पितृइच्छा

पितृइच्छा 

✍️ प्रतिभा परांजपे

फोनवर आलेला अननोन नंबर पाहून वकील मनोहर रावांना आश्चर्य वाटले .त्यांनी फोन रिसीव केला.

"हॅलो कोण वकील साहेब ना?"

"हो, आपण ?"

"मी प्रकाश, सुधाकर आठवले यांचा धाकटा मुलगा बोलतो आहे."

"हं बोला ,कसा काय फोन केला??"

"तुम्हाला कळल असेलच, बाबांच मागच्या आठवड्यात निधन झालं. बरेच दिवस आजारी होते, त्यांनी मृत्युपत्र केले आहे असे कळवले होते. मी व माझा मोठा भाऊ प्रमोद दोघं अमेरिकेतून आलो आहे. बाबांच्या जमीन -संपत्ती बाबत बोलणं-करायच आहे. आम्ही फार दिवस सुट्टी घेऊन नाही राहू शकत त्यामुळे लवकरात लवकर..."

"हो हो समजलं. संध्याकाळी मी येतो तिकडे मग बोलू",  म्हणत मनोहर वकीलांनी फोन कट केला.

त्यांना आठवले, दोन महिन्या आधीच तर सुधाकररावांकडे ते गेले होते. त्यावेळेसच त्यानी सांगितले होते कि दोन्ही मुले बाहेर देशात असतात, बायको नुकताच वारली आहे. सुधाकरराव यांना  बहुतेक आपल्या मृत्युची जाणीव झाली असावी..

 सुधाकरराव एकटेच. तब्येत जरा नरम गरम असायची, त्यामुळे त्यांना मृत्युपत्र तयार करायचे होते.

 बडी असामी होती. बरीच संपत्ती जमा केली होती. त्याची रितसर वाटणी करायची होती. त्यानी एक पत्र लिहून वकील साहेबांच्या स्वाधीन केले होते.

संध्याकाळी वकील मनोहर आठवले यांच्या बंगल्यावर पोहोचले.

घरात दोघ मुलं धाकटा प्रकाश व मोठा भाऊ प्रमोद व त्यांच्या दोघांच्या बायका एकूण चार जण होते. नातवांना ह्यात काहिच घेणदेण नव्हते म्हणून ते आलेच नाही.

नोकराने आत जाऊन सांगितले .

दोन्ही मुले बाहेर आली.

वकील साहेब चहा-कॉफी की सरबत घेणार प्रकाश नी विचारले.

"नाही -नाही काही नको फक्त पाणी द्या. आणि  शेखर ला नाही बोलावले कां?"

 "कां बरं, त्याचे काय काम?"

"बोलवून घ्या, सांगतो,"  पाणी पीत मनोहर वकील म्हणाले.

"पण हा सगळा आमचा घरगुती  मामला आहे."

"तोही घरचाच आहे." म्हटल्यावर शेखरला निरोप गेला.

शेखर जरा बिचकत बिचकत आला. त्यानी वकील साहेबांना नमस्कार करून विचारले, "आपण मला कां बोलवलं?"
प्रकाश व प्रमोदने त्याला ये, बस ही म्हंटले नाही.

"बस शेखर," वकील साहेब म्हणाले.

  "हे  इच्छापत्र म्हणजेच मृत्युपत्र तुमच्या वडिलांनी उर्फ सुधाकर आठवले  यांनी केले होते ते मी तुम्हाला वाचून दाखवतो.

     प्रिय प्रकाश व प्रमोद ,

तुम्ही नेहमी सुखाने रहावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

मी नसताना तुम्ही नक्की याल यावर माझा पूर्ण विश्वास आहे कारण संपत्तीचे माप नेहमीच आई-वडिलांच्या प्रेमापेक्षा जड असते हे मी व तुमची आई दोघही समजून चुकलो होतो.  याची पुढे तुम्हाला ही जाणीव होईल.

तुम्ही माझेच अंश आहात या नाते माझ्या या संपत्तीवर तुमचा पूर्ण अधिकार आहे. आणि त्या अधिकाराने तुम्ही याल. पण माझा एक मुलगा अजून आहे. त्याला तुम्ही पाहिले आहे पण ओळखत नाही कारण तो माझा मानस पुत्र आहे , माझा मित्र अशोकचा मुलगा शेखर. खर तर सख्या पेक्षा ही जास्त जवळचा.

आश्चर्य वाटलं ना ?

त्यालाही अंदाज नाही.

 पण एका मुलाचे जे कर्तव्य आहे त्याहीपेक्षा काकणभर जास्तच आमच्यासाठी त्यानी केले आणि मनात काहीही अपेक्षा न ठेवता.

अशोक आणि मी लहानपणीचे मित्र. आमच्या मैत्रीत त्याची गरीबी किंवा माझी श्रीमंती कधीच आड आली नाही. अगदी लहान असल्यापासून मी शेखरला पाहतो आहे आहे. अभ्यासात फार हुषार नव्हता पण आदर्श वाटावा असा. आपल्या आईबाबांचा त्यांनी नेहमी मान ठेवला. जेव्हा तुम्ही दोघंही आम्हाला सोडून परदेशात स्थाईक झाला तेव्हा आणि अशोक व वहिनी दोघांचे निधन झाले त्यानंतरही त्याने आमची साथ सोडली नाही. नेहमी घरी येऊन विचारपूस करायचा काही हवे असल्यास  नेहमी तत्पर.

  प्रत्येक वाईट प्रसंगी त्याने निस्वार्थपणे आम्हाला मदत केली ती पण अगदी मुलाप्रमाणे. पैशांचा मोह त्याच्या वागण्यात मला कधीच जाणवला नाही. नेहमी हिशोबात चोख.

पैशांची गरज तर ईश्वर कृपेने आम्हालाही नव्हती. या वयात गरजा  कमीच असतात.  गरज होती ती फक्त नी फक्त प्रेमाची, आपलेपणाची, सोबतीची गरज. म्हातारपणी जेव्हा शरीर साथ देत नाही  आपल्या माणसांची गरज  जास्त असते. असे वाटते की कोणीतरी जवळ असावे ज्याच्यावर सर्व सोपवून निर्धास्त व्हावे आणि तेच निर्धास्तपण, तोच आपलेपणा आम्हाला शेखरच्या रुपात भेटले. न सांगता त्याला आमच्या गरजा कळत. दर दोन दिवसांनी येऊन काही हवं नको विचारून जायचा. तुमची आई आजारी असताना त्यांनी व सुनबाई नी हिची खूप सेवा केली. हिला जेवण जात नसे तेव्हा प्रेमाने भरवले ही. एक मदतनीस होती सेवेसाठी पण स्वतःच्या आईप्रमाणे प्रेमाने करणार लागत न ती कमतरता त्यां दोघांनी भरून काढली.

ऐकता ऐकता आता प्रकाशला आठवले मागे बाबांनी फोन करू सांगितले होते. तुझी आई खूप आजारी आहे डॉक्टरांच्या मते ती फार दिवस नाही काढणार ....

   पत्रात बाबांनी पुढे लिहिले होते. तिला सतत तुमची दोघांची आठवण येत असे. एकदा जरी भेटला  तरी तिच्या जीवाला शांती मिळेल पण प्रकाशने प्रमोदला कळवले तू जाशील कां पण त्यानेही सध्या सुट्टी नसल्याने जमणार नाही असे कळवले.

वाचता वाचता वकील साहेबांनी  दोन्ही मुलांकडे पाहिलं दोघांच्या नजरा शरमेने खाली झुकलेल्या होत्या.

शेखर आणि सुनबाई दोघांनी अगदी सख्ख्या मुलाप्रमाणे तुमच्या आईची शेवटपर्यंत सेवा केली. अगदी शेवटचे पाणीही त्यानी तिला पाजले. तेव्हांच मला कळून चुकले होते. म्हणून मी माझे आजारपण तुम्हाला कळवले नाही.  मी गेल्यावर शेखरने तुम्हाला कळवले.

  तुमच्या आईची व माझी दोघांची शेवटची इच्छा म्हणून हे घर आम्ही शेखरच्या नावाने करतो आहे. हे पैतृक  नाही, हे घर मी माझ्या मेहनतीने बांधल आहे. त्याची  देखभाल दुरुस्ती सर्व मी वेळोवेळी केली. माझ्यासाठी  हे  घर सर्वात अनमोल आहे. त्यात लावलेली फळझाडे बाग मी स्वतः  लावली आहे. या सर्वांची देखरेख  तोच करू शकतो जो इथे राहील. नाही तर ही बाग ही  आमच्या सारखी कोमेजून  जाईल. तुम्ही दोघं हे सर्व विकून वाटून घ्याल मला ठाऊक आहे. बाकी सर्व संपत्ती जमीन तुमच्या आईचे दागिने त्यावर तुमचाच अधिकार आहे ते तुम्ही वाटून घ्यावे.

                   तुमचे बाबा

                     सुधाकर आठवले

इच्छापत्र पूर्ण वाचून  त्याची घडी करत वकील साहेबांनी दोन्ही मुलांकडे पाहिले. दोघांचे चेहरे शरमेने काळे ठिक्कर पडले होते. आणि शेखर रडत रडत हात जोडत म्हणाला, "नाही नाही वकील साहेब मला यातलं काही नको. तुम्ही हे घर  दादांच्याच नावाने करून द्या."
"अरे ही पितृइच्छा आहे. तू  त्यांची सेवा काहिही अपेक्षा न ठेवता केली. त्यांनी वडिलकीच्या नात्याने आपल्या संपत्तीतून काही तुला  दिले. आणि मी ह्यात काही फेरबदल  नाही करू शकत ही आठवले साहेबांची शेवटची इच्छा होती. तू मुलाप्रमाणे वागला त्यांनी वडिलांचे कर्तव्य निभावले. आता त्यांची ही शेवटची इच्छा तू पूर्ण कर ज्याने त्यांच्या आत्म्याला समाधान मिळेल." असे म्हणत वकील साहेबांनी मृत्युपत्र प्रकाशच्या हातात दिले. प्रकाशने प्रमोद व दोघांच्या बायकांना ही ते वाचायला दिले.

सर्वांनी त्या वर सही केली व घराचे कागदपत्र शेखरच्या स्वाधीन केले. शेखरक्या डोळ्यातून  दोन थेंब अश्रू त्यावर पडले. ते पेपर त्यानी फोटो समोर ठेवून नमस्कार केला व बाहेर निघून गेला.

 सुधाकरराव यांच्या फोटोला पुष्प अर्पण करून नमस्कार केला तेव्हा  वकील साहेबांना जाणवले की फोटोतल्या सुधाकर रावांच्या चेहऱ्यावर कर्तव्य पूर्तीचा तृप्त भाव दिसत होता.

समाप्त
वरील कथा प्रतिभा परांजपे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post