मात

 मात 

✍️ मिलिंद अष्टपुत्रे

तो पन्नाशीचा ...

सुखवस्तू कुटुंबातला ... 

एका मल्टिनॅशनल कंपनीत चांगल्या मोठ्या पदावर कार्यरत ....

हाताखाली भरपूर स्टाफ, दर वर्षी घसघशीत पगारवाढ, परदेश दौरे, पंचतारांकित हॉटेलमध्ये स्टे ....

लाईफ मध्ये सर्व काही सेट होतं. 

घरात सुंदर व सुसंस्कृत बायको ....

नक्षत्रासारखी दोन मुले ... त्यांनाही चांगले जॉब ... आणखी काय पाहिजे असतं माणसाला ?

तो दिसायलाही देखणा होता. पन्नाशीत सुद्धा इतका फिट की प्रथम बघणाऱ्याला जेमतेम चाळिशीचा वाटावा. स्वभावाने रसिक. जीवनात सगळी सुखे भरभरुन उपभोगावीत अशा मताचा! सुंदर आणि उच्चशिक्षित बायकोशी लग्न झाले असल्यामुळे त्याच्या बौद्धिक आणि शारीरिक गरजा पूर्णपणे शमल्या होत्या. पण आताशा त्याच्या बायकोला विरक्ती आली होती. अध्यात्माकडे तिचा ओढा वाढला होता. फक्त सुखे ओरबाडत रहाणे म्हणजे आयुष्य जगणे नव्हे असं तिला वाटू लागलं होतं. त्या दृष्टीने वाचन, चिंतन करण्यात तिला गोडी वाटू लागली होती. त्याला तिचं हे मत अजिबात मान्य नव्हतं. अध्यात्म, 'स्व' चा शोध, आत्मा, परमात्मा वगैरे विषयांचा त्याला तिटकारा होता. एकदाच मिळणारा मनुष्यजन्म सर्व सुखे उपभोगण्यासाठीच मिळतो असं त्याचं ठाम मत होतं. बायकोच्या वर्तनाला तो वैतागला होता. गेले कित्येक महिने तो आणि बायको अक्षरशः बहीण-भावांसारखे रहात होते. बायको कधी बोलली तर ते अध्यात्मा विषयीच बोले ज्यात त्याला काडीमात्र रस नव्हता.

एकदा ऑफिस मधील उच्चपदस्थांच्या पार्टीत नकळत त्याने ही व्यथा बोलून दाखविली होती. चार पेग घशाखाली गेले की, " मन की भडास " बाहेर यायला लागते तसंच काहीसं झालं होतं.

" अरे यार सगळ्याच बायका अशा असतात ..." कंपनीचा मार्केटिंग हेड शर्मा व्हिस्कीचा घोट घेत म्हणाला.

" बीबी को भूल जाओ अभी .... दुसरी काहीतरी सोय कर ...." डोळे मिचकावत शर्मा बोलला आणि तो एकदम चमकला. अरे खरंच की हे आपल्या डोक्‍यात आधीच कसं आलं नाही ? त्याला स्वतःचेच आश्चर्य वाटले. पण जसजसा तो विचार करू लागला तस तसं ते किती अवघड आहे हे त्याच्या लक्षात येऊ लागले. हाताखालच्या स्टाफ मध्ये असणाऱ्या सर्व बायका त्याला आठवल्या. काही सुंदर, काही सामान्य, काही बेढब तर काही कमनीय !! पण त्यांच्यापैकी कोणीच 'त्या ' दृष्टीने योग्य नव्हती आणि त्यांच्या बाबतीत असा काही प्रयत्न करणंही धोकादायक होतं. एक करता एक झालं तर नोकरीवर पाणी सोडावं लागलं असतं आणि बदनामी वेगळीच !! नकळत आलेला घाम पुसत त्याने रमचा मोठा घोट घेतला. त्याच्याकडे एकटक रोखून बघणारा शर्मा त्याला घाम पुसताना बघून मोठ्यांदा हसला. जणू त्याच्या मनातील विचार शर्माने उघडे पुस्तक वाचावे तसे वाचले होते.

"ऑफिसमध्ये काही लफडं करू नकोस. सगळ्या करियरची होळी होईल." डोळे बारीक करून त्याच्याकडे एकटक बघत शर्मा बोलला. शर्माने आपल्या मनातील विचार ओळखल्याचे लक्षात येताच त्याचा चेहरा पडला. त्याच्या ओशाळून पडलेल्या चेहऱ्याकडे पाहून शर्मा पुन्हा खदाखदा हसला.

" इतका खचून जाऊ नकोस यार ! मी तुला भन्नाट आयडिया देतो." त्याच्या कानाजवळ आपले तोंड नेत शर्मा बोलला. उत्सुकतेने शर्माचं पुढील बोलणं तो ऐकू लागला. पुढची काही मिनिटं शर्मा त्याच्या कानात काहीतरी पुटपुटत होता. त्याचं बोलणं संपलं आणि मोठ्यांदा हसत शर्मानं त्याला टाळी दिली.

" अहो मी आज मंदिरात प्रवचनाला जाणार आहे. स्वातीला म्हणावं दोन पोळ्या कमी कर. मी जेवायला नाहीये ! प्रवचनानंतर मंदिरात प्रसादही आहे आणि तुम्ही तुमचा डबा भरून घ्या आजचा दिवस, नाहीतर मग कॅन्टीनला जेवा !" घाईघाईने त्याला सूचना देत बायको आवरत होती. तिचे बोलणे ऐकून त्याला आनंदाच्या उकळ्या फुटल्या. स्वाती येईल त्यावेळी घरात इतर कोणीच नसणार होते. तो आणि ती !! अचानक त्याचे मन भूतकाळात शिरले. ऑफिसमधील त्यादिवशीच्या पार्टीत मिळालेला गुरूमंत्र डोक्यात घोळवत तो घरी वावरत होता. त्याच्या गरजा पूर्ण करण्याचा सहज आणि सोपा उपाय शर्माने त्याला सांगितला होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात कुठलाही धोका नव्हता.

" हाऊस मेड .... टारगेट हाऊस मेड ... धिस इज द बेस्ट अँड सेफेस्ट वे !!" शर्मा त्याच्या कानात पुटपुटला होता. त्या दिवसापासून तो स्वातीवर लक्ष ठेवून होता. पस्तिशीतील नीटनेटकी, अटकर बांध्याची सावळी स्वाती त्यांच्या घरी स्वयंपाकासाठी येत होती. "त्या" नजरेनं तिच्याकडे पाहू लागल्यावर त्याला ती त्रिभुवन सुंदरी वाटू लागली होती. तिचेही आपल्याकडे लक्ष असावे असा संशय त्याला आला होता. अर्थात आपण आहोतच तेवढे रुबाबदार आणि देखणे ... आणि ते सुद्धा पन्नाशीत !! त्याने स्वतःचीच मिजास केली होती. अधून मधून स्वाती आपल्याकडे तिरके कटाक्ष टाकते असा ठाम समज त्याचा झाला होता. अलीकडे ती जरा जास्तच नटून-थटून येते असेही त्याला वाटत होतं. 

"म्हणजेच आग दोन्ही बाजूने लागली आहे." शीळ घालत तो स्वतःशीच पुटपुटला होता.

बायको निघून गेली आणि तो आतुरतेने स्वाती येण्याची वाट पाहू लागला. शॉवर घेऊन नेहमीचे ऑफिसचे कपडे त्याने घातले. कपड्यांवर त्याच्या आवडीचा परफ्यूम स्प्रे करून तो तयार होऊन बसला. शर्टच्या वरच्या खिशात त्याने दोन हजाराची गुलाबी नोट घडी करून ठेवली होती.

" पैसा बोलता है मालिक ।" स्वतःशीच तो पुटपुटला. ती गुलाबी नोटच त्याला हवं ते मिळवून देणार होती. दरवाजाची बेल वाजली आणि त्यानं पुढे होऊन दार उघडलं. दारात स्वातीच होती. पायातल्या चप्पल दरवाजा बाहेर काढत खालमानेने तिने आत प्रवेश केला आणि घाईघाईने ती किचन मध्ये गेली. डब्यातील कणिक परातीत घेत असतानाच त्याने बायकोचा निरोप तिला सांगितला. तिच्याशी बोलताना तो रोखून तिच्याकडे पाहात होता पण तिने मान सुद्धा फिरवली नाही. एकटक नजरेने परातीमधील पीठाकडे पहात ती "बरं " एवढच हलक्या आवाजात म्हणाली. तो नाराज झाला. म्हणजे ती आपल्याला रिस्पॉन्स देत होती हा आपला गोड गैरसमज होता की काय ? मनात आलेल्या या विचाराने तो आणखीनच खचून गेला व नकळत त्याची पावले बेडरुमच्या दिशेने वळली. बेडरूम मध्ये आल्यावर त्याने ग्लास मधील पाणी घटाघट पिऊन संपवले. आता त्याला कसले तरी अनामिक टेन्शन आले होते. त्याच्या पायांना किंचीत कंप सुटला होता. डोके जोरजोराने हलवून त्याने स्वतःला धीर दिला.

" मला पुढाकार घ्यावाच लागेल ..." स्वतःलाच बजावत तो पुन्हा बेडरूममधून बाहेर आला. दुरून किचनमधील स्वाती त्याला दिसत होती. पोळ्या लाटताना होणाऱ्या तिच्या लयबद्ध हालचाली बघताच त्याच्या शरीरात एक वेगळीच शिरशिरी आली. हळूच मागून तिच्या कानात काहीतरी रोमँटिक पुटपुटावे असा विचार करून तो दोन पावले पुढे सरकला. त्याचा घामाजलेला हात नकळत शर्टच्या वरच्या खिशाकडे गेला. गुलाबी नोटेचा स्पर्श हाताला होताच त्याला एकदम धीर आला.

" असे किती पैसे मिळत असतील हिला महिनाभर राबून ?"  त्याने विचार केला. या गुलाबी नोटेत तिला वश करण्याची पूर्ण क्षमता आहे याची त्याला खात्री पटली आणि तो नि:शंक झाला सर्व धीर एकटवून तो पुढचे पाऊल उचलणार तोच स्वातीचा फोन वाजला. किचन ओट्या शेजारील टेबलवरचा फोन कानाशी लावत ती बोलू लागली.

"बोल वहिनी ... काही अर्जंट काम आहे का ?"

"नाही मी कामावर आली आहे."

"येणार नव्हते पण आज जरा बरं वाटतंय म्हणून आले कामावर !"

"हो ... गेले होते डॉक्टरांकडे ..."

"पेन किलरने तेवढ्यापुरती थांबते कंबर दुखायची ..."

" विश्रांतीची गरज आहे म्हणाले ..."

"कसं शक्य आहे वहिनी ? या महिन्यात फी भरायची आहे चिंटूची ...."

" किती खाडे करणार कामाचे ? "

"डॉक्टर म्हणतात "एम आर आय" करा कबंरेचा !!"

"कसं शक्य आहे वहिनी ? लाल रेशन कार्ड दाखवलं तरी तीन हजार रुपये लागणार आहेत. कुठून आणू एवढे पैसे ? बघू पुढच्या महिन्यात. चल ठेवते फोन अजून खूप कामे राहिली आहेत करायची ..."

फोन कट करून स्वातीने टेबलवर ठेवला आणि दुखऱ्या कंबरेला तळहाताने दाबून ती पुन्हा पोळ्या लाटू लागली. स्तब्धपणे तो ऐकत होता. घशाशी काहीतरी कडू-कडू दाटून आले होते. घृणा ... घृणा वाटली त्याला स्वतःबद्दल !! आयुष्यात प्रथमच तो त्याच्याच नजरेतून उतरला होता. पोटच्या कच्च्या बच्च्यांना जगवण्यासाठी दुसऱ्यांकडे पोळ्या लाटणाऱ्या त्या अबलेकडे आपण कशा दृष्टीने पहात होतो ते आठवून त्याला स्वतःचीच लाज वाटली.

त्याच पावली तो मागे फिरला. बेडरूममधील वॉशरुमच्या वॉश बेसिन मध्ये त्याने चेहर्‍यावर थंडगार पाण्याचे हबके मारले. नॅपकिनने चेहरा पुसून त्याने त्याच्या पॅन्टच्या मागच्या खिशातील पाकीट काढले. दोन हजाराची आणखीन एक गुलाबी नोट त्याने शर्टच्या वरच्या खिशात ठेवली. ठाम पावले टाकत बेडरूम मधून तो किचन मध्ये आला. सिंकमध्ये स्वाती परात आणि पोळपाट धुवत होती. पोळ्यांची चवड तिने डब्यात ठेवली होती.

" स्वाती ... " हलक्या आवाजात त्याने हाक मारली. चमकून तिने मागे वळून पाहिले.

" हे पैसे घे आणि आजच्या आज एम आर आय करून घे." शांत नजरेनं तिच्याकडे बघत तो दृढ आवाजात म्हणाला.

" माफ कर ! तुझे फोनवरचे बोलणे मी ऐकले आहे. मी तुझ्या डॉक्टरांशीही बोलेन तुझ्या दुखण्या बाबत !!"

दिग्मूढ होऊन स्वाती पहात राहिली.

" नको साहेब ! पैशांची सोय होईल पुढच्या महिन्यात !" खचलेल्या आवाजात शून्यात बघत स्वाती पुटपुटली, आणि त्याला भडभडून आले.

" तुझा दादा तुला पैसे देतोय असं समज आणि घे हे पैसे !" गदगदलेल्या आवाजात तो म्हणाला. टचकन डोळ्यात आलेले पाणी पुसत स्वातीने पैसे घेतले.

" साहेब ... माझा दादा खरच अगदी तुमच्यासारखाच होता दिसायला !! दोन वर्षांपूर्वी एक्सीडेंट मध्ये गेला तो !

ताई आणि तुम्ही दोघे देव माणसं आहात."

पुन्हा पुन्हा भरून येणारे डोळे पुसत स्वाती म्हणाली. ती अधून मधून कटाक्ष का टाकायची हे आत्ता त्याला उमगले. अचानक त्याच्या डोळ्यांसमोर," नुसतं सुख ओरबाडण म्हणजे जगणं नव्हे !!" असं म्हणणारी त्याची बायको आली. येणारा कढ कष्टाने थोपवून त्याने बेडरूम कडे जाण्यासाठी पाठ फिरवली. पाठमोरा असूनही स्वातीचे नकळत जोडलेले हात त्याला जाणवत होते.

आज त्याच्यातील माणसाने जनावरावर मात केली होती.

समाप्त 

वरील कथा श्री. मिलिंद अष्टपुत्रे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखकाच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.

आमच्या Shabd Chapha या यूट्यूब चॅनलवर अनेक कथा वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. एकदा जरूर भेट द्या. 

फोटोवर क्लिक करा आणि पाहा एक नवी कथा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post