पिकलेले पान

 पिकलेले पान

लेखिका - जया प्रमोद पवार.

झाडाची सर्व पाने पिकलेली होती आणि टपाटप गळून पडत होती. जानकी दचकून जागी झाली. पहाटे पाचचा अलार्म वाजत होता. तो बंद करून ती तडक खिडकीपाशी गेली. तिने खिडकी उघडताच थंडगार वार्‍याची झुळूक आत आली. अंधार असल्याने मागच्या आवारातील दिवे लागलेले होते. पण चष्मा लावून नीट पाहताच तिला झाडावर एक पिवळे पान दिसले. तिच्या काळजात धस्स झाले. तिला वाटणार्‍या भिती मागचे कारण ही तसेच होते. 

लग्नानंतर जानकी जेव्हा या घरात आली तेव्हा तिच्या सासूबाईंनी एकदा तिला आपल्या खोलीत बोलावून या झाडाबद्दल सांगितले होते. या झाडावरची सगळी पाने शक्यतो हिरवीच असतात, एखादे पान कधीतरी पिकते. पिवळे पडते आणि दोन चार दिवसात गळून पडते. परंतु त्याचबरोबर त्यांच्या परिवारातील एका व्यक्तीचा मृत्यू होतो. सासूबाईंच्या या बोलण्यावर जानकीचा प्रथम विश्वास बसला नाही पण तिच्याही खिडकीतून ते झाड दिसत असल्याने सासू आणि सासर्‍यांच्या आणि तिच्या पतीच्या म्हणजेच वसंताच्याही मृत्यूपूर्वी आलेल्या पिवळ्या पानांची ती साक्षीदार होती. 

 आणि आज परत एकदा एक पिवळं पान दिसलं होतं. एकोणसत्तर वर्षांची जानकी आता आपलाही निरोपाचा क्षण जवळ आला आहे हे जाणवून कासावीस झाली होती. 

चोविसाव्या वर्षी लग्न होऊन ती सासरी आली होती. वसंता तिच्याहून तीन वर्षे मोठा होता. याच घरात तिचा संसार फुलला होता. ऐन तारुण्यातील स्पर्शातली हुरहुर ते पन्नाशी नंतरच्या स्पर्शातली आश्‍वासकता इथपर्यंतचा त्यांचा अतिशय हेवा वाटावा असा प्रवास होता. त्यांच्या संसारातील सागर व पल्लवी या दोन अपत्यांची जोड ही परमेश्वराची असीम कृपाच होती. सागर बॅंकेत फाइनैंस डिपार्टमेंट मध्ये चांगल्या पोस्टवर कार्यरत होता. तर पल्लवी ने कॉम्प्युटर सायन्स ची डीग्री घेतल्यावर योग्य स्थळ सांगून आल्याने ती तिच्या सासरी सुखात नांदत होती. सगळं कसं दृष्ट लागण्यासारखंच.

वसंता पासष्ट वर्षांचा झाला होता. सासू-सासरे जाऊनही आता खूप वर्षे झाली होती. सागरचं लग्न सुमन बरोबर होऊन आठ वर्षे उलटून गेली होती. अनघा व अन्वी अशा अनुक्रमे सहा व चार वर्षांच्या दोन नाती होत्या. पल्लवीलाही मायरा व राया अशी एक मुलगी व एक मुलगा अशी दोन अपत्ये होती. अशी एकूण चार नातवंडे असल्याने दिवसामागून दिवस आनंदात सरत होते. वसंता व जानकी रिटायर्ड होऊन भरघोस पेंशन मिळत असल्याने समाधानाच्या परमोच्च शिखरावर असल्यासारखे या बोनस आयुष्याचा आनंद घेत होते. 

अशातच एकदा तिला झाडावर एक पिकलेले पान दिसले आणि पुढच्या दोन दिवसांत छातीत दुखण्याचं निमित्त होऊन वसंता परतीच्या प्रवासाला निघून गेला होता. आणि सात वर्षानंतर आज परत एक पिवळे पान दिसले होते. तिच्या मनाची घालमेल सुरू झाली. 

सकाळी सर्व आटोपून तिने योगा क्लासला जायची तयारी केली. तेवढ्यात तिचा फोन वाजला.अनुचा फोन होता.

अनु तिची धाकटी बहीण आणि तिची लहान जाऊ. हो!दोनच वर्षांनी लहान असलेली तिची बहीण. अगदी जीवाला जीव लावणार्‍या या दोघींना एकाच घरातून स्थळ सांगून आलेलं. त्यामुळे वसंताच्या धाकट्या भावाची म्हणजे धनंजयची ती बायको होती. धनंजयने स्वकमाईने घेतलेल्या घरात पण जानकीच्या घरापासून पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावर त्यांचं घर असल्याने सासू-सासरे अधून मधून त्या मुलाकडेही रहायला जायचे. महत्त्वाचे सण, समारंभ दोन्ही कुटुंबे एकत्र येऊन जानकी राहत होती त्या घरातच साजरे व्हायचे. दुरावा असा कधी जाणवलाच नाही. सागर व पल्लवी अनुला माकू अशी हाक मारायचे. माकू म्हणजे मावशी-काकू चा शॉर्टफॉर्म. अनुलाही माकू हे नाव भारी आवडायचं. 

तर अनुचा फोन आल्याने तिने तो पटकन घेतला आणि अनु काही बोलायच्या आधी जानकीच बोलली, "अगं अनु, बरं झालं तू फोन केलास. मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. " अनु म्हणाली, "अगं हो हो, थोडा श्‍वास तर घे. मीही तुला, आज संध्याकाळी भेटूया का? हे विचारायलाच फोन केला आहे. पण काय महत्त्वाचं सांगायचय तुला? संध्याकाळ पर्यंत धीर धरवणार नाही बाई मला. तू आत्ताच सांग." जानकीलाही अनुजवळ मन मोकळं केल्याशिवाय राहवत नसे.


ती म्हणाली, "अनु झाडावर पिवळं पान दिसतय गं ! आता मी काही जगत नाही." 

हे ऐकताच अनुलाही आतून हलल्यासारखे झाले. तरी उसने अवसान आणून ती म्हणाली, "अगं ताई, अजुन पंचवीस वर्षे तरी तुला काही होणार नाही बघ! अगदी नेमाने योगा करतेयस. पथ्य पाळतेस. माझं ही आयुष्य तुला लागेल बघ." 

हे ऐकून जानकी ओरडलीच ."गप्प बस हं अनु !! काहीतरीच काय बोलतेय!! बरं तू संध्याकाळी पाच वाजता नेहमीच्या बागेत ये. तिथेच भेटू."

 अनु म्हणाली, "हो नक्की भेटू. जास्त विचार नको करूस त्या पिकलेल्या पानाचा. चल ठेवते फोन. स्वयंपाकीण बाईंना सूचना द्यायच्या आहेत." 

"भेटू मग " म्हणुन जानकीने फोन ठेवला. 

आज योगा क्लासमध्ये जानकीचं मन लागत नव्हतं. राहून राहून मनात निर्वाणीचे विचार येत होते. अशा विचारातच ती घरी आली.

दुपारची वामकुक्षी झाल्यावर तिने सहज खिडकीबाहेर नजर टाकली. पिकलेलं पान अजूनही तिथेच होतं. आता आपल्यासकटच ते जाणार याची तिला खात्री झाली. 

संध्याकाळचे चार वाजले होते. सुमन ऑफिसमध्ये आणि अनघा व अन्वी शाळेत होत्या. 

सागर आज ऑफिसमधुन लवकर घरी येऊन त्याच्या खोलीत ऑफिसचं काम करत बसला होता. संध्याकाळी सुमन आल्यावर ती दोघं एकत्रच चहा घेत. जानकीला मात्र लवकर चहा प्यायची सवय होती. 

तोंडावर पाणी मारून ती चहा घ्यायला खोलीबाहेर आली. पाच वाजता अनु भेटणार होती. चहा पीत असतानाच खोलीत मोबाईल वाजत असल्याचा आवाज आला. अनुचाच असेल! आता भेटण्याविषयीच असेल! चहा संपवून करते तिला फोन. असा विचार करून ती चहाचा घोट घेऊ लागली. 

तेवढ्यात सागर घाईघाईने त्याच्या खोलीबाहेर आला. "आई.. चल लवकर, आपल्याला निघायचंय." 

"काय रे ! काय झालं?" जानकीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

"आई ,धनंजय काकांचा फोन आला होता. माकूला हॉस्पिटलमध्ये नेलंय.तिला श्वास घ्यायला त्रास होत होता." 

"काय !!!! " जानकीची धडधड वाढली. 

"अगं आई, घाबरू नकोस. तुला माहित आहे ना!काका आणि सुजय माकूला किती जपतात. साधी शिंक आली तरी डॉक्टरांकडे नेतात तिला. तू ये बाहेर, मी गाडी काढतो. आपण निघूया."

 जानकीला काही सुचेना. ती फोन आणायला खोलीत गेली. धडधडत्या छातीने तिने खिडकीबाहेर पाहिलं. पिकलेलं पान गळून पडलं होतं. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ती लगबगीने गाडीत बसली. तिच्या मनात सारखे नकारात्मक विचार येत होते.अनुचे शब्द तिच्या कानात घुमत होते, 'माझंही आयुष्य तुला लागेल बघ.' मनातल्या मनात ती देवाला विनवणी करत होती, 'देवा माझ्या अनुला सुखरूप ठेव, देवा सुखरूप ठेव. माझं आयुष्य तिला दे पण तिला सुखरूप असुदेत देवा!!

गाडी हॉस्पिटलच्या आवारात पोहोचली. दोघेही हॉस्पिटलमधील receptionist ला विचारून एका private वॉर्डच्या दिशेने गेले. तिथे वॉर्डबाहेर मयुरी (अनुची सुन) उभी होती. धनंजय व सुजय डॉक्टरांना भेटायला गेले होते. मयुरीला पाहताच जानकी पटापट पावले टाकत तिच्यापाशी आली आणि तिने मयुरीला विचारले ,"कशी आहे गं अनु? अचानक काय झालं तिला??"

"अहो काय सांगू काकू!!कितीवेळा आईंना सांगितलंय, तेलकट - तुपकट खाऊ नका. तरी स्वयंपाकीणबाईंना सांगून आज सकाळी नाष्ट्याला बटाटेवडे बनवून घेतले. दुपारी मिरचीचा ठेचाही खाल्ला. या सगळ्याचा परिणाम जो व्हायचा तोच झाला. मी कार्यालयातून दुपारी तीन वाजता घरी आले, तेव्हा बाबा घाबरून खोलीबाहेर येताना दिसले. मला पाहताच ते म्हणाले..'मयुरी..बघ ना! अनु कसं करतेय. तिला नीट श्वास घेता येत नाहीय.' मी आईंना थोडं पाणी प्यायला दिले. आणि सुजयला फोन करून हॉस्पिटलमध्येच यायला सांगितलं. मी व बाबांनी, आईंना हॉस्पिटलमध्ये आणलं. डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं आहे. झोपल्या आहेत त्या आता."

"डॉक्टर काय म्हणत आहेत मयुरी?" सागरने विचारले. तेवढ्यात धनंजय व सुजय तिथे आले. त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव नव्हते, तर हायसे वाटल्यासारखे त्यांचे चेहरे वाटत होते. त्यांनी येताच जानकीकडे आश्वासक दृष्टीने पाहून सगळे नीट असल्याची ग्वाही दिली. सागरने काकांना व सुजयला परत तोच प्रश्न विचारला, "काय म्हणाले डॉक्टर?"

 सुजय म्हणाला, "डॉक्टर म्हणाले, एसिडिटी वाढल्यामुळे आईला श्वास घ्यायचा त्रास झाला. खाण्यामध्ये अपथ्य झाल्याने असं झालंय म्हणाले. " 

धनंजयही म्हणाला,"खूप घाबरून गेलो होतो रे मी..वाटलं अनुला गमावून बसतो की काय मी. "

तेवढ्यात जानकी म्हणाली,"भाऊजी, तुम्ही असं बोलू नका. अनुला काही होणार नाही. बरं आता डिस्चार्ज कधी देणार आहेत तिला?" 

"अजून एक तास under observation ठेऊन घरी सोडणार आहेत." सूजय म्हणाला. 

"भाऊजी, अनुला मी थोडे दिवस माझ्याकडे नेईन म्हणतेय. तुम्ही दोघांनीही आता पथ्याकडे लक्ष दिले पाहिजे. या गोष्टीकडे मी आता कटाक्षाने लक्ष देणार आहे."

 "हो वहिनी, आजच्या या घटनेनंतर मलाही पथ्याचं महत्व समजलंय. आता मात्र तुमच्यासारखे आम्हीही योगा क्लास जॉईन करणार आहोत आणि जेवणात सुद्धा पथ्य-पाणी पाळणार आहोत." हे ऐकताच सुजय व मयुरीच्या चेहर्‍यावर समाधानाचे हसू पसरले. 

जानकी, अनु व सागर घरी आले. घरी सुमन व मुली या सर्वांची वाटच बघत होते. सागरने आधीच फोन करून सुमनला जे घडलं त्याची कल्पना दिली होती. तिने सगळ्यांसाठी वरण भात व मेतकूट असा साध्या आहाराचा बेत केला होता. गरम गरम जेवून अनु व जानकी खोलीत आल्या. 

"किती घाबरवलंस अनु आज!! मला वाटलं..." जानकी बोलता बोलता थांबली. 

अनु म्हणाली "काय वाटलं? की मी तुम्हाला सगळ्यांना सोडून जाणार..असं??"

 जानकी परत तिला ओरडली "गप्प बस गं अनु !! परत कधी..कधी असं बोलू नकोस. 

"हो गं बाई !! नाही बोलणार..पण तू आतातरी ते पिकलेल्या पानाचं खुळ डोक्यातून काढलंस!! की अजून तोच विचार करतेयस?"

"नाही गं अनु ..खरच ते खुळच होतं बघ.. सासूबाईंनी सांगितलं आणि त्याच दृष्टिकोनातून मी या झाडाकडे बघितले. खरं तर हा सदाबहार जातीचा वृक्ष आहे. या झाडाची पाने क्वचितच गळतात. वसंता गेल्यानंतर माझं या झाडाकडे कधी लक्षच नव्हतं. सतत स्वतःला कोणत्या ना कोणत्या चांगल्या कामात व्यग्र ठेवलेले. त्या दरम्यान या झाडाची पाने पिकली असतील, गळलीही असतील. माझं लक्षही नव्हते गं !! पण त्या दिवशीच्या वाईट स्वप्नामूळे व नेमके त्याच दिवशी दिसलेल्या पिकलेल्या पानामूळे हा घोळ झाला. पुरोगामी विचारांची असूनही मरणाची भीती जशी प्रत्येकाला वाटते तशीच ती मलाही वाटली..पण आता या झाडाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललाय माझा. हे झाड जसे सदाबहार आहे तसेच मीही स्वतःला सदाबहार ठेवेन आणि माझ्या आसपासच्या माणसांना ही मी सदाबहार जगणं जगायला शिकवेन." जानकीच्या चेहर्‍यावरचा दृढ़निश्चय बघून अनु आनंदाने म्हणाली, "ये हुई ना बात!!"

जानकी म्हणाली.."चला आता झोपूया. उद्या लवकर उठून योगा क्लासला जायचे आहे. "

अनु म्हणाली..हो नक्कीच!!

समाप्त

वरील कथा जया पवार यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

 

Post a Comment (0)
Previous Post Next Post