जाणीव

 जाणीव

लेखिका- सविता किरनाळे 

सदर लेखिकेने आपल्या सर्व कथांचे copyright register केले असून यांच्या कथा कोणत्याही प्रकारे वापरल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. 

आज सुमेधाला थोडा उशीरच झाला होता. प्रिन्सिपलबाईंनी वाचनालयातील पुस्तकांवर फडकं मारून ती नीट लावायला सांगितले होते. डिपार्टमेंटचे लोक शाळा तपासनीला येणार होते म्हणे. असं काही असलं, की नॉन टीचिंग स्टाफच्या टायमाचा बोजवारा उडतो हे तिला आता अनुभवाने माहीत झाले होते.

वर्षातून सहासात वेळा येणारे सण आणि असे काही प्रसंग सोडले तर बाकी नोकरी तशी छानच होती. सातवीपर्यंत शिकलेली सुमेधा एका शाळेत मदतनीस होती. तिच्या बाकीच्या मैत्रिणी लोकांच्या घरी धुणीभांडी, लादीकचरा, स्वयंपाक अशी काम करायच्या.

त्यांचे काम कष्टाचे तर होते परंतु इतकी प्रतिष्ठाही मिळत नव्हती. सुमेधाला तिच्या शाळेतील नोकरीमुळे प्रतिष्ठा तर मिळायचीच वरून तिच्या तीन मुलींच्या फीमध्ये सवलतही मिळायची. मुलगा अजून लहान होता पण पुढे त्याच्या शिक्षणातही नक्की मदत झाली असती. शाळेतील इतर सुशिक्षित स्टाफ गरजेच्या वेळेस भावनिक, आर्थिक मदत करायचा.

 


हातातील प्लास्टिक पिशवी सावरत ती झपाझप पावले उचलत होती. मुली आणि लहान मुलगा वाटेकडे डोळे लावून बसली असतील याची तिला कल्पना होती. नवरा शंकरही रात्रपाळीला जाण्यासाठी वाट पाहत असेल. उशीर झाल्याने त्याचा भडका उडाला असेल हा विचार करूनच तिच्या अंगाला कापरे सुटले होते.

 


तिने घरात पाय ठेवता क्षणी शंकरच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला.

“काय ग भवाने, किती हा उशीर. मला कामाला जायचं आहे हे विसरलीस काय? स्वयंपाक का तुझा बाप करणार का?”

“अहो आज थोडं जास्त काम होतं म्हणून उशीर झाला. लगेच बापावर कशाला जायचं?” हातातील पिशवी खुंटीवर अडकवत सुमेधाने उत्तर दिले तोच काडकन तिच्या कानाखाली आवाज आला.

 

“तुझ्या आयला... चार दीडक्या काय कमवायला लागली जीभ चुरुचुरु चालू लागली तुझी. जास्त शहाणपणा न करता गुमान कामाला लाग.” शंकर कडाडला. मुलांसमोर उगाच तमाशा नको म्हणून सुमेधा चुपचाप मोरीत शिरली. हातपाय आणि चेहरा धुताना तिने अश्रूही धुवून टाकले.

पटापट शंकरपूरत्या चपात्या, भाजी बनवून त्याला जेवायला वाढले. तो जाईपर्यंत मूलं घाबरून चिडीचुप कोपऱ्यात बसली होती. छोटीशी जरी चूक झाली तर आपले वडील आपल्यावर आणि आईवर हात उचलायला मागेपुढे बघत नाहीत हे त्यांना अनुभवाने माहीत झाले होते.

 


शंकर होताच तसा भयानक. रिक्शा चालवायचा. रात्री जास्त भाडं मिळतं म्हणून तो रात्री रिक्षा बाहेर काढायचा. सकाळी घरी यायचा ते भडकलेल्या डोक्यानेच, पोटात एक नवटाक टाकून जो यायचा. दर गोष्टीला घाणेरड्या शिव्या घालणे, मारहाण करणे हे रोजचेच होते. सुरूवातीला शेजारी, नातेवाईक भांडणात हस्तक्षेप करायचे पण मग शंकर सुमेधाला सोडून मधल्या व्यक्तीलाच भिडायचा. हे कोण चालवून घेईल? कंटाळून लोकांनी त्यांच्या भांडणामध्ये पडणे सोडून दिले. रोज मरे त्याला कोण रडे...

 


आजही जेवून शंकर घराबाहेर पडताच अख्ख्या घराने मोकळा श्वास घेतला. आता सकाळपर्यंत शांती नांदणार होती घरात. सुमेधाने घर आवरून उरलेला स्वयंपाक करून मुलांना जेवू घातले आणि त्यांना झोपवून तिही अंथरूणावर आडवी झाली. लगेच ती झोपूनही गेली.

 

“अगं ए म्हशे..आहेस की उलथलीस ढगात... गेलीस तर बरच होईल... दार उघड ना ए...” 

कुठून तरी दुरून आवाज येत होता. पाठोपाठ धाडधाड दार बडवल्याचा आवाजही येत होता. मोठ्या कष्टाने सुमेधाचे डोळे उघडले. आवाज आपल्याच घराबाहेरून येतोय हे लक्षात येताच ती गडबडीने उठली आणि दरवाजा उघडला.

 

दार उघडताच तिच्या अंगावर लाथाबुक्क्यांचा वर्षाव झाला. बांगड्या फुटून मनगटात रुतल्या, अंगावर काळेनिळे वळ उठले, एक डोळा सुजून बंद झाला. हे सगळं कशासाठी तर लवकर दार उघडले नाही म्हणून.

 


लेकरं घाबरू नये म्हणून वरकरणी सुमेधा मुकाट्याने हात चालवत होती पण मनात वादळ उठले होते. पदर येताच पाच मुलींमधील दुसऱ्या सुमेधाचे लग्न आईने झटपट उरकून टाकले होते. शहरात स्वतःचे दोन खोल्यांचे घर, आणि स्वतःची रिक्षा इतकंच आईने शंकरमध्ये पाहिले होते कारण मागोमाग अजून तीन मुली तयार होत्याच लग्नासाठी. एकदा पोरी उजवल्या की आई वंशाच्या दिव्याला मार्गी लावायला मोकळी झाली असती.

 


सुमेधाचे वडील गणपतराव हमाली करायचे. तेही स्वभावाने शंकरसारखेच होते. आईचे प्राक्तन सुमेधाच्या वाटेला आले होते. कदाचित त्यामुळे सुरूवातीला ती शंकरचा त्रास मनावर घेत नसे. पण मुलं मोठी होवू लागली, नोकरीमुळे तिचेही अनुभव विश्व विस्तारू लागले तसे तिला ही गोष्ट चुकीची असल्याची जाणीव होवू लागली, मनात द्वंद माजू लागले. आताही तेच चालू होते.

 


मुलींना शाळेत पाठवून, मुलाला तयार करून मुलं सांभाळणाऱ्या हीराबाईकडे सोडून ती ड्यूटीवर हजर झाली. कितीही झाकून घेतलं तरी सुजलेला डोळा, हालचालीगणिक चेहऱ्यावर उमटणाऱ्या वेदनांच्या रेषा तिचे हाल सांगून गेल्या.

नकळत सगळ्या स्टाफने तिच्या वाटणीला कमी काम दिले. मेघना टीचरच्या मात्र अंगाचा भडका उडाला होता. सुमेधाच्या मोठ्या मुलीला गोड बोलून त्यांनी सगळी माहिती काढून घेतली. निरागसतेने पोरीने कालचा आणि आजचा प्रसंग सांगून टाकला. शाळा सुटल्यावर त्यांनी सुमेधाला बोलावून घेतले.

 

“सुमेधा, काय झाले अंगावर हे वळ कसले? का मारल नवऱ्याने परत?” चिड़ुन त्यांनी प्रश्न केला.

“अहो बाई, काही नाही... संसार म्हटल्यावर थोडफार असं होणारच... काही मोठं नाही त्यात.” कसनुसं हसत सुमेधा उत्तरली.

“हो का? आणि संसार काय तू एकटीच करतेस? आम्हाला नाही का संसार? माझा नवरा तर कधी नाही असं कधी मारत? तुझ्यापेक्षा काही वर्ष जास्त झाली माझ्या लग्नाला.” मेघना हट्टाला पेटली होती.

“अहो, तुमचं वेगळं आणि आमचं वेगळं. तुम्ही शिकलेली, मोठी माणसं. हे असलं आमच्या पाचवीला पुजलेलं असतं. यातून काय मरेपर्यंत सुटका नाही व्हायची.” सुमेधा सावरून घेण्याचा प्रयत्न करत होती पण तिचा हा युक्तिवाद ऐकून टीचर अजूनच चिडत होत्या.

 

“अच्छा, शिकलेल्या माणसांना दोन पाय जास्त असतात का? आणि हे पाचवीला पुजलेलं वगैरे काही नसतं. सगळं आपल्या हातात असतं. तुमच्यासारखे लोक गपगुमान मार खातात म्हणून मारणाऱ्याची हिंमत वाढत जाते. मला एक सांग सुमेधा, इतकी मोठी काय चूक असते तुझी की त्याने असं जनावरासारखं तुला मारावं? आणि समज काही छोटमोठी चूक झाली तरी समजावून सांगावं. जरा मनाविरूद्ध झाले काही तर बायकोवर हात उचलण्यात कसला पुरुषार्थ आहे?” त्या समजावत होत्या.

“बघ सुमेधा, तू शिकलेली आहेस, चार पैसे कमवून संसाराला हातभार लावतेस. तू नवऱ्यापेक्षा कशात कमी नाहीस. विनाकारण अन्याय सहन करू नकोस. तू जेवढं सहन करशील तेवढा तो जास्त त्रास देत जाईल. मला सांग जेव्हा घरात भांडण चालू असतं तेव्हा मुलं काय करतात?”

“काय करणार बाई, घाबरून उंदरासारखी एका कोपऱ्यात बसतात.” सुमेधाचे डोळे काठोकाठ भरले.”

“बघ तूच विचार कर, मुलांवर कसले संस्कार होत असतील. लहान मुलं जे बघतात तेच शिकतात, पुढे भविष्यात तशीच वागतात. तुझं मार खाणं बघून जर तुझ्या मुलींना नवऱ्याकडून चुपचाप मार खाणे बरोबर आहे असं वाटलं तर चालेल का तुला? उद्या जर त्यांच्यावर कसलाही अन्याय होत असेल तर त्यांनी अजिबात प्रतिकार न करता तो सहन करावा असे वाटते का तुला?

त्यांनाही तू बिनकण्याचं बनवणार आहेस का? हे पाहत पाहत जेव्हा तुझा मुलगा मोठा होईल तेव्हा बायकांना मारणे हा पुरुषांचा हक्क आहे असे वाटू लागले तर त्याला जबाबदार कोण? तुझे जे हाल होत आहेत तेच तुझ्या मुलींचे, सूनेचे व्हावेत असं वाटतं का तुला? अजूनही वेळ गेलेली नाही सुमेधा, स्वतःसाठी ठामपणे उभी रहा. जे चालू आहे ते थांबव. मानसिक गुलमगिरीचे हे चक्र वेळीच थांबव, स्वतःसाठी नाही तर मुलांना चांगल्या व्यक्ती बनवण्यासाठी.”


मेघना टीचरच्या बोलण्याने सुमेधाच्या डोक्यातील चक्र चालू झाले. आपले लहानपण तिला आठवले. टीचरच्या म्हणण्याप्रमाणेच भाऊही असवेंदनशील झाला होता. मागील पानावरून पुढे असं चालू होतं. हे थांबलेच पाहिजे अशी सुमेधाची मनापासून इच्छा होती. तसा निश्चय करूनच ती घराकडे निघाली.

शंकर टीवी बघत बसला होता. शांत वाटत होता. सुमेधाने फ्रेश होवून चहा बनवला. कपबशी नेवून त्याच्या हातात दिली. स्वतःही घोटभर चहा घेवून ती रात्रीच्या स्वयंपाकाला लागली. कणिक मळून कोबीची भाजी बनवली. गरमागरम जेवणाचे ताट सुमेधाने शंकरसमोर ठेवले. ताटात कोबीची भाजी पाहून त्याचा पारा क्षणात चढला.

“तुला शंभरदा सांगितलंय ना कोबीची भाजी बनवू नको म्हणून तरीही तू मुद्दाम तीच बनवतेस.”

“अहो बाजारात जायला वेळ नाही मिळाला म्हणून येताना रस्त्यात जी मिळाली ती घेतली. घरकाम, शाळा यातून कधी कधी जमत नाही. आज एक दिवस चालवून घ्या उद्या जाते बाजारात.”

 

“चालवून घ्या म्हणे. काय मोठी बॅरिस्टर लागून गेलीस वेळ न मिळायला. चल जा बनव दुसरं काहीतरी पटकन. नाहीतर मी जेवणार नाही.” बोलता बोलता शंकरने ताट फेकून दिले. ते पाहताच सुमेधाला राग अनावर झाला.

 

“दुसरं तिसरं काही बनवणार नाही मी. जेवायचं असेल तर जेवा नाहीतर सोडा.”

तिचे प्रत्युत्तर ऐकून शंकरने तिला एक धपाटा मारला. चिडलेल्या सुमेधाने बाजूला पडलेला झाडू उचलला आणि त्याला मारायला सुरू केलं. ती असं काही करेल याची कल्पना नसलेला शंकर आयताच बेसावध तिच्या तावडीत सापडला.

 

“मेल्या तुझे हात खूप लांबले का रे येता जाता मारायला? आणि मग माझे हात काय केळी खायला गेले आहेत काय? आज सुधारेल उद्या सुधारेल म्हणून सोडून दिलं तर तू काय बदलायचं नाव घेईनास. इतका तुला आमचा राग येतो तर जा तोंड काळं कर कुठेतरी.

माझ्या भीतीने तुला हिंमत मिळायची ना अजून मारकुटेपणा करायची आता जर नाही माझ्या हिंमतीची तुला भीती वाटली तर नाव सांगणार नाही सुमेधा म्हणून. एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे जर वाईटवकटं वागलास, माझ्यावर- मुलांवर हात उगारलास तर तोच हात मोडून चुलीत घालीन.”

 

नेहमी मार खाणाऱ्या सुमेधाचा तो दुर्गावतार पाहून शंकर गर्भगळीत झाला होता. आता तो स्वप्नातही तिला त्रास देण्याचा विचार करणार नव्हता. मेघना टीचरने करून दिलेल्या जाणिवेने सुमेधाचे जीवन कायमचे बदलले होते. त्याच स्वाभिमानाची ज्योत सुमेधा कायमची तेवती ठेवणार होती.

समाप्त 
वरील कथा सविता किरनाळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित.

Post a Comment (0)
Previous Post Next Post