नास्तिक

नास्तिक

✍️ मिलिंद अष्टपुत्रे 

संध्याकाळचे पाच वाजले होते. सुमित्राला आज जरा उशीरच झाला होता. घरी चिवड्याचा घाट घातल्याने वेळ कसा गेला ते तिला समजलेच नव्हते. साडेपाचला मठात स्वामींचे प्रवचन सुरू होईल हे लक्षात येताच सुमित्रा पटकन उठली आणि स्वयंपाकघरात आवराआवर करू लागली. साडी बदलून तिने पायात चपला सरकवल्या आणि गॅलरीत बसलेल्या सासूबाईंना सांगून ती भरभर जिना उतरू लागली.

मठात पोहोचेपर्यंत साडे पाच वाजलेच. " शी .... प्रवचनाची सुरवात चुकणार. " असं स्वतःशीच पुटपुटत सुमित्रा चप्पल स्टँडवर पोहोचली. चपला काढून स्टँडवर ठेवत असतानाच तिला तो दिसला. चप्पल स्टँड शेजारील आंब्याच्या झाडाला टेकून तो बेदरकारपणे उभा होता. येणार्‍या जाणार्‍यांकडे भेदक नजरेने बघत आणि एका हाताने आंब्याच्या झाडांची पाने चुरगाळत तो अस्वस्थपणे चुळबुळ करत होता . क्षणभर सुमित्रा थबकली ! होय नचिकेतचं होता तो !! तिच्याकडे त्याचं लक्ष नव्हतं. चटकन त्याच्याकडे पाठ करुन सुमित्रा प्रवचनाच्या हॉल कडे निघाली. 

" हा काय करतोय इथे ? " सुमित्रा स्वतःशीच पुटपुटली. 

प्रवचन सुरू होऊन पाच-सात मिनिटे झाली होती. स्वामींचा शांत स्वर हॉलमध्ये घुमत होता. श्रोते चित्रासारखे स्तब्ध बसून ऐकत होते. आजचे प्रवचन 'कठ' उपनिषदांवर होते. स्वामी बोलत होते, 

" फार प्राचीन काळी एका अत्यंत श्रीमंत मनुष्याने एकदा एक विशिष्ट यज्ञ केला. त्या यज्ञात यजमानाने आपल्या सर्वस्वाचे दान केले पाहिजे असा विधी होता. परंतु आपला हा यज्ञकर्ता असावा तितका प्रामाणिक नव्हता. कोणालाही काडीमात्र उपयोग होणार नाही अशा वस्तू तो दान करीत होता. त्याचा मुलगा तिथेच शेजारी बसला होता. त्याचे नाव नचिकेत ! " तल्लीनतेने ऐकणारी सुमित्रा एकदम दचकली. स्वामी पुढे बोलू लागले, 

" तर हा नचिकेत आपल्या पित्याचे हे वर्तन पाहून अत्यंत दुःखी झाला. नम्रपणे वडिलांकडे येऊन त्याने त्यांना विचारले, 

" बाबा, तुम्ही माझे दान कोणाला करणार आहात ? दानात तुम्ही मलाही कोणालातरी देऊन टाकायला हवे कारण तुम्ही तसा संकल्प सोडला आहे. " मुलाने वारंवार केलेला हा प्रश्न ऐकून अखेर पिता रागावला आणि म्हणाला, 

" नचिकेत्या ! तुला मी यमाला देऊन टाकीत आहे. " प्रवचन ऐकता ऐकता सुमित्रा भूतकाळात गेली. अगदी असेच नचिकेत चे वडील दहा-बारा वर्षांपूर्वी त्याला म्हणाले होते. 

" तुझा माझ्याशी संबंध संपला ! माझा मुलगा मी कोणालातरी दान केला असं मी यापुढे समजेन ! "

इतक्या वर्षांनंतरही सुमित्राच्या डोळ्यांसमोर तो प्रसंग जसाच्या तसा उभा राहिला. त्यानंतर कधीही नचिकेतनं वडिलांच्या घरात पाऊल ठेवलं नव्हतं. अगदी त्यांच्या अंत्यसंस्काराच्या दिवसापर्यंत ! अतिशय हट्टी स्वभाव. देवाधर्मावर तर काडीमात्र विश्वास नव्हता त्याचा ! 

" सुमित्रा अगं देव-बिव काही नसतं .... एवढी शिकलेली तू , पण एखाद्या आंधळ्यासारखी चाचपडत आहेस. समाजावर वचक ठेवण्यासाठी, धनदांडग्यांकडून गरिबांची पिळवणूक होऊ नये आणि त्यांच्यावर कोणाचीतरी जरब बसावी म्हणून, आपल्याच पुर्वजांनी जन्माला घातलेली ही एक संकल्पना आहे. मी देव माणसांच्यात बघतो आणि तूही असंच करावं असं मला वाटतं ! " तावातावानं नचिकेत बोलत असे . सुमित्रा मुक्याने उभी राहायची. तिला त्याचं म्हणणं पटायचं, पण देवाधर्माला नाकारण्या इतकी मजल तिने कधीच मारली नाही.

" का पण तू एवढा चिडून आहेस देवाधर्मावर ? " एकदा तिने त्याला विचारले. शून्यात कुठेतरी पाहात तो म्हणाला होता,

" माझी आई मृत्युशय्येवर तळमळत होती. गुडघ्या येवढा पोर होतो मी तेव्हा! पण बाबांनी तिला दवाखान्यात नेलं नाही. का ? तर म्हणे ती वेळ तिच्यासाठी घराबाहेर पडायला योग्य नव्हती. जेव्हा त्यांच्या पंचांगानुसार योग्य वेळ आली तेव्हा आई हे जग सोडून गेली होती.... बाबांच्या देवा-धर्माच्या अतिरेकामुळे मी माझी आई गमावली ! त्यांनी मला कायमचं पोरकं करून टाकलं ! आई नसलेल्या मुलांच्या वेदना तुला समजायच्या नाहीत सुमित्रा !! " 

याच त्याच्या नास्तिकतेपायी, माझा नवरा म्हणून आईबाबांनी त्याला नाकारलं. माझा निर्णय ऐकल्यावर तो विषण्णपणे हसला. म्हणाला, " I am too early for this society ! सुखाने संसार कर सुमित्रा !! "

स्वामींचे प्रवचन आता ऐन रंगात आले होते. 

" तर माणूस मेल्यावर त्याचे काय होते ? या यमधर्माला विचारलेल्या प्रश्नापासून ढळण्यास नचिकेत अजिबात तयार नव्हता. त्याच्या या हट्टाला शरण जाऊन सरतेशेवटी यमधर्माने या गहन प्रश्नाचे उत्तर देण्यास सुरुवात केली. " सर्व श्रोते एकाग्रतेने ऐकत होते. सुमित्रा मात्र स्वतःच्याच विचारात हरवून गेली होती. त्या प्रसंगानंतर नचिकेत तिला कधीच भेटला नव्हता. काही दिवसांसाठी शहर सोडून तो दुसरीकडे गेला असल्याचे तिने उडत उडत ऐकले होते. सुमित्रा चे लग्न झाले आणि यथावकाश मुलाबाळांमध्ये ती पूर्णपणे रमून गेली. त्याच्याबद्दल शेजाऱ्यापाजाऱ्यांकडून तिला कळायचे. अंधश्रद्धा निर्मूलन आणि बुवाबाजीविरुद्ध काम करणाऱ्या संस्थेचा तो पदाधिकारी होता. कित्येक भोंदूबाबांचा त्याने पर्दाफाश केला होता. सरकार दरबारीही त्याचा दबदबा होता. विचार करता करता सुमित्रा चमकली. पण हा इथे काय करतोय ? या मठातील लोकांबद्दल, स्वामींबद्दल याला काही शंका आहे की काय ? बापरे ! पण स्वामी तर किती ज्ञानी आहेत, धर्माचे गाढे अभ्यासक आहेत. नचिकेतला भेटून सांगितले पाहिजे.

टाळ्यांच्या कडकडाटाने सुमित्रा भानावर आली. प्रवचन संपले होते. शेवटची प्रार्थना झाल्यावर भक्त बाहेर पडू लागले. गर्दीतुन पुढे सरकताना सुमित्रेला नचिकेत दिसला. मठाच्या काही कार्यकर्त्यांशी त्याची हुज्जत चाललेली दिसत होती. पटकन चपला घालून सुमित्रा मठाबाहेर पडली. झपाझप घराकडे चालू लागली. वळणावर मागुन हाक आली, 

"सुमित्रा थांब ! " सुमित्रा थांबली. मागून आलेल्या नचिकेतनं विचारलं, "ओळखलस ? " अचानक सुमित्राला भरून आले. किती खंगला आहे हा ! एकेकाळी किती देखणा आणि राजबिंडा होता ! अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांतून अस्पष्ट दिसणाऱ्या त्याला पहात ती हुंकारली ! 

" कशी आहेस? तब्येती वरून तर चांगलीच दिसतेयेस म्हणा !! " डोळे मिचकावत नचिकेत हसला. 

" तू काय करत होतीस मठात? अगं तो स्वामी भोंदू आहे असा आम्हाला संशय आहे. "

" नाही रे नचिकेत! तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. चांगले आहेत स्वामी... ज्ञानी आणि वैरागी ! " सुमित्रा कळवळून म्हणाली.

" ठीक आहे .ते कळेल मला लवकरच, पण तू जपून राहा ..... फार आहारी जाऊ नकोस या लोकांच्या!! तुझा पत्ता दे, येईन कधीतरी घरी बच्चेकंपनीला भेटायला ! " नचिकेत म्हणाला. पत्ता घेऊन नचिकेत आला होता तसाच वादळासारखा निघून गेला.

त्यानंतर कित्येक महिने काहीच घडले नाही. नचिकेतही पुन्हा कधी मठात आलेला तिला दिसला नाही. बहुतेक स्वामींबद्दल चा त्याच्या मनातील संशय दूर झाला असावा. सुमित्रा ही हळूहळू तो प्रसंग विसरून गेली. गेल्या आठवड्यापासून मठात कृष्ण जन्माष्टमीची तयारी सुरू होती. मठातील काही महिला स्वयंसेवक घरी आल्या होत्या. जन्माष्टमीच्या तयारीत त्यांना सुमित्राची मदत हवी होती. सुमित्राच्या नवऱ्याने हसत हसत परवानगी दिली. 

" नशीबवान आहेस ! सेवा करायला मिळतीये तुला ! " तो हरखून सुमित्राला म्हणाला. सुमित्रालाही आकाश ठेंगणे झाले. श्रीकृष्ण म्हणजे तिचे आराध्य दैवत. रोज रात्री उशिरापर्यंत थांबवून सर्वजण तयारी करत होते. तो शनिवारचा दिवस होता. रात्री उशिरापर्यंत सजावटीचे काम चालू होते. जन्माष्टमी अगदी तोंडावर आली होती. सुमित्रा मन लावून सजावटीचे काम करत होती. बर्‍याच वेळाने भानावर आल्यावर ती चांगलीच गांगरली. सोबतच्या सर्व महिला घरी गेल्या होत्या. काही मोजके पुरुष भक्तच दिसत होते. सुमित्रा पटकन उठली. घड्याळात रात्रीचे बारा वाजून गेले होते. घाईघाईने ती घराकडे निघाली. सगळीकडे निरव शांतता पसरली होती. काहीशी घाबरलेली सुमित्रा झपाझप चालत होती. अचानक एका अंधाऱ्या कोपऱ्यातून दोन-तीन धटिंगण पुढे आले. सुमित्राला ओरडायची संधीही मिळाली नाही.

शुद्धीवर आल्यावर पहिल्यांदा सुमित्राला ती कुठे आहे हेच समजेना. त्यानंतर एका अंधाऱ्या खोलीत आपण तोंडाला पट्टी आणि मागे हात बांधलेल्या अवस्थेत आहोत याची जाणीव तिला झाली. तिच्या सर्वांगाला घाम फुटला. पायातली ताकदच निघून गेली .थोड्यावेळात मंद प्रकाशाचा दिवा घेऊन कोणी तरी येताना दिसले. जवळ आल्यावर तिने ओळखले. स्वामी आणि त्यांचा निकटचा भक्त होता. मागे बांधलेले सुमित्रा चे हात सोडवत तो भक्त म्हणाला, 

" सुमित्राजी स्वामींची कृपा दृष्टी तुम्हाला लाभली आहे. फार थोर नशीब आहे तुमचं ! स्वामींना संतुष्ट केलंत तर आयुष्याचं कल्याण होईल तुमच्या ! " भीतीने थरथर कापणाऱ्या सुमित्राच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. देवाच्या नावाखाली स्वामीने बाजार मांडला होता. नचिकेत चा संशय खराच होता म्हणायचा. आणि मी मात्र मूर्खासारखी त्याची दिशाभूल केली. पश्चातापाने सुमित्रा कळवळली. लोचट हसू तोंडावर घेऊन स्वामी पुढे आला आणि सुमित्राशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करु लागला. सुमित्राला ब्रह्मांड आठवले. कोणत्याही परिस्थितीत येथून बाहेर पडलंच पाहिजे. तिने श्रीकृष्णाचा धावा सुरू केला. आता तिच्या अंगात बारा हत्तींचे बळ संचारले. स्वामीच्या तोंडावर नखाने बोचकारत तिने शेजारी पडलेला दंडुका उचलला. त्याचा जोरदार फटका त्या भक्ताच्या डोक्यात मारून तिने खोलीबाहेर धूम ठोकली. तिला शिव्या देत ते दोघे तिचा पाठलाग करू लागले. कशाला तरी अडखळून सुमित्रा धाडकन पडली आणि त्या दोन नराधमांनी तिचा कब्जा घेतला. झटापटीत तिची साडी व कपडे फाटले. त्यांची लक्तरे लोंबू लागली पण जीवाची पर्वा न करता सुमित्राने प्रतिकार केला आणि ती तशाच अवस्थेत पुन्हा पळू लागली. मठा बाहेर पडताच तिने तोंडावरील पट्टी काढून ओरडायला सुरुवात केली. त्या नराधमांनी तिला पुन्हा गाठले पण तेवढ्यात अंधारातून दोन व्यक्ती पुढे आल्या. हातातील काठ्यांनी त्यांनी स्वामी आणि त्याच्या भक्ताचा खरपूस समाचार घेतला. देवासारख्या आलेल्या या दोन व्यक्तींमधील एक नचिकेत होता ! त्याने खिशातून शिट्टी काढून वाजवली आणि अंधारातून पोलीस पुढे आले.

अंगावरील फुल शर्ट काढून नचिकेतने सुमित्राच्या हातात दिला आणि तिच्याकडे पाठ करून तो बोलू लागला,

" आम्हाला स्वामी चा संशय आला होता. कित्येक रात्री आम्ही गस्त घालत होतो. कोणत्याही परिस्थितीत वाईट घटना मला घडू द्यायची नव्हती. अखेर आज हा भोंदूबाबा तावडीत सापडला. तुला अशा अवस्थेत बघून मला धक्काच बसला. तुला जर का काही झाले असते तर मी कधीच स्वतःला माफ करू शकलो नसतो .... माझ्या आईसाठी मी काही करू शकलो नाही ही मनाची बोच आता खूप कमी होईल. " अंगावरील फाटलेल्या कपड्यांवरून त्याचा शर्ट घालत सुमित्रा ऐकत होती. थोड्यावेळाने मुसमुसत ती पुटपुटली, 

" यू आर नॉट अर्ली फॉर धिस सोसायटी नचिकेत !! वी नीड मेनी मोअर लाइक यू !! "

मंद चंद्रप्रकाशात उघड्या अंगाने पाठमोऱ्या उभ्या असलेल्या त्या 'नास्तिक' माणसात तिला तिचा 'देव' दिसला होता .... 

समाप्त

फोटोवर क्लिक करा आणि वाचा एक सुंदर सकारात्मक कथा.वरील कथा श्री. मिलिंद अष्टपुत्रे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखकाच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post