मोठी बायको

 

मोठी बायको

©️सविता किरनाळे 

सदर लेखिकेने आपल्या सर्व कथांचे copyright register केले असून यांच्या कथा कोणत्याही प्रकारे (लिखीत किंवा यूट्यूब चॅनलवर) वापरल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. 

नयनच्या दारावरची बेल वाजली. तिने आयहोलमधून पाहिले तर अवनीश होता बाहेर. अवनीश, तिचा एक सहकर्मी. जो कितीतरी महिन्यांपासून तिचा अनुराग करत होता. तो चांगला नव्हता म्हणून नाही पण नयनने दरवेळेस त्याला ठाम नकार दिला होता.


‘हा इथे यावेळी काय करतोय?’ 


नयनच्या कपाळावर आठ्या चढल्या. परत एकदा बेल वाजली. काही तरणोपाय नसल्याने नयनने दार उघडले.


“हेलो नयन, कशी आहेस. ऑफीसमधून समजले तुझा हात फ्रॅक्चर झाला आहे म्हणून. मला माहीत आहे तू एकटी राहतेस. म्हणून तुला मदत करायला आलो.”


हातातील बॅग खाली ठेवत तो म्हणाला.


“मला मदत करायला तू आलास? आणि ही बॅग कशासाठी?”


नयनने विचारले.


“अगं असं काय करतेस. तुला रात्री अपरात्री किंवा सकाळी लवकर वगैरे माझी गरज लागू शकते. म्हणून मी इथे राहायला आलो आहे काही दिवस. मला माहीत आहे दोन बेडरूम आहेत तुझ्या घरी.”


अवनीश हसत म्हणाला आणि नयनचा पारा चढला.


“अवनीश, मूर्ख आहेस का तू? हद्द केलीस आता तर तू... तुला कुणी सांगितले मला तुझ्या मदतीची गरज आहे म्हणून? का आलास इथे न बोलावता? इतके दिवस मी तुझ्या कारनाम्यांकडे दुर्लक्ष केलं पण आता तू....”


आपल्या चांगल्या हाताने डोकं पकडत नयन ओरडली.


“उभा का आहेस अजून, जा निघ तू इथून. मी हाकलून द्यायच्या आधी स्वतःच दार उघड आणि जा बाबा तू.”


“नयन मी आता कुठेच जावू शकत नाही. माझ्या लँडलॉर्डसोबत माझे भांडण झाले आणि त्याने मला हाकलून लावले आहे.”


केविलवाणा चेहरा करत अवनीश म्हणाला. 


“तो तुझा प्रॉब्लम आहे, माझा नाही. लुक, मी इथे एकटी राहते हे सोसायटीमध्ये सगळ्यांना माहीत आहे. जर तुला मी आय मीन आपण दोघे एकत्र इथे राहिलो तर किती मोठा गोंधळ होईल याची काही आयडिया आहे तुला? तुझा प्रॉब्लम सुटेल पण मी वाईट पद्धतीने फसेन.”


“यार, कसली बाई आहेस. तुला माझी दया नाही का येत? एक तर बाहेरचे वातावरण असले. मला मग कोरोना झाला तर?”


नयन विचारात पडली. अवनीश तिच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत होता. 


“इतकं इमोशनल ब्लैकमेल करायची गरज नाही. थांब थोडा वेळ, पाहू काय करता येईल.”


शेवटी नयन म्हणाली, तसा त्याचा चेहरा उजळला. निदान ती आता त्याला घालवून तर देणार नव्हती.


नयन तीस वर्षाची अविवाहित, टार्गेट्स, रिझल्टस हे कळीचे शब्द असणाऱ्या चांगली कमाई देणाऱ्या कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारी मुलगी. बरीच वर्ष या क्षेत्रात राहिल्याने पॉलिश झालेले व्यक्तीमत्व. पंचविशीत प्रेमात अशी ठोकर खाल्ली, की प्रेम, लग्न, संसार हे शब्दच जीवनातून रद्दबादल करून टाकले होते. कर्तव्यदक्ष, थोडीशी खडूस बॉस होती ती. तिच्या पाठीमागे तिचा उल्लेख ब्यूटी विधाउट हार्ट असा केला जाई.


अविनाश सत्तावीस वर्षीय तरुण. नयनच्याच कंपनीमध्ये कामाला होता, नयनला ज्यूनियर. तिच्या हाताखाली काम करता करता तो तिच्या प्रेमात पडला. त्याला तिच्यासोबत लग्न करायचे होते पण ती नकार देत राहिली, पुन्हा पुन्हा. 




दोन वर्षे झाली या लपंडावाला पण नयनने कधीच अवनीशला जिंकू दिले नाही. पण आज अवनीशने तिला गाठले होते, बेसावध. नयनने मोबाइलवरून आपल्या शेजारी राहणाऱ्या वेदांतीला कॉल केला. ती फक्त तिची शेजारीणच नाही तर चांगली मैत्रिणही होती.


“वेदांती ऐक ना, एक प्रॉब्लम झाला आहे आणि मला फक्त तूच मदत करू शकतेस.”


नयनने तिला सर्व प्रकार सांगितला.


“मग मी कशी हेल्प करू तुला?” 


वेदांतीने विचारले.


“हे बघ, तुझी रूममेट लॉकडाउनमुळे गावी गेली म्हणालीस ना? तू एकटीच राहतेस ना आता. मग तू माझ्या इथे शिफ्ट हो थोडे दिवस. या ठोंब्याला तिथे राहू दे तोपर्यंत. आपल्याला एकमेकांची सोबत होईल. आणि याचाही राहण्याचा प्रश्न सुटेल. हा आपली रूम सोडून आला आहे. लॉकडाउन शिथिल झाल्यावर तो करेल आपली सोय. मी त्याला जे होईल ते रेंटही द्यायला लावेन.”


“ओके, तू म्हणतेस तसंच करू. मी पंधरा मिनीटात माझं गरजेचं सामान घेवून तुझ्या घरी येते. मग ठरवू आपण काय करायचे ते.” वेदांतीने फोन बंद केला.


काही वेळात वेदांती आपले सामान घेवून नयनच्या घरी आली. हॉलमध्ये बसलेल्या अवनीशला पाहून तिचे डोळे विस्फारले.


“नयन आर यू शूअर तुला याच्यासोबत इथे नाही राहायचे?” 


वेदांती नयनच्या कानात कुजबुजली.


“हम्म, पण तुला राहायचे असेल तर रहा. तेवढीच माझ्या मागची ही ब्याद टळेल. कधीपासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत आहे.” दात ओठ खात नयन म्हणाली.


वेदांती समजून गेली, काहीतरी अवघड जागेचे दुखणं आहे हे. ती गप्प बसली. 


“अवनीश ही माझी मैत्रिण आहे, वेदांती. बाजूच्या फ्लॅटमध्ये राहते. सध्या ती तिच्या घरी एकटीच राहते. मी असं ठरवलं आहे, की ती इथे माझ्यासोबत राहील आणि तू तिच्या घरी. आपल्या दोघांचे प्रॉब्लम सॉल्व. बघ तुला वाटते तेवढी दुष्ट नाही मी.”


नयन शांतपणे अवनीशला म्हणाली. अवनीश थक्क झाला. नयन असा मार्ग काढेल असे त्याला वाटले नव्हते. त्याला मान्य करण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

 




अवनीश राहत तर होता वेदांतीच्या घरी पण दिवसातील बराच वेळ तो नयनसोबत घालवत होता. ती त्याची बॉस होती, त्यामुळे तिच्यासोबत तिच्या घरुन काम करणे त्याला सोयीचे होते. त्यातून तिचा हात फ्रॅक्चर असल्याने तिला लॅपटाॅपवर सफाईने जास्त काम करता येत नव्हते. मग अवनीश तिला प्रेजेंटेशन बनवण्यात, काही डेटा रिप्रेजेंट करण्यात मदत करत असे. ती आपल्या कामाबाबत किती दक्ष आहे हे त्याला नव्याने समजत होते. तर त्याच्या काळजी घेण्यावरून त्याचे प्रेम खोटे नाही याची नयनला जाणीव होत होती. त्याच्या खेळकर हसऱ्या स्वभावामुळे घरात प्रसन्न वाटायचे. नयनचा कठोरपणाचा मुखवटा हळूहळू गळून पडत चालला होता. आपण समजतो तितकं वाईट नसतं प्रेम असा विचार तिच्या मनात हल्ली डोकावू लागला होता. वेदांती या सगळ्याची साक्षीदार होती. तिलाही जाणवत होते, नयनच्या मजबूत बुरुजाला खिंडार पडत चालले आहे.




एकदा मधल्या वेळात भूक लागली म्हणून अवनीश सगळ्यांसाठी सॅंडविच बनवायला किचनमध्ये गेला. टोमॅटो कापताना टोमॅटोच्या गुळगुळीत पृष्ठभागावरून चाकू सटकला आणि अवनीशच्या हाताला जखम झाली. त्याचे ओरडणे ऐकून नयन किचनमध्ये आली. त्याच्या हातातून वाहणारे रक्त पाहून तिला काही सूचेनासे झाले. पटकन तिने त्याचा हात नळाखाली धरला.


“केलास ना परत घोळ? का रे तू असा वागतो. परवा पापड तळताना तेल अंगावर उडवून घेतलं. एक दिवस चहाचा टोप पोळला. तू माणूस आहेस की बला?” 


रागाने ताडताड बोलत होती ती.


“अच्छा, तुला का माझी इतकी काळजी?” 


त्याने तिरकस प्रश्न केला.


“कारण मला तू...” ती मध्येच थांबली.


‘छे काय बोलून जाणार होते मी... रागाच्या भरात की खरेच.?


हम्म खरंच..’


“काही नाही, जावू दे,” म्हणून ती जायला वळली. 


“असा कसा जावू देवू तुला,” म्हणत त्याने तिचा हात पकडला.


“सांग मला नयन. गेले दोन वर्ष मी तुला एकच प्रश्न परत परत विचारतो. माझ्या जागी दुसरा कोणी असता तर गेलीस उडत म्हणून मोकळा झाला असता. पण I really love you. तू मला फक्त एक जेन्यूयन कारण दे मी सोडेन तुझा नाद. मी तुला ज्युनियर आहे म्हणून तुझा नकार आहे का?”


अवनीश कळवळून विचारत होता.


“नाही, तू खूप छान आहेस. अगदी परफेक्ट. पण तू माझ्यापेक्षा तीन वर्षानी लहान आहेस. कसं शक्य आहे आपलं लग्न होणं. समाज काय म्हणेल? समाज सोड, तुझे आणि माझे आईवडील तरी या नात्याला मान्यता देतील का? माणसाने प्रेम जरूर करावं पण त्यात इतकं आंधळं होवू नये की साध्या गोष्टीही दिसू नये.”


“ते समाज वगैरे सोड, तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? फक्त हो किंवा नाही मध्ये उत्तर दे.”

 


“हो...”


“मग बाकीचं तू माझ्यावर सोड.” नयनच्या कपाळावर हलकेच ओठ टेकून अवनीश म्हणाला. आज तो खूप खूश होता. नयन मात्र काहीशी गंभीर होती. तिला जगरीत चांगलीच माहीत होती. नवरा बायकोपेक्षा कितीही मोठा असला तरी इथे चालतो पण बायको काही महिन्यांनी जरी मोठी असून चालत नाही. ती तर अवनीशपेक्षा तीन वर्षांनी मोठी होती. फक्त वयानेच नव्हे तर व्यावसायिक जीवनातही ती त्याच्यापेक्षा वरच्या पदावर काम करत होती. पगारात फरक होता. दोघांमध्ये साम्य कोणत्याच गोष्टीत नव्हते. 




अवनीशने आपल्या आईला कॉल केला. बोलता बोलता त्याने नयनबद्दल सांगितले. आधी आईला खूप आनंद झाला. तिचा मुलगा तिच्यासाठी सून घेवून येणार होता. पण जेव्हा तिला समजले नयन अवनीशची बॉस आहे तेव्हा तिचा आनंद विरून गेला. 


‘हा आपल्या बॉसच्या प्रेमात पडला? कसं जमणार मग. ती पोरगी घरीही त्याच्यावर दादागिरी करू लागली तर? घरी दारी सगळीकडे याला तिला दबूनच राहावे लागेल. अशाने यांचा संसार कसा सुखाचा होईल. त्यातून ती वयाने मोठी असली की मग झाले.’


“अवनीश, तिचे वय काय आहे?” आईने प्रश्न केला.


“तीस.” श्वास रोखून अवनीशने उत्तर दिले. 


पलीकडे शांतता पसरली.


“अवनीश हे लग्न मला मान्य नाही. तुझ्या पप्पांचा पण याला विरोधच असेल.” 


पुढे काहीही न बोलता त्याच्या आईने फोन बंद केला.


अवनीश नाराज झाला. त्याला इतक्या स्पष्ट नकाराची अपेक्षा नव्हती. नयनला मात्र हे अपेक्षितच होते.

 


“अवनीश तुला मी आधीच सांगितलं होतं, नाही पचनी पडणार हे कुणाच्या. तू लग्नाचा नाद सोड. आपण चांगले मित्र राहू.” तिने त्याच्या केसांतून हात फिरवत समजूत काढण्याचा प्रयत्न केला.


“नाही नयन, मला फक्त आणि फक्त तुझ्याशीच लग्न करायचे आहे. मग त्यासाठी मला कुणाच्याही विरोधात उभं राहावं लागलं तरी बेहत्तर.” 




काही दिवसांनी जेव्हा निर्बंध शिथिल होवू लागले तेव्हा अवनीश स्वतः त्याच्या घरी केला. त्याच्या आईने आधीच स्पष्ट नकार दिला होता. पण अवनीश हार माननाऱ्यांपैकी नव्हता.


“मम्मी, तुम्ही कधी ना तिला पाहिलं ना भेटलात मग आधीच नकार देणे चुकीचे नाही का?”


“हे बघ बेटा, आपल्या पूर्वजांनी काही नियम घालून दिले आहेत, ते उगाच नाहीत. लग्नासाठी मुलगा हा मुलीपेक्षा मोठाच असावा कारण मग संसारासाठी हवी असलेली मॅच्युअरिटी त्याच्यात येते. दुसरे कारण हे की एक मूल झाले  की मुली शरीराने थोराड वाटू लागतात. जर वधू आधीच मोठी असेल तर मग ती लवकरच म्हातारी भासते. अशा परिस्थितीत पुरूषाचा तिच्यातील रस कमी होवू शकतो. शेवटची गोष्ट, जर नवरा बायकोपेक्षा जास्त कमवत असेल तर बायकोसाठी ती नॉर्मल, नाही अभिमानाची गोष्ट असते. त्या सहजतेने ही गोष्ट स्वीकारतात. पण पुरूषामध्ये हा मनाचा मोठेपणा थोडा कमी आणि पुरुषी अहंकार जास्त असतो. आज तुम्ही प्रेमात आहात म्हणून या गोष्टी तुम्हाला दिसत नाहीत. पण विचार कर, तुलाही हे पटेल.”


अवनीशचे पप्पा म्हणाले. 




“पप्पा जर वयाने मोठं असल्याने मुलात मॅच्युअरिटी येत असेल तर मुलीतही ती यायला हवी. मीन्स नयनमध्ये ती ऑलरेडी आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे. कदाचित मूल झाल्याने बायका वयाने मोठ्या दिसतही असतील पण म्हणून नवऱ्याचा तिच्यातील रस कमी होतो हे पटण्यासारखं नाही. तसं जर असतं तर एका ठराविक वयानंतर सगळे संसार मोडले असते. मान्य आहे पुरुषी अहंकारामुळे नवऱ्याला त्याच्यापेक्षा जास्त कमावणारी बायको डोईजड वाटते. पण जर माझी बायको माझ्यापेक्षा जास्त टॅलेंटेड आहे तर असे असणे मला मान्य आहें. मी नयनला दोन वर्षाहून जास्त काळ ओळखतो. ती खूप वेगळी मुलगी आहे. तुम्हालाही ते लक्षात येईल.”




शेवटी अवनीशच्या हट्टासमोर त्याच्या पालकांचे काही एक चालले नाही. आपल्या मनाच्या विरूद्ध त्यांनी लग्नाला परवानगी दिली. जवळचा मुहूर्त पाहून नयन आणि अवनीशने सगळ्या डामडौलाला फाटा देवून अतिशय साध्या पद्धतीने लग्न केले. अवनीशचे आईवडील लग्नाला उपस्थित नव्हते. त्यांचे मन दुखावले गेले असल्याने ते त्याच्यासोबत जास्त बोलत नसत. लग्नानंतर अवनीश नयनच्या घरी राहायला गेला या गोष्टीचे ही शल्य त्यांना बोचत होते. आपल्या मुलांचे वाईट व्हावे असे कोणत्या पालकांना वाटते पण त्याचबरोबर आपला योग्य तो मान राखला जावा इतकीच त्यांची अपेक्षा असते.

 




लग्न होवून फक्त एक महिनाच झाला होता तर अवनीशच्या बाईकचा ॲक्सीडेंट झाला. त्याला काही जखमांबरोबरच कमरेला मार लागला. कोविडचा धोका अजून टळला नसल्याने नयनने त्याची घरीच देखभाल करण्याचे ठरवले. आता तिची खरी परीक्षा होती. तिने डाॅक्टरांकडून ड्रेसिंगचे प्राथमिक ज्ञान घेतले. फिजिओ थेरपिस्टसोबत व्हिडीयो कॉलद्वारे अवनीशकडून फिजीयो थेरपीही करून घ्यायची. त्याला ती घेण्यात मदत करायची. त्याचबरोबर तिचे ऑफीसचेही काम चालू होते. 




अवनीशचे आईवडील जरी सोबत राहत नसले तरी त्याचा ॲक्सीडेंट झाल्यापासून ते रोज व्हिडीयोकॉलवर  त्याच्यासोबत बोलायचे. त्याच्याशी बोलताना त्यांना नयनची जलद आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता, वागण्यातील मॅच्युअरिटी, कामातील सफाई, अवनीशवरील प्रेम जाणवत होते.

आपला तिच्या बाबतचा अंदाज चुकीचा असल्याचे जाणवत होते. त्याचबरोबर आपल्या मुलाला योग्य सहचरणी मिळाल्याचा आनंदही होत होता. बायको नवऱ्यापेक्षा थोडी मोठी असली तरी त्याचा संसारावर काही वाईट परिणाम होत नाही. कारण संसार टिकतात ते परस्पर सामंजस्यावर. अनेक देशात आणि जमातीत वधू वरापेक्षा मोठी असणे हे स्वीकारार्ह आहे कारण त्यामुळं तिचा अल्लडपणा कमी झालेला असतो आणि ती अधिक समजदार होते असे मानले जाते. अवनीश आणि नयनच्या पालकांनी हे स्वीकारले आहे पण असे किती जण समजून घेतात हा खरा प्रश्न आहे. 

समाप्त

प्रिय वाचकहो आपले यूट्यूब चॅनल Shabd Chapha वर अनेक कथा वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. एकदा जरूर भेट द्या. 

फोटोवर क्लिक करा आणि वाचा एक सुंदर नवीन कथा.



वरील कथा सविता किरनाळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. 



Post a Comment (0)
Previous Post Next Post