पहिलं प्रेम

 पहिलं प्रेम

लेखिका  ---सौ प्रतिभा परांजपे.


आज सुरेश रावांच्या बायकोचे, ललिताचे वर्ष श्राद्ध होते. ललिताला जाऊन एक वर्ष ही झाले.


सर्वांची जेवणे होऊन गुरुजींना यथायोग्य दक्षिणा देऊन, "सर्व व्यवस्थित झाले ना ?" अशी विचारपूस करून सुरेश राव त्यांच्या खोलीत आले. आज त्यांचे मन खूप बेचैन होते. बाहेर हॉलमध्ये मुलगा सून यांची आवराआवर व गप्पा होत होत्या.


"बाबा आज खूप उदास वाटत होते ना," त्यांची सून म्हणाली.


"हं--- बरोबरच आहे, पण होईल हळूहळू सवय... ."



सवय, सुरेश रावांना गंमतच वाटली.  एकटेपणाची सवय?


सवय होऊन खरेतर बरेच वर्ष झाली. ललिता त्यांच्या आसपास असायची पण तरीही, ती आपल्या सोबत नाही हे त्यांना काही वर्षांपासून जाणवायला लागले होते...


 पण हे सर्व आपल्या मनाचेच खेळ आहे हे ते स्वतःला समजवायचे.


लिताच्या हार घातलेल्या फोटोकडे त्यांनी पाहिले. हा फोटो तिचा तती 30 च्या आसपास असतानाचा. लग्नाच्या वाढदिवसाला दोघांचा फोटो काढला होता. एकदा ती सहज बोलून गेली, "मी जेव्हा नसेल ना-- तेव्हा माझा हाच फोटो तुम्ही भिंतीवर लावा.."



सुरेश रावांना स्त्री स्वभावाची तेव्हा खूप गंमत वाटली व वाईटही वाटले.


 ललिता गेल्यानंतर दोघांच्या फोटो मधुन मुलांनी मग ललिताचा फोटो वेगळा करुन मोठा करुन लावला .. दोघांचा फोटो कुठेतरी पेटीत असावा.



ललिताशी त्यांचे लग्न झाले तेव्हा घरात आई, बाबा, भाऊ-बहीण सर्व होते. सुरेशच्या वाट्याला ललिता संध्याकाळी व रात्रीच.


 त्या वयात नोकरी व जबाबदारी असल्याने त्यांनी ते फारसे मनाला लावले नाही, सुरेश ना फिरायची फार हौस होती, तेव्हा मात्र ते ललिताला नेत असत. 


पुढे- पुढे संसार वेल फुलली. दोन मुलगे झाले त्यांचे बालपण शिक्षण करण्यात ते दोघं व्यस्त झाले...


आधी सून, मग वहिनी या पदव्या न बरोबरच आई हे मेडल मिळाल्यानंतर ललिता मधली प्रेयसी पत्नी हरवत चालली आहे असे त्यांना वाटू लागले.



  मुलांचे घरच्यांचे करण्यात त्यांच्या वाटेला ती कमीच यायची तेव्हा मग त्यांनी एकदा चिडून सकाळ व संध्याकाळचा चहा आपण दोघांनी एकत्र बसून प्यायचा असा जवळपास हुकूमच सोडला. त्यामुळे त्यांचा राग पाहून ललिता त्यांच्याबरोबर चहा घेऊ लागली .


काही काळ हे नियमित चालले पण पुढे मुलांना नोकरी लागली त्यांच्या वेळा पाळण्यात या बैठकीत ही राम उरला नाही. सुरेश यांच्या हातात चहाचा कप देऊन ललिता कामाला लागलेली असायची.



सुरेश राव रिटायर्ड झाल्यानंतर मग "अहो तुम्हाला काय वेळच वेळ आहे पण मला मेल कुठे रिटायरमेंट असे मधून मधून टोमणे मिळू लागले ." मग ते मोबाईल घेऊन चहा पीत वेळ घालवू लागले.



"बाबा, चहा झालाय बाहेर येता की इथेच देऊ?" सुनेच्या आवाजाने ते वास्तव्यात परत आले...


 पाच वाजून गेले. फिरायला जायची वेळ झाली. आज जावे कि नको? बरे दिसेल ना ! पण मग जावे झालं, असे मनाशी ठरवून ते चहा पिऊ लागले...



कट्ट्यावर त्यांचे मित्र वाट पाहत होते. पाच- सहा जणांचा त्यांचा ग्रुप होता.


 एक मित्र शहाणे - त्याच्याजवळ इकडचे तिकडचे गॉसिप असायचे. बेहरे - राजनीतिवर गरम गरम विषय घेऊन नेहमीच तावातावात बोलायचा. एक शर्मा, एक गुप्ता, शर्मा --अध्यात्मिक वृत्तीचा तर गुप्ता त्यांच्यासारखा बायको नसल्याने एकटाच. मधून मधून मुलांकडे गावी जात असे.



"आज बडी देर कर दि यार सुरेश लगा, नही आओगे...."


"हां, एक बार लगा जाऊं-- या नही? पर ---घर मे बैठ कर भी...."


"अच्छा किया,आगये जितने जलदी खुद को ॲक्टिव रखोगे उतना अच्छा, जाने वाला तो चला गया,  पता नही--हम कब तक…"



"अरे सुरेश, पुढच्या महिन्यात एक टूर निघतो आहे, आठ दिवसांचा. नाशिक -त्रंबक महाबळेश्वर, तुझा काय विचार? पैसे फार नाही, दहा हजार खर्च आहे एक-दोन जण तयार आहेत विचार करून सांग." शहाणेनी माहिती दिली.



सकाळी सुरेश रावांनी मुलांजवळ टूर बाबत चर्चा केली सर्वांनीच "त्यांना जाऊन या बाबा. तुम्हाला चेंज मिळेल,"  असा सल्ला दिला.



टूरवर निघायचंय ठरल्यापासून सुरेशना थोडा उत्साह आला. कपडे, औषध, सामानाची लिस्ट तयार होत सुटकेस भरत होती व मुलांच्या सूचना...  तब्येत सांभाळा, औषध वेळेवर घ्या फोन करा वगैरे वगैरे.....



पहिले तीन दिवस नाशिक त्र्यंबकेश्वरचे दर्शन व इतर स्थाने पाहून झाली. नंतर महाबळेश्वरला बस निघाली. बसमध्ये काही समवयस्क एकटी तर कोणी जोडपी  होती.


 कोणी पूर्वी मधुचंद्रासाठी गेलेली त्यांच्या आठवणी ताज्या करीत होते. 



कंपनीने हॉटेल आधीच बुक केले होते.


सकाळी नऊ ते दहा वाजता त्यांची बस महाबळेश्वरला पोहोचली तेव्हा वातावरण थोडे ढगाळलेले होते, सर्वांनी चहा नाश्ता करून थोडे फिरून यायचे ठरवले.



  सुरेशना थोडे थकल्यासारखे वाटत होते म्हणून त्यांनी  रुम मधेच आराम करायचे ठरवले.


 पण तासाभराने त्यांना खोलीत बसून कंटाळा आला ते हॉटेलच्या कॅरिडॉर मध्ये येउन उभे राहिले.  


 


          बाहेर लॉन मध्ये आणखीन इतर ठिकाणचे प्रवासी दिसत होते त्यात काही स्त्रिया व मुले होती.


बेंचवर एक स्त्री पाठमोरी बसलेली दिसत होती .


तेवढ्यात दुरून आवाज आला, "अग नंदा,  ए नंदा चल फिरून येऊ."

 नंदा हे नाव कानावर पडताच सुरेश राव दचकले... मनाच्या डोहात त्या नावांचे तरंग बरेच वेळ उमटत राहिले.


  त्यांच्या मनःपटलावर नंदाची छवी स्पष्ट होत गेली…



सुरेशना बँकेत नोकरी लागून साधारण दोन वर्ष झाली होती. त्याच सुमारास एक दिवस त्यांच्या डेस्कवर मॅनेजर साहेबां बरोबर एक तरुणी उभी होती.


 साहेबांनी ही  ओळख करून दिली.


" ही मिस  नंदा--माझ्या मित्राची मुलगी आज  जॉईन करते आहे. तिला काही डिफिकल्टी असल्यास प्लीज,--"



'हो सर नक्की नक्की' म्हणून सुरेशनी नंदाकडे पाहिले.


 दिसायला स्मार्ट पण चेहरा निरागस  अशी नंदा.


लवकरच दोघांचे छान जमले. कामाच्या निमित्ताने बोलणे होत गेले..


 रोज भेट होत होती सुरेशच्या लक्षात आले की नंदा त्यांना आवडू लागली आहे. नंदाचे ही मन त्यांच्यावर बसले आहे.


 पण दोघांच्या घरच्या परिस्थितीत बरेच अंतर आहे. नंदा श्रीमंत बापाची कन्या .ती नोकरी केवळ स्वतःसाठी करते आहे पण सुरेश वर पूर्ण घराची जबाबदारी. दोन बहिणी लग्नाच्या एक भाऊ त्याचे शिक्षण.


यासर्व कर्तव्यात स्वतःच्या लग्नाचा सध्या विचार करणे अशक्य.  पण नंदाच्या घरचे तिच्या साठी स्थळ पहात होती. सुरेशने पाऊल मागे घेतले.


 त्यांनी नंदाला घरच्यांच्या इच्छेप्रमाणे लग्न कर असे स्पष्ट सांगितले. 



नंदा खूप दुखावली गेली. लवकर तिने दुसऱ्या ब्रांचमध्ये बदली घेतली .


जाताना भेटली तेव्हा खूप रडली. सुरेशच ही मन बरेच दिवस कामात लागत नव्हते. सारखी बाजूच्या डेस्कवर नंदा दिसायची. मग त्यांनीही  जागा बदलून घेतली...


पुढे काही वर्षांनी जवाबदार्‍या कमी झाल्यावर त्यांचे ललिताशी लग्न झाले…



मागचे हे सर्व आठवून त्यांचे मन उदास झाले. आज त्यांना नंदाची कमतरता भासत होती, 


कुठे असेल नंदा ? सुखात असेल? आपण आपले प्रेम का व्यक्त केले नाही? तेव्हाचा निर्णय चूक की बरोबर अशा अनेक प्रश्नांच्या भोवऱ्यात मग ते फिरत राहिले...


संध्याकाळी सर्वान बरोबर सुरेश ही फिरायला निघाले.


फिरत फिरत सर्व इको पॉईंट वर आले तिथे बरीच गर्दी होती. लोक उत्साहात आपल्या प्रियजनांचे नाव ओरडून बोलत होते आणि मग तोच आवाज प्रतिध्वनीत  होत परत येत होता..


सुरेश ही त्या पॉईंटवर उभे राहिले डोळे मिटले नी स्वतःच्या नकळत  त्यांच्या तोंडातून आवाज आला, नंदा --नंदा-- नांव प्रतिध्वनित होत होत त्यांच्या तनामनात झिरपत गेले....


समाप्त 


वरील कथा सौ प्रतिभा परांजपे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post