झाले मोकळे आकाश भाग अंतिम
लेखिका- सविता किरनाळे
सदर लेखिकेने आपल्या सर्व कथांचे copyright register केले असून यांच्या कथा कोणत्याही प्रकारे वापरल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.
रितिका मम्मीपप्पावर चिडुन खोलीत निघून गेली. आता पुढे
अवघ्या दोन क्षणात हा प्रसंग घडून गेला. झालेला प्रकार पाहता कुणालाही जेवण्याची इच्छा उरली नव्हती. ताट बाजूला सारून दिलीप हात धुवायला निघून गेला. अंजना निशब्दपणे आत्याला आवरायला मदत करू लागली.
सगळं उरकल्यावर अंजनाने आत्याला रितिकाशी बोलून घेण्याचे सुचवले. आत्याला थोडा अंदाज आला होताच पण तरीही खात्री करून घेण्यासाठी तिने अंजनाला विचारले,
“अबॉर्शनबद्दल तुम्ही रितिकासोबत बोलला होतात का?”
“आत्या त्याबद्दल तिला काहीच सांगितले नाही आम्ही. आम्हाला वाटले वयात आलेली मुलगी आहे, याबाबतीत कशी रिॲक्ट होईल काय माहीत. या वयात म्हणजे मुलगी एवढी मोठी झाल्यावर हे होवून बसलं म्हणून आम्हाला आधीच लाज वाटत होती मग कुठल्या तोंडाने तिला हे सांगणार.”
अंजना खालमानेने सांगत होती.
‘हम्म म्हणजे चूक माझ्याकडून झाली आहे तर. मग मीच ती दुरुस्त करेन.’
सुभाआत्या मनाशी बोलत होती.
“तू काही काळजी करू नकोस, मी बोलते तिच्यासोबत. होईल सगळं व्यवस्थित.”
अंजनाला विश्वास देवून आत्या रोजच्यासारखे झोपायला रितिकाच्या खोलीत आल्या. अजूनही रितिका गादीवर पालथी पडून मुसमुसत होती.
“रितु काय झाले, तू इतकी का चिडलीस बाहेर आईवर? आणि असं कुणी बोलतं का आपल्या आईबद्दल?”
“नाव नको काढू माझ्यासमोर त्या घाणेरड्या बाईचे. या वयात प्रेग्नंट झाली ती. लाज नाही का वाटत तिला या असल्या घाणेरड्या गोष्टी करायला. आणि वरून पप्पा पण तिचीच बाजू घेतात. घेणारच ना कारण त्यांचा पण तर हात आहे ना यात.” रितिका तडतडत होती.
आत्याला तिचे म्हणणे समजले. आताच जर तिच्यासोबत याबद्दल बोलले नाही आणि जर ती या घटनेबद्दल पूर्वग्रह मनात ठेवेल तर भविष्यात तिला लग्नानंतरही तिला हे सगळं अवघड वाटेल हे त्यांच्या लक्षात आले.
शांतपणे त्यांनी तिच्याशी बोलायला सुरू केले.
“बेटा मूल कसे होते ते तुला माहीत आहे का?”
“हो मग आजी, पंधरा वर्षाची आहे मी आता. सायन्समध्ये हा टॉपिक आहे आम्हाला.”
रितिकाचे गाल लाल झाले होते.
“तुम्हाला अभ्यासाला हा विषय आहे, म्हणजे हे घाण नाही हो ना?” आत्याने प्रश्न केला.
“हो पण आजी.... पण ज्या प्रोसेसने हे होते ती तर...”
रितिका गोंधळली होती. नेमक्या कोणत्या शब्दात हा विषय मांडावा तिला समजत नव्हते.
“हे बघ रितु, तुझ्या पप्पाचे आणि मम्मीचे तुझ्यावर प्रेम आहे. त्याचप्रमाणे त्यांचे एकमेकांवरही प्रेम आहे. आपलं प्रेम ते तुझी काळजी घेवून, तुला गोंजारून व्यक्त करतात. नवराबायकोचे एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याच्या निरनिराळ्या पद्धती आहेत त्यातील एक पद्धत म्हणजे तू पुस्तकात शिकलीस ती. मला सांग प्रेम व्यक्त करणे चुकीचे आहे का?”
आत्या बोलत होती आणि रितिकाच्या मनात चक्र चालू होते.
“तुला अंजना गरोदर होती ही गोष्ट पचवता येत नाही आहे कारण तुला वाटते ती क्रिया चुकीची आहे आणि आपल्या पालकांनी ती केली याची तुला लाज वाटते. स्त्री पुरूषांना परस्पर आकर्षण वाटणे हे अगदी नैसर्गिक आहे. तुला शेजारच्या ऋषभबद्दल वाटते तेच नेमके तुझ्या मम्मी पप्पालाही एकमेकांबद्दल वाटते. तुला वाटते ते बरोबर आणि त्यांचे चुकीचे असे वाटते तुला?”
ऋषभच्या उल्लेखाने रितिका गोरीमोरी झाली होती.
“आजी ... ते ऋषभ... तसे काही नाही.”
ती बोलायचा प्रयत्न करत होती.
आत्याने हात वर करून तिला थांबवले.
“थांब रितिका, मी फक्त हे आकर्षण नैसर्गिक आहे हे पटवून देण्यासाठी ते उदाहरण दिले. तुझ्याबाबतीत ते चुकीचे आहे असं मी म्हणत नाही पण त्याची वेळ चुकीची आहे. तुझी आई तुला याबद्दल सांगेलच जेव्हा तू तिला हे सांगशील तेव्हा. पण आता आपण दुसऱ्या विषयावर बोलत आहोत."
"तर मी म्हणत होते जे घडले त्यात चुकीचे काहीच नाही. माणसाचा वंश पुढे चालण्यासाठी निसर्गाने केलेली योजना आहे ती. जेव्हा तू आणखीन थोडी मोठी होशील तेव्हा तुला मी काय म्हणते व्यवस्थित लक्षात येईल. "
"आपण सगळेच जण आयुष्यात खूप सारी नाती निर्माण करतो जसे मित्रमैत्रिणी , शेजारी आणि काही नाती जन्मताच आपल्या आयुष्यात असतात जसे आई-बाबा , मामा-मामी , काकु-काका, भाऊ-बहीण , आजी- आजोबा , पण या सगळ्या नात्यांना एकच बाजू असते. या प्रत्येक नात्याला काहीतरी मर्यादा असतात , अपेक्षा असतात , पण नवराबायकोच्या नात्यात मात्र अश्या कुठल्याच मर्यादा नसतात. या सगळ्या मर्यादांचे कुंपण तोडून एकमेकांना केलेले मानसिक आणि शारीरिक समर्पण म्हणजेच नवराबायकोचे प्रेम."
" प्रत्येकाला मानसिक आधारासोबत शारीरिक आधाराची गरज असते ना रितू बाळा ... त्यामुळे तुझ्या आईबाबांना देखील ती गरज , ते समर्पण हवे असेलच ना ..."
" दोन अनोळखी वातावरणात वाढलेल्या व्यक्ती जेव्हा पती पत्नी म्हणून वावरतात तेव्हा थोडं दडपण दोघांनाही असतेच पण हळूहळू ते दडपण संपून जवळीक वाढते, एकमेकांवरचा हक्क वाढतो. स्त्री पुरुषातील संबंध फक्त शारीरिक गरज नसते रितू बाळा ...तर ती एकमेकांच्या भावनांची देवाणघेवाण असते."
" जशी जशी नवरा बायकोच्या नात्यांची वर्षे लोटत जातात तशी त्यांच्या नात्यातील दृढता , त्यांच्यातले प्रेम वाढत जाते. तसेच प्रेम तुझ्या आई पप्पांमध्ये देखील आहे. मग मला सांग यात चुकीचं असं काय आहे...? "
"रितु तुला लहान बाळ आवडतं हो ना? कारण तू गावी आलीस की तासंतास आत्याच्या बाळासोबत खेळत असतेस.”
“तुला अंजना या वयात गरोदर राहिली याची लाज वाटते म्हणालीस ना? अगं वेडे, आधीच्या काळी तर कधी कधी मुलगी आणि आई एकदमच बाळंत व्हायच्या."
"लाज वाटते म्हणे गाढवीला...आणि काय गं टवळे, तू पण अशीच तर जन्मलीस ना, आणि मोठी होशील तेव्हा तुझं बाळही याचप्रकारे जन्म घेणार. मग तेव्हा म्हणशील का वाईट आहे, घाण आहे?” आत्याने प्रश्न केला.
“नाही आजी, माझी चूक झाली. मी त्यांना फक्त मम्मीपप्पा याच नजरेने पाहत होती. त्यांनाही खास भावना असू शकतात, तू म्हणते तसे स्त्री पुरुष अट्रैक्शन, हे माझ्या लक्षातच आले नाही. मम्मी घाणेरडी नाही हे समजतंय मला आता. आजी, मी खूपच रूडली वागली तिच्यासोबत.”
रितिका रडायला लागली.
“हो, तू वाईट पद्धतीने बोललीस. अंजनाची अवस्था सध्या नाजुक आहे. तिलाही जे घडले त्यात स्वतःची चूक आहे असं वाटून अपराधी वाटतंय. त्यात तूही तसं बोललीस. ऑपरेशनमुळे शारीरिक त्रास आणि आता मानसिकही. बघ काय करता येते.”
आत्याने रितिकावरच चूक सुधारण्याची जबाबदारी टाकली. पाच मिनीट विचार करून रितिका अंजना दिलीपच्या खोलीसमोर जावून उभी राहिली. तिने दारावर टकटक केली. दार उघडले जाताच ती अंजनाजवळ गेली. तिला त्रास होत असावा असे चेहऱ्यावरून वाटत होते. रितिका आईजवळ बसली. तिने हळुवारपणे अंजनाच्या पोटाला स्पर्श केला.
“मम्मी तुला दुखतंय का?” तिने खालमानेने विचारले.
“जास्त नाही बाळा, थोडंसं. ते तू दोन दिवस खीर घेवून नाही आलीस ना म्हणून बहुतेक.” तिला जवळ घेत अंजना हसत म्हणाली.
“मम्मी I am sorry. मी ओवर रिॲक्ट झाली. पण आत्याआजीने मला माझी चूक दाखवून दिली. मी यापुढे अशी नाही वागणार. I promise. मम्मी मी उद्या तुला छानशी खीर घेवून येते हा. तू लवकर बरी हो, मला तुला एक सीक्रेट सांगायचे आहे.”
रितिका आईला मिठी मारून म्हणाली.
“हो बेटा, नक्की.”
अंजना आनंदाने म्हणाली.
तिला आता अपराधी अजिबात वाटत नव्हते. मायलेकीमधील कुंद आकाश आता मोकळं झाले होते.
प्रिय वाचकहो, अशा अनेक घटना आपल्या आजुबाजूला पाहायला मिळतात. एक वेळ असते, ज्यावेळी मुलांना आपल्याला एक भावंड असावं असे वाटते. पण जशी ही मुलं किशोरवयात पदार्पण करतात तशी त्यांना गरोदरपणा, त्याचे कारण, परिणाम याची माहिती व्हायला लागते. शालेय पुस्तकातून त्रोटक माहिती मिळते, पण इतर मार्ग असतातच जास्त माहिती मिळवण्याचे.
अडनिडं वय, हार्मोनल बदल, खुलेपणाने व्यक्त होण्याची लाज या अनेक गोष्टींमुळे एकुणच त्यांच्या मनात द्विधा निर्माण होते आणि ते रितिकासारखी रिॲक्ट होतात.
याउलट जर थोड्या मोठ्या मुलांसमोर अशी परिस्थिती उभी राहिली तर ते खूप सकारात्मकतेने तिला सामोरी जातात. कारण आता ती या वयात पोहोचलेली असतात, की यात काही चुकीचे नाही हे समजून घेण्याची मॅच्युअरिटी त्यांच्यात नक्कीच आलेली असते. ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे.
गेल्या वर्षभरात या दुसऱ्या टाईपच्या बऱ्याच केसेस पाहण्यात, ऐकण्यात आल्या. पण गोष्टीतल्या सारखी परिस्थिती हाताळायची असेल तर एखादी सुभाआत्या किंवा तशी जबाबदार व्यक्ती घरी जरूर असावी. किंवा बेस्ट वे, समजून घेण्याच्या वयाला मुलं पोहोचली, की त्यांना विश्वासात घेवून, त्यांच्या कलाने घेवून प्रजनन, प्रजननक्रिया,त्याची आवश्यकता या गोष्टी बोलता बोलता स्पष्ट कराव्या.
समाप्त
वरील कथा सविता किरनाळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.
आमच्या Shabd Chapha या यूट्यूब चॅनलवर अनेक सुंदर कथा उपलब्ध आहेत. एकदा जरूर भेट द्या.
एका वेगळ्या आणि सुंदर कथेसाठी फोटोवर क्लिक करा.
खूप छान कथा आहे.आपण वास्तवाची जाणीव करून दिली.आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
ReplyDelete