दिसतं तसं नसतं

 दिसतं तसं नसतं ....

✍️ मिलिंद अष्टपुत्रे 


दिनेशचा फोन आला त्यावेळी मी एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये होतो. टॉप मॅनेजमेंटची या फायनान्शिअल इयर मधील पहिलीच मीटिंग असल्याने बऱ्याच महत्त्वाच्या मुद्द्यांवर उहापोह होणार होता. जवळपास तीन तासांच्या मॅरेथॉन मीटिंग नंतर मी मोकळा झालो, त्यावेळी मानसिक पातळीवर इतकी दमछाक झाली होती की सरळ घरी जावे असेच वाटत होते. पण ते अर्थातच शक्य नव्हते. इतर महत्त्वाची कामे आ वासून पुढे उभी होती. केबिनमध्ये येऊन मी माझ्या चेअर मध्ये बसलो आणि एसी चा स्पीड वाढवून निवांतपणे मागे रेललो. मोबाईल चेक करताना मला दिनेश चा मिस्डकॉल दिसला. दिनेश हा माझा शाळेपासूनचा मित्र !! पहिलीपासून ते दहावीपर्यंत आम्ही एकाच वर्गात होतो. दहावीनंतर मात्र आमचे मार्ग बदलले. मी सायन्सला गेलो तर दिनेश कॉमर्सला .... मी दिनेशला फोन केला,

" बोल दिनेश ..... कशासाठी फोन केला होतास ?"

" अरे आज अचानक स्वातीची गाठ पडली. पुढच्या महिन्यात आपल्या दहावीच्या बॅचचे स्नेहसंमेलन करण्याचा तिचा प्लॅन आहे. पुढाकार घेऊन ती सगळं मॅनेज करणार आहे ! त्यासाठी तिला आपल्या सगळ्यांचे मोबाईल नंबर हवे होते. माझ्याकडे होते त्या सगळ्यांचे नंबर मी तिला दिले आहेत. तुझ्याकडे ज्यांचे ज्यांचे नंबर असतील ते तिला पाठवून दे ! ती व्हाट्सअप ग्रुप क्रिएट करणार आहे."

दिनेश घाईघाईत बोलला.

" एक मिनिट दिनेश ..... अरे माझ्याकडे स्वातीचा नंबर नाहीये ...."

मी त्याचे बोलणे मध्येच तोडत म्हणालो.

" ठिक आहे .... मी तिचा नंबर शेयर करतो ... चल बाय .... नंतर बोलू निवांत !! आत्ता थोडा घाईत आहे ...."

दिनेशने फोन ठेवला. दोनच मिनिटात स्वातीचा नंबर दिनेशने मला शेअर केला. मी नंबर सेव्ह केला ,आणि स्वातीला माझ्याकडे असलेले आमच्या वर्गमित्रांचे नंबर  मेसेज करून टाकले. 



पुढच्याच आठवड्यात स्वातीने आमच्या दहावीच्या बॅचचा व्हाट्सअप ग्रुप बनवला. ग्रुप वरील मुलींना लग्नाआधीचे आणि लग्नानंतरचे अशी दोन्ही नावे टाकण्याची सूचना तिने केली होती. ही सूचना वाचल्यावर नकळत मी सुटकेचा निश्वास टाकला ! आता जुईलीची खबरबात कळणार होती ..... जुईली .... एखाद्या मनस्वी चित्रकाराने काढलेल्या चित्रासारखी सुरेख आणि सुंदर ...... जुईलीला मी पहिल्यांदा पाहिले तो प्रसंग इतक्या वर्षानंतरही माझ्या डोळ्यासमोर जसाच्या तसा आहे. अगदी कालच घडल्यासारखा ..... नववी नंतर दहावीच्या वर्गातला पहिला दिवस होता. बोर्डाचं वर्ष असल्याने आमच्यापैकी कित्येकांनी उन्हाळी सुट्टीतच दहावीचे क्लासेस लावले होते. काही महाभागांचा तर अर्धा सिलॅबस शाळा सुरू होण्याआधीच शिकून संपला होता ! त्यांच्या अभ्यासाबद्दल चाललेल्या गप्पा माझ्या डोक्यावरून जात होत्या. त्या चर्चेतलं ओ की ठो कळत नसल्याने, आलेलं टेन्शन घालण्यासाठी मी वर्गाच्या दारात पडलेला उन्हाचा कवडसा किती सेंटिमीटर लांब असावा याचा अंदाज लावत होतो. इतक्यात दरवाजात जुईली एखाद्या स्वप्नसुंदरी सारखी अवतरली.



क्षणभर मला आपण एखादे स्वप्न तर पाहत नाही ना ..... असा संशय आला. तिने क्लास टीचर ला उद्देशून,

" मे आय कम इन मॅडम ?" असे गोड आवाजात विचारले, आणि वर्गात पिन-ड्रॉप सायलेन्स पसरला.

"येस .... कम इन!"

आम्हाला मराठी शिकवणाऱ्या मेहंदळे बाई म्हणाल्या, आणि ती ऐटदार पावले टाकत मुलींच्या बाजूकडील शेवटच्या बाकाकडे निघाली. सर्व मुलांच्या माना तिकडे अगदी विशाल कोनात वळल्या होत्या.

" मुलामुलींनो .... ही आपल्या वर्गात या वर्षीपासून नवीन प्रवेश घेऊन आली आहे. आपण तिच्याकडूनच तिची ओळख करून घेऊ!"

मेहंदळे बाई म्हणाल्या. जुईली तेथेच उभी राहून बोलू लागली,

" मी जुईली दामले ... याआधी कोल्हापूर मध्ये होते . माझ्या बाबांची बदली झाल्याने, मी या शाळेत प्रवेश घेतला आहे."

मी धडधडत्या हृदयाने ऐकत होतो. पुढच्या बाकांवर बसणाऱ्या सगळ्या मुलांच्या मानांना वळून वळून बघताना रग लागली होती. पण तरीसुद्धा डोळ्याची पापणीही न हलवता प्रत्येकजण टक लावून तिच्याकडे पहात होता. क्षणभराने ती लाजली आणि चटकन खाली बसली. मी पुन्हा फळ्याकडे पाहू लागलो. आईशप्पथ त्या दिवशी कुठल्या तासाला काय शिकलो ते कळलेच नाही .... डोळ्यासमोर गोड गोड हसणाऱ्या जुईली शिवाय दुसरं काही येतंच नव्हतं !! 



जुईलीने आमच्या शाळेत प्रवेश घेतला त्या दिवसापासून केवळ तिच्यासाठी मी शाळेत जात होतो. अहोरात्र फक्त तिचाच विचार !! दहावीचे महत्वाचे वर्ष होते ते ..... पुढील आयुष्यातील सगळं करियर ज्या बोर्डाच्या परीक्षेवर अवलंबून असतं, ते महत्त्वाचं वर्ष .... त्या नकळत्या वयात मी जुईलीत पराकोटीचा गुंतलो होतो ..... माझी ही अवस्था लक्षात यायला जुईलीला वेळ लागला नाही. वेळी-अवेळी तिच्या घरावरून मी मारत असलेल्या चकरा, तिच्या नजरेतून सुटल्या नव्हत्या. तीन महिने असेच बेभान अवस्थेत गेले. तिमाहीच्या परीक्षेचा निकाल लागला. माझे पार पानिपत झाले होते .सगळ्या विषयात जेमतेम काठावर पास झालो होतो. घरी बॉबस्फोट झाल्यासारखी परिस्थिती होती. नववीपर्यंत पहिल्या पाचात नंबर असलेला मी .... वर्गात शेवटच्या नंबर वर फेकला गेलो होतो. आईच्या संतापाचा उद्वेग झाला होता. बाबांनी तर माझ्याशी बोलणेच सोडून दिले होते. धाकटी बहीण परक्यासारखी वागू लागली होती. मेहंदळेबाईनीं रिझल्टच्या दुसऱ्या दिवशी बाबांना भेटायला बोलावले होते .कोठे काय चुकतंय हे माझ्याशिवाय कोणालाच कळत नव्हते. आणि त्याच दिवशी मला दप्तरात जुईलीची चिठ्ठी मिळाली ..... तिने मला संध्याकाळी शाळा सुटल्यावर शाळेशेजारील बागेच्या कोपऱ्यात भेटायला बोलावले होते. माझा आनंद गगनात मावत नव्हता. जुईलीशी काय बोलायचं हे ठरवण्यात तो सारा दिवस गेला ..... मी माझ्या पहिल्यावहिल्या प्रेमाची कबुली तिला देणार होतो .... तिने भेटायला बोलवले म्हणजे नक्कीच तिला माझ्याबद्दल काहीतरी वाटत असणार !! लाल गुलाबाचं फुल घेऊन मी धडधडत्या हृदयाने बागेत पाऊल ठेवले. बागेच्या कोपऱ्यातील गुलमोहराच्या झाडाखाली जुईली पाठमोरी उभी होती. मी तिच्यापर्यंत पोहोचलो हे पाठमोरी असूनही तिला कळले होते. झटक्यात ती वळली आणि मी पहातच राहिलो ..... तिचा गोरापान चेहरा लाल झाला होता. ओठ किंचित थरथरत होते. डोळे पाण्याने भरून आले होते .... तिचा तो अवतार पाहून माझ्या हातात पाठीमागे धरलेलं गुलाबाचं फूल मागच्या मागेच गळून पडलं ....

" काय चाललंय हे तुझं ?"

तीव्र स्वरात जुईली म्हणाली. ती कशाबद्दल बोलत आहे हेच पहिल्यांदा मला कळेना. माझं तिच्यावरचं अव्यक्त प्रेम तिला कळून द्यायचा प्रयत्न मी कधीच केला नव्हता ..... मग ती एवढी चिडलीये का ?

" मागच्या वर्षीपर्यंत तू कायम पहिल्या पाचात असायचास म्हणे ...."

आवाजाची तीव्रता आणखी वाढवत ती म्हणाली.

" मग आता घोडं कुठे पेंड खातंय ? की माझ्या घरावरून चकरा मारण्यातच सगळा वेळ जातोय ??"

काय बोलावे ते मला कळेना .... नजर झुकवून मी नुसताच उभा राहिलो. दोन मिनिटे कोणीच काही बोललं नाही. ती दोन मिनिटे मला अक्षरश: दोन युगांसारखी वाटली !!

" हे बघ अजय .... एक चांगला वर्गमित्र, माझ्यामुळे वाया गेलेला मला मुळीच आवडणार नाही ...... माझ्याबद्दल तुझ्या मनात काही विशिष्ट भावना आहेत हे मी जाणते ..... पण आत्ताचे आपल्या दोघांचेही वय त्या भावनांना योग्य असे नाही. आपलं आत्ताच वय आहे अभ्यास करुन चांगले गुण मिळवण्याचं !! अजूनही वेळ गेलेली नाही. अभ्यासाला लाग.... आणखी एक गोष्ट लक्षात ठेव ..... कुठलीही चांगली गोष्ट मिळवण्यासाठी त्या योग्यतेची पात्रता आधी मिळवावी लागते !"

झटक्यात वळून ती गेट कडे चालू लागली. भरल्या डोळ्यांनी तिच्या पाठमोर्‍या धूसर आकृतीकडे मी पहात राहिलो .... बेसावध असताना अचानक कोणीतरी फाडकन मुस्कटात द्यावी अशी माझी अवस्था झाली होती ..... भानावर येऊन मी घराच्या दिशेने निघालो .... तिचे शेवटचे वाक्य घण मारल्यासारखे डोक्यात घुमत होते ....

" कुठलीही चांगली गोष्ट मिळवण्यासाठी त्या योग्यतेचे पात्रता आधी मिळवावी लागते !!"



टेबलावरील इंटरकॉमची घंटा वाजू लागली आणि त्या आवाजाने मी भानावर आलो. परचेसच्या राजेश मिश्राचा फोन होता. काही गोष्टींच्या चर्चेसाठी माझ्या केबिनमध्ये येण्याची परवानगी तो मागत होता.

" ये राजेश ... मी फ्री आहे ." इंटरकॉमवर एवढे बोलून मी फोन ठेवला आणि पुढ्यातील पेपरवेटशी चाळा करत पुन्हा भूतकाळात डोकावून बघू लागलो.

जुईलीने दिलेल्या त्या चपराकीने मी चांगलाच भानावर आलो. तिचे विचार डोक्यातून झटकून नव्या उमेदीने अभ्यासाला लागलो. जात्याच हुशार असल्याने दहावीचे शिवधनुष्य मी लीलया पेलले. प्रिलीम मध्ये आणि नंतर बोर्डाच्या परीक्षेत शाळेत पहिला नंबर काढून मी उत्तम गुणांनी पास झालो. जुईलीच्या घरी जाऊन तिला व तिच्या आईबाबांना पेढे देताना गर्वाने माझी छाती अगदी फुलून आली होती. जुईली सुद्धा फर्स्ट क्लास मध्ये पास झाली होती. दिवाणखान्यात आम्ही बसलो असतानाच फोन वाजला आणि तिचे बाबा तो घेण्यासाठी बाजूला गेले. तिची आईसुद्धा आमच्यासाठी चहा बनवायला म्हणून किचनमध्ये निघून गेली आणि आम्ही दोघेच तेथे उरलो.

" अजय .... आय ऍम प्राऊड ऑफ यू !! आता चांगल्या कॉलेजमध्ये अकरावी सायन्सला तुला अगदी आरामात प्रवेश मिळेल." माझ्याकडे हसून बघत जुईली म्हणाली.

" असाच अभ्यास आणखी दोन वर्षे करून तुला इंजिनियरींगला प्रवेश मिळवायचा आहे .... मला माहित आहे .... तुला मेकॅनिकल इंजिनिअर व्हायचं आहे ते !!आणि ही खात्री सुद्धा आहे की तू नक्की तुझे ध्येय गाठशील !! मी मात्र आर्ट्सला जाणार आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन करून मला इंग्रजीची प्रोफेसर व्हायचं आहे."

स्वप्नाळू डोळ्यांनी माझ्याकडे बघत बोलणाऱ्या जुईलीला मी डोळे भरून पहात होतो.

" नक्की होशील तू इंग्रजीची प्रोफेसर ..... आणि तुझ्या लेक्चरला कधीतरी मी हळूच येऊन मागच्या बाकावर बसेन .... आय प्रॉमिस !!"

माझ्या या बोलण्यावर ती खळखळून हसली. एखाद्या निर्मळ झर्‍यासारखी ..... आणि त्याच वेळी मी मनोमन ठरवलं ...... लग्न करायचं तर ते हिच्याशीच ......



केबिनच्या दारावर नॉक करून राजेश मिश्रा आत आला आणि मी वर्तमानात आलो. मिश्रा नंतर डिझाईनचा दुवेदी आला ..... हा हा म्हणता दिवस संपला आणि मी थकून-भागून घराकडे निघालो. घरी जाऊन कधी एकदा रेवतीला हे सगळं सांगतो असं मला झालं !!

आमच्या दहावीच्या व्हाट्सअप ग्रुप बद्दल ऐकल्यावर रेवती खुप एक्साईट झाली.

"अजा ..... अरे इतक्या वर्षांनी तुझी इच्छा पूर्ण होणार ..... तुला जुईली भेटणार ...."

आनंदाने रेवती म्हणाली, आणि मी तिला टाळी दिली. रेवती ...... माझी बायको !!  माझं सर्वस्व ...... खरंच ती माझ्या आयुष्यात आली नसती तर त्या कठीण वेळी मी काय केलं असतं कोण जाणे ? पुन्हा एकदा माझं मन भूतकाळात भराऱ्या मारू लागलं.



बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून मी मेकॅनिकल इंजिनीअरिंगला प्रवेश मिळवला. जुईली इंग्रजी विषय घेऊन बीए करू लागली. सगळं कसं अगदी स्वप्नवत घडत होतं. मी आणि जुईली एकमेकांच्या प्रेमात अगदी आकंठ बुडालो होतो. फक्त दोघांच्याही घरच्यांना हे माहीत नव्हतं. अर्थात योग्य वेळी आम्ही ते सांगणारच होतो ,पण ती वेळच आली नाही ........ एके दिवशी जुईली हिरमुसली होऊन मला भेटली. तिच्या वडिलांनी तिचे लग्न  एका आय.ए.एस. ऑफिसरशी करून द्यायचे ठरवले होते. प्रशासकीय सेवेत असणाऱ्या उच्च पदावरील देखण्या आणि रुबाबदार निखिल तलवार नावाच्या तरुणाला त्यांनी जुईलीचा नवरा म्हणून निश्चित केले होते. मी कोसळून गेलो. जुईली शिवाय मी जगूच शकत नव्हतो. माझा माझ्या कानावर विश्वासच बसेना.

" अगं पण तू बाबांना आपल्याबद्दल का सांगितलं नाहीस ?" 

ओरडून मी जुईलीला विचारलं.

" सांगितलं .... पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते...... त्यांनी शब्द दिलाय म्हणे निखिलच्या वडिलांना !!"

मुसमुसत जुईली म्हणाली.

" हि आपली शेवटची भेट आहे अजय ..... यापुढे मी कधीच तुला भेटू शकणार नाही !! "

निश्चयी आवाजात जुईली म्हणाली.

" आपल्या प्रेमापायी मी माझ्या आई वडिलांना दुखवू शकत नाही. त्यांच्या शब्दाबाहेर जाणं मला जमणार नाही. कबूल आहे .... सुरुवातीला खूप त्रास होईल .... पण मी मनावर दगड ठेवीन .... आणि तुला नक्कीच माझ्यापेक्षा जास्त चांगली मुलगी बायको म्हणून मिळेल ... विसरून जाऊ आपण एकमेकांना ...."

दुःखातिषयाने मी अक्षरश: वेडापिसा झालो होतो. दुःखाचे कढ एकापाठोपाठ एक येत होते .पुरुषासारखा पुरुष असूनही अश्रूंना थोपवणे मला जमत नव्हते. अक्षरश: धाय मोकलून त्यावेळी मी रडत होतो.



आमचा व्हाट्सअप ग्रुप फॉर्म होऊन आठवडा उलटला होता. रोज मी उत्कंठेने ग्रुपला जॉईन होणाऱ्या वर्ग मित्रांची आणि मैत्रिणींची नावे वाचत होतो. मात्र जुईलीची काहीच खबरबात नव्हती. पुन्हा एकदा निराशेनं मला घेरलं. कदाचित जुईली पर्यंत ही बातमी पोहोचली नसावी. पण हे कसं शक्य आहे ? वर्गातल्या इतक्या साऱ्या मुलींपैकी कोणी ना कोणीतरी तिच्या संपर्कामध्ये असायलाच पाहिजे होते. का ती जाणून-बुजून या सगळ्यापासून दूर राहात आहे ? त्या दिवशी संध्याकाळी मनात असे सगळे विचार घेऊन मी मोबाईल वरील व्हाट्सअप चेक करत सोफ्यावर बसलो होतो, तोच मागून रेवतीने माझ्या गळ्याला मिठी मारली. माझ्या गालाला गाल घासत रोमॅण्टिक आवाजात ती म्हणाली,

" बिच्चारा एक मुलगा !! कित्ती कित्ती वाट पाहतोय ग्रुपवर लाडकी मैत्रिण ऍड व्हायची ..... पण ती काही मनावर घेत नाहीये .... बिच्चारा ग बाई माझा नवरा !!"

हलकेच मी तिच्या ओलसर ओठांचे चुंबन घेतले, आणि काही न बोलता तिला माझ्या घट्ट मिठीत जखडून घेतले ..... रेवती सारखी गुणी आणि समजूतदार स्त्री जर माझ्या आयुष्यात आली नसती ,तर भूतकाळातील ती कठीण वेळ मी कशी निभावून नेऊ शकलो असतो याची कल्पनाही मला असह्य होत होती. जुईलीशी झालेल्या त्या शेवटच्या भेटी नंतर माझ्या आयुष्यात काहीच राम उरला नव्हता. जीवन संपवून टाकायचे टोकाचे विचार प्रबळपणे माझ्या मनात येऊ लागले होते. अशा दोलायमान मानसिक अवस्थेत मला साथ दिली रेवतीने !!  रेवती ..... इंजीनियरिंगची माझी बॅचमेट .... चांगली मैत्री होती आमच्या दोघांमध्ये ..... असेच एके दिवशी जुईलीच्या आठवणीने उदास होऊन कॅन्टीनमध्ये एकापाठोपाठ एक सिगरेटी ओढत बसलेला असताना, अचानक रेवती माझ्या पुढे येऊन बसली.

" काय चाललंय हे तुझं अजय ?" शोधक नजरेने माझ्याकडे बघत तिने विचारले.

" यापूर्वी कधीच तू इतक्या सिगरेट्स पाठोपाठ ओढत नव्हतास. कसलं टेन्शन आहे तुला ?"  कोणीतरी इतक्या आपुलकीने आपली चौकशी करतंय ........ कोणालातरी आपल्याबद्दल काळजी वाटत आहे ..... या कल्पनेनेच माझ्या संयमाचा बांध फुटला. टेबलवर डोके ठेवून मी मनसोक्तपणे अश्रूंना वाट करून दिली. काहीही न बोलता रेवतीने माझे हात आपल्या हातात घट्ट धरून ठेवले होते. थोडा शांत झाल्यावर मी सगळं काही रेवतीला सांगितलं. कुठलाही आडपडदा न ठेवता माझं मन तिच्यापुढे मोकळं केलं. 

"मी तुझ्यासोबत आहे अजय !! मी तिला जाऊन भेटते. तिला बळ देण्याची गरज आहे. ती नक्की परत तुझ्याकडे येईल. आय प्रॉमिस !! मी तुमची भेट पुन्हा घडवून देईन . सगळं काही नीट होईल." 

ती मला समजावत राहिली. आणि खरोखर तिने प्रयत्न सुरू केले. ती जुईलीला भेटली, तिच्या आई-वडिलांशी बोलली, इतकेच नाही तर निखिल तलवारलाही भेटायची तिची इच्छा होती. परंतु जुईलीने तिला रोखले !! कारण दरम्यानच्या काळात तिचा आणि निखिलचा साखरपुडा झाला होता. रेवती हतबल झाली. झालेल्या पराभवाने खचून गेली. शेवटी उद्भवलेल्या परिस्थितीचे खापर केवळ माझ्या नशिबावर फोडणे एवढेच माझ्या हाती राहिले होते ..... रेवतीमुळे हळूहळू मी सावरू लागलो. त्या कठीण काळात तिने अगदी निरपेक्षपणे मला मदत केली. निराशेच्या गर्तेतून बाहेर यायला तिच्या सहवासाचे बहुमोल योगदान होते . या सर्व काळातील सततच्या सहवासाने आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलो, आणि त्याचे पर्यवसन अर्थातच आमच्या लग्नात झाले !! आणि आता इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकदा जुईली माझ्या आयुष्यात डोकावणार होती ........



शेवटी एके सकाळी तो अपेक्षित मेसेज व्हाट्सअप वर झळकला ...

" नमस्कार !! मी नम्रता तलवार ... पूर्वाश्रमीची जुईली दामले ... समूहात ऍड केल्याबद्दल मनःपूर्वक आभार !! " 

थरथरत्या बोटांनी मी तो नंबर ' जुईली ' अशा नावाने सेव्ह केला.आता मी उत्सुकतेने स्नेहसंमेलनाची वाट पाहू लागलो .शेवटी एकदाचा तो दिवस उजाडला. स्वातीने समूहावर मेसेज टाकला,

" मित्र-मैत्रिणींनो आपल्या सर्वांचे स्नेहसंमेलन येत्या रविवारी सकाळी दहा वाजता हॉटेल मेरीएट मध्ये ठरवण्यात आले आहे. सर्वांनी आपापल्या स्पाऊस बरोबर यायचे असून, आपण सर्वजण संपूर्ण दिवस एकत्र धमाल करणार आहोत. येणारा खर्च आपण सर्व कॉट्रिब्यूट करणार असून त्यासाठी सर्वांनी दिनेशला कॉन्टॅक्ट करावे ."

मी आतुरतेने रविवारची वाट पाहात होतो. माझ्याबरोबरच रेवतीही खूप एक्सायटेड होती.

" अजा ..... जुईलीला भेटल्यावर तिच्याशी कसं वागायचं हे लक्षात आहे ना ? अजिबात आऊट ऑफ कंट्रोल व्हायचं नाही ."

रेवती पुन्हापुन्हा मला बजावत होती ,आणि मी मान डोलावत होतो. रिसेप्शन हॉलमध्ये सर्वजण उभे होते. जुन्या शाळकरी मित्रांचे मोठे बापे झाल्याने एकमेकांना ओळखायला वेळ लागत होता. मुली तर अजिबात ओळखू येत नव्हत्या. सर्वांशी रेवतीची ओळख करून देत मी फिरत होतो. जुईलीचा मात्र पत्ता नव्हता. बर्‍याच वेळाने निखिल तलवार ऐटीत हॉलमध्ये आला. अंगावर किमती सुट, पायात ब्रांडेड बूट, गळ्यात बांधलेला टाय, गोरापान चेहरा आणि राजबिंड व्यक्तिमत्व .... असा त्याचा थाट होता. त्याच्यापाठोपाठ जुईली येत होती. तिने किमती साडी नेसली होती. तिच्या अंगावर हिर्‍यांचे दागिने होते. मात्र तिचा चेहरा म्लान होता. एखाद्या कळसूत्री बाहुलीसारखी ती निखिल पाठोपाठ येत होती. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. हीच का ती खळखळून हसणारी, कायम उत्साही असणारी, स्वप्नाळू डोळ्यांनी भरभरून बोलणारी जुईली ? एखाद्या भेदरलेल्या हरणी सारखी, चिंताग्रस्त चेहऱ्याने, कशाला तरी घाबरून असल्यासारखी, डोळ्यांभोवती असलेली काळी वर्तुळे मेकअपने लपवायचा प्रयत्न केलेली जुईली मला पूर्णपणे अनपेक्षित होती. इकडे आल्याआल्याच आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाच्या जोरावर निखिलने सगळी सूत्रे स्वतःकडे घेतली. स्वतःची ओळख सगळ्यांना करून देत त्याने स्वतःभोवती मोठा ग्रुप जमवला. मी गर्दीतून पहात होतो. स्वतःचा मोठेपणा सांगताना तो कोठेही कमी पडत नव्हता. त्याचे सी एम बरोबरचे किस्से, एकदा झालेली पी एम शी मुलाखत, या सर्व गोष्टी तो तिखट-मीठ लावून सगळ्यांना सांगत होता. सर्वजण भारावून ऐकत होते. 



बऱ्याच गप्पा झाल्यावर सर्वांनी जेवण केले. जेवल्यानंतर मंडळी इतस्ततः पांगली. छोटे छोटे ग्रुप बनवून गप्पागोष्टी रंगल्या. मी आणि रेवतीने कोपर्‍यातले एक टेबल पकडले. दुरून आम्हा दोघांना बघून जुईली आमच्याकडे आली. हाय-हॅलो झाले. तिघांनाही काय बोलावे ते सुचत नव्हते. शेवटी जुईलीने बोलायला सुरुवात केली.

" कसा आहेस अजय ?"

" मी मजेत ... तू कशी आहेस जुईली ?"

" कशी दिसतीये तुला ?"

तिने मला प्रतिप्रश्न केला. मी काहीच बोललो नाही. जुईली उदासपणे हसली.

" एका मोठ्या सरकारी अधिकाऱ्याची पत्नी असणे भोगतीये मी ! तुला आठवतं अजय .... मी तुला म्हणाले होते ...... कुठलीही चांगली गोष्ट मिळवण्यासाठी, त्या योग्यतेची पात्रता आधी मिळवावी लागते .... तू ती पात्रता मिळवलीस ..... तुझी योग्यता सिद्ध केलीस ! पण तुला हे सांगणारी मी मात्र माझ्या आयुष्याचा योग्य जोडीदार सुद्धा नीट निवडू शकले नाही."

मी चमकून म्हणालो,

" असं का म्हणतेस जुईली ? निखिल सारखा सर्वगुणसंपन्न नवरा मिळालाय तुला !"

ती पुन्हा एकदा कडवटपणे हसली. कुठेतरी शुन्यात बघत म्हणाली,

" अजय .... समाजात मान-सन्मान, प्रतिष्ठा असणं म्हणजे सर्व काही आलबेल असण नाही. मी निखिलच्या अपेक्षांना कधीच न्याय देऊ शकले नाही, आणि माझ्या त्याच्याकडुन काय अपेक्षा आहेत हे तो कधी जाणू शकला नाही .......... नवरा-बायकोच्या खऱ्या नात्यात न सांगता एकमेकांच्या अपेक्षा ओळखल्या जातात. असं खरं खुरं नातं आमच्यात कधी निर्माणच झालं नाही. बायको म्हणजे त्याच्या लेखी एक शोभेची बाहुली आहे ...... जिला घेऊन उच्चभ्रू लोकांत मिरवता येते. तिला उंची साड्यांनी आणि दागदागिन्यांनी मढवली म्हणजे ती झाली सुखी !! पण मला कुठलं सुख अभिप्रेत आहे हे तो कधीच ओळखू शकला नाही. तुला आठवतं ..... मला इंग्रजीची प्रोफेसर व्हायचं होतं ..... पण बी ए  नंतर माझं शिकणच संपलं रे  ....... माझं स्वप्न स्वप्नच राहीलं ........" बोलता-बोलता जुईलीला हुंदका फुटला. नकळत माझे डोळे पाणावले. मला आठवली ती जुईली जी स्वप्नाळू डोळ्यांनी मला म्हणत असे,

"पोस्ट ग्रॅज्युएशन करून मला इंग्रजीची प्रोफेसर व्हायचंय ......."

" अगं, मग तू सांगायचंस ना निखिलना ..... तुझ्या उच्च शिक्षणाला त्यांनी थोडीच आडकाठी केली असती ?"  काहीतरी बोलायचे म्हणून रेवती म्हणाली. डोळ्यांच्या कडा पुसत जुईली कडवटपणे हसली.

" कॉलेजमध्ये लेक्चर देणारी बायको आय ए एस ऑफिसरला शोभत नाही रेवती !! आणि त्या तुटपुंज्या पगाराची गरजच काय होती ? त्याच्या मते प्रोफेसरकी वगैरे फक्त पैसे मिळवण्यासाठी केली जाणारी कामे आहेत ...... प्रोफेसर होण हे आपल्या बायकोचं स्वप्न आहे, हे सुद्धा त्याला कधी कळलं नाही ..... " जुईली बोलायची थांबली. थोडा वेळ शांततेत गेला. एवढ्यात कोणीतरी आमच्या टेबलवर चहाचे कप ठेवून गेलं .... न बोलता आम्ही चहा पीत राहिलो.

"किती खराब झाली आहेस जुईली ..... स्वतःची काळजी घे ग जरा !! तुला पाहिल्यांदा पाहिलं होतं त्यावेळी तुझ्या सौंदर्यानं स्तिमित झाले होते मी .... अजय तुझ्यासाठी उगाच नव्हता इतका वेडा झाला ....."  जुईलीच्या हातावर हात ठेवत काळजीने रेवती म्हणाली. जुईली हसली. मला ते हास्य बघवेना. त्यापेक्षा तिने हुंदका दिला असता तरी चाललं असतं !!

" तू मात्र पहिल्यापेक्षा आणखीनच सुंदर आणि आकर्षक दिसायला लागली आहेस रेवती ....." सुस्कारा सोडत जुईली म्हणाली. माझ्याकडे कटाक्ष टाकत ती पुन्हा हसऱ्या चेहऱ्याने रेवतीकडे बघू लागली.

" कोणाकडून तरी ऐकलं होतं ...... आपण बायका ना मोगऱ्याच्या कळ्यांसारख्या असतो !आणि आपल्याला मनासारखं उमलू द्यायचं, की कुस्करून फेकायचं .... हे आपल्या नवर्यांच्या हातात असतं !! " 

कोणीतरी ओळखीचे टेबलपाशी आलं आणि जुईली त्यांच्याशी बोलत उठून बाजूला गेली. मी बधिर झाल्यासारखा नुसताच बसून होतो. रेवतीने माझा हात घट्ट दाबला. मी तिच्याकडे बघितले. एखाद्या टवटवीत गुलाबाच्या फुलाप्रमाणे ती दिसत होती. माझ्याकडे बघुन गोड हसत तिने तिचे ओठ माझ्या कानापाशी आणले. हळू आवाजात ती पुटपुटली,

" ऐकलस ना ... काय म्हणाली ती ते ...... बायकोला तिच्या मनासारखं उमलू द्यायचं की कुस्करून टाकायचं हे तिच्या नवर्‍याच्या हातात असतं ....."  मी नुसताच हसलो .



निरोप घेण्याची वेळ आली होती. लवकरच पुन्हा भेटण्याचे आश्वासन एकमेकांना देत मंडळी पांगू लागली. भिरभिरत्या नजरेने मी जुईलीला शोधत होतो. रेवती दूर कोणाशी तरी बोलत होती. अचानक कोपऱ्यातून जुईली माझ्याकडे आली.

" अजय ...."  तिच्या हळुवार हाकेने मी भानावर आलो.

" हि आपली शेवटची भेट .... निखिलला तसं प्रॉमिस केलंय मी ....  इतके दिवस उराशी बाळगलेलं एक गुपित तुला सांगायचं होतं ....... तुझ्याकडे परतण्याची संधी बाबांनी मला दिली होती ..... पण त्यावेळी निखिलच्या शिक्षणाची, त्याच्या रुबाबदारपणाची आणि त्याच्याकडे असलेल्या संपत्तीची भूल मला पडली होती ....... मी माझ्या हाताने परतीचे दोर कापून टाकले होते ..... मला विसर पडला होता की ... दिसतं तसं नसतं ..... झालं ते होऊन गेलं ,माझ्या बाबांबद्दल तुझ्या मनात असलेली कटुता मला दूर करायची होती. तुला हे सांगितलं नसतं तर आयुष्यभर हे शल्य मनात राहिलं असतं ...."

" नम्रता ....." लांबून निखिल तलवारची हाक ऐकू आली आणि चटकन माझा निरोप घेऊन जुईली घाईघाईने त्याच्या दिशेने निघाली. गाईने खाटकामागे जावे तशी ..... 

दुसऱ्या दिवशी सकाळी व्हाट्सअप वर दहावीच्या ग्रुप वर नोटिफिकेशन आले होते ..........


           जुईली लेफ्ट

समाप्त 

वरील कथा श्री. मिलिंद अष्टपुत्रे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखकाच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत. 

Post a Comment (0)
Previous Post Next Post