌, कारण प्रथमच होणाऱ्या जावई व सुनेसमोर आपण बऱ्याच कालावधीसाठी वावरणार आहोत, त्यामुळे आपले चांगले इंप्रेशन पडले पाहिजे,कारण First impression is the last impression..आयुष्यभर ते टिकून राहिले पाहिजे.सुशीलराव आणि वसंतराव मात्र अगदी कूल होते.त्यांची इच्छा पूर्ण झाल्याने बाकी कशात त्यांना स्वारस्य नव्हतेच...

हायला.. आपल्या प्री वेडिंगला आपले मम्मीपप्पाही हजर असणार आहेत.त्यांच्यासमोर आपण कशा पोझ द्यायच्या?

अशा विचाराने दोघाही लग्नोत्सुकांना वेढले होते.पण तेव्हाचे तेव्हा पाहू असा विचार करत त्यांनी आपापले पॅकींग सुरु ठेवले.

ठरलेल्या दिवशी फ्लाईटने सगळे दुपारपर्यंत राजस्थानला आपल्या हाॅटेलवर पोहोचले.संध्याकाळी आमेर फोर्ट येथे शुट करायचे ठरले होते.दुपारी जरा विश्रांती घेऊन सगळेजण आमेर फोर्ट कडे रवाना झाले.शुटिंग करणारी टीम परस्पर तिकडेच येणार होती.हे पोहोचले तेव्हा शुटिंग चे सामान गाडीतून नुकतेच उतरवायचे चालले होते.ते इतके कॅमेरे,काळ्या पांढर्या छत्र्या, कृत्रिम पण खरी वाटणारी झाडे,फुले, हिरव्यागार गवताचा भास होणारे मॅट आणि खूप काही पाहून दोन्ही मम्मा,पप्पा विस्मयचकित झाले.आपल्यावेळी असले काही नव्हते याचा विषाद दोन्हीं मम्मांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

सगळे सामान काढून मा़ंडणी करण्यात अर्धातास गेला.तोपर्यंत सगळेजण फोर्टभोवती चक्कर मारुन आले.मग ज्या कामासाठी आले होते ते सुरु करण्यासाठी मनीष व निकीताला पुढे बोलावले.उरलेले चौघेजण उत्सुकतेने शुटिंग कसे चालले आहे ते पाहू लागले.पण....आपल्या आईवडिला़ंसमोर मनमोकळेपणाने फोटोशुटर जी पोझ घ्यायला सांगेल ती घेणे या दोघांनाही अवघड वाटत होते.चारचार वेळा सांगितल्यानंतर ते पोझ तर देत होते,पण चेहऱ्यावर त्या पोझच्या वेळी जे भाव हवे होते ते कितीही प्रयत्न केला तरी येईनात.

  नेमका काय घोळ आहे ते फोटोग्राफरच्या लक्षात आले.मग त्याने एक शक्कल लढवली.त्याने आपल्या असिस्टंटना जवळ बोलावले आणि त्यांना काही सुचना दिल्या.गालातल्या गालात हसत असिस्टंट तेथून बाजूला आले व त्यांनी हातात कॅमेरा घेऊन आपला मोर्चा मनीष व निकिताच्या आईवडिलांकडे वळवला.फोटोशुटरने तेथे येऊन या चौघांना तुमचे फोटो शुट करण्याची या माझ्या असिस्टंटना परवानगी द्या.ते शिकाऊ आहेत.तुमच्या सहकार्यामुळे ते फोटोशुट करण्याची प्रॅक्टिस करतील असे सांगितले.या चौघांना याबाबत हरकत घेण्याचे काही कारणच नव्हते.कारण तिथेच मुलांच्या जवळच यांचेही फोटो शुट होणार होते.या़ंनी होकार दर्शविला आणि या दोन्ही जोडप्यांचे पण फोटोशुट सुरू झाले.

पण गंमत अशी झाली की, असिस्टंटना त्यांच्या गुरुंनी सांगितले होते की, फोटो शुट करण्याच्या बहाण्याने यांना इथून पुरेसे दूर नेऊन मग फोटो शुट करा.आणि तो त्यांचा हेतू सफल झाला.विविध पोझमध्ये फोटो काढून घेण्याच्या नादात मुला़ंच्या फोटोशुट कडे पालकांचे दुर्लक्ष झाले आणि ते स्वतः अधिक छान पोझ कशा देता येतील यातच मश्गूल झाले.फोटोग्राफरचा हेतू साध्य झाला.मग वेगवेगळ्या पोझ समोर करुन दाखवत ॲसिस्टंटने या दोन्ही जोडप्यांना कधी एकमेकांच्या डोळ्यांत डोळे घालून बघायला लावले.तर कधी मॅडमना सरांच्या खांद्यावर डोके टेकवून सरांच्या मिठीत बसवले. परत चक्क मॅडमना बाहुपाशात उचलून घ्यायला लावले.व्याही व विहिणबाईंसमोर अशी पोझ देताना लाजल्यासारखे झाले,पण त्यांनाही त्याच पोजमध्ये बघून भीड चेपली व अगदी नवी जोडपी असल्यासारखे लाजत फंड फोटोशूट सुरू झाले होते.तीन जोडप्यांचे फोटो शुट करुन अखेर त्यांनी पॅकअप केले.मुले आपापल्या पालकांसह हाॅटेलमध्ये परतली.दुसऱ्या दिवशीही आदल्या दिवसाचीच पुनरावृत्ती झाली अन् एकदाचे फोटोशुट पूर्ण झाले.

आपल्या इच्छेनुसार प्री वेडिंग झाले या समाधानात पालक होते,अन् फोटोग्राफरच्या युक्तीने आपले शुट हवे तसे झाले या आनंदात मनीष अन् निकीता होते.एकूण सर्वांच्याच मनासारखे घडले होते.मोबाईलवर आलेल्या फोटोच्या काॅपीज पाहून तिन्ही जोडपी खुश झाली होती.

बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला.इव्हे़ंंट मॅनेजमेंट कडेच फोटो जाणार होते,अन् तेच मोठाले बॅनर बनवून योग्य ठिकाणी लावणार होते.घोड्यावरुन नवरदेव, त्याची मित्रमंडळी हाॅलवर आले, सोबत घरचे,पैपाहुणे असे मूळ वऱ्हाड आले.आणि हाॅलच्या प्रवेशद्वारापाशी लावलेले तीन मोठे बॅनर पाहून तिथेच थबकले.तेवढ्यात नवरीकडचेही वऱ्हाड हाॅलवर पोहोचले.ते वऱ्हाडी ही फोटो पाहून तिथेच थबकले.मग एकेक बॅनर अगदी बारकाईने पहात व गालातल्या गालात हसत व एकमेकांना नेत्रपल्लवी करत खुणावत सगळे आत पोहोचले.सर्व पाहुणे मंडळी, मूळ वऱ्हाडाच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू होते.त्यांची आपापसांत चर्चा सुरू झाली होती,आजवर नवरा नवरीचे प्री-वेडिंगचे फोटो खूप पाहिले,पण सोबतच त्यांच्या मम्मीपप्पांचेही फोटोशुट पहिल्यांदाच पाहिले बुवा ! मुलांच्या मित्रमैत्रिणींनी ही हा प्रकार पाहून नवरदेवाला व नवरीला अनेक प्रश्न विचारुन भंडावून सोडले होते.

समजले का खरा काय घोळ झाला होता तो? फोटोग्राफरच्या ॲसिस्टंटने मम्मीपप्पांचेही फोटोशुट चुकून इव्हेंट मॅनेजमेंट कडे पाठवले.इव्हेंटच्या कामगारांनी स्वतः चे डोके न चालवता पार्टीला अगर आपल्या मॅनेजरला काहीच न विचारता नवरानवरीच्या आईवडिलांच्याही फोटोंचे बॅनर बनवून आणले होते व प्रवेशद्वारापासून ते स्टेजपर्यंत अधूनमधून यांचेही फोटो लावले होते.लग्नाला येणाऱ्या सर्वांनाच ते फोटोशूट पाहून हसू येत होते. आजपर्यंत लग्नसमारंभात सर्वांनी नवरानवरीचे वेगवेगळ्या पोझ मधील फोटो पाहिले होते, पण त्यांच्या आईवडिलांचे एकमेकांच्या बाहुपाशात असलेल्या फोटोंचे पोस्टर याच लग्नसमारंभात पाहिले. दोघांच्याही मम्म्यांची आपल्या मुलांच्या हटके प्री-वेडिंगची व डामडौलाची हौस पुरती भागली होती,अन् वस़ंतराव व सुशीलरावांना आपला मुलांसोबत जाण्याचा निर्णय साफ चुकला यांचा प्रत्यय ते फोटो पाहून येत होता. सुशीलरावांनी फोन करून इव्हेंट मॅनेजरला झालेली गडबड सांगितली.पण आत्ता यावेळी कुणीही कामगार तिथे पोस्टर हलविण्यासाठी येऊ शकत नाही कारण सगळेजण नेमून दिलेल्या कार्यालयात अशीच कामे उरकण्यासाठी गेलेले आहेत.त्यामुळे आता तुम्हीच काही करता येत असेल तर करा असे मॅनेजरने सांगितले.आता आपले हसे करुन घेण्याशिवाय काहीच पर्याय शिल्लक नाही हे लक्षात आल्याने सुशीलरावांचा संपूर्ण लग्नसमारंभात चेहरा पडला तो पडलाच !आणि आपले First impression इतके वाईट झाले आहे की ते आयुष्यभर सुधारु शकत नाही या विचाराने दोन्हीही सासवा आपले तोंड लपवत होत्या.आणि आपल्या लग्नात तर आपल्यापेक्षा आपले आईवडीलच highlight झाले. आपण एवढे कष्ट घेऊन दिलेल्या पोझेसकडे पाहण्यापेक्षा सगळेजण डोळे फाडून आपल्या आईवडिलांच्याच पोझेस अगदी निरखून पहातायत हे पाहून नवरानवरीला आपले प्री- वेडिंग फेल गेले हे समजले. आता लग्नात तरी तसे होऊ नये यासाठी फोटो काढताना ते दोघेही खूप दक्ष होते...अन् दोघांचेही आईवडील फोटोग्राफर कडे अजिबात फिरकले नाहीत.एवढेच काय आपण चुकूनही फोटोत येऊ नये यासाठी ते चौघेही स्टेजवर येण्याचे टाळत होते.हे लक्षात येताच मनिष व निकीताने त्यांना बळजबरीने स्टेजवर बोलावून सर्वांचा मिळून एक फॅमिली फोटो काढला.तेव्हा मनिष हळूच वसंतरावांच्या कानात कुजबुजला, "पप्पा, आईला तुम्ही बाहुपाशात घेतलेला फोटो काय झकास आलाय" ! अन् निकीता आपल्या मम्माच्या कानात कुजबुजली, " मम्मा, पप्पांनी तुला उचलून घेतल्यावर तुला पडायची भीती वाटली नव्हती का गं"..? यावर कुणीच काही उत्तर दिले नाही पण मुलांनी हे सगळे लाईटली घेतले आहे हे पाहून आईवडीलांना हायसे वाटले...

अशीही प्री-वेडिंगची कहाणी संपूर्ण सुफळ झाली...

समाप्त

फोटोवर क्लिक करून पाहा एक नवी सुंदर सकारात्मक कथा वरील कथा सौ. हेमा पाटील यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

1 Comments

Post a Comment
Previous Post Next Post