चक्रव्यूह

चक्रव्यूह

✍️ मिलिंद अष्टपुत्रे

" सर इंजिन मधला हा कॉम्पोनंट फार क्रिटीकल आहे. या कॉम्पोनंट वर सगळ्यात जास्त स्ट्रेस आहे. फेल्यूअरचे चान्सेस आहेत. आपल्याला याचं कॉम्पोझिशन बदलावं लागेल. " 

अतुल अलिप्तपणे ऐकत होता. डिझाईन सेक्शनचा प्रमुख अशोक वर्मा कंपनीच्या नव्या एस यू व्ही च्या इंजिन बद्दल बोलत होता . 

आपणही कंपनीच्या ह्यूमन रिसोर्सेस मधील सगळ्यात क्रिटिकल कॉम्पोनंट आहोत ही जाणीव अतुलला अस्वस्थ करत होती. याला तसेच कारणही होते. अतुलचा जिवलग मित्र आणि कंपनीचा मार्केटिंग व्हाइस प्रेसिडेंट शिरीष जाधव याचा अकाली मृत्यू ! आठवड्या पूर्वीची गोष्ट ! कंपनीतून रात्री उशिरा शिरीष घरी पोहोचला होता. जेवण करून झोपला ते सकाळी न उठण्यासाठीच ! ती रात्र शिरीष साठी काळरात्र ठरली . झोपेतच हार्टफेलने त्याचा मृत्यू झाला. वय वर्षे बेचाळीस ! खरंतर बेचाळीस हे काही मरण्याचं वय नक्कीच नाही . चाळिशीनंतर माणूस खऱ्या अर्थाने जीवन जगायला सुरुवात करतो. वयाच्या पंचविशीपर्यंत तर शिक्षणच चालू असते, त्यानंतर नोकरीतली उमेदवारी ! म्हणजे जेमतेम दहा ते बारा वर्षेच स्थिर जीवन . शिरीषची बायको शालिनी अडतीस वर्षांची आणि मुलगा शेखर केवळ दहा वर्षाचा ... काय भवितव्य असणार आहे त्या दोघांचं ? अतुलच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण होत होते, ज्यांची भीतीदायक उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करण्याची हिंमत त्याला होत नव्हती. 

काहीतरी बोलून अतुलने अशोक वर्माला कटवले आणि तो आपल्या खुर्चीत कोसळल्यासारखा बसला. शिरीष वर कामाचं प्रेशर खूप होतं. शरीराने नक्कीच पूर्वसूचना दिली असणार ! शिरिषला कळलं कसं नाही ? आता सगळेच प्रश्न अनुत्तरीत राहणार होते. अतुलला आठवले, मागच्या महिन्यात अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले होते. पहिल्या प्रथम त्याने दुर्लक्ष केले पण असा अनुभव पुन्हा एक-दोन वेळा आला होता. 

ही हृदयविकाराची सुरवात तर नाही ? घामाचा थंड ओघळ अतुलच्या पाठीवरून खाली सरकला ! आपले काही बरे वाईट झाले तर अंजली आणि अर्णवचे काय ? अस्वस्थपणे कपाळ चोळत अतुलने मनातले विचार झटकून टाकण्याचा प्रयत्न केला . टेबलावरील इंटरकॉम वाजल्यामुळे अतुल दचकून भानावर आला. 

" येस ?" ..... 

" सर, गंगवानी सरांचा निरोप आहे. त्यांनी अर्जंट मीटिंग कॉल केली आहे." सेक्रेटरी म्हणाली ..... 

" ओके थॅंक्स " अतुल उत्तरला. मीटिंगमध्ये मार्केटिंगच्या नव्या व्हाईस प्रेसिडेंटची घोषणा करण्यात आली. रोहित मनचंदाला नवीन व्हाईस प्रेसिडेंट करण्यात आले होते . सर्वजण रोहितचे अभिनंदन करत होते. अतुलला अचानक लहानपणी देवीच्या जत्रेत बघितलेल्या बळीच्या सजवलेल्या बकऱ्याची आठवण झाली. रोहित मनचंदा अगदी तसाच दिसत होता ! मीटिंगमध्ये शिरीष जाधवचा विषयही निघाला नाही. चार दिवसात कंपनीतले सर्वजण जणू त्याला विसरून गेले होते. काळ कोणासाठी थांबत नाही हेच खरे ! कंपनीचे सर्व व्यवहार सुरळीतपणे चालू होते. शिरीषच्या आहुतीची किंमत काय होती ? 

अतुलला तो ज्यात अडकला होता त्या रहाटगाडग्याची आता कल्पना येऊ लागली होती. चक्रव्यूहात फसलेल्या अभिमन्यूसारखी त्याची अवस्था होती. हा व्यूह तोडता येऊ शकेल ? कंपनीचा सि. इ. ओ. अतुल मराठे ! वर्षाला पंच्याहत्तर लाखांचं पॅकेज ! सर्व सुखं हात जोडून समोर उभी ! त्या स्थितीतही अतुलला हसू आलं. खरंच एवढ्या पगाराची आपल्याला गरज आहे का ? आपल्या वडिलांना सेवानिवृत्तीच्या वेळी फक्त वीस हजार महिना पगार होता . त्यांच्या तीस पट पगार आपण घेतोय ! माझे वडील कुठे दुःखी आहेत ? वयाच्या सत्तरीतही चांगले टुणटुणीत आहेत. मुख्य म्हणजे शांत जीवन जगत आहेत. कामाच्या या प्रचंड व्यापामुळे आपण जगण्यातला आनंदच हरवून बसलोय ! आपण हे सगळं कशासाठी करतोय ? प्रश्नांची मालिकाच अतुल च्या समोर उभी राहिली. 

माझं आयुष्य ! 

अमूल्य ! 

एकदाच मिळणारं ! 

ही मला लाभलेली जाणीव ! पृथ्वीवरच्या सर्व जीवांमधील सगळ्यात उच्च प्रतीची जाणीव ! ही मी कधी मनापासून अनुभवणार ? माझे छंद कधी जोपासणार ? मला अंजली सोबत सर्व जग फिरायचे आहे. निसर्गात मनसोक्त भटकंती करायची आहे. त्यासाठी मला कधी वेळ मिळणार ? म्हातारपणी ? 

आणि तेही तिथपर्यंत जगलो तर ! त्याची शक्यताही कमीच ! अशा जीवघेण्या ताणातून जाताना शरीराचा निभाव लागेल ? 

मेडिकल सायन्स म्हणते की मनावरील ताण तणावाचा परिणाम हा थेट शरीरावर होतो. म्हणजे मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग अशा सर्व विकारांची साखळी मागे लावून घ्यायची ! या कुठल्याशा ऑटोमोबाईल कंपनीच्या प्रगतीसाठी मी माझं हे इतकं अमूल्य आयुष्य पणाला लावणे योग्य आहे ? आणि माझं खाजगी आयुष्य ! त्याचं काय ? माझी प्रिय पत्नी अंजली, मुलगा अर्णव यांच्या सोबत मी कधी मजा करायची ? माझं काही बरं वाईट झालं तर त्यांनी काय करायचं ? मी काढलेला मोठ्या रकमेचा विमा हे याचं उत्तर आहे का ? त्यातून मिळणारे पैसे त्यांच्या उर्वरित आयुष्याला पुरे पडतील का ? असंख्य प्रश्नांची मालिकाच त्याच्या मनात काहूर माजवत होती.

" सो व्हॉट डू यू थिंक अतुल ?" डायरेक्टर गंगवानींच्या प्रश्नामुळे अतुल भानावर आला . 

" यू आर राईट सर !" कोणत्याही परिस्थितीत बरोबर असणारे उत्तर देऊन अतुल मोकळा झाला. मान हलवून सरांनी पुढे बोलायला सुरवात केली, 

"आता आपण सर्वांनी आपली एफिशियन्सी वाढवली पाहिजे. यापुढे मला कुठलीही कारणे चालणार नाहीत. सगळी टार्गेट्स पूर्ण झालीच पाहिजेत."

 गंगवानी सरांची मीटिंग संपली.

केबिनमध्ये येऊन बसल्यावर अतुलचे विचारचक्र पुन्हा सुरू झाले. ' स्ट्रेस मॅनेजमेंट !' कॉर्पोरेट क्षेत्रातला सध्‍याचा परवलीचा शब्द ! हुशार लोकांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधून ठेवली आहेत. कामातील ताण तणावांना कसे तोंड द्यायचे याचे सेमिनार घेऊन हे लोक उच्चपदस्थ व्यक्तींना चांगली मदत करतात . असंच काहीतरी आपल्यालाही करावं लागणार. अक्राळ-विक्राळ विचारांचं ओझं आता अतुलला असह्य होऊ लागलं. हे सगळं कोणाबरोबर तरी शेअर करावं लागेल. अंजली ..... 

येस हे सगळं अंजलीबरोबर शेअर करुयात ! अतुलला एकदम हलकं वाटलं. त्याच रात्री तिच्याशी बोलायचं त्यांनं मनोमन ठरवलं. 

अंजली स्तब्ध बसली होती. जवळजवळ अर्धा तास अतुल भरभरून तिच्याशी बोलत होता. त्याचं बोलून संपलं आणि एक विचित्र शांतता खोलीत भरून राहिली. 

" अतुल, अरे अशा परिस्थितीत असणारा तू काही एकटा नाहीयेस. सर्व वरच्या पदावरील लोक या ताणाला तोंड देतच असतात. दुर्दैवाने शिरीषला त्याच्यावरील स्ट्रेस मॅनेज करता आला नाही. नाहीतर असं काही झालं नसतं ! मी तुझ्या सोबत आहे. मी मदत करेन तुला स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये ! आपण अधूनमधून छान पिकनिकस्, फॅमिली गेट टू गेदर ॲरेंज करू. पाहिजे तर एखादी लाँग फॉरेन ट्रीप करू. सगळं काही ठीक होईल ! अरे आत्ताची तुझी पोझिशन सोडायचा विचारसुद्धा करू नकोस. लोक काय म्हणतील ? अशी पोझिशन इतक्या क्षुल्लक कारणासाठी सोडल्याचं कोणाला तरी पटेल का ? आणि एवढा पगार अदरवाईज कसा मिळेल ? कमॉन, आता रिलॅक्स हो ! वाटल्यास झोपेची गोळी घे . छान झोप झाली की उद्या सकाळी तुझ तुलाच हसू येईल !"

  अतुलच्या केसातून प्रेमाने हात फिरवत अंजली बोलत होती . 

महाभारतातल्या युद्धात अभिमन्यूला वाचण्याची संधी एकदाच होती ...... 

चक्रव्यूहात शिरण्यापूर्वी !!

 वास्तवतेची कटू जाणीव अतुलला करून देऊन अंजली गाढ झोपी गेली होती. हे युद्ध आता लढावेच लागणार होते. मध्येच कधीतरी दुखणारी छाती, वाढलेल्या बीपी मुळे होणारी ह्रदयातली धडधड, ए.सी. केबिनमध्ये सुद्धा एकदम कधीतरी भीतीने फुटणारा घाम हे सगळं सगळं विसरून टार्गेटस् अचिव्ह करावीच लागणार होती . कॉर्पोरेट जगतातील महायुद्धे लढणाऱ्या इतर असंख्य अभिमन्यूनंप्रमाणे अतुलला या न भेदता येणाऱ्या चक्रव्यूहात लढावे लागणारच होते. अंजलीने त्याचे मागे फिरण्याचे सर्व दोर कापून टाकले होते, आणि वास्तवतेला असहायपणे स्वीकारून अतुल झोपेची प्रतिक्षा करु लागला !

समाप्त

फोटोवर क्लिक करून पाहा एक नवी सुंदर सकारात्मक कथा.



वरील कथा श्री मिलिंद अष्टपुत्रे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखकाच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post