मैत्र

 मैत्र... 

✍️ दीपाली थेटे-राव


"अस्मी ऐक ना माझं. 

नको फार नादी लागूस गं साकेतच्या.

 असं काय पाहिलंयस त्याच्यात की वेडी झालीस त्याच्यासाठी? 

सावर स्वतःला..खूप वहावत चाललीयेस तू 

इतकं.. की तुला तुझ्या आजूबाजूला तुझं स्वतःच एक स्वतंत्र जग अस्तित्वात आहे याचाच विसर पडलाय."


"काहीतरी बोलू नकोस नचि. तु तेव्हाही माझा चांगला जवळचा मित्र होतास आणि आत्ता ही आहेस. 

असं काय विचित्र.. अंतर ठेवून वागले रे तुझ्याशी? पूर्वी इतकीच समरसून धम्माल करतो की आपण ग्रुपमध्ये. 

हं! आता थोडावेळ माझा साकेतसाठी जातो म्हणा. पण त्याला काही ऑप्शन नाही After all Saket is my sweet heart. "


"थोडा ss ? 

अस्मि ..अग तुझा सगळाच वेळ सध्या साकेतसाठीच आहे. त्याच्यासोबत नसतानादेखील तू फक्त त्याच्याच विचारात असतेस. पूर्णपणे साकेतमय झाली आहेस तू. आज-काल तुला आम्हा सगळ्यांबरोबर पिक्चरलाही यायचं नसतं. काहीही कारणं देत बसतेस मग. 

परवा काय म्हणालीस? 

आईबरोबर बाहेर जायचं आहे. 

आणि नंतर नीरूने तुझ्या घरी फोन केला...जायच्या आधी तर 

काकू तिला म्हणाल्या, 'अग तुमच्याबरोबरच येणार आहे ना ती पिक्चरला. कधीचेच बाहेर पडलीय.' 

आता काय सांगणार त्यांना..

हे असं खोटं बोलणं शोभत का तुला? 

आमच्या नावाखाली साकेत बरोबर फिरत असतेस" अपर्णा चिडुन बोलली.

"अग तो दुसऱ्या कॉलेजमध्ये आहे ना म्हणून मग भेटायला प्रॉब्लेम येतो. मग अशी काहीतरी कारणं शोधावी लागतात. इथेच असता तर सोपं होतं सगळं 

आणि हो फिरतेय तुमच्या नावाखाली सध्या.. 

 पण घ्या ना रे समजून थोडसं यार

हे इयर संपू दे. ग्रॅज्युएशन झाल्यावर मास्टर्ससाठी यु. एस. ला जायचा विचार करतोय दोघेही आम्ही. तेव्हा सांगूच घरी सगळं काही. 

मित्र मैत्रिणी म्हणवता आणि इतकं करता येत नाही का तुम्हाला?" अस्मिदेखील तावात आली होती

"अग पण खोटं बोलून? 

नचि सांगत होता..साकेत बरा मुलगा नाही. 

आम्हालाही जाणवलंय अस्मि..

सतत सिगरेट फुंकणं ...कॉलेज बुडवून पार्ट्या करणं....

अभ्यासातही फार हुशार नाहीये तो असं ऐकलंय अन् तो काय येणार तुझ्यासोबत यु. एस. ला मास्टर्स करायला. 

नको वेळ वाया घालवू त्याच्यासाठी 

लक्ष दे अभ्यासाकडे" रेवा म्हणाली.


"अस्मि ! अग तू अशी टॉप करियरची मुलगी आणि स्वतः सगळी हुशारी त्याच्यामागे घालवतेस. 

नको ग!" नचि काकुळतीने म्हणाला


 "एक मिनिट!" अस्मि ओरडलीच त्याच्यावर,


"काय म्हणालास? 

आणि काय सांगतोयस तू सगळ्यांना? साकेत चांगला मुलगा नाही... सिगरेट ओढतो... पार्ट्या करतो... आणि काय? मला फसवतोय? 

नचिकेत तू मुद्दाम पसरवतोय हे सगळं. मला माहित नाही का? तुला मी आवडते ते. 

तुझं माझ्यावरचं प्रेम..

मला जाणवलं होतं याआधीच.. पण मैत्रीत खूप सहजपणे घेतलं सगळं

 म्हटलं..ठीक आहे

 होता है यार! 

पण आता नाही हं! 

 जळतोस तू साकेतवर 

तुला मिळालं नाही ते इतक्या सहजपणे त्याला मिळालं म्हणून

 हो ना? 

बोल कि आता! 

आता का गप्प आहेस मूग गिळून?"


"काहीतरीच काय बोलतेस अस्मि. 

हो ! आवडतेस तू मला.. पण याचा अर्थ असा नाही की तू माझीच व्हावीस.

मी फक्त तुझ्या भल्याचा विचार करत होतो. लहानपणापासून एकत्र आहोत आपण. तुझं काही वाईट झालेलं नाही बघवणार ग."


"Enough नाचि!! 

आणि काय रे हुशार.. हुशार म्हणे 

हुशारी काय चाटायचीय? 

अरे इंडस्ट्रीयलिस्ट आहेत साकेतचे पप्पा

 काय गरज रे त्याला परीक्षेत चांगल्या मार्कांनी पास होऊन नोकरीसाठी वणवण करण्याची. 

काही नाही केलं तरी आयुष्यभर बसून खाईल इतकं करून ठेवलय त्याच्या पप्पांनी"


"अग पण ? स्वकर्तृत्व म्हणून काही आहे की नाही? स्वतःला काही सेल्फ रिस्पेक्ट.. सेल्फ अचिव्हमेंट्स असतात की नाही?" नचिकेतनं सांगून पाहिले. 


"तू गप्पच बस हं! सगळ्या ग्रुप मध्ये माझी आणि साकेतची इमेज खराब केलीस तू... फक्त तुझ्या जळकुकडेपणाने. 

मला आता तुझं तोंडही पाहायचं नाही. जोडीदार व्हायची स्वप्न बघत होतास ना.. अरे तू तर चांगला मित्रही होऊ शकत नाहीस. 

तू.. तू मला कधीच पुन्हा भेटू नकोस. 

नचि माझ्या लाईफ मधून डिलीट केलय मी तुला. 

आज.. आत्ता.. इथेच"


  अस्मि मागे वळूनही न पाहता ताडताड निघून गेली. 

 नचि थिजल्यासारखा सगळं काही संपलेलं बधीरपणे बघत ती गेल्याच्या वाटेकडे एकटक नजर लावून राहिला. 

इतक्या वर्षांचं मैत्र असं सहज एका क्षणात तुटून पडलं होतं. 

गळून गेली होती आयुष्यातली मागची सगळी वर्ष 

एका क्षणात रिकामा झाला होता फ्रेंडशिप बॉक्स.. 


अस्मि आता ग्रुप मध्ये यायची बंद झाली 


...काही नाही तरी या सगळ्यामुळे तिला स्वतःच्या अभ्यासाची थोडी का होईना जाणीव झाली. मन लावून अभ्यास करून मेरीट मध्ये आली ती फायनल इयरला.


सगळेच आता वेगवेगळ्या वाटा पकडणार होते. 

प्रत्येकाची वेगवेगळी स्वप्न आणि वेगवेगळी ध्येय....

आज कॉलेजचा सेंड ऑफ... 

उद्यापासून सगळेच दुरावणार .. 

एकमेकांना दरवर्षी भेटण्याचे वायदे चालू होते.. खूप सारी दोस्तीतली प्रॉमिसेस..

 प्रत्येकजण आपापल्या पुढच्या करिअरविषयी बोलत होता 

 अस्मिनं ही ती ठरवल्याप्रमाणे यु एस ला जाणार असल्याचं शेअर केलं. सगळे हसून खेळून एकमेकांशी बोलत होते पण आजही नचिकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं तिने. एक शब्दही बोलली नाही. 

काल आलेल्या साकेतसाठी लहानपणापासूनची मैत्री पणाला लावली होती तिने. 

शेवटी पुढे होऊन तोच बोलला

" नको बोलूस तु माझ्याशी. 

  वाग असच ...तुला हवं तसं...

पण मी तुला नाही विसरणार अस्मि

 बघ ! तू यु एस ला जाताना एअरपोर्टवर तुला सी ऑफ करायला नक्की येईन.

 येणारच... आफ्टर ऑल तू माझी मैत्रीण आहेस आणि इतक्या छान गोष्टीसाठी तिकडे चालली आहेस. 

तुला शुभेच्छा तर द्यायलाच हव्यात."

 इतकं बोलून निघून गेला तो पार्टीतून.


  पुढचे दिवस कसे भराभर निघून गेले तिचं तिलाच कळलं नाही. 

एंट्रन्सची तयारी..इंटरव्यू ...व्हिजासाठीची पळापळ ...या सगळ्यांमध्ये विचार करायला तिला क्षणाचीही उसंत मिळाली नाही. 

हो साकेतही जाणारच होता की बरोबर. 

त्यामुळे ती आणखीनच खुश होती आई-बाबांनाही तिने या सगळ्याबद्दल सांगितलं होतं 

त्यांचं म्हणणं एकच होतं ... आधी शिक्षण पूर्ण करा मग बघू पुढचं .

तिनही त्यांना तसं प्रॉमिस केलं 

आज निघाली ती

 नाही म्हणलं तरी दोन वर्ष घरापासून लांब राहायचं.... तिच्या पोटात गोळा आला होता

 आजपर्यंत कधी आई बाबांना सोडून राहिलीच नव्हती ती आणि आता एकदम असं दोन वर्षांसाठी .. तेही इतक्या दूर

 कसंनुसं व्हायला लागलं तिला पण दुसरीकडे मनात हुरहूर दाटून आली होती. साकेतही येणार होता बरोबर.. तिला तिथेच युनिव्हर्सिटीत होस्टेल मिळालं होतं. तिथेच जवळच साकेतनं अपार्टमेंट बुक केलंय म्हणाला.

कसलासा कोर्स करणार होता तो 

मास्टर्स इतके मार्क्स नव्हतेच त्याचे पण तिच्यासाठी जाणार होता... तिच्याच हट्टाखातर 

त्याच्याबरोबर ही दोन वर्ष भुर्कन उडून गेली असती..

आणि एकदा का शिक्षण पूर्ण झालं.. की मग त्यांचं लग्न..

.....ती स्वतःशीच विचार करत हरवून गेली

  साकेत तिला डायरेक्ट एअरपोर्टवरच भेटणार होता 

सतत त्याला फोन करत होती पण तो उचलतच नव्हता

 एकीकडे अपर्णा ही अस्मिला कंटीन्यूअस ट्राय करत होती पण आत्ताच्या घडीला तिला साकेतशी बोलणं जास्त गरजेचं होतं

 शेवटी एकदाचा उचलला त्याने फोन.. 

  "हॅलो !अरे कुठे आहेस तू? मी निघाले सुद्धा!आता पोहोचेनच थोड्यावेळात.

तू पोहोचलास का तिकडे? बोल ना काही तरी.. 

 हॅलो! हॅलो !अरे ऐकतोस ना? "


"अस्मि मी नाही येत आहे. मला नाही जमणार हे रिलेशन कंटिन्यू करायला. 

नाही यार! हे असलं अभ्यास बिभ्यास नाही जमणार बाबा. तू माझ्या बरोबर फिरत होतीस तोपर्यंत मजा येत होती पण हे आता नवीनच काय खुळ.

 असलं मास्टर्स वगैरे करायचं आणि तुझ्या अॅम्बिशन्स पूर्ण करायला मी तुझ्या मागोमाग फरफटत तिथपर्यंत येऊन रहायचं.... मग लग्नाची डिमांड तुझी.. 

नाहीच झेपणार

मला नाही अडकायचंय यात... इतक्या लवकर 

आणि तसही लग्नासाठीचे माझे निर्णय माझे मम्मी पप्पा घेतील.

ते स्वातंत्र्य मला नाही. त्यांच्या स्टेटसला शोभेल असंच स्थळ बघणार ते. 

माझं तिकीट कॅन्सल केलंय मी.

So...let's stop this all & good bye darling. Have a safe journey..

En....joy life."


  कोणीतरी उंच कड्यावरून धाडकन खाली ढकलून द्यावं अनपेक्षितपणे...तसंच वाटलं तिला. 


"अरे असं काय म्हणतोस! ऐक ना! आपल्यासाठीच एवढे सगळे प्लान केले ना? तुझ्यासाठी सगळे मित्र मैत्रीण मागे सोडले मी. 

हे..हे..सगळं तुझ्यावरच भिस्त ठेवून प्लॅन केलं ना रे? मग तू असा कसा वागू शकतोस? एकटी पडेन मी साकेत! 

प्लीsssज माझं ऐकुन तर घे."


पण तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच साकेतनं फोन कट केला. शेजारी बसलेले आई-बाबा काळजीत पडले.

 अस्मि रडायला लागली .. कळतच नव्हतं काय करावं ते. 

कोणाला सांगावं आणि कुठल्या तोंडाने..

मित्र..मैत्रीणी..ग्रुप..

याच्यासाठी तोडून टाकले सगळे रिलेशन्स 

आणि आई-बाबा... त्यांना किती विश्‍वासाने ठामपणे बोललो होतो 

'लग्न करीन तर साकेतशीच. तुम्ही कितीही विरोध केला तरी मी त्यालाच माझा लाईफ पार्टनर म्हणून निवडला आहे. एकुलती एक मुलगी आहे मी तुमची. तुम्हाला समजून घ्यावच लागेल मला.'

अनुभवी खोडं आहेत .. सगळं जाणूनही केवळ मला कळण्यासाठी दोन वर्षांची मुभा दिली. 

तुम्ही करेक्ट होता.. सगळे

नचि तू तर अगदी खरा होतास.. अगदी खरा

बरोबर सांगत होतास मला पण मीच वेडी 

नाही ऐकलं तुझं 

गाडी एअरपोर्टवर पोहोचली

"अस्मि जाशील ना नीट? नसेल झेपणार एकटीला तर अजूनही परत जाऊ.... आई-बाबा काळजीने बोलत होते. 

पण तिने मनाशी पक्क केलं.. 

 साकेत नाही आला तरी जायचंच. आपण आपली ध्येय गाठायचीच. आता नाही फसायचं त्याच्या मागे परत. आपली स्वत:ची नविन इमेज तयार करायची.... निर्धाराने डोळ्यातील पाणी पुसत ती निघाली.

 सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करता करता तिच्या मनात गोंधळ माजला होता..

समोर नजर गेली .. तसेही डोळ्यातील पाण्यामुळे धुसरच दिसत होत सगळं .. 

'नचि? समोर दिसला तो नचिच का? 

का आपल्याला भास झाला? 

तो म्हणाला होता... तुला सोडायला.. सी ऑफ करायला.. मी एअरपोर्टवर नक्की येईनच. तोच होता का ?'

 तिने परत परत पाहिलं पण काही नीटसं दिसेना गर्दीत. 

तिला मागच्या सगळ्या गोष्टी आठवत राहिल्या.. 

मनोमन त्याची माफी मागितली तिनं. 

'मला माफ कर रे! तू इतकं पोटतिडकीने सांगत होतास पण मीच मुर्ख. 

नाही ऐकलं.. 

नचि! मी पोहोचताच पहिला फोन तुला करेन. तुला सॉरी म्हणायला.... 

तु ही म्हणशील मग ... 

दोस्ती मे इतना तो चलता है यार !'


अन् त्या सहजपणात मागचे सगळे रुसवे फुगवे विरून जातील. 

...नचि इतका गूढ का हसत होता? त्याला कळलं होतं की काय आधीच ..

हे असं वागणारे साकेत? .. 

ती फ्लाईटमध्ये बसली

मधे दुबईला पाच तासांचा हॉल्ट होता. 

Whatsapp चालू केलं तर अपर्णाचा मेसेज..

. ................. 


"...अस्मि .... खूप वाईट झालं.

आपला नचि... 

एअरपोर्ट रस्त्यावर त्याच्या बाईकला बसने उडवलं सकाळी

आणि नचि... जागीच.. "

.................................. 


पुढचं वाचवेनाच तिला. 

म्हणजे मगाशी अपर्णा यासाठी.... कंटीन्यूअस कॉल....... 


नचिss ! नचि...मी इतकं जीवापाड प्रेम करूनही साकेतने शब्द मोडला

..

आणि तू...मरूनही कमिटमेंट पाळलीस रे! 

हो! तो धूसर दिसणारा.. गूढ हसणारा...तूच होतास नचि.. तूच होतास.... 


सगळ विमानतळ आपल्याभोवती फिरतंय की काय असं वाटू लागलं अन् अस्मि जागीच कोसळली.... 

समाप्त

वरील कथा दीपाली थेटे राव यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. 

आमच्या Shabd Chapha या यूट्यूब चॅनलवर अनेक सुंदर कथा उपलब्ध आहेत. एकदा जरूर भेट द्या.

एका वेगळ्या आणि सुंदर कथेसाठी फोटोवर क्लिक करा.Post a Comment (0)
Previous Post Next Post