परिणाम

 परिणाम 

✍️ सौ.हेमा पाटील.

 "ए...क्या बोलती तू"..

ही आकाशच्या तोंडून आलेली गाण्याची ओळ ऐकताच निवांतपणे झाडाखाली बसलेल्या राजीने त्वेषाने जवळ पडलेला खराटा उचलला अन् आकाशच्या अंगावर धावून गेली. आकाशला पळता भुई थोडी झाली. त्याला वाटले होते, राजी गाण्याची पुढची ओळ म्हणेल. मग आपण आमीर खान सारखी माचीसची पेटती काडी जीभेवर फिरवू.. पण भलतेच झाले. राजीच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला तो काही थांबायचे नाव घेईना, "आरं थांब की दाज्या.... सांगते की तुला काय बोलती ते ! का पळायलायस कोंबडी वानी".. 

मुंबईत राहणारा आकाश सुट्टीत मामाच्या गावाला आला होता. ग्रामीण भागात मामाची मुलगी भाच्याला देण्याची पद्धत आहे. त्यामुळे साधारणपणे वय मॅच होणाऱ्या मुलामुलींना गावाकडे सगळेच चिडवतात. कधी कधी योग असेल तर तसे घडतेही ! पण बऱ्याचदा फक्त चिडवण्याचा व त्याप्रमाणे कल्पनेत रमून स्वप्ने बघण्याचा आनंद घेतला जातो. अनेकदा मुलगा, मुलगी यांपैकी कुणीतरी एक समोरच्याला मनोमन आपला जोडीदार म्हणून मानायला लागते. दोघांचीही इच्छा आहे असे जाणवले तर कुटुंबातील कुणीतरी मोठी व्यक्ती यात पुढाकार घेऊन त्यांचे लग्न ठरवते. पण जर एकाचीच इच्छा असेल तर ते शक्य होत नाही. मग समोरच्याचे लग्न होईपर्यंत वेडे मन उगाचच वाट पहात रहाते अन् त्यानंतर मात्र परिस्थितीचा स्वीकार करून स्वप्नरंजन थांबवते.

असेच काहीसे आकाश आणि राजीच्या बाबतीत घडत होते. आकाश आणि राजीला सगळे चिडवत असत. आकाशला राजी आवडायची पण राजीला आकाशचा टपोरीपणा अजिबात आवडायचा नाही. काय ते भडक रंगीबेरंगी कपडे, तोंडात कायम उपडी केलेली माव्याची पुडी अन् भाषाही मवाली ! तो गावी आला की कायम तिच्या अवतीभवती वावरायचा. हे पाहून तर तिचा मस्तकशूळ उठायचा. पण एकुलत्या एका आत्तीचा मुलगा असल्याने त्याची सरबराई तिला करावी लागे. पण त्याच्या इशाऱ्यांना ती कधीच प्रतिसाद देत नसे. आज तर त्याच्या गाण्याची ओळ कानी पडताच ती चवताळूनच उठली होती.

सांजच्यापारी कडुसं पडताना आई जेव्हा रानातनं घरी आली तेव्हा तिने आईला विचारले, "आकाशदाजी अजून किती दिवस रहानार हाय इथं ?" आई म्हणाली, "का गं..सुट्टीला आलेती ! राहुंदे की निवांत. शेरात असती का इथल्यावानी मोकळी हवा! तुज्या का पोटात दुकाय लागलं..." आता यावर काय बोलायचं म्हणून राजी गप्पच बसली.

चार दिवसांनी आत्ती, मामा अन् वनिता पण गावी आले. वनिताचे अन् राजीचे गुळपीठ मस्त जमायचे. त्यामुळे वनिताला पाहून तिला आनंद झाला. पण वनिताने तिला कानात जे गुपित सांगितले ते ऐकून तिच्या काळजाने ठावच सोडला. आत्ती अन् मामा आकाशच्या अन् तुझ्या लग्नाची बोलणी करायला आले आहेत हे गुपित ऐकून राजी खुश होईल असे वनिताला वाटले होते. पण तिचा पडलेला चेहरा पाहून ती विचारात पडली. "तुला आकाशदादा आवडत नाही का"? असे वनिताने विचारले. यावर काय उत्तर द्यावे हे राजीला समजेना.

आई एकटी कधी भेटतेय याची राजी वाट पहात होती. आईला परड्याकडे गेलेली पाहून ती पण मागे गेली. आईला आधीच सांगितले की आई आकाशला नकार देईल अशी भाबडी आशा तिच्या मनात होती. तिने वनिताने जे सांगितले ते आईला सांगितले. पुढे ती बोलायला सुरुवात करणार तर आई आनंदी स्वरात म्हणाली, "खऱं का काय हे राजे?"  तिने मान हलवली. त्याबरोबर आईने तिच्या तोंडावरून प्रेमाने हात फिरवला व "माझ्या राजीनं नशीब काढलं बया.." असे म्हणाली.

ते ऐकताच राजीच्या मनातील उरलीसुरली आशा पण कोमेजून गेली. आईची आनंदात चाललेली बडबड थांबवत राजी म्हणाली, "ऐ आये... मला नाय करायचं दाजीबंर लगीन!"  ते ऐकून आई म्हणाली, "का गं, भिकंचं ढव्हाळं लागलेती व्हय तुला ? पोरगा एकुलता एक हाय, मम्हईत सोत्ताची रुम हाय, नात्यातलं बघन्यातलं पोरगं हाय आनी काय होवं? सोत्ताच्या पायाखाली काय जळंतय बघितलयंस का कदी? शेतीत राबराबून हाडाची काडं करण्यापरीस हे ब्येस हाय."

आई आपले ऐकत नाही हे समजून राजी हिरमुसली अन् मुकाट्याने घरात येऊन चुलीला जाळ घातला व पातेल्यात भात करायला तांदूळ धुऊन पातेले चुलीवर ठेवले. पातेल्यात तांदूळ रटरट करत होते अन् राजीच्या मनात जाळ धगधगत होता. तेवढ्यात आत्ती घरात आली. "राजे जरा चहा ठेव की", असे म्हणाली. म्हणून राजीने रटरटणार्या भाताचे पातेले वैलावर ठेवले व चुलीवर चहा ठेवला. आत्ती तिथेच शेजारी येऊन बसली. बोलता बोलता आत्तीने विषय काढला, "राजे, आमच्या सोबत मु़ंबईला येतीस का?"

राजी म्हणाली, "मला नाय आवडत मम्हई ! त्या खुराड्यात मला करमत न्हाई. रानात मोकळ्या अंगाऩं फिराची सव़ं हाय मला. चार सालापूर्वी आले होते की."

"अगं पण आता तुला मुंबई आवडून घ्यायला लागेल. कारण परत तुला कायमचेच तिकडे यायचेय. मानसं मुंबईत जायला मिळावे म्हणून धडपडतात. कारण मुंबई ही जीवनदायिनी आहे. कुणीही मुंबईत गेले तर त्याला उपाशी राहू देत नाही मुंबई."

"पण हतं तरी मी कुटं उपाशी हाय ! ही काळी आय कुठं आमास्नी उपाशी ठेवती?" असे राजी म्हणाली. यावर आत्ता काहीच न बोलता गप्प झाली.

चहात दूध घालून राजीने गाळला व सर्वांना दिला. उरलेल्या चहाचे पातेले उतरुन ठेवले व वांग्याचे कालवण चुलीवर घातले व ती शांतपणे जाळाकडे बघत बसून राहिली.

रात्री जेवणखाण झाल्यावर अंगणात सगळ्यांची हतरुणं राजीनं टाकली. तिथे सगळ्यांच्या गप्पाटप्पा सुरू झाल्या. वनिता मुंबईतल्या शाळेतील गमतीजमती राजीला सा़ंगत होती. शेजारीच दाद्या बसला होता. आई सगळी झाकापाक आटपून तिथे येऊन बसली. अन आत्तीनं हळूच विषय काढला. "वैनी..मी काय म्हणतेय."

"बोला की बत्ताशाबाई."

"आपली राजी आता लग्नाला आली. बाहेर कुठं देण्यापेक्षा आमच्या आकाशला करुन घ्यावी अशी आमची इच्छा आहे. वैनी, तुझं काय मत आहे?"

हे ऐकून राजीच्या आईला आनंद झाला. ती म्हणाली, "व्हय..माझ्या मनातलं बोललास बगा."

पण हे ऐकून दाद्या अस्वस्थ झाला. तो म्हणाला, "काय गडबड हाय यवढी राजीच्या लग्नाची ! तिला तीचं शिक्षन तर करु दे.'

आई व आत्ती दोघी बी एकाचवेळी म्हणाल्या, "काय करायचं हाय शिकून ! भाकरीच थापायचेत नव्हं! मग उरकून टाकू या लगीन."

पण दाद्याऩं आल्यापासून आकाशचे काय चालले आहे हे बारकाईने पाहिले होते. त्याला आपल्या बहिणीसाठी नवरा म्हणून आकाश अजिबात पसंत नव्हता. दाद्याचं बोलणं ऐकून राजीच्या मनातील आशेला पालवी फुटली. तेवड्यात त्याने डायरेक राजीला विचारले, "व्हय गं राजे ! तुझं काय मत हाय ? तुला लगीन करायचं हाय का कालेजात शिकायच़ हाय..!"
यावर राजी म्हणाली, "दाद्या,मला नाय लगीन करायचं. मला शिकायचं हाय."

हे ऐकून राजीची आई म्हणाली, "पोरीच्या जातीला काय करायचं हाय शिकून! झालं तेवडं पोटापुरतं लै झालं ! बाईंनं काय दिवं लावायचं त्ये चुलीपाशी लावायचं."

यावर दाद्या चिडून म्हणाला, "एक बाई आपल्या देशाची प़ंतप्रधान किती वरसं होती सा़ंग मला".

आई म्हणाली, "त्ये़ंंची गोष्ट निराळी. ती मोठी मानसं. आपुन हातावरचं पोट असणारी मान्सं.."

यावर दाद्या म्हणाला, "मी राजीच़ं सगळं शिक्षन पुऱं करुन तीला नोकरी लागल्याबिगर तीचं लगीन करु देणार न्हाई म्ह़जे न्हाई."

हे ऐकून आत्तीला राग आला. पण दाद्या योग्य तेच बोलत असल्याने तिला पुढे काहीच बोलता येईना. जबरदस्ती करता येईना.     

राजीच्या आईला लेकीला चा़ंगले चालून आलेले स्थळ या दाद्यापायी हातचे जातेय याचं वाईट वाटले. पोरगी मम्हईला असती असा पावन्यारावळ्यात तोरा मिरवता आला असता. पण यो दाद्या ऐकंनाच... बापाच्या माघारी आता घराची सगळी जबाबदारी त्यानंच घेतलेली असल्याने ती मुकाट्याने गप्प बसली.

आकाशच्या चेहऱ्यावर आपल्याला नाकारले गेल्यामुळे रागाची भावना धुमसत होती. त्याच्या मनात रुतून बसलेली राजी त्याच्या हातात येता येता बाजी पलटली होती याचे त्याला दुःख झाले होते. पण लग्नाच्या बाबतीत जबरदस्ती करता येत नाही म्हणून तो गप्प बसला होता.

  वनिताला मात्र दाद्याचे बोलणे शंभर टक्के पटले होते. राजी आपली वैनी झाली असती तर तिला खूप आवडले असते. पण दाद्याचे बोलणे ऐकून तीही आपल्या भविष्याचा विचार करु लागली. मुलींनी शिकले पाहिजे, स्वतः च्या पायावर उभे राहिले पाहिजे हे तिच्या मनावर चांगलेच बिंबले.

आपल्या लग्नाच्या विषयाला आपल्या दाद्यामुळे खो मिळालेला पाहून राजीला खूप आनंद झाला. त्या आऩंदात मश्गूल होऊन ती अंथरुणावर पडल्या पडल्या आकाशातील चा़ंदण्या़ंचे चमचमते रुप पाहून आपणही शिकून सवरुन या चा़ंदण्यांसारखे स्वतः च्या अस्तित्वाच्या प्रकाशात चमचमत स्वतः चे हक्काचे स्थान निर्माण करु अन् त्यानंतर आपल्याला साजेशा मुलाशी लग्न करु अशा स्वप्नात रमली.

अन् दाद्या आपल्या बहिणीवर होणारा अन्याय टळला म्हणून खुश झाला होता. एकाच निर्णयाचा सर्वांच्या मनावर होणारा परिणाम मात्र भिन्न भिन्न होता.

समाप्त

एक सुंदर कथा ऐकण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा.




वरील कथा सौ. हेमा पाटील यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

1 Comments

Post a Comment
Previous Post Next Post