बाईकसवारी

 बाईकसवारी✍️

 सौ.हेमा पाटील.

"अहो, ऐकलंत का? आजपासून मी आणि सुषमा संध्याकाळी स्कुटी शिकायला जाणार आहोत. तुम्ही घरी याल तेव्हा मी घरात नसेन.संध्याकाळी चहा तेवढा हाताने करुन घ्या. जमेल ना"?  


"कोण बहाद्दर तयार झालाय तुम्हाला गाडी शिकवायला?" इति पतीदेव..


"आजकाल सगळे सोपे झालेय. अन सगळे अगदी चुटकीसरशी उपलब्ध असते. सध्या एजंट फक्त लायसेन्स काढून देतात असे नाही तर गाडीही शिकवतात ! त्यांना माहीत आहे आमच्यासारख्या महिलांची अडचण!"


"अरे वा ! मानले पाहिजे या एजंटच्या सहनशक्तीला.."


"काय म्हणालात?"


"अगं, म्हणजे एजंट हे पण काम करु लागलेत म्हणजे त्यांनी कुठल्याही कामाला हलका दर्जा द्यायचा नाही असा विचार करणे सुरु केले आहे असे म्हणायचे होते मला.पण एजंट महाराष्ट्रीयनच आहेत ना, की तेही बिहारी?"


 "नाही हो,आपलेच आहेत."


  ‌ "मग ठीक आहे,पण तूच बघ ना, फोरव्हिलर शिकवणे सोपे असते. कारण त्यावेळी शिकवणाराच्या पायातही ब्रेक,अॅक्सिलेटर असतात. शिकाऊ व्यक्ती गाडी चालवताना भलतीकडेच भरकटली तर शिकवणारा गाडी कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. पण टू-व्हीलरचे तसे नाही ना! मागे बसलेला माणूस गाडी कंट्रोलमध्ये ठेवू शकत नाही ".


"बघा तुम्हीच ! तरीही ते गाडी शिकवायला तयार आहेत. नाहीतर तुम्ही... कितीवेळा दाताच्या कण्या केल्या, पण तुम्ही मनावर घेतलेच नाही, त्यामुळे हा पर्याय शोधला ".


हे ऐकून मनातल्या मनात नवरा ( मला हातपाय मोडून घ्यायची थोडीच हौस आली आहे..) पण प्रत्यक्षात,

"तू काहीही म्हणालीस तरीही मी ते मनाला लावून घेणार नाहीय. तुम्ही जा संध्याकाळी. मी हाताने चहा करुन घेईन. वाटल्यास कुकर पण लावेन".


पण या एजंटना टू-व्हिलरच्या डीलर कडून काहीतरी भरघोस आमिष दाखवले गेले असणार! त्याशिवाय शरीराच्या खिळखिळे होण्याच्या भीतीला त्यांनी दूर सारले नसावे असा विचार पतीदेवांच्या मनात आला, पण तो उच्चारण्याचे धाडस त्यांच्यात नव्हते त्यामुळे गुपचूप डबा उचलून ते बाहेर पडले.


पतीदेवांनी पहिल्या दिवसाची गाडी शिकण्याची काॅमेंट्री रात्री जेवताना तोंडी लावणे म्हणून ऐकली. पहिल्या दिवसाचे ऐकण्यातील नावीन्य परत टिकून राहिले नाही. त्यानंतर रोजच ते ऐकून ऐकून पतीदेवांनी नुसते हं हं म्हणत त्याकडे दुर्लक्ष करणे सुरु केले. पण सांगण्याच्या उत्साहाच्या भरात ते बाईसाहेबांच्या कधीच लक्षात आले नाही म्हणून बरे ! नाही तर तिथेच दोघांच्या नवीन वादाला तोंड फुटले असते.


  ग्राऊंडला न थांबता उलटसुलट दहा राऊंड मारले की गाडी शिकलात हे लक्ष्य एजंटने यांच्यासमोर ठेवले होते. मोजून दहाव्या दिवशी दहा राऊंड मारणे जमले म्हणून दोघीही खुश झाल्या. आता लायसेन्स काढण्यासाठी स्वतःची स्कुटी घेऊनच आरटीओ कार्यालयात या असे एजंटने आत्मविश्वास पूर्ण शब्दांत सांगितल्यावर तर हवेत तऱंगतच दोघी घरी पोहोचल्या.


आजचे जेवतानाचे तोंडी लावणे जरा वेगळेच अन् मधात घोळवलेले आहे हे लक्षात आल्यावर पतीदेवांनी सावध पवित्रा घेतला. ऐकताना जणू काही आपले लक्षच नाही असे दाखवत मोबाईल सर्फिंग सुरु होते. पण आपल्या गाडी चालवण्याच्या कौशल्याबाबत इतका वेळ सांगूनही नवऱ्याकडून कसलीच प्रतिक्रिया येत नाहीय हे पाहून तिने थेटच वार केला. "आपण स्कुटी घेऊया ना गडे"...हे शब्द ऐकल्यावर तर संभाव्य धोका लक्षात घेऊन पतीदेवांनी पटकन उरलेले भाताचे दोन घास तोंडात घालून हात धुवायला बेसीनकडे धाव घेतली.


पण हार मानेल तर ती पत्नी कसली ? रात्री बेडरुममध्ये आल्यावर लाडीकपणे नवऱ्याच्या गळ्यात हात घालून तीने परत तोच प्रश्न विचारला. आता नकार देणे नवऱ्याला अवघड झाले. कारण गळ्यात असलेल्या हातांची जवळीक बरेच काही सुचवत होती.

"बरं..बरं , बघूया. घेऊया". असे गुळमुळीत उत्तर नवऱ्याने दिले. पण हेच शब्द कानी पडण्यासाठी इतका वेळ तिचा खटाटोप चालला होता. त्यामुळे ते शब्द कानी पडताच ती अगदी आनंदली अन् लगेच नवऱ्याच्या गळ्याभोवती घातलेली हातांची नाजूक मिठी दूर करून मोबाईल उचलून तिने सुषमाला फोन लावला. 


"ए ,जाऊया गं उद्या.आमचे हे पण म्हणालेत घेऊया गाडी.आपल्या स्वतःच्या नव्याकोऱ्या गाडीवरच टेस्ट द्यायची हे ठरले तर मग" !


   नवरोबाने कपाळावर हात मारुन घेतला. पण आता काहीच करु शकत नाही हे समजल्याने शांतपणे त्यांच्या फोनवरच्या गप्पा ऐकणे एवढेच त्याच्या हाती उरले होते. गप्पा संपल्यावर तरी आपल्याकडे पत्नीची कृपादृष्टी पडेल या वेड्या आशेने तो गप्पा संपण्याची वाट पहात होता. पण गप्पा संपण्याची कुठलीच चिन्हे दिसेनात, उलट गाडी घेऊया म्हणता म्हणता कुठली गाडी घ्यायची हे ही फोनवर ठरल्याचे ऐकून बिचाऱ्या नवऱ्याने कुस बदलली.


दुसऱ्या दिवशीचा रविवार गाडी खरेदीला जाण्यासाठीच जणू उगवला होता. उत्साहाने गाडी आणण्यासाठी जायला पत्नी अगदी नटूनथटून तयार झाली होती.शेवटचा उपाय म्हणून पतीदेव म्हणाले, "मी काय म्हणतोय ! सध्या आपण सेकंडहॅंड गाडी घेऊयात.मग तुला चालवण्याची चांगली प्रॅक्टिस झाली, हात साफ झाला की नवी घेऊयात."


"नाही हं.. ग्राऊंडला उलटसुलट दहा राऊंड मारलेत मी न बिचकता.. अजून कसला हात साफ व्हायचाय? एकदा हो म्हणून परत असे माघार घेणे बरे दिसते का? सुषमाचा नवरा तर एका पायावर तयार झाला आहे गाडी घ्यायला. मी तर रात्री सांगितले पण सुषमाला की , तुम्ही ही गाडी घेऊयात म्हणालात ते.. अन् आता नाही म्हंटले तर आपल्या स्टेटसला शोभेल का ते?"


"अगं, ते तू रात्री अगदी लाडात येऊन विचारलेस म्हणून तुझे मन राखण्यासाठी मी होकार दिला होता."


"जा तिकडे.. मला नाही बोलायचं तुमच्याशी.. तुमचे प्रेमच नाही मुळी माझ्यावर ! कधी नव्हे तो हट्ट केला होता मी.. तरीही तुम्ही तो पुरवत नाही. इतर बायकांसारखी मी कधी उधळपट्टी करते का?"


"अगं, पण तू जे मागशील ते मी नेहमीच घेतो की ! आता गेल्या महिन्यात पैठणी हवी म्हणालीस तर घेतली की नाही"?


"तर तर.. जणूकाही माझ्यासाठीच घेतली. मी नेसल्यावर मला फक्त आरशासमोर उभे राहिल्यावर दिसते. तुम्हीच पहाता मी नेसल्यावर टकामका! मग कुणासाठी घेतलीय बघा तुम्हीच!"


यावर नवरोबाने दोन्ही हात कोपरापर्यंत जोडले अन् म्हणाले, "चला बाईसाहेब! जशी आपली मर्जी "!


त्या रविवारी शेजाऱ्यांना पेढे खायला मिळाले हे सांगण्याची आवश्यकता उरली नाही हे सुज्ञ वाचकांना समजले असेलच !


पण आता याचा उत्तरार्ध पण ऐकून जावे ही कळकळीची विनंती..


घराचे नूतन सदस्यत्व प्राप्त केलेल्या स्कूटीचे उद्घाटन आपल्या पतीदेवांच्या हस्ते करण्याइतका सुज्ञपणा तिच्याकडे नक्कीच होता. त्यामुळे पहिल्या दिवशी नवरोबा बाईक ऐवजी स्कूटी घेऊन आॅफीसला गेले हे सांगणे न लगे! 

त्यानंतर आठवडाभर अपार्टमेंटच्या आवारात दररोज एक दोन राऊंडस् मारत आपला हात साफ करणे मॅडमनी सुरु ठेवले. आत्मविश्वासात इतकी वाढ झाली की, नवरोबांना मागे बसवून जरा दूरवर राऊंड मारायचा असे दोन्ही शिकाऊ ड्रायव्हरनी ठरवले‌. मग काय.. नो अपील ! रात्री जेवण झाल्यावर आईस्क्रीम खायला गाडीवरून जायचे ठरले. ठरल्याप्रमाणे दोन्ही पार्ट्या खाली उतरल्या. गाडीवर बसून बटन स्टार्ट केले. मागे नवरोबा बसले की, दोघींनीही गेटकडे मोर्चा वळवला. दोघींचेही नवरे,

जरा होले होले चलो मोरे साजना

हम भीं पिछे है तुम्हारे | हे गाणे गुणगुणत आपापल्या बायकोवर अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून होते. गेटबाहेर पडताना गेटवर उभी असलेली सोसायटीतील तरुण मुले कौतुकाने या दोघींना गाडी चालवताना पाहून बकअप असे अंगठा दाखवून ओरडली. ते पाहून दोघींच्या ही अंगात उत्साह जरा जास्तच संचारला. तेवढ्यात होऊ नये ते झाले. गेटच्या समोरच्या बोळातून एक रिक्षा येत होती. तिच्याकडे लक्ष देणे आवश्यक होते, पण या नवीन चालकांना आरशात आपल्या मागे बसलेल्या आपल्या नवऱ्याला पाहण्यातच स्वारस्य वाटत होते हे त्या बिचाऱ्या रिक्षावाल्याला काय माहित? नवऱ्याला मागे बसवून कसे आपण गाडी चालवतोय या अॅटीट्यूड मध्ये रमलेल्या बायकोला अगं.. अगं ,पुढे बघ म्हणेपर्यंत स्कूटी रिक्षाच्या पुढील भागावर जाऊन आदळली होती. अन या स्कूटीच्या मागे मागे जायचे असे ठरल्याने दुसरी स्कूटी ही येऊन पहिल्या स्कूटी वर आदळली होती. साहजिकच दोन्ही गाड्यांनी रस्त्यावर लोळण घेतली, कारण त्यांच्यापुढे दुसरा पर्यायच नव्हता. दोन्ही स्कूटी वर असणारे चौघेजण आता आपापले सुखासन सोडून रस्त्यावर पसरले होते. उठून उभे राहिल्यावर दोघींच्या नवऱ्यांनी आपल्या सर्वांगावर नजर फिरवली, अन् आपण हाती पायी सुखरूप आहोत हे पाहून इतक्या जोराने निःश्वास सोडला की, त्या दोघांनाही एकमेकांचा निःश्वास ऐकू आला. एकमेकांचे दुखणे समजून त्या परिस्थितीतही दोघे एकमेकांकडे पाहून हसले. रिक्षावाला समोर येऊन काहीतरी बोलतोय एवढेच दोघींच्या नवऱ्यांना दिसत होते, तो काय बोलतोय ते ऐकायला मात्र येत नव्हते. कारण आठवड्यापूर्वी आणलेल्या लाखभर किमतीच्या स्कूटीचे पासिंग होण्याआधीच तिचे कुठकुठले पार्ट बदलावे लागणार आहेत, अन् त्यासाठी किती खर्च येईल याच्या हिशोबातच दोघींचेही नवरे गुंतले होते....

  

अन तुझीच चुकी कशी आहे हे तावातावाने भांडत दोघी मैत्रिणी रिक्षावाल्याला गाडी चालवण्याचे नियम शिकवत होत्या. रिक्षातील गिऱ्हाईक मात्र रिक्षातून उतरुन कधीच पायी चालू लागले होते, कारण हे भांडण अर्धातास तरी मिटणार नाही याची त्याला खात्री होती.

अन् दोघींच्याही नव्याकोऱ्या स्कूटी मात्र अजूनही रस्त्यावर लोळण घेत पडल्या होत्या...

समाप्त

वरील कथा सौ. हेमा पाटील यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित.

आमच्या Shabd Chapha या यूट्यूब चॅनलवर अनेक सुंदर कथा उपलब्ध आहेत. एकदा जरूर भेट द्या.

एका वेगळ्या आणि सुंदर कथेसाठी फोटोवर क्लिक करा.Post a Comment (0)
Previous Post Next Post