दिपावली मनायी सुहानी
✍️ सौ.हेमा पाटील.
जसजशी दिवाळी जवळ येऊ लागली तसतश्या सगळीकडे दिवाळीच्या बाबतीतील जाहिराती दिसू लागल्या. एवढेच काय फेसबुक, इंस्टावर पण दिवाळीबाबतचेच लिखाण, फोटो समोर येऊ लागले. थोडक्यात काय तर दिपावलीचा फिवर सगळीकडे पसरला होता. या फिवरला बळी पडणार नाही तर ती वैशाली कसली ! सकाळी उठल्यावर पहिल्यांदा हातात मोबाईल घेऊन आज की ताजा खबर फेसबुक व इंस्टावर पाहिल्याशिवाय ती बेडवरुन अजिबात खाली उतरत नसे. तिचा तो नेमच होता म्हणा ना ! बाकीचे जग सकाळी उठल्यावर जगभरातील बातम्या ऐकते, पण वैशालीला बाकीच्या जगातील घडामोडींशी काहीच देणेघेणे नव्हते. ती पूर्णपणे फेसबुकी किडा बनली होती. तर...सांगायचा मुद्दा हा आहे की, रोज रोज पाहून अन् वाचून हम भीं इस साल जोरशोर के साथ दिपावली मनायेंगे असे वैशालीच्या मनाने घेतले.
यासाठी आता काय करायचे याचाच आराखडा डबा बनवताना तिच्या डोक्यात होता. नवऱ्याने तिला एकदा टोकले पण, की काय शिजतेय डोक्यात! आज एवढ्या अबोलपणे स्वयंपाक बनवणे सुरु आहे... खरंच आपला नवरा आपल्या मनातील गोष्टी पण ओळखतो याबद्दल तिला पुन्हा एकदा अभिमान वाटला. पण तरीही तिने आपला अबोला सोडला नव्हता, कारण मनात अजून पूर्ण आराखडा तयार झाला नव्हता. तो तयार झाल्याशिवाय समोरच्याला काय अन् कसे सांगायचे?
दोघांचेही डबे भरून तिने डायनिंग टेबलवर आणून ठेवले. प्रशांतसाठी व स्वतःसाठी ब्रेकफास्टला बनवलेला उपमा डिश मध्ये काढून ती ही प्रशांतसोबत जेव्हा डायनिंग टेबलवर खुर्चीत बसली तेव्हाच प्रशांतला जाणवले की आता सकाळपासून जे वादळ मनात घोंघावत होते ते आता बाहेर पडणार आहे, त्यामुळे तो ही कान सरसावून बसला.
"ऐ हनी, ऐक ना" !
"बोल बोल.मी ऐकतोय". असे मोबाईल वरील आपले लक्ष न हलवता तो म्हणाला.
"ऐ बेबी,इकडे बघ ना ! तो मोबाईल जरा ठेव बघू बाजूला"!
आता बेबी हे संबोधन आले म्हणजे जाम लोच्या आहे हे प्रशांतला समजले. पण त्याचे आपल्या बायकोवर नितांत प्रेम होते, त्यामुळे तिकडे दुर्लक्ष करत त्याने आपला मोबाईल बाजूला ठेवला व तिच्या डोळ्यांत डोळे घालून तो म्हणाला, "बोला राणीसरकार! काय हुकूम आहे"!
"आज संध्याकाळी तुला ऑफीसमधून जरा दोन तास लवकर येता येईल का ?"
"का गं? काही विशेष ?"
"अरे बघ ना ! दिवाळी कित्ती जवळ आलीय.दिवाळीची तयारी केली पाहिजे ना.. तर मी म्हणत होते की, आज आपण दिवाळीच्या खरेदीला जाऊयात. मला तू ऑफीसमधून कलेक्ट करशील अन् मग आपण माॅलमध्ये जाऊ. दिवाळीचे सामान घेऊ अन् बाहेरच जेवून मग घरी येऊ".
"तुझे प्लॅनिंग खूप छान आहे, पण आमच्या कंपनीने दिवाळीपूर्वी जे टार्गेट ठरवलेय ते पूर्ण करण्यासाठी आम्हांला रोजच उशीरपर्यंत थांबावे लागतेय हे तू पहातेच आहेस रोज ! त्यामुळे तुझ्याच एखाद्या मैत्रिणीला घेऊन जा तू खरेदीला. अन् तशीही दिवाळीची खरेदी ही तुम्हां बायकांची मक्तेदारी. मी येऊन बोअरच होणार .
ते तुमचे भाजके पोहे घ्यायचे का दगडी पोहे.. अन् उटणे कुणाचे यावरच्या चर्चेत मला अजिबात स्वारस्य नाही.सो.. तुझी तूच जा. हे माझे कार्ड ठेव. यावरुन दर महिन्यांपेक्षा जास्त खरेदी केली तर पाॅईंटस् जमा होणार आहेत. त्यामुळे दिवाळीची खरेदी यावरुन कर."
यावर प्रशांत येत नाही म्हणून हिरमुसलेली वैशाली खरेदीचे नाव निघताच उत्साहित झाली. बहुतांशी महिलांचे खरेदी म्हणजे टाॅनिक असते. वैशालीही याला अपवाद नव्हती. प्रशांतचे कार्ड आपल्या पर्समध्ये टाकून आपला डबा घेऊन ती प्रशांतसोबत ऑफीसला जाण्यासाठी बाहेर पडली. ऑफीसमध्ये गेल्यावर तिने संगीताला फोन केला.
"अगं तुझी दिवाळीची खरेदी झाली का ?" यावर ती म्हणाली, "अगं, मी अॅमेझाॅन वरुनच मागवलेय सामान. त्यांचा सध्या सेल सुरु आहे ना !"
यावर तिने पुढे काहीच न बोलता फोन कट केला. पण दिवाळीसाठी ही ऑनलाईन खरेदीची संकल्पना तिला मानवत नव्हती. एरव्ही सगळे सामान, भाजी, कपडे ऑनलाईनच घरी येत होते. पण दिपावलीचा खरा आनंद स्वतः जाऊन पारखून सामान खरेदी करताना एकेका वस्तूंवर हात फिरवून ती वस्तू घेण्यात आहे असे वैशालीला वाटायचे. त्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींच्या खरेदीतून आपल्याला जो आनंद मिळतो तो आनंद दिपावली साजरी करेपर्यंत टिकून रहातो असे तिचे स्पष्ट मत होते. बालपणीची साजरी केलेली दिपावली आजही तिच्या मनात स्मृतींच्या रुपाने जिवंत होती. मग तिला लीना आठवली. तिने लगेच लीनाला फोन लावला. इकडची तिकडची चौकशी करून झाल्यावर दिपावलीची खरेदी केली का असा प्रश्न वैशालीने विचारला. यावर लीनाने सांगितले, "नाही अजून! या एकदोन दिवसांत जाणार आहे".
यावर वैशाली म्हणाली, "आज संध्याकाळी जाऊयात का? मलाही खरेदी करायचीय."
लीनाने होकार दिला. मग कुठे किती वाजता भेटायचं यांचे दोघां मैत्रिणींमध्ये प्लॅनिंग झाले अन् वैशालीने फोन ठेवला.
संध्याकाळी शार्प सहा वाजता दोघीजणी माॅलच्या समोर भेटल्या. एकमेकींच्या गळ्यात गळे घालून दोघींनी आपल्या भेटीचा आनंद व्यक्त केला. मग दोघींनीही आपला मोर्चा माॅलकडे वळवला. दोघींचीही लग्नानंतरची ही पहिलीच दिवाळी होती.
आधी किराणामालाकडे दोघी वळल्या. तिथे प्रशांत म्हणाला तसे दोघींमध्ये खरेच कन्फ्यूजन सुरु झाले. दगडी पोहे म्हणजे काय हे बिचाऱ्या दोघींच्या ही गावी नव्हते. मग मोबाईल झिंदाबाद! मोबाईलवर दगडी पोह्यांबाबतची माहिती सर्च केली अन् सगळ्याच पोह्यांची माहिती घेऊन व फेसबुकवर चे फोटो पाहून शेवटी पातळ पोहे सिलेक्ट केले अन् ते सर्वात आधी बास्केटमध्ये जाऊन बसले. मग असेच एकेक करत सर्व किराणामालाची खरेदी झाली. बील करायला काऊंटरवर गेल्यावर तिथे नवनवीन साबण, सुगंधित तेले ठेवलेली पाहून त्याचीही खरेदी केली.बील पे केले अन् सामानाची पिशवी घेऊन त्या दोघी काऊंटरवरुन बाजूला झाल्या तेवढ्यात माॅलमधील कस्टमर केअर युनिट असा छातीवर छापील बिल्ला असलेला गणवेशातील कर्मचारी त्यांच्याकडे आला.
" Hii mam. Good evining".
"दिवाळीची सगळी खरेदी झाली का?"
यावर दोघींनीही होकारार्थी मान हलवली.तो म्हणाला , "सगळी कुठे झाली मॅम? दिपावली साठी नवीन बेडशीट पिलो कव्हर घेतलेच नाही तुम्ही! आपल्याकडे आज दुपारीच नवीन स्टाॅक आला आहे. बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडले तरच खरेदी करा. आणि दिवाळीनिमित्त भरघोस डिस्काउंट आहे."
हे ऐकल्यावर दोघींनी एकमेकींकडे पाहिले. अन पाहून तर येऊया असे दोघींच्या मनातील विचार त्यांच्या डोळ्यात उमटले. ते समोरच्या अनुभवी सेल्समनला बरोबर समजले. तो म्हणाला," मॅम,तुमच्या या सामानाच्या बॅगज् त्या समोरच्या काऊंटरवर ठेवा. ते एक बिल्ला देतील. परत आल्यावर तो बिल्ला दाखवला की बॅगज् मिळतील. हे ओझे वागवत तिकडे जायला नको".
हे ऐकून दोघींनाही हायसे वाटले. दोघींनी बॅगा ठेवल्या व बेडशीटस् पहाण्यासाठी गेल्या. तिथली बेडशीट दोघींनाही खूप आवडली. दोघींनीही चार चार सेटस् घेतले. सोबतच पडदेही मनात भरल्याने त्याचीही खरेदी झाली. त्याचे बील कार्डवरुन पे केले. प्रशांतला मोबाईलवर बील पे केले की मेसेज जात होता. त्याला समजले की आपल्या प्रिय पत्नीची खरेदी सुरू झाली आहे...
बेडशीट घेतल्यानंतर पुन्हा मागचीच पुनरावृत्ती झाली. तिथे मात्र लेडीज कर्मचारी त्यांच्याकडे आली. तिने सांगितले, "मॅम,साडी विभागाकडे तर तुम्ही फिरकलाच नाहीत ! खास दिपावलीसाठी काठपदराच्या साड्या व पैठणीचे सुंदर कलेक्शन आपल्याकडे आहे. आपल्याकडे असणाऱ्या किंमतीत तुम्हांला कुठेच असे कलेक्शन भेटणार नाही. ऑनलाईन पेक्षाही कमी किंमतीत आम्ही रेट लावले आहेत. आपण पाहून तरी या. खरेदी केलेच पाहिजे असे काही नाही."
हे ऐकल्यावर बायकांची पावले तिकडे वळली नसती तरच नवल झाले असते ! दोघींना आता समजले होते, त्याप्रमाणे बेडशीटच्या बॅगा तिथल्या काऊंटरवर ठेवून तिथला बिल्ला घेऊन त्या साडी विभागात शिरल्या.
साडी विभागाचे एक वैशिष्ट्य आहे. इथे आत शिरताना बायका अगदी कूल असतात, पण एकदा आत शिरले की त्यांच्या अंगात काय संचारते माहीत नाही, त्या विभागातील अगर दुकानातील प्रत्येक साडी आपल्या नजरेखालून गेलीच पाहिजे असे त्यांना वाटू लागते. कधी कधी तर सेल्समन चांगल्या साड्या मुद्दामच आपल्याला दाखवत नाही असे त्यांना वाटते व स्वतः उठून त्या सेल्समनला ही साडी दाखवा, ती काढा असे फर्मान सोडतात. समोर साड्यांचा इतका ढिग लागतो की आपल्याला आवडलेली साडी त्या ढिगात कुठेतरी गुडूप होऊन जाते आणि त्या महिला तो ढीग ती साडी शोधण्यासाठी वरखाली करत रहातात. पण इतक्या साड्या पाहिल्यामुळे बऱ्याचदा कुठली साडी आवडली होती याबाबत महिला गोंधळून जातात अन् मग अजूनच साड्या वरुन काढायला लावतात. तर या दोघां मैत्रिणींची ही अवस्था यापेक्षा वेगळी नव्हती. खूप वेळ संशोधन करुन, एकमेकींच्या अंगावर साड्या टाकून, "ही छान आहे" असे म्हणत ती आपल्या खांद्यावर टाकून आरशासमोर उभे राहिल्यावर नाक मुरडत, "शी बाई ! तुझ्या अंगावर छान दिसली, पण माझ्या अंगावर उठून दिसेना" असे म्हणत ती साडी पुन्हा ढिगावर भिरकावून, "भैय्या, वो निकालो " असे बराच वेळ चालू होते. शेवटी एकीने पैठणी तर दुसरीने नारायण पेठी घेतली. यासोबतच कधीमधी छोट्या कार्यक्रमात घालण्यासाठी सिल्कच्या दोन साड्या, कधीही वापरता याव्यात अशा चार साड्या दोघींनीही घेतल्या. बील पे केल्यावर प्रशांतला मेसेज गेला. तो पाहून त्याने डोक्यालाच हात लावला. आजची खरेदी आता तरी आपल्या प्रिय पत्नीने आवरती घ्यावी म्हणून त्याने वैशालीला फोन केला. "झाली का खरेदी"?
वैशालीने सांगितले, "बऱ्यापैकी उरकलेय."
यावर प्रशांत म्हणाला, "येऊ का तुला घ्यायला?"
यावर वैशाली म्हणाली, "माझ्यासोबत लीना आहे. आम्ही दोघी आता इथेच काहीतरी खाऊन मग कॅब करणार आहोत. त्यामुळे तुझे काम आटपले की तुझा तू घरी जा. तुला काय हवे आहे त्याची स्विगी वरुन ऑर्डर टाकू का?"
यावर प्रशांत म्हणाला, "नको. माझे मी पहातो. पण लवकर आटपा."
यावर होकार भरत तिने मोबाईल पर्समध्ये टाकला. इथे कुणी सेल्समन समोर आला नाही, पण प्रशांतचा फोन आल्यामुळे तिच्या लक्षात आले की आपण त्याच्यासाठी काहीच खरेदी केले नाही. हा विचार तिने लीनाला बोलून दाखवला अन् ती म्हणाली, "आपण किती सेल्फीश आहोत.. आपल्या नवऱ्यासाठी काही घ्यावे हे आपल्या डोक्यात आले नाही."
यावर लीना म्हणाली, "हो गं.. आपण त्यांच्यासाठी पण खरेदी करुयात. पण आपण ज्या साड्या खरेदी केलेत त्यावर मॅचिंग कपडे त्यांच्यासाठी घेऊयात."
लीनाचा प्लॅन वैशालीला खूप आवडला. मग साड्यांच्या पिशव्या सांभाळत त्या दोघीजणी जेन्टस् विभागात शिरल्या. आधी महावस्त्रावर शोभेचे सूटस् दोघींनी बाजूला काढले. मग एम्ब्राॅयडरी असलेली शेरवानी, मग साधा झब्बा, टीशर्टस् अन् जीन्सवर त्यांची खरेदी थांबली. पण तिथे जीन्स विभागात लेडिज अन् जेन्टस् अशा दोघांसाठीही जीन्स होत्या. त्यामुळे लागलीच स्वतः साठीही जीन्स आणि टिशर्टची खरेदी त्यांनी केली. कारण दिवाळीच्या सुट्टीत दोन दिवस बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅनिंग डोक्यात घोळत होतेच! मनासारखी खरेदी झाल्याने अगदी तृप्त होऊन त्यांनी बाहेर पिझ्झा मागवला अन् त्याचा आस्वाद घेऊ लागल्या. शेवटच्या बिलाचा मेसेज जेव्हा प्रशांतला पोहोचला तेव्हा तो घरी बसून स्वतः बनवलेली मॅगी खात होता. शेवटच्या बिलाचा आकडा पाहून त्याने चमच्यात घेतलेली मॅगी चमचासह खाली प्लेटमध्ये कधी गळून पडली तेही त्याला समजले नाही.
अर्ध्या तासात सर्व खरेदीच्या बॅगा सांभाळत वैशाली घरी पोहोचली तेव्हा प्रशांत डोक्याला बाम लावून बेडवर आडवा झाला होता. आल्यावर तिने प्रशांतसमोर सगळ्या पिशव्या ठेवल्या व आतील एकेक वस्तू काढून ती प्रशांतला दाखवू लागली.
खरेदीचे पण एक वैशिष्ट्य असते. ते म्हणजे खरेदी करताना जेवढा आनंद मिळत नाही तेवढा आनंद ती खरेदी इतरांना दाखवण्यात होतो. प्रशांतपुढे "व्वा व्वा ! खूप सुंदर, छान, हे तुला खूप छान दिसेल... माझी चाॅईस तुला अगदी करेक्ट माहीत आहे.. वाॅव अशा टिशर्टची सध्या क्रेझ आहे... असे उद्गार काढण्यावाचून त्याच्यापुढे पर्यायच नव्हता. कार्डवरील एकूण लाखभर रुपये दिपावलीसाठी खर्च झाले याचा हिशोब खरेदीच्या नादात वैशालीने केला नव्हता. पण त्याच्या कार्डवरुन अमाऊंट कट झाली असल्याने त्याला मात्र ते आकडे स्वतःभोवती गोलगोल फिरत असल्याचे जाणवत होते. पण आपली लग्नानंतरची पहिलीच दिपावली आहे, त्यामुळे त्याने वैशालीला टोकले नाही. पण इथून पुढे खरेदीला तिला एकटीला कधीच पाठवायचे नाही असा निश्चय मात्र त्याने मनाशी केला.
समाप्त
वरील कथा सौ. हेमा पाटील यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.