झाले मोकळे आकाश भाग एक

 झाले मोकळे आकाश भाग एक

लेखिका- सविता किरनाळे 

अंजनाची सकाळ उजाडली तीच सोबत प्रकृती अस्वास्थ्य घेवून. सकाळपासून अंजना उलट्यांनी बेजार झाली होती. अधूनमधून तिला गरगरत होते. कसंबसं आपली पंधरा वर्षाची मुलगी रितिकाला शाळेला आणि नवरा दिलीपला आॅफिसला पाठवून तिने सोफ्यावर बसकण मांडली. डोळ्यावर हात ठेवून मान मागे टेकून तिने डोळे मिटले. ‘हे अचानक काय झाले असावे बाई?’ ती विचार करत होती.

अचानक तिच्या डोक्यात एक विचार चमकला आणि ती खडबडून उठली. मनाशी काही हिशोब घालत कॅलेंडर जवळ जावून पान पलटून नोंदी पाहू लागली. तिला हवी असणारी नोंद  अडीच महिने आधीची होती. ती नोंद होती मासिकधर्म आलेल्या तारखेची. अंजना आपल्या आणि रितिकाच्या मासिक पाळीची तारीख कॅलेंडरवर छोटासा लाल आणि निळा ठिपका देवून नोंदवून ठेवायची. तारखेप्रमाणे अंजनाला शेवटची पाळी येवून गेल्याला दोन महिने उलटून गेले होते. ‘आपल्याला परत दिवस तर नाही गेले’ या शंकेने अंजनाचे धाबे दणाणले. 

अंजना चाळीस वर्षीय गृहिणी होती. नवरा दिलीप, पंधरा वर्षाची मुलगी रितिका, उत्तम आरोग्य, थोडीफार भविष्याची तरतूद. आपल्या छोट्याशा जगात अगदी खूश होती ती. मोठमोठी स्वप्नं नाहीत किंवा अवाजवी अपेक्षा नाहीत. सासूबाई निर्वतल्या होत्या आणि सासरे गावी राहायचे आपल्या चुलत भावांच्या सोबत. एकुण सगळं अगदी परफेक्ट होतं, आत्तापर्यंत तरी...

पटापट गाऊन बदलून ड्रेस घालून, चावी आणि पर्स उचलून अंजना खाली आली, मेडिकलला जाण्यासाठी. मनात काही विचार करून ती नेहमीच्या दुकानात न जाता पुढे चौकात असलेल्या मेडिकल दुकानात गेली. यूपीटी किट घेवून ती घरी आली. कपडे बदलले आणि किट घेवून बाथरूममध्ये गेली. किटवरील सुचनांप्रमाणे केले आणि अस्वस्थपणे रिजल्टची वाट पाहत बसली. काही मिनिटांनी तिने पाहिले तर तिचा श्वासच थांबला. दोन गुलाबी रेषा, म्हणजे ती खरंच गरोदर होती. 

अंजनाला काही सुचत नव्हते. तिचे कोणत्या कामात लक्ष लागत नव्हते. मनावर खूप ताण आला होता. ती नवरा घरी यायची वाट पाहत होती. आपल्या डोक्यावरील ओझं त्याच्या डोक्यावर देवून तिला मुक्त व्हायचे होते. पण कसे शक्य होते ते कारण गर्भवती ती होती, तो नाही. 

संध्याकाळी दिलीप घरी आला. घर आज शांत वाटत होते. आज रोजच्या प्रमाणे टीवीवर सासूसुनेच्या मालिकेचा रतीब चालू नव्हता. रितिका आपल्या खोलीत अभ्यास करत होती तर अंजना स्वयंपाकघरात काही करत होती. हातपाय धुवून दिलीप सोफ्यावर येवून बसला. त्याला पाहून रितिका बाहेर येवून काही बोलून गेली. दिलीपने भुवया उंचावून अंजनाबद्दल तिला विचारण्याचा प्रयत्न केला. रितिकाने खांदे उडवून आपल्याला काही माहीत नसल्याचे सूचित केले. ती परत आपल्या खोलीत निघून गेली. अंजना चहाचा कप घेवून दिलीपजवळ आली. उघडच दिसत होते, की ती कशाने तरी अस्वस्थ होती. 

“काय झाले अंजु?” दिलीपने प्रश्न केला.

“अहो.... मी प्रेग्नंट आहे.” अंजनाने दबलेल्या स्वरात सांगून टाकले.

“काय?” दिलीपच्या हातातील चहाचा कप हिंदकळला. 

“तुझी खात्री आहे?” त्याने परत प्रश्न केला.

“हो, मी टेस्ट करून पाहिली घरी.” अंजनाने हताश आवाजात उत्तर दिले.

दिलीपही थोडा विचारात पडला. थोडा वेळ विचार करून तो बोलला,

“काळजी नको करू, उद्या मी हाफ डे घेतो. आपण जावू डॉक्टरकडे. तू अपॉइंटमेंट घेवून ठेव. मी डायरेक्ट हॉस्पिटलला येतो. मग पाहू काय करता येते. पण अंजना मला एक सांग तुझे काय मत आहे?”

“नको.” अंजनाने एकाक्षरी उत्तर दिले.

रितिकाला हे कळले तर तिची काय प्रतिक्रिया होईल या विचाराने दोघांनाही झोप लागत नव्हती.

ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी अंजना आणि दिलीपने डाॅक्टरांची भेट घेतली. तपासून झाल्यावर डॉक्टर गंभीर मुद्रेने समोर येवून बसले. 

“तुम्ही प्रेग्नंट आहात. नऊ ते दहा आठवडयाचा गर्भ दिसतो आहे. पण गर्भपिशवीत नाही तर ट्यूबमध्ये. इट्स कॉम्प्लिकेटेड. मेडिकली टर्मिनेट करावी लागेल. आता फक्त कधी हा एकच प्रश्न आहे.”

अंजनाच्या मनावर एक दडपण आले होते, डॉक्टरांच्या शब्दांनी ते उतरले.

‘आपण चूक नाही करत आहोत, अबॉर्शनशिवाय पर्याय नाही आता.’ असा विचार मनात येताच ती सावरली.

डॉक्टर पुढे बोलतच होते. 

“तुम्ही म्हणत असाल तर लगेच आपण कुटुंबनियोजन शस्त्रक्रियाही करून घेवू. याबाबत तुमचा विचार कळवा म्हणजे त्याप्रमाणे एमटीपीची तारीख ठरवता येईल. पण जास्त उशीर करू नका कारण मग यातील रिस्क वाढत जाईल.”

“आम्ही उद्यापर्यंत कळवतो,” असे सांगून दिलीप आणि अंजनाने निरोप घेतला.

घरी येवून विचारविनिमय केल्यावर अंजना आणि दिलीपने येत्या चार दिवसात दोन्ही प्रक्रिया पार पाडायचा निर्णय घेतला. रितिकाला जास्त काही सांगायचे नाही यावर दोघांचे एकमत झाले. शस्त्रक्रियेनंतर महिनाभर तर अंजनाला काळजी घ्यावी लागणार होती म्हणून घरात कुणीतरी बाईमाणूस असावं म्हणून दिलीपच्या आत्याला बोलावण्याचा निर्णय झाला. अंजनाच्या माहेरी फक्त तिचे वडील, भाऊ आणि वहिनी होते म्हणून त्यांची मदत होण्यासारखी नव्हती. याउलट सुभाआत्या एकदम धडाडीची कणखर बाई होती. कुठलीही परिस्थिती ती व्यवस्थित हाताळत असे. लोकांवर तिचा असणारा होल्ड कमालीचा होता, इतका ती अंजनाचे सासरेही बहिणीला घाबरून असत. फणसासारखं वरून काटेरी पण आतून गोड रसाळ सुभाआजी रितिकाला खूप आवडायची आणि अंजनालाही.

आत्याला फोन केला गेला. आत्या लगबगीने निघालीही. ठरल्याप्रमाणे अंजनाने रितिकाला तिच्या कलाने घेत ती शस्त्रक्रिया करून घेत असल्याचे सांगितले. 

“रितु मी आत्याआजीला बोलावले आहे काही दिवस राहण्यासाठी. मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये असेन किंवा नंतर घरी आल्यावरही आजीला त्रास द्यायचा नाही हां.”

“हो ग मम्मी, मी काय लहान आहे का हे सगळं सांगायला. तू बिनधास्त रहा.” रितिकाने आईला आश्वस्त केले. 

ठरल्याप्रमाणे सर्व काही सुरळीत पार पडले. रितिकाला आपल्या आईचे फॅमिली प्लॅनिंगचे आॅपरेशन झाले आहे इतकेच ठावूक होते. अबॉर्शनबद्दल तिला कल्पना नव्हती. सुभाआत्या दिलीप आणि रितिकाच्या मदतीने सर्व आघाड्या सांभाळत होती. अंजनाला शक्ती भरून यावी म्हणून अळीवाची खीर, साजूक तुपातील लाडू वगैरेचा रतीब चालू केला होता तिने. 

एक दिवस आत्याने खीरीचा बाऊल रितिकाच्या हाती देवून अंजनाला देवून यायला सांगितले. तसेही हल्ली नेहमी रितिकाच आईची कामं करत असे. आज खीर देवून आल्यावर रितिका आजीकडे आली. 

“आजी ती खीर तू का देते मम्मीला? त्याच्याने काय होते?” रितिकाने आजीला प्रश्न केला.

“बेटा ती अळीवाची खीर आहे. याने अंगात शक्ती येते. बाईचा जन्म मोठा कठीण असतो. मूल जन्माला घाला. गर्भात काही व्यंग असले तर गर्भपात. पुढे जावून मूल होवू नये म्हणू शस्त्रक्रिया करून घ्या. या सगळ्या चक्रातून बाईलाच जावे लागते. हे सगळं करता करता शरीरातील शक्ती संपून जाते बघ. तुझ्या आईवरही दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. म्हणून तिची काळजी घ्यावी लागत आहे.”

“मम्मीची दोन ऑपरेशन्स झाली आहेत? मला तर वाटले एकच झाले. दुसरं कुठले आॅपरेशन?” रितिका बुचकळ्यात पडली होती.

“अगं राणी, असं काय करतेस. काही गडबड होती म्हणून अंजनाने बाळ पाडलं नाही का? विसरलीस का!” सुभाआत्या बोलून गेली. 

खरंतर तिला कल्पनाच नव्हती, की ही गोष्ट रितिकापासून लपवण्यात आली आहे. वास्तविक पाहता काही विचार करून अंजना आणि दिलीपने ही गोष्ट लपवली होती पण ती आता उघड झाली. रितिकावर या गोष्टीचा आघात झाला. ती धावतच आपल्या खोलीत गेली. आता तिला आपल्या आईचा राग आला होता, नव्हे तिला घृणा वाटू लागली होती. अंजनाने ही गोष्ट लपवली म्हणून राग आला, की दुसरी एखादी गोष्ट तिला डाचत होती हे तिलाही सांगता येत नव्हते. 

दुसऱ्या दिवसापासून रितिकाचे अंजनासोबतचे वागणेच बदलून गेले. रितिकाने अंजनासोबत बोलणे तर सोडा तिच्याकडे पाहणेही सोडून दिले. अंजना जेव्हा स्वतःहून बोलायचा प्रयत्न करायची तेव्हा रितिका काहीतरी बोलून तिचा अपमान करायची. अंजनाला समजत नव्हते रितिकाला अचानक काय झाले. आधीच ती कठीण शारीरिक अवस्थेतून जात होती आता तिला मानसिक त्रासही होवू लागला. गंमत म्हणजे रितिकाचा रोष फक्त अंजनावरच होता. दिलीपशी ती तशीच हसून खेळून बोलत होती. घरातील वातावरण तंग झाले होते. कधीही या ताणाचा स्फोट होणार होता आणि तो झाला ही.

एक दिवस रात्री सगळे एकत्र जेवायला बसले असता रितिकाने दिलीपला दह्याचा वाडगा पुढे सरकवायला सांगितले. अभावितपणे अंजनाने वाडगा रितिकापुढे सरकवला. ते पाहून रितिका संतापली. 

“तुला कुणी सांगितलं चोंबडेपणा करायला, पप्पा देत होते ना?” 

आता मात्र दिलीपचा संयम सुटला. त्याने रितिकाला खुर्चीवरून उठवले आणि खाडकन गालावर चपराक लगावली. 

“मूर्ख, बेअक्कल, जीभ खूप लांबली का तुझी. लाज नाही वाटत आपल्या आईला अशा भाषेत बोलायला.” 

रागाने थरथरत होता दिलीप. आणि रितिका सुन्न होवून गालावर हात ठेवून उभी होती. भानावर येताच “आय हेट बोथ ऑफ यू, डर्टी पीपल”, म्हणत रडत स्वतःच्या खोलीत निघून गेली. 

मातृत्व हे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक सुवर्ण क्षण असतो पण जर हे मातृत्व अवांछित असेल तर...

अंजना सध्या याच ताणाला सामोरी जातेय. 

दुसरीकडे रितिका जी किशोरवयीन शारीरिक, मानसिक, हार्मोनल बदलांना सामोरी जात आहे. तिची अशी प्रतिक्रिया अचानक असली तरी अनपेक्षित नक्कीच नाही. 

पाहू काय मार्ग निघतो या गुंत्यातून आणि कोण काढेल तो...

क्रमशः

भाग अंतिम

आमच्या Shabd Chapha या यूट्यूब चॅनलवर अनेक सुंदर कथा उपलब्ध आहेत. एकदा जरूर भेट द्या.

एका वेगळ्या आणि सुंदर कथेसाठी फोटोवर क्लिक करा.



वरील कथा सविता किरनाळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post