वचन

  वचन 

© मिलिंद अष्टपुत्रे

आज दिवाळीतल्या पाडव्याचा दिवस .... सोसायटीतील सगळ्यांच्या घरातून आनंद, उत्साह आणि चैतन्य अक्षरशः भरभरून वहात होते .... अपवाद फक्त जोशींच्या घराचा होता. जोशींच्या फ्लॅटचा दरवाजा संपूर्ण दिवाळीत एकदाही उघडला नव्हता ... खरं म्हणजे साऱ्या सोसायटीला हेवा वाटावा असं जोशींचं कुटुंब !! राघव, रागिणी आणि एकुलता एक मुलगा रोहन !! राघवने लावलेली  " रा रा रो जोशी " अशी वैशिष्ठपूर्ण पाटी फ्लॅटच्या बाहेर दिमाखाने झळकत असे. राघव एका मल्टिनॅशनल कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर होता तर रागिणी स्टेट बँकेत ब्रांच मॅनेजर ! रोहन नुकताच दहावी पास होऊन अकरावीत गेला होता. दृष्ट लागावी असा सुखी संसार होता. पण म्हणतात ना नियतीपुढे कोणाचेच काही चालत नाही ...

राघवला बाईक रायडिंग चा छंद होता. दर शनिवार आणि रविवार तो ठरलेल्या ग्रुप बरोबर रायडींगला जात असे. कधी लवासा, कधी पवना लेक तर कधी राजमाची किल्ला ... हि सर्व ठिकाणे पुण्यापासून पन्नास ते साठ किलोमीटर लांब होती. त्याव्यतिरिक्त वर्षातून एकदा त्याची लॉगं ट्रीप असे ... रागिणीला त्याचा हा छंद तितकासा आवडत नसे. गोवा किंवा लडाख अशा लांबच्या ठिकाणी राघव गेला की रागिणी अस्वस्थ असायची ... त्या काळात तिला रात्री नीट झोपही लागायची नाही .... खरंतर राघवचा खुशाली सांगणारा फोन रोज यायचा पण तरीही तो परत पुण्यात येईपर्यंत तिचे चित्त ताळ्यावर नसायचे ... जस जसा रोहन मोठा होऊ लागला तस तसे त्यालाही राघव सारखेच बाईकचे आकर्षण वाटू लागले ... कुठली बाईक किती सीसी ची आहे, तिची टायर विड्थ किती आहे, किती एचपी क्रिएट करते .... वगैरे चर्चा दोघे हिरीरीने करत असतं .... त्या ऐकताना सुद्धा रागिणीचा जीव घाबरा होत असे ...

" राघव तू रोहनला हे सगळं शेअर करत जाऊ नकोस ... इतक्या लहान वयात त्याला नाही तो छंद लागायला नको आहे मला !" रागिणी राघवला निक्षून सांगायची .. पण तिच्या या बोलण्यावर राघव मोठ्यांदा हसत असे ...

" अगं माझं पिल्लू आहे ते ... बाईक बद्दलची त्याची पॅशन माझ्या दुप्पट आहे ..." बेफिकीरीने तो म्हणायचा आणि रागिणीच्या काळजात उगाचच धस्स व्हायचं ... सहा महिन्यांपूर्वी संध्याकाळी बँकेतून रागिणी घरी आली आणि रोहनने हसत हसतच आनंदाने तिला मिठी मारली ...

" काय रे पिल्ला ? खुश दिसतोयस आज .... कॉलेजमध्ये एखादी मैत्रीण मिळाली की काय तुला ?" 

त्याच्याकडे पाहून डोळे मिचकावत रागिणी म्हणाली.

" छे ग आई ... ऐक ना , बाबा 'हार्ले डेव्हिडसन' घेतोय .... जाम मजा येणार आहे त्या बाईक वरून फिरायला !!" नाचतच रोहन म्हणाला.

" तुला माहितीये का??  बाबा 'स्ट्रीट सेवन फिफ्टी' मॉडेल घेतोय ... सेवन फिफ्टी सीसी .... कॅन यू इमॅजिन ? व्हॉट ए पॉवर मॅन ..... मी जाम खुश आहे आज .... कॉलेजमधली सारी पोरं जळणारेत माझ्यावर !! बाबा इज ग्रेट ... "

त्याचे बोलणे ऐकून रागिणी थिजल्यासारखी जागेवरच उभी राहिली !! घरात इतक्या बाईक असताना हा 'हार्ले डेव्हिडसन' रुपी नवा राक्षस पाहिजे कशाला हे तिला कळेना ...

" किती पैसे घालवतोय तुझा बाबा ?" रोहनकडे टोकदार नजरेने बघत रागिणीने विचारले ...

" सिक्स लॅक सेवंटी सिक्स थाउजंड ओन्ली ..." निरागसपणे रोहन ने उत्तर दिले आणि रागिणी उखडलीच ....

" पावणे सात लाख रुपये घालवायची काय गरज आहे आत्ता ? घरात काय कमी बाइक्स आहेत का ?" तीक्ष्ण आवाजात तिने विचारले.

" अगं आई तुला नाही कळायचं ते ... आफ्टर ऑल हार्ले डेव्हिडसन इज हार्ले डेव्हिडसन !!" एवढं बोलून रोहन निघून गेला आणि पायातलं बळ गेल्यासारखी रागिणी मटकन जवळच्या सोफ्यावर बसली. त्याच आठवड्यात नवीन बाईक घरी आली आणि दोघा बाप-लेकांनी सहा महिने आधीच दिवाळी साजरी केली. दोघे नव्या बाईकवरून गावभर फिरून आले. रोहनला परमनंट लायसेन्स नसल्याने तो राघवच्या मागे बसून नव्या बाईकवरून फिरण्याचा आनंद लुटत होता ... रात्रीचे जेवण झाले आणि रोहन झोपायला त्याच्या खोलीत गेला. राघव हॉलमध्ये टीव्ही वर डिस्कवरी चॅनल बघत बसला होता.

" राघव गरज नसताना तू हार्ले डेव्हिडसन घेतलीयेस खरी, पण एक पथ्य पाळण्याचं वचन मला दे ..." राघव शेजारील सोफ्यावर बसत रागिणी बोलू लागली ...

" काय वेड्यासारखं बोलतीयेस रागिणी ..."

तिचे बोलणे मध्यावर तोडत राघव ओरडला.

" आता तू माझ्याकडून चाळीस च्या पुढे स्पीड न वाढवण्याचं वचन घेणार आहेस का ??"

त्याचे बोलणे ऐकून तशाही मनस्थितीत रागिणीला हसू आले.

" तू समजतोस तितकी वेडी नाही मी राघव ... स्पीड बद्दल नाही बोलत मी ... रोहनला परमनंट लायसेन्स मिळाल्याशिवाय तू बाईक चालवू देणार नाहीस याचं वचन हवय मला ..." रागिणी म्हणाली आणि राघव तिच्या हास्यात सामील झाला ....

" दिलं वचन तुला ... चल आता झोपायला ..."  सरळ सरळ तिला डोळा मारत राघव बोलला आणि त्याच्या नजरेतील भाव ओळखून रागिणीने लाजून मान फिरवली ...

" तू वचन पाळलं नाहीस राघव ! " अंधारात सोफ्यावर विमनस्कपणे बसलेली रागिणी विचारशृंखलेत गुरफटत स्वतःशीच पुटपुटली ... दोन महिन्यांपूर्वी घडलेला सर्व घटनाक्रम तिच्या डोळ्यापुढे एखाद्या चित्रपटासारखा सरकू लागला ....

त्या रविवारी राघवने भीमाशंकरला जायचा प्लॅन केला होता. ऑगस्ट महिना असल्याने पाऊस अधून-मधून बरसत होता. नेहमीचा बाइकिंग ग्रुप नसल्याने राघवने रोहनला बरोबर घेतले होते.

" भीमाशंकरला खूप पाऊस असेल राघव ....  रोहनला घेउन जातो आहेस ... जपून चालव बाईक !" रागिणी राघवला बजावत होती.

" जायलाच पाहिजे का राघव ?" हा ओठांपर्यंत आलेला प्रश्न तिने मोठ्या कष्टाने गिळला होता. हा प्रश्न विचारून काहीही साध्य होणार नाही याची तिला पूर्ण कल्पना होती. सारा दिवस पावसाळी वातावरण होते. सतत बारीक पाऊस पडत होता. रागिणीला एक विलक्षण हुरहूर लागून राहिली होती. काहीतरी अशुभ घडणार असं तिला सारखं वाटत होतं. संध्याकाळी सहा साडेसहाच्या सुमारास तिच्या मोबाईलवर पोलिसांचा फोन आला, आणि एखादा बॉम्बस्फोट झाल्यासारखी तिच्या मनाची अवस्था झाली. राघवच्या बाईकला ॲक्सिडेंट झाला होता. राघव आणि रोहन दोघांनाही हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले होते. रागिणी धडपडत हॉस्पिटलमध्ये पोहोचली. बरोबर तिचा भाऊ ,वहिनी आणि राघवचे काही मित्र होते. राघव बेशुद्धीत होता. त्याच्या डोक्याला चांगलाच मार लागला होता. हाता पायाची हाडे फ्रॅक्चर झाली होती. बाईकची टक्कर पुढून वेगाने येणाऱ्या कारशी झाली होती. कार चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने विरुद्ध लेनमध्ये घुसली होती. दोष केवळ नशिबाचा होता ....

" माझा रोहन कुठे आहे ? कसा आहे ?" रोहिणीने आक्रंदत विचारले.

"आय अँम सॉरी मॅडम ... हि इज नो मोअर , वुई कान्ट  सेव्ह हिम ..."

निराशपणे मान हलवत डॉक्टर पुटपुटले आणि रागिणीची शुद्ध हरपली.

रागिणी शुद्धीवर आली खरी, पण त्या क्षणापासून तिचे आयुष्य पूर्ण बदलले होते. तिच्या काळजाचा तुकडा नियतीने हिरावून घेतला होता.

" मी बेशुद्धीतच का नाही मेले ?" तिने आक्रंदून शेजारी बसलेल्या भावाला आणि वहिनीला विचारले. तिला कसे सावरायचे हे कोणालाच समजेना ! शेवटी डॉक्टरांनी झोपेचे इंजेक्शन देऊन तिला शांत केले. नंतरही रागिणीला सावरायला खूप वेळ लागला. राघव मात्र वेगाने रिकव्हर झाला. खरं तर रोहनच्या जाण्यामुळे झालेली त्याच्या मनाची अवस्था रागिणीपेक्षा वेगळी नव्हती पण उपजत असलेल्या पुरुषी सोशिकपणामुळे त्याने स्वतःचे मन घट्ट केले होते.

महिनाभरात राघवला डिस्चार्ज मिळाला. राघव घरी आल्यावर इतके दिवस रागिणी सोबत राहणारे तिचा भाऊ व वहिनी त्यांच्या घरी निघून गेले. त्या रात्री प्रथमच रागिणी आणि राघव दोघेच घरात होते. इच्छा नसतानाही थोडं फार खाऊन रागिणी आडवी झाली. शेजारी राघव डोळ्यांवर हाताची घडी ठेवून झोपला होता. कोणीच काही बोलत नव्हते. सरतेशेवटी रागिणीच्या मनाचा बांध फुटला. तिला हुंदके अनावर झाले. राघव भरल्या डोळ्यांनी तिच्या डोक्यावर थोपटत राहिला.

" का असं अघटीत घडलं रे राघव ? माझ्या पिल्लाला नेण्यापेक्षा मला का नाही नेलं देवानं ?" हुंदके देत रागिणी विचारत राहिली.

" रोहनचं क्रियाकर्मही दादाला करावं लागलं ... त्याला शेवटचा निरोप देणंही आपल्या नशिबी नव्हतं राघव ..." भावना अनावर होऊन रागिणी स्फुंदू लागली ....

" शांत हो रागिणी .... आपल्याला आता खंबीरपणे परिस्थिती स्विकारावीच लागणार आहे ..." भरलेल्या आवाजात राघव तिची समजूत घालत होता.

" कशी स्वीकारू मी ही परिस्थिती? एकुलतं एक लेकरू गमावलंय मी राघव ! तुझ्या मागे बसलेला असूनही तो गेला आणि तू वाचलास ... याला सुदैव म्हणायचं की दुर्दैव हेच मला कळेनासं झालंय .." आक्रन्दून रागिणी विचारत राहिली. थोडावेळ खोलीत एक भयाण शांतता पसरली. मिनिटभराने त्या शांततेचा भंग करत राघव बोलू लागला.

" रागिणी इतके दिवस सगळ्यांनी तुझ्यापासून लपवलेली एक गोष्ट मी तुला सांगणार आहे ... खरतर ती तुला सांगायची की नाही याचा निर्णय मी अजूनही करू शकलो नाहीये .... पण जर ही गोष्ट मी तुला सांगितली नाही तर आयुष्यभर मी शांतपणे झोपू शकणार नाही." राघव बोलताना थांबला आणि स्तंभित झालेली रागिणी त्याच्याकडे वेड्यासारखी बघत राहिली. एक थंड शिरशिरी तिच्या मणक्यातून खाली सरकली. क्षणभराची उसंत घेऊन राघव पुढे बोलू लागला,

" रागिणी एक्सीडेंट झाला त्यावेळी रोहन बाईक चालवत होता ..."

त्याचं वाक्य उकळत्या तेलासारखं रागिणीच्या कानात शिरलं आणि ती ताडकन उठून उभी राहिली.

" राघव तू काय बोलतो आहेस हे ? घरातून निघताना तू मला वचन दिलं होतंस ... आठवतंय का तुला ? " ओरडून तिने विचारले. स्वतःच्या आवाजा वरील तिचा ताबा सुटला होता. तिच्या त्या रुपाकडे पाहून राघवचा थरकाप उडाला.

" माझं बोलणं पूर्ण ऐकून घे रागिणी ... " त्याने पुढे बोलण्याचा प्रयत्न केला खरा पण त्याच्या हाताला हिसडा देत रागिणीने दोन्ही हातांनी आपले डोके घट्ट दाबून घेतले ...

" तू मारलस आपल्या रोहनला राघव ... यू आर किलर राघव .... आय हेट यू, आय हेट यू ...."

रागिणी मोठमोठ्यांदा ओरडत राहिली आणि स्तंभित झालेला राघव असहाय्यपणे नुसताच तिच्याकडे बघत राहिला ...

त्या रात्रीपासून रागिणीने राघवशी बोलणे पूर्णपणे बंद केले. एखाद्या त्रयस्थ माणसाशी वागावे असं ती राघवशी वागू लागली. राघवने खूप वेळा तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून ती तेथून निघून जात असे ... राघवने दोन-तीन वेळा जबरदस्तीने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण,

" यू आर किलर ऑफ माय सन ..... आय हेट यू .... आय हेट यू ....."

एवढंच ती बोलत असे. तिच्या या अशा वागण्यामुळे राघव खचून गेला. तासंतास तो हॉलमध्ये लावलेल्या रोहनच्या फोटोकडे एकटक पाहत राही. स्वतःशीच काही तरी पुटपुटत निराशेने मान हलवत राही ... रागिणी दोन वेळच्या जेवणाचे ताट त्याच्या समोर आणून ठेवत असे. बऱ्याच वेळा ते तसेच भरलेलं रहायचं ... पण रागिणीला त्याचे ना सुख होते ना दुःख .....

रागिणीला राघव बद्दल वाटणारी घृणा आणि तिरस्कार दिवसेंदिवस वाढतच चालला होता.

" माझ्या लेकरा ऐवजी हा माणूस का नाही मेला ?"

" मुलाला मारुन जगण्यापेक्षा मरत का नाही हा माणूस ?" असे टोकाचे विचार, राघव दृष्टीस पडल्यावर तिच्या मनात येत असतं ...

तिच्या तिरस्कारामुळे भग्न झालेल्या अंतकरणाने राघव सतत बाल्कनीतच बसून राहायचा आणि खालील रस्त्यावर वाहणाऱ्या अव्याहत ट्राफिककडे विझलेल्या नजरेने पहात रहायचा ....

खाली सोसायटीत कोणीतरी हजाराची माळ लावली आणि त्याच्या आवाजाने रागिणी भानावर आली. संध्याकाळ आणि रात्र यांच्या सीमेवरची ती कातरवेळ होती. घरात अंधार भरून राहिला होता. राघव बाल्कनीत बसून रस्त्यावरून वाहणारे ट्रॅफिक शून्य नजरेने बघत होता. अचानक वार्‍याची एक हलकीशी झुळूक रागिणीच्या गालाला स्पर्श करुन गेली. सोबत एक गुणगुणती कुजबुज तिला ऐकू येऊ लागली ...

" आई .... मी तुझ्याशी बोलण्यासाठी आलो आहे .... त्या दिवशी काय घडलं हे तुला कळलं पाहिजे ..."

रागिणी दचकली . रोहनचा आवाज तिने ओळखला.

" त्या दिवशी आम्ही भीमाशंकर होऊन परत यायला निघालो आणि बाबाला चक्कर आली. थोडा वेळ थांबूनही बाबाला हुशारी वाटत नव्हती. अशा स्थितीत बाबाला बाईक चालवू देणार धोक्याचं होतं. मी बाईक चालवायचा निर्णय घेतला. पहिल्यांदा बाबा तयार होईना ... 

' रोहन तुला परमनंट लायसेन्स मिळाल्याशिवाय ही बाईक चालवायला देणार नाही असं वचन मी रागिणीला दिलयं ...' बाबा म्हणाला. 

' अरे बाबा, मी लहान नाही आता. अशा परिस्थितीत तू बाइक चालवण रिस्की आहे. अशा वेळी मी बाईक चालवली हे आईला कळलं तरी ती काही म्हणणार नाही. उलट माझं कौतुकच करेल ...'  मी त्याची समजूत घातली. मोठ्या मुश्किलीने बाबा तयार झाला वीस-पंचवीस किलोमीटर जाईपर्यंत सगळं व्यवस्थित होतं. स्पीडही फार नव्हता. अचानक मला रॉंग साईडने सुसाट येणारी कार दिसली. जणू ती आम्हाला धडकण्यासाठीच येत होती.  बाईक तशीच सोडून बाजूला उडी मारण्याचा विचार क्षणार्धात माझ्या मनात आला, पण मग मागे बसलेला बाबा सरळ कारखाली आला असता. निर्णय घ्यायला माझ्याकडे काही क्षणच होते ... आणि त्याच वेळी माझ्या डोळ्यासमोर तू आलीस आई ... बाबाशिवाय तुझी काय अवस्था होईल हे जाणून मी क्षणार्धात निर्णय घेतला. बाईकवर अर्धवट उभा रहात मी माझ्या उजव्या हाताच्या कोपराने बाबाच्या कुशीत जोरदार आघात केला. अचानक झालेल्या हल्ल्याने बाबाची प्रतिक्षिप्त क्रिया झाली आणि त्या विचलित अवस्थेत असतानाच मी बाबाला बाईक वरून ढकलून दिले .... बाबा खाली फेकला गेला खरा, पण मला मात्र उडी मारायला वेळ मिळाला नाही ...... 

आई .... बाबाची काहीच चूक नव्हती. बाबाने तुला दिलेले वचन मोडले नव्हते. बाईक चालवायचा निर्णय माझा होता. आज मला एक वचन दे आई ...... तू बाबाला माफ करशील आणि पुन्हा पहिल्यासारखं प्रेम त्याच्यावर करशील .... माझ्या जाण्याला तोच जबाबदार आहे असं त्याला वाटायला लागलंय ...... बाबा खूप दुःखी आहे आई ..... त्याला जर काही झालं तर मला मुक्ती मिळणार नाही ..... मला वचन दे आई ......" 

कानाशी होणारी गुणगुणती कुजबुज थांबली आणि रागिणी भानावर आली ....

अंधारातून तिला बाल्कनीत उभा असलेला राघव दिसत होता. बाल्कनीतून खाली वाकून तो वाहते ट्रॅफिक एकटक नजरेने बघत होता. महिनाभरात तब्येतीने निम्मा झाला होता राघव .... हाडाचा सापळाचं जसा .....

अचानक रागिणीला भडभडून आले ....

" राघव ....."  मोठ्यांदा ओरडून रागिणी तीरासारखी बाल्कनीकडे धावली .....

" माफ कर मला राघव .... मी तुला चुकीच समजत होते ..... आय लव यू राघव ......"

राघवला घट्ट मिठीत घेत रागिणी बोलत होती .....

आश्चर्याचा धक्का बसलेल्या राघवने तिच्या मिठीत असतानाच हॉलमधील रोहनच्या फोटोकडे नजर टाकली ..... का कोण जाणे पण फोटोतून रोहन दोघांकडे बघून समाधानाने हसतोय असा भास त्याला झाला .....

©मिलिंद अष्टपुत्रे

वरील कथा श्री. मिलिंद अष्टपुत्रे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखकाच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post