वात्सल्य

वात्सल्य

✍️ सविता किरनाळे 

सदर लेखिकेने आपल्या सर्व कथांचे copyright register केले असून यांच्या कथा कोणत्याही प्रकारे वापरल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. 

‘आई म्हणून कोणी

आईस हाक मारी

ती हाक येई कानी 

मज होय शोककारी’

कवी- यशवंत पेंढारकर

 लोकलच्या महिलांच्या सेकंड क्लासच्या डब्यात गर्दीत उभी राहून एकतारी वाजवत ती मधुर आवाजात गात होती. 

‘किती गोड गळा दिलाय देवाने या पोरीला, नाही तर आम्ही...अगदी बाथरूम सिंगर म्हणवण्याच्या पण लायकीचे नाही.’ 

मी खिडकीजवळ बसल्या बसल्या विचार करत होते. माझ्या बाकीच्या ग्रूपचा कलकलाट चालूच होता. विषय आपले नेहमीचे, कसा बाॅस नेमकं निघायच्या वेळी अर्जंट फाईल्स देतो, मुलांचे प्रोजेक्ट पुर्ण करायचे आहेत, सासूबाईंनी निदान कुकर जरी लावला तरी किती मदत होते असे एक न अनेक विषय.

आज शनिवार असल्याने बऱ्याच ऑफिसेसना सुट्टी होती म्हणून ट्रेनला जास्त गर्दी नव्हती. मुंबईमध्ये ‘जास्त गर्दी नव्हती’ याचा अर्थ चेंगराचेंगरी न करता थोडा मोकळा श्वास घ्यायला येतो असा घ्यायचा असतो. 

तर मी काय सांगत होते की ती मुलगी उभी राहून गात होती आणि मी तिच्या सुरात हरवून गेले होते, गाण्यातील तिची आतुरता मनाला भिडत होती.

“हो की नाही ग स्मिता? ऐ कुठे हरवलीस?” हर्षा काहीतरी विचारत होती मला. 

“अं हो, म्हणजे अगं माझं लक्ष नव्हतं तुझ्या बोलण्याकडे.” मी म्हणाले. 

“तेच विचारतेय मी, काय झाले तुला?” हर्षा काळजीच्या सुरात विचारत होती. 

“ती मुलगी बघ गाणं म्हणणारी, ती नेहमी असते ना या डब्यात. रोज ती वेगवेगळी गाणी गाते पण आज काही विशेष वाटतंय गं. किती मनापासून आतुरतेने गातेय बघ ना.” 

हर्षा त्या दिशेने पाहू लागली. ‘स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी’ त्या मुलीने आपले गाणे संपवले आणि ती पैसे गोळा करू लागली. ते झाल्यावर दाराजवळ जाऊन बसली. दोन स्टेशन गेल्यावर मी त्या मुलीला हाक मारून जवळ बोलावलं, ती लगेच आली. 

“काय ताई, बोलावलंत मला?” तिने हसून विचारले. 

“बस गं जरा, कधीपासून गाते आहेस, गळा गोड आहे हां तुझा.” मी तिला म्हटलं. 

“हों मग, माझी आई आणि शाळेतल्या बाई पण असेच म्हणतात.” ती अभिमानाने म्हणाली.

“अच्छा, शाळेत जातेस का तू, कितवीत आहेस, आणि अशी भीक का मागतेस मग?” मी प्रश्नांची फैर झाडली. 

“मी भीक नाही मागत ताई, माझी कला पेश करते मग लोक खूश होवून पैसे देतात.” तिच्या डोळ्यात दुखावल्याचा भाव होता. 

“हो बरोबर, साॅरी गं, मला तसे म्हणायचे नव्हते. बरं नाव काय आहे तुझं?” माझ्या बोलण्याने ती थोडी निवळली. 

“ माझं नाव धनश्री, पण मला सगळे धनू म्हणतात. धनश्री म्हणजे धनाची म्हणजे पैशांची देवता, हो ना? मी, चौथीत आहे आता, रोज सकाळी शाळेत जाते, दुपारी थोडं घरातील काम आवरून, अभ्यास करून साडेतीनची सीएसटी ट्रेन पकडते, आईला घेवून. ताई, माझ्या आईच्या डोळ्यात मोतिबिंदु झालाय, तो पिकलाय असं डॉक्टर म्हणत होते. लवकर ऑपरेशन नाही केलं तर ती आंधळी होईल कायमची. तसं तर आताही तिला काही दिसत नाही. म्हणून पैसे जमा करायला मी बाबाची मदत करते.” 

तेवढ्यात गोंधळ ऐकु आला, ‘ऐ बाई, मरायचं आहे का सरक मागे.’ मुलीने झटकन मागे वळून पाहिले. तिची आई दरवाज्याच्या एकदम जवळ उभी होती, तिला दिसत नव्हते काही. मुलगी झटक्यात उठून धावत दरवाज्याकडे गेली. 

“दीदी, तिला आत घ्या, आई आहे माझी ती, तिला दिसत नाही.” ओरडून दरवाज्याजवळ उभ्या असलेल्या स्त्रीला तिने सांगितलं. त्या स्त्रीने मुलीच्या आईला आत घेतले. वाईट प्रसंग घडता घडता टळला होता. 

“आई, तुला कितीवेळा सांगितलं गं, असं जागेवरून हलू नकोस म्हणून. तुला काही झाले असते तर मी काय करू?” 

रडवेली होवून मुलगी आईवर ओरडत होती. एरवी शक्यतो कुणाच्या फंदात न पडणाऱ्या बायका पण भावनिक होवून त्या मायलेकीचे बोलणे ऐकत होत्या. 

ठाणे स्टेशन आले. माझ्याकडे हात हलवून ‘ताई भेटू परवा’ असे बोलून ती चिमुकली आईचा हात धरून ट्रेनमधून उतरुन निघुन गेली. 

“स्मिता तुला काय वाटते, तिची गोष्ट खरी असेल का, आईच्या आजारपणाची?” हर्षाने विचारले. 

“हो, खरी असेल बहुतेक, कळेलच परवा. अजून माहिती घेऊ आपण तिची.” मी म्हटलं. 

बोलता बोलता आमचे ही स्टेशन आले आणि आम्ही मागचं सगळं विसरून रिक्शा पकडायला धावलो. दुसरा दिवस रविवार होता. नोकरी करणाऱ्या बायकांसाठी रविवार म्हणजे घातवार असतो. त्या दिवशी न संपणारा कामाचा ढीग असतो. आठवडाभर नुसती वर वरची सफाई झालेली असते घराची. रविवारी अगदी डीप क्लिनिंग करायचं. रोज भाजी, पोळी, आमटी भात म्हणून काही स्पेशल जेवण बनवायचं. शिवाय जास्तीचे कपडे धुवा, मुलांचे प्रोजेक्ट करा, कुणाला भेटायचं असेल तर ते उरकून घ्या किंवा तुमच्या घरी आलेल्यांची सरबराई करा... एक ना अनेक कामं. 

सोमवार उजाडला तो तिची आठवण घेवूनच. दिवसभराच्या कामाचा रतीब घातल्यावर मी धावत पळत स्टेशनवर येवून नेहमीची ट्रेन पकडली. ती मुलगी सीएसएमटीला चढायची नाही. तिचे नेहमीचे स्टेशन आल्यावर ती चढली. सोमवार असल्याने गाडीला तुफान गर्दी होती. आपल्या आईला जपून पॅसेजमध्ये बसवत तिने गाणे सुरू केले. ते एक गाणे संपवून ती वाट काढत माझ्याकडे आली. “कशी आहेस ताई?”

“मी ठीक आहे, बोल आज गेली होती का शाळेत?“ मी विचारले.

“हो रोज जाते, शिकून मला मोठी साहेबीण व्हायचे आहे. आई बाबाला खूप सुखात ठेवीन मग. आईच्या ऑपरेशनला पैसे हवे म्हणून बाबा सध्या डबल ड्यूटी करतात ना. त्यांना आणि आईला मग काहीच काम करू देणार नाही. नुसतं आराम करायचं त्यांनी.”  तिच्या डोळ्यात स्वप्न चमकत होते. 

“काय करतात तुझे बाबा?” 

“हमाल आहेत, ठाणे स्टेशनवर.” ती बोलली. 

“तुला सांगू का ताई, माझी आई खूप कष्ट करायची. मी लहान होते तेव्हा मला सोबत घेवून एका कारखान्यात कामाला जायची. रात्री घरी आल्यावर टेलरने शिवलेल्या कपड्यांना हातशिलाई, काज बटन करायची. बाबा म्हणतात अंधारात ते काम करूनच डोळे फोडून घेतले या बाईने. पण आई हे सगळं घरासाठीच करायची. म्हणायची माझी धनू शिकून घरासाठी खूप धन घेवून येईल. मला तिचे बोल खरे करायचे आहेत. आता दिसत नाही तिला पण तरीही किती काळजी घेते माझी. ताई मला ना माझ्या आईची आई व्हायच आहे. तिची खूप काळजी घ्यायची आहे. तिला सुखी झालेलं पाहायचे आहे.” 

किती प्रगल्भ विचार होते तिचे. अवघं दहा वर्षाची असावी ती पण आईवरती असलेलं प्रेम, ते व्यक्त करण्याची पद्धत किती मोहक होतं. इतक्यात तिच्या आईने हाक मारली, “धनू..” 

“हो आई, आले. तू बस तिथेच, मी आले. हलू नको बरं.” अतिशय प्रेमाने ती बोलली. 

“धनू, एकदा ती आई म्हणोनी कोणी, हे गाणं म्हणशील का गं?” मी विचारले. 

“हो ताई का नाही, माझे ही आवडते गाणे आहे ते.” ती हसून बोलली. 

ती गाणं गात होती, त्याच आर्ततेने. मला माझी दूर असलेली आई आठवत होती. माझ्यासारखीच अवस्था अजून बऱ्याच जणींची झाली होती. गाणे संपले आणि बरेच हात पटापट पर्समध्ये गेले. धनूने हसून ती बक्षिसी स्वीकारली. ठाणे आल्यावर ती त्याच प्रेमाने, वात्सल्याने आईचा हात धरून काळजीपूर्वक फलाटावर उतरली. वात्सल्याची ही भावना स्त्रीमध्ये उपजतच असते का....

काल्पनिक 

समाप्त 

वरील कथा सविता किरनाळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.


Post a Comment (0)
Previous Post Next Post