दुर्गा
लेखिका - सविता किरनाळे
सदर लेखिकेने आपल्या सर्व कथांचे copyright register केले असून यांच्या कथा कोणत्याही प्रकारे वापरल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.
सकाळी सहाचा गजर वाजला आणि वत्सलाबाईंना जाग आली. त्यांनी गजर बंद केला. हाताचे तळवे जोडून कराग्रे वसते लक्ष्मी म्हटलं, जमिनीला हात लावून पादस्पर्शे क्षमस्वे म्हणून त्या बेडवरून उतरल्या. लगबगीने गीझर चालू करून प्रात:विधी पार पाडले. किचनमध्ये जावून कपभर चहा, अगदी आपल्याला आवडतो तसा मसालेदार, बनवून घेवून त्या गॅलरीतील झोपाळ्यावर येवून बसल्या. अजून फक्त सातच वाजत होते. सूर्याची कोवळी किरणं नुकतीच जमिनीवर आगमन करत होती. वातावरण प्रसन्न झाले होते. वत्सलाबाई समाधानाने ते दृष्य पाहत, त्याचा आनंद घेत होत्या.
पासष्टीच्या वत्सलाबाई एका नामांकित हाॅस्पिटलमधून हेडनर्स म्हणून निवृत्त झाल्या होत्या. स्वतः अविवाहित होत्या पण कित्येक बाळांना त्यांनी सुखरूप या जगात आणले होते. त्यांच्या हातात जादू, मनात प्रेम आणि व्यक्तिमत्वात ऋजुता होती. प्रसववेदना झेलणाऱ्या बायकांना वत्सलाबाईंकडे पाहूनच धीर मिळायचा. त्यांच्या कौशल्यामुळे कित्येक वर्षांपासून प्रसुतीविभागात त्याच हेडनर्स होत्या. फिकट रंगाची सुती साडी चापूनचोपून व्यवस्थित नेसलेली, पांढऱ्या पण भरदार, लांबसडक केसांचा अंबाडा, त्यावर एक कोणतेही छोटेसे फूल, कपाळावर कुंकू असा त्यांचा वेश असे. उंच, गोऱ्यापान, घाऱ्या डोळ्यांच्या हसतमुख बाईंनी लग्न का केले नसावे हे एक न सुटणारे कोडं होते. पण नुसत्या दिसण्यावर जावू नका हं, नाजुकसाजुक दिसणाऱ्या वत्सलाबाईंना स्वसंरक्षणाचे बरेच प्रकार येत होते. हाॅस्पिटलची शिफ्टमध्ये चालणारी नोकरी आणि एकटे असल्याने ते शिकणे त्यांना गरजेचे वाटले होते.
निवृत्तीनंतर मिळालेले पैसे आणि आपली बचत यामध्ये त्यांची गुजराण आरामात होत होती. स्वतःचे वन अँड हाफ बीएचकेचे घर होते. भल्यामोठ्या गॅलरीमध्ये सुंदर बाग फुलवलेली होती, घरामध्ये छोटीशी लायब्ररी बनवली होती. संभाषणकौशल्य आणि बोलक्या स्वभावामुळे पुष्कळ माणसं जोडली होती त्यांनी. सतत काही ना काही करत असायच्या त्यामुळे वेळ कसा घालवायचा हा प्रश्न त्यांना कधीच पडत नव्हता. घरकामाला येणाऱ्या बाईचीसुद्धा त्या आपुलकीने चौकशी करायच्या, गप्पा मारायच्या. त्यांनाही बाईंविषयी आपुलकी वाटायची.
रोज संध्याकाळी सहा वाजता फिरायला म्हणून वत्सलाबाई घराबाहेर पडायच्या. येताना भाजी, काही किरकोळ खरेदी करून देवीच्या मंदिरात जावून तिथे थोडावेळ बसून मग घरी यायच्या. मंदिराच्या आजुबाजूला काही भिकारी बसलेले असायचे त्यात एक नवीन तरुण मुलगी वत्सलाबाईंनी पाहिली. त्यांच्या अनुभवी नजरेने ती वेडसर आणि काही महिन्यांची गरोदर असल्याचे टिपले. जेव्हा कुणी पुरूष तिच्याजवळ जाई तेव्हा ती अस्वस्थ होत होती तर कधी अंगावर धावून जायची. ते साहजिकच होते ना कारण तिचा फायदा उठवणारा ही एक पुरूषच होता! कुणा नराधमाने त्या वेडीलाही सोडले नव्हते आणि आपल्या पापाचे फळ तिच्या पदरात घातले होते. त्याच्या क्षणिक वासनेचे प्रतीक ती आपल्या शरीरात वाढवत होती.
आता रोज मंदिरात जाताना वत्सलाबाई काही चांगलं खायला निदान काही फळं तरी घेवून जायच्या. त्यांनी आजुबाजूला त्या मुलीबद्दल चौकशी केली तर चहावाल्याने माहिती दिली की ती रोज रात्री मंदिराजवळच्या दुकानांच्या वळचणीला राहते, त्याने मेंटल हाॅस्पिटलला तिच्याबद्दल कळवले होते पण ही दोन दिवसातच तिथून पळून आली. बाईंना तिची काळजी वाटू लागली.
दिवस आपल्या गतीने पुढे सरकत होते. आता ती मुलगी वत्सलाबाईंना चांगली ओळखू लागली होती, ती त्यांची वाट पाहायची. तिचे पोट आता चांगलेच पुढे आले होते. अश्विन महिना येत होता. नवरात्रात देवीचे घट बसणार म्हणून वत्सलाबाई कामवाल्या मावशींच्या मदतीने घराची साफसफाई करत होत्या. घर स्वच्छ केल्यावर मावशींनी साबणाच्या पाण्याने लादी धुवायला घेतली आणि वत्सलाबाई त्यावरून घसरून पडल्या. त्यांना लगेच दवाखान्यात घेवून जाण्यात आले. सुदैवाने जास्त इजा झाली नव्हती पण कमरेला मुका मार लागल्याने आठवडाभराची बेडरेस्ट सांगितली डाॅक्टरांनी. आता वत्सलाबाईंना बाहेर जाता येत नव्हते. त्यांना त्या देवळाजवळच्या मुलीची चिंता वाटू लागली. त्यांनी घरुनच देवीला हात जोडले, तिची काळजी घेण्यास विनवले.
आज घटस्थापना, नवरात्रीचा पहिला दिवस... वत्सलाबाईंना आता बरे वाटू लागले होते . पण का कोण जाणे सकाळपासूनच त्यांना खूप अस्वस्थ वाटत होते. मन सैरभैर झाले होते. अगदी कुठेतरी निघून जावे अशी उर्मी येत होती आतून. काहीच सूचत नव्हते. विचारांच्या नादातच त्यांनी पायात चपला सरकवल्या आणि सवयीने आपली छोटी पिशवी घेवून त्या घराबाहेर पडल्या. आत्ता कुठे सकाळचे सात वाजत होते. बाहेर पडल्यापडल्या त्यांचे पाय मंदिराची वाट चालू लागले. तिथे पोहोचताच त्या भानावर आल्या. ती वेडी मुलगी वेदनेने तळमळत होती. आजुबाजूला कुणी नव्हते फक्त तो पोरगेला चहावाला होता आणि त्याला काही सूचत नव्हते. वत्सलाबाईंच्या अनुभवी नजरेने हेरले तिला प्रसववेदना होत होत्या. थोड्याच वेळात तिची प्रसुती होणार होती. त्या धावतच तिच्याजवळ पोहोचल्या. त्यांना पाहून त्या अवस्थेतही मुलीला आनंद झाला. वत्सलाबाईंनी चहावाल्याला पाणी गरम करायला ठेवण्याची विनंती केली. तो त्यासाठी आपल्या टपरीवर गेला. बाईंनी मंदिराच्या पुजाऱ्याला आवाज देवून सांगितले, “बाबा काही स्वच्छ सुती कपडे असतील तर दया.” घटस्थापनेची तयारी करत असलेले सोवळे नेसलेले बाबा देवीला चढवण्यासाठी आणलेल्या साडयांपैकी चांगली मऊ सुती पातळं आणि प्रथमोपचार पेटी घेवून आले. त्यांनी काही साड्या आडव्या बांधून आडोसा केला. वत्सलाबाई आपले कौशल्य पणाला लावून मुलीची सुखरूप सुटका करण्याचा प्रयत्न करत होत्या. गरम पाणी घेवून आलेला चहावाला माहिती देवून गेला की गेल्या पाच दिवसात मुलीने अन्नाचा कणही खाल्ला नव्हता. कुणी काही दिले तरी फेकुन देवून कुणाची तरी वाट पाहायची. कदाचित म्हणून तिच्यामध्ये काही शक्ती उरली नसावी. त्याने अंब्युलन्सला फोन केला होता. इतक्यात त्या मुलीने शरीराला झटका दिला आणि वत्सलाबाईंनी मुखाजवळ आलेले बाळ पटकन बाहेर खेचले. तिची सुटका झाली होती. बाईंनी लगेच बाळ तिच्यासमोर धरले.एकवेळ त्याच्या डोक्यावर हात फिरवुन तिने डोळे मिटले, कायमचे. तिच्या अशक्त, आबाळ झालेल्या शरीराला ताण सोसवला नव्हता.
बाळाला स्वच्छ करून स्वच्छ कापडात लपेटून वत्सलाबाई मोकळ्या झाल्या. वत्सलाबाईंनी मंदिराबाहेरूनच देवीला हात जोडले. त्यांना आपल्या हुरहुरीचे कारण समजले होते. त्या दुर्गेनेच त्यांना आज बोलावले होते. वत्सलाबाई कृतकृत्य होऊन घराकडे निघाल्या. दुरुन अंबुलन्सच्या सायरनचा आवाज ऐकू येत होता. पुजारीबाबांनी त्या गोंडस बाळाला हातात घेतले, मुलगी होती ती... सुंदर, तेजस्वी... ‘दुर्गा आली!’ ते उद्गारले.
समाप्त
सुरेख कथा.
ReplyDelete