श्राद्ध

 श्राद्ध

✍️ सौ. अमृता श्रीरंग देशपांडे

मेघनाने रागरागातच फोन ठेवला. गुरुजी काही ऐकून घ्यायलाच तयार नाहीत! दादाला म्हटले, तर त्यानेही अंग झटकून घेतले. म्हणाला, 'अगं मी अमेरीकेत कुठे आईबाबांचं श्राद्ध वगैरे करणार? इथे जेवायला ब्राम्हण-सवाष्ण तरी मिळेल का? तू असं कर, आपल्या दोघांच्याही नावानी एखाद्या सेवाभावी संस्थेला पैसे दान करून दे, झालं!'

  ‘बस्स! पैसे दिले की झालं? पण श्राद्ध म्हणजे काय रे? तर श्रद्धायुक्त स्मरण! वर्षातला एक दिवस त्या गेलेल्यांच्या स्मृतीत, त्यांच्यासाठी घालवायचा, आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करायचा दिवस म्हणजे श्राद्ध! नुसत्या पैश्यानी या सगळ्या भावना व्यक्त होणारेत का?


गुरुजींना विचारलं तर म्हणतायत, मुलींना आईवडीलांचे श्राद्ध करण्याचा अधिकार शास्त्रात नाही. का? तर म्हणे आता तुम्ही लग्न करून दुसर्या कुळात गेलात, तुमचं गोत्रही बदललं, वगैरे वगैरे.... मला सांगा, कुळ बदललं तरी नाळ बदलेल? माझ्या अंगात नसां-नसांत वाहणारं माझ्या माता-पित्यांचं रक्त बदलेल? माझ्या रक्तातल्या पेशी-पेशीत असणारी जनुके (डी. एन.ए.) आणि त्यात असणारी गुणसूत्रे बदलणारेत का? आणि यासगळ्याहून महत्वाचं माझ्या आईवडिलांनी माझ्यावर केलेले संस्कार बदलणारेत? या सगळ्या गोष्टींचा वारसा जसा मला सहज मिळालाय, तसाच त्यांच्याविषयीचा अधिकार का मिळू नये?


मेघनाच्या डोक्यात या अशा विचारांचा गोंधळ सुरू असतानाच दारावरची बेल वाजली. तिने दार उघडलं तर दारात एक विशीतली तरुणी वृद्धाश्रमासाठी देणगी मागायला आलेली. तिला देणगी देऊन दार लोटत असतानाच मेघनाच्या डोक्यात एक छानशी कल्पना चमकली, आणि तिच्या मनातला ताण हलका झाला. दुसर्या दिवशीच तिच्या बाबांची तिथी असल्याने ती लगेच तयारीला लागली...


दुसर्या दिवशी मेघना लवकरच उठली. आईबाबांच्या फोटोसाठी तिने घरच्याच बगिच्यातल्या फुलांचा हार केला. फोटो छान स्वच्छ पुसून टेबलावर मांडून, उदबत्ती लावून नमस्कार केला, तिचे बघून मुलांनी आणि नवर्यानेही केला. आज मी दिवसभर घरी नसल्याचे आधीच जाहिर करून टाकले. मुलांनाही एक दिवस शाळेला सुट्टी घेऊन सोबत चलण्याचे सांगितले. नवराही कुतूहलापोटी तयार झाला. 

घरच्याच गाडीतून सगळे निघाले. 


साधारण तासाभरात त्यांची गाडी एका वृद्धाश्रमाबाहेर येऊन थांबली, तेव्हा मेघनाच्या नवर्याला, सुहासला थोडे-थोडे उलगडू लागले. मेघनाने कालच फोन केल्यामुळे ते आलेले पाहून वृद्धाश्रमाच्या संचालिका मॅडमनी त्यांचे हसतमुखाने स्वागत केले. त्यांना त्यांच्या वृद्धाश्रमाविषयी संपूर्ण माहिती दिली. ते काही साधेसुधे वृद्धाश्रम नव्हते, तर अनेक दुर्धर रोगांनी आजारी आणि अपंग वृद्धांसाठी असलेले विशेष वृद्धाश्रम होते. जिथे त्यांच्या औषधोपचारांची, आहारा-विहाराची पूर्ण काळजी घेतली जात होती.

त्यानंतर तेथील एक सेविका सगळ्यांना आश्रमातील वेगवेगळ्या विभागांत घेऊन गेली. 


मेघना तिथल्या सर्व वृद्धांची आपुलकीने चौकशी करत होती, मुलांना सगळ्यांना नमस्कार करायला लावत होती. होता-होता ते अल्झायमर्सने आजारी असलेल्या वृद्धांच्या विभागात पोहोचले. सेविकेने आधीच सूचना केली, येथील काही वृध्द आक्रमक होऊ शकतात, त्यामुळे सांभाळून चला.  तेथील काही आजीआजोबा स्वता:तच मग्न होते, एक जण त्यांच्याकडे बघून रडू लागले. मेघनाने सेविकेला कारण विचारताच ती म्हणाली, 'अगं इथे येणारी हि माणसं आपल्या माणसांपासून दुरावलेली, प्रेमाची भुकेली असतात. कुणी आलं कि यांना वाटतं आपलंच कुणी भेटायला आलंय कि काय? आता ते काका बघ, आयुष्यभर ज्या मुलासाठी खस्ता खाल्ल्या, त्याच मुलाने शेवटी वृद्धाश्रमात आणून ठेवले, म्हणून आपल्याच मुलावर प्रचंड रागावलेयत. म्हणून कुणीही त्यांच्याजवळ आले तर 'दूर जा, दूर जा' म्हणतात, कधी-कधी आक्रमकही होतात. त्यांना बघताच मेघनाला तिच्या तापट, पण तितक्याच प्रेमळ बाबांची आठवण झाली... मेघनाने त्यांना वाकून नमस्कार करताच 'माझी बछडी गं...' त्यांच्या तोंडून नकळत निघून गेलं.


तेवढ्यात सुहासचं लक्ष एका खिडकीजवळ पलंगावर पहुडलेल्या आजीकडे गेलं. ब्याएंशी-चौर्याएंशी वय असावं त्यांचं. सारख्या खिडकीतून बाहेर काहीतरी शोधत होत्या. सेविकेला विचारल्यावर तिने सांगितले, या आजींना मूलबाळ काही झाले नाही, नवर्याचाच काय तो आधार होता. पण तेही दहा वर्षांपूर्वी रोड अ‍ॅक्सिडेंटमध्ये गेले. त्यानंतर आजींची स्मृती गेली. बाकी सगळ विसरल्या, पण आजोबा आपल्यासाठी गजरा आणायला बाहेर गेलेत, हे काही विसरल्या नाहीत. आजोबांची वाट बघतच पडून राहतात दिवस दिवसभर... मेघनाला कसेसेच वाटले ऐकून. बाबा गेलेत तेव्हा आईची झालेली अवस्थाच डोळ्यांसमोर आली...


तिने सेविकेची परवानगी घेऊन आजींना न्हाऊ-माखु घातले, सगळ्या वृद्धांसाठी आणलेल्या कपड्यांपैकी छानशी साडी नेसवली. बाकी वृद्धांसाठी मेघनाने मागवलेले जेवण या आजींना चालणार नाही कळल्यावर स्वता: आश्रमाच्या स्वयंपाकघरात जाऊन आजींसाठी पथ्याचे जेवण बनवले, ते स्वत:च्या हाताने त्यांना भरवले. नंतर त्यांचे डोके मांडीवर घेऊन मेघना त्यांना निजवू लागली. तिच्या हातातली मायेची ऊब जाणवून आजींनाही गहीवरून आले. थरथरत्या हातांनी त्यांनी तिला आशीर्वाद दिला. जणू त्या डोळ्यांतून सांगत होत्या, 'पोरी, आयुष्यभरात ज्या मातृसुखापासून मी वंचित राहिले, ते सुख आज तू काही तासात अनुभवून दिले...' 'आज तुमच्या रूपात माझी आईच मला परत भेटली...' मेघनानेही डोळ्यांतूनच सुचवले...


नऺतर बाकी वृद्धांना भेटून त्यांची आस्थेने चौकशी केली. त्यांच्याशी संवाद साधून त्यांची दु:खं हलकी होऊ दिली. त्यांच्यासाठी आणलेले नवे कपडे दिले. त्यातल्या ज्या वृद्धांना शक्य होतं त्यांच्यासोबत खेळ खेळले. मुलेही त्यात छान रमली. असाच हसत-खेळत दिवस कधी संपला या चौघांना कळलेच नाही. शेवटी दरवर्षी आईबाबांच्या तिथीला इथेच येऊन या अनोख्या रितीने श्राद्ध करण्याचा मेघना-सुहासने निश्चय केला, आणि साश्रू नयनांनी सगळ्यांचा निरोप घेऊन परतीचा रस्ता धरला. मेघनाच्या मनात आज खर्या अर्थाने आईवडीलांचे श्राद्ध केल्याचा सार्थ अभिमान होता...


समाप्त 

वरील कथा सौ. अमृता देशपांडे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. 


Post a Comment (0)
Previous Post Next Post