सोबत

 सोबत

✍️ सौ. प्रतिभा परांजपे 


रमा आजी  लगबगीने घरी निघाल्या. आज देवळात प्रवचन होते त्यामुळे घरी यायला उशीर झाला.


 'काय फरक पडतो कोण आहे वाट पाहतय घरी?' असा विचार करत त्यांनी गेट उघडले व घरात आल्या .



घरात येऊन हातपाय धुवून देवापुढे दिवा लावून शुभंकरोती म्हणत एक पणती घेऊन बाहेर तुळशीपाशी ठेवायला बागेत आल्या. दिवा ठेवून घरात शिरणार तेवढ्यात दारात खुडखुड आवाजाने त्यांचे लक्ष वेधले. त्यांनी इकडे तिकडे पाहिलं. एक कुत्र्याचे पिल्लू उभे होते. ते आजींकडे पहात होते त्यांनी जवळ जाऊन पाहिलं,  'अगबाई किती लहान आहे! आई कुठे असेल ह्याची?' पण मग मनाशी विचार केला, "नको गुंतवणूक"  म्हणत दार लावून आत आल्या.



  रात्री झोपताना दाराशी कुं कू आवाजाने त्यांना जाणवले पिल्लू अजून इथेच आहे. बाहेर खूप थंडी आहे आणि रात्र  ही झाली.


 आता हा इतक्या थंडीत कुठे जाणार? या विचाराने त्यांना झोप येईना. त्यांनी उठून दार उघडून  त्याला आत घेतलं.  त्याच्यासाठी ताटलीत दूध घेऊन आल्या व  समोर ठेवल. थोडं घाबरत घाबरत पिल्लाने दूध पिऊन घेतलं व  अंगाचे मुटकुळे करून पडून राहिला .


रमा आजींनी त्याच्या अंगावर एक जुना टॉवेल टाकला व त्या झोपल्या.



सकाळी जाग आली ती पिल्लूच्या आवाजाने. त्यांनी पाहिलं पांढरे स्वच्छ त्यावर भुर्या रंगाचे गोळे, अंगावर रेशमी केस असलेला गुबगुबीत, टॉवेल खाली व  पिल्लू त्यावर  बसून आजीं कडे पाहत शेपटी हलवत होता. 


'झोप झाली वाटतं ', आजींनी त्याला नीट पाहिलं. गळ्यात पट्टा दिसत होता.


 कोणाचा तरी पाळलेला दिसतोय, घरचे शोध घेत असतील. असे म्हणून रमा आजींनी दार उघडून त्याला बाहेर बागेत सोडलं व त्या आंघोळीला गेल्या.



थोड्या वेळाने त्या फुलं काढायला बागेत आल्या तो पिल्लू तिथेच बसला होता, आपल्या प्रातर्विधी उरकून. आजींच्या मागेपुढे करु लागला. भूक लागली वाटत म्हणत आजींनी त्याला बिस्कीट खायला घातलं. ते खाऊन ते पिल्लू परत बसून गेलं.



 थोड्याच वेळात पोळ्या करणारी सखू आली. तिला आजी म्हणाल्या, "अगं सखू आज चार पोळ्या जास्त कर ग !"


"कां आजी? कोणी पाहुणे येणारे?"



"हां आला आहे ना बाई." 


"कोण?"


"हा चार पायांच्या पाहुणा. हा, टॉमी ग," कुत्र्याकडे बोट दाखवून त्यांनी सखूला सर्व सांगितलं.


"हां व्हय. किती दिवस मुक्काम पाहुणे?" सखूने हसत हसत विचारलं.


त्यावर आजी  म्हणाल्या, "पहा बाई कोणी शोधायला आलं तर घेऊन जाईल ज्याचं त्याच्या घरी."



 दोनचे चार दिवस झाले  वाट पाहुन पण कोणीही टॉमीला शोधायला आले नाही.


 रमा आजी रोज त्याला दूध पोळी देत खायला. तोही आपल्या घराप्रमाणे रमला.


  हळूहळू त्याही टॉमीमध्ये रमल्या आणि तोही.


 आजी खुर्चीवर बसल्या की पायाशी येऊन बसायचा. त्यांच्या मागे पुढे करायच्या .


मग आजींनी एक चेंडू शोधून काढला. खुर्चीवर बसून आजी चेंडू दूर फेकत मग तो चेंडू टॉमी घेऊन येत असे. असा थोड्यावेळ खेळ चाले .


कधी कधी आजी विणायला बसत एक दिवस त्यांचा लोकरीचा गोळा घेऊन टाॅमी चेंडू समजून घ्यायला लागला. आजींना हसायला आले.


 "उसवून टाकलं ना माझं,"  म्हणत त्यांनी विणकाम ठेवून दिले. असेच दिवस जाऊ लागले.



एक दिवस  दुपारी आजी खुर्ची वर बसून पेपर वाचत होत्या. टॉमी त्यांच्या पायाशी बसला होता.


 तेवढ्यात एक पाच सहा वर्षाची मुलगी धावत आली. 'चिकू , चिकू' आवाज देताच भो,भो करत टॉमी तिच्याकडे धावला.


 तिने त्याला उचलून कवटाळून घेतला.



 आजी आश्चर्याने पहात राहिल्या.



"अग बाई तुझा आहे का?"


 "हो मी चिनू, आणि हा माझा चिकू चार दिवस झाले शोधत होते. इकडे आले तेव्हा वॉचमन म्हणाला इथे आहे."



"हो ग चार दिवसांपूर्वीच आला."



 "थँक्यू आजी," म्हणत टॉमीला म्हणजे तिच्या चिकूला घेऊन निघून गेली.



 आजी हताशपणे पाहत राहिल्या.



  रमा आजींना रात्री काही झोप येईना, सारखे लक्ष त्याच्या बसायच्या जागेकडे जात होते.


आता आपण परत एकटे. आला चार दिवस राहिला आणि जीव लावून गेला या विचारांनी त्यांच्या डोळ्यात पाणी आले.


जीवाला जीव लावणारी माणसं एक एक करत निघून गेली. आजी  आठवणीत रमल्या.


रमा आणखी माधवरावांचा मोहन एकुलता एक मुलगा. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याच्यासाठी योग्य अशी मुलगी पाहिली सीमा .


रमा आजींनी खूप प्रेम दिले पण सीमाला काहीच पसंत पडत नसे. सारखी धुसफूस सुरू असायची.


तिच्या या स्वभावामुळे मोहनशी ही तिचं पटत नसे.


त्यामुळे घरातल वातावरण गढुळलेले असे.


पुढे सीमाला दिवस राहिले. रमा आजींनी खूप कौतुकाने तिचे डोहाळे पुरवले. नऊ महिने पूर्ण झाले.  सीमा माहेरी बाळंतपणाला गेली. कन्या रत्न  जन्माला आले. आजींना दिवस पुरेना. बारस ही थाटात झाले. गौरी नांव ठेवले.


सीमा परत आली. अजुनही  स्वभावात काही बदल नव्हता.


पण मुलाकडे पाहून आजींनी सहन केले.


एक दिवस काय झाले कुणास ठाऊक. मोहन आणि सीमाचे कडाक्याचे भांडण झाले.


सीमा मुलीला घेऊन माहेरी निघून गेली ती कायमची. 


मोहनने तिला समजवायचा खूप प्रयत्न केले पण शेवटी घटस्फोट झाला.


या सगळ्याचा परिणाम मोहनने जीव दिला.


आजी आजोबांवर दुःखाचा डोंगर कोसळला.


घरात आता दोनच प्राणी उरले.



काळ आपल्या गतीने पुढे सरकत होता. एक दिवस अचानक माधवराव ही गेले.


आता रमाआजी एकट्या उरल्या. 


त्यांनी स्वतः ला सावरले. मन बागेत, भजन, प्रवचनात रमवायचा प्रयत्न करु लागल्या.


एक सखूच होती जी सुरवातीपासून येत होती.


आणी आज अचानक हा टाॅमी आला चार दिवस राहिला आणि जीव लावून बसला. आणि आता ही चीनू आली नि त्याला घेऊन गेली.


आजींनी मनाला खूप समजावले कशाला उगाच मोह ? ज्याचे त्याने नेले.



संध्याकाळी नेहमीप्रमाणे आजी फिरायला जायला बाहेर निघाल्या. पाहतात तो टॉमी दाराशी बसलेला .



 'तू परत पळून आला वाटतं.' असे म्हणतात तेवढ्यात त्याची मालकीण उर्फ चिनू ही आली . 



"आजी त्याला तुमची आठवण येत होती वाटतं. दार उघडले तसे धावत आला इकडे. मग मी पण आले. रोज आले तर चालेल?"


"अगं, अगं पण तुझ्या घरच्यांना चालेल का  तुझे आई बाबा..."


"त्यांना कुठे वेळ असतो दोघे ऑफिसला जातात ना. मग मला घरी कंटाळा येतो. आयाबाई आहे पण ती काम करते आणि फोन पहात बसते म्हणून तर टॉमीला पाळलाय मी. चार दिवस हा नव्हता तर मला ही जेवण जात नव्हते.सारखी मी इकडे तिकडे विचारतं होते. मग इथल्या वाॅचमनने सांगितले."



 आजींना गौरीची आठवण झाली. इथे असती तर एवढीच असती चिनू सारखी.


"छान आहे हो तू आणि तुझा टॉमी.. नाही चिकू."



  " आजी तुम्ही पण, हो की नाही रे चिकू?"


चीकूने ही शेपटी हलवत हो म्हटले.



आजींनी दोघांना आत बोलावल टाॅमीला बिस्कीट आणि चिनूला लाडू दिला.  लाडू खात खात चिनू म्हणाली, "आजी तुम्हाला ह्याची आठवण यायची कां?"





"हो'ss हो, अग  या वेड्याने चार दिवसात माया लावली. मुके प्राणी जीव ‌लावतात."


  "आजी तुम्ही एकट्या राहता?'


"हो."


 "आजोबा कुठे आहेत?"


 "ते वर गेले," आजींनी आकाशाकडे बोट दाखवत म्हटले.


 "अच्छा अच्छा, म्हणजे ते तारा बनून गेले."


"हो ग."


 "मग तुम्ही एकट्या राहता म्हणून ते वरून पाहतात तुम्हाला."



 "हो त्यांनीच या टॉमी म्हणजे चिकूला आणि तुला पाठवलं माझी काळजी घ्यायला." 


"आणि मला आजी नाही म्हणून तुम्हाला," चीनूने त्यांचा हात धरत म्हंटले...



-------------------------------------------


वरील कथा सौ. प्रतिभा परांजपे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. 


Post a Comment (0)
Previous Post Next Post