अप्रूप

अप्रूप 

✍️ सौ.हेमा पाटील. 


"मृदुला...ए मृदुला ", आईच्या हाका ऐकून गेटपाशी मैत्रिणीशी बोलत उभी असलेली मृदुला ," काय गं..आले आले " ! असे म्हणत मैत्रिणीला निरोप देत घराकडे वळली. 


"लग्न आठ दिवसांवर आलेय, कधी कामे उरकायची "? अशी आईची बडबड चालू होती. 


"काय गं आई..आता लग्नानंतर मैत्रीण भेटणार आहे का सारखी"?


  "हो..! पण कामे पण उरकली पाहिजेत ना मी तरी एकटीने या दोन हातांनी किती उरकायचे ? लग्नघरी कमी कामे असतात का गं "? यावर काहीच न बोलता मृदुलाने मैत्रिणीला दाखवायला काढलेला साड्यांचा पसारा आवरायला घेतला. आजपर्यंत अनेकदा लग्नाच्या साड्या इतरांना दाखवताना मृदुलाने त्यावरुन हळुवारपणे हात फिरवला होता, तरीही आज पुन्हा तिला मोह आवरला नाही. तिने लग्नाचा शालू आपल्या एका खांद्यावर टाकला आणि समोरच्या आरशात ती पाहू लागली. तो शालू एकदा नेसून पहावा अशी तीव्र इच्छा तिला होत होती, पण घरातील बाकीचे काय म्हणतील या संकोचामुळे तिने ती इच्छा अमलात आणली नाही.


  घरात आपण एकटेच असण्याची संधी ती शोधत होती. तशी संधी एकदा चालून आली होती , म्हणून तिला खूप आनंद झाला होता. आई रेशनचे धान्य आणायला गेली म्हणून तिने आऩंदून दरवाजाला कडी लावली व परकर ब्लाऊज घालून शालू नेसण्यासाठी शालूची घडी हातात घेतली तेवढ्यात दरवाजाची कडी वाजली. शेजारच्या रमाकाकू मोठमोठ्याने हाका मारत होत्या. त्यामुळे गडबडीने तिने शालू तसाच ठेवला व ब्लाऊज काढून पटकन गाऊन चढवला व ती दार उघडायला गेली. रमाकाकूंना स्टूल हवे होते, वायरमन आला होता, अन् त्यांचे स्टूल उंचीला छोटे होते. काहीही कारण नसताना हा वायरमन मध्येच कशाला कडमडला असा विचार मृदुलाच्या मनात आला. स्टुल देऊन ती घरात परत आली, पण आल्यावर तिने तो सगळा पसारा आवरुन ठेवला कारण तिचा मूडच गेला होता. आणि बरं झालं आपण आवरुन ठेवले कारण पाचच मिनिटांत आई परत आली होती, खूप गर्दी होती म्हणून ! आपली चोरी पकडली गेली असती असाच विचार तिच्या मनात आला. 


खरंतर तिच्याच लग्नासाठी घेतलेल्या साड्या होत्या त्या ! मी नेसून बघते असे ती म्हणाली असती तर कुणी काहीच म्हणाले नसते तिला. पण तिच्याच मनाला ते पटत नव्हते. पण त्याचवेळी त्या नव्याकोऱ्या कपड्यांची असोशी ही तिला सारखी खुणावत होती. या नव्याकोऱ्या साड्या आपल्यासाठी आहेत याचे तिला खूप अप्रूप वाटत होते. 


बाबांच्या अकाली जाण्याने आजवर परिस्थितीमुळे ताईचे कपडे वापरतच ती लहानाची मोठी झाली होती. लग्नामुळे आपल्यासाठी नव्याकोऱ्या गोष्टी घेतल्या जातायत यातच ती खूप आनंदी होती. परवा लग्नासाठी छानशी चप्पल घेतानाही तिला अगदी भरुन आले होते. या फक्त आपल्यासाठी चाललेल्या खरेदीमुळे ती लग्नावर जाम म्हणजे जामच खुश होती. आणि परवा आणलेली नवीखट्ट सुटकेस पाहून तर ती हरकूनच गेली. सुट्टीत मामाकडे जाताना कापडी अंगात तंगुसच्या पिशवीत कपडे भरुन नेणारे आपण आता ऐटीत सुटकेस वापरणार याचा तिला कोण आऩंद झाला होता ! कितीतरी वेळा सुटकेस हातात घेऊन आरशापर्यंत तिने चालून बघितले होते, जसे रॅम्प वॉक करतात तसे हिचे सुटकेस घेऊन चाललेले वाॅक पाहून ताई खूप हसली. त्यामुळे मृदुला जरा हिरमुसली पण परत आपले सुटकेस घेऊन चालतानाचे आरशात पाहिलेले रुप आठवून मनाशीच हसली. 


आज्जी सारखी सासरी कसे वागायचे अन् कसे वागायचे नाही यावर बौद्धिक घेत होती. पण सध्या तिला त्याचा राग येत नव्हता. नाहीतर यापूर्वी ती आज्जीला म्हणायची, रोज रोज तेच काय गं सांगत असतेस? अन् मी काही वावगे वागते का? मग कशाला रोज रोज तेच ... यावर आज्जीचे उत्तर तयार असायचे, मुलीच्या जातीला फार तोंड असणे बरे नव्हे! उद्या सासरी नांदायला जायचे आहे. तिथे आपल्या माहेरच्या घराण्याला कमीपणा आणू नका म्हणजे मिळवली. तेव्हा मृदुलाला वाटायचे, योग्य ते बोलले तर घराण्याला कमीपणा कसा येतो? पण इतर अनेक अनुत्तरित प्रश्नांसोबत हा ही प्रश्न ती मनाच्या कोपऱ्यात सारत असे. 


होता होता लग्नाचा दिवस उजाडला. लग्नासाठी घराबाहेर पडताना क़ंठ दाटून आला, पण अंगावरची नवीकोरी झुळझुळीत साडी मनाला भुलवत होती. त्यामुळे डोळ्यात आलेले पाणी डोळ्यांच्या कडा ओलांडून बाहेर पडले नाही. मैत्रीणी, ताई अन् पाहुण्यांच्या गराड्यात जानवसघरी पोहोचल्यावर नवरा नवरीला हळदीला बसवण्यासाठी मांडवात बोलावले. अंगावर डोक्यापासून पायाच्या नखांपर्यंत शेलकट पांघरायला दिले होते. पण तिला हळदी लावणे हा प्रकार फारसा रुचला नाही,कारण शेलकटाच्या आतील नवीकोरी साडी ही हळद लागून खराब होत होती. पण ती गप्पच बसली. हळदी लागल्या, आता लग्नाची तयारी सुरू झाली. तिला ताईने लग्नाचा शालू नेसवला. 


शालू नेसत असताना त्याचा नवाकोरा वास तिच्या नाकात शिरला. तिने अधीरपणे तो सुवास आत खोलवर भरुन घेतला. शालू नेसून झाल्यावर आपण या नव्याकोऱ्या शालूत कशा दिसतो हे पहाण्यासाठी ती आरसा शोधू लागली, पण ते शक्य झाले नाही. बाहेर मंडपात बोहल्यावर मुलीला लौकर आणा चा घोशा सुरु होता. कसेतरी ताईने टिकली पावडर लावले अन् मामाने हाताला धरून ओढतच तिला बोहल्यावर नेण्यासाठी बाहेर आणले.


तो काळ आत्तासारखा ब्युटीशियनने नवरीला शृंगारीत करण्याचा नव्हता. त्याकाळी नवरीला फक्त टिकली पावडर अन् कपाळावर भुवयांच्या वर छोट्या टिकल्या अगर रंगीबेरंगी गंधाच्या टिकल्या लावत. त्याला मळवट भरणे असे म्हणत असत. शालू नेसली, गंधपावडर केले, मळवट भरला की नवरीमुलगी तयार झाली... तेव्हा लग्ने दारात होत. नवरा किंवा नवरी उचलून येई अन् एखाद्या वाड्यात वर्हाडाला जानवसा दिला जाई. मग तिथूनच लग्नमंडपात जायचे. मग तिथे कुठला आरसा अन् नटणे अन् फोटोशुट तर दूरची बात ... लग्नविधी होताना अन् लग्नानंतर नातेवाईकांसोबत फोटो काढणे एवढेच फोटोग्राफरचे काम !


  बोहल्यावर नवरदेव आधीच हजर होते. मग नवरी आली की, भटजींनी लग्नाच्या विधीला सुरवात केली.मंगलाष्टका झाल्या अन् लग्न लागले म्हणून सर्वांनी टाळ्या वाजवल्या. लगेच साखरेची ताटे घेऊन साखर वाटण्यासाठी मुले मंडपात फिरु लागली. यानंतर लाजाहोम, सप्तपदीचा विधी झाल्यावर डोळ्यात जाणार्या धुरामुळे चुरचुरणारे डोळे चोळत ती भटजींचे आदेश पाळत होती. सर्व विधी पार पडले,अन् एकदाची ती सौभाग्यवती झाली...! माहेरची सगळी नाती माहेरच्या घरी सोडून आपण एकटेच आता नव्या घरात नव्या माणसांत निघालोय या जाणीवेने ती एकदम बावरली. पण नवर्याच्या उपरण्याला बांधलेल्या शालूच्या पदराच्या गाठीमुळे ती आपसूकच पाय ओढत त्याच्या मागे मागे पाय टाकत होती. कारण चालण्यात अंतर पडले तर पदराला मारलेल्या गाठीमुळे हिसका बसत होता.


  रात्री उशिरा वरात काढून सगळ्या गावांतून नवरा नवरीला बैलगाडीतून फिरवून झाल्यावर एकदाचे सासरच्या घरी पोहोचले. तिथे पोहोचल्यावर तरी लगेच घरात प्रवेश कुठला? दरवाजातच उभे करुन दार अडवण्याचा विधी झाला. नणंदेने दार अडवून विचारल्यावर तिच्या मुलाला आपली मुलगी देण्याचे वचन दिले, अन् मग माप ओलांडून तिने लक्ष्मीच्या पावलांनी सासरच्या घरात प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यावर नवरानवरीला आधी घरातील देव्हार्यासमोर जाऊन घरच्या देवांना जोडीने नमस्कार करायला लावण्यात आले. अन त्यानंतर घरातील सर्व मोठ्यांना नमस्कार करायला सांगितले गेले. सर्वांना नमस्कार करून झाल्यावर नवरदेवाने आपले उपरणे गळ्यातून काढले व तिच्या खांद्यावर सरकवत तो कुठेतरी आत निघून गेला. 


तो गेला त्या दिशेकडे पहात ती तशीच अवघडत उभी होती. ढिगभर असलेल्या कुरवल्यांपैकी एका कुरवलीने तिला आत एका रुममध्ये नेले. तिथे सगळा पसारा पडला होता, साहजिकच होते कारण तिच्या घरीही सकाळी तीच अवस्था होती. त्यामुळे तिथेच बाजूला ती जागा करुन बसली. एवढ्यात चहा पुढ्यात आला.चहा बघून तिला हायसे वाटले. पण चहाचा पहिला घोट घेतला अन् तिचे तोंड कडवट झाले. चहा अगोड होता. पण काय बोलणार तिने निमूटपणे तो चहा पिला. आत्ता आपल्या घरी असतो तर आपण असा चहा पिला नसता, उठून साखर घेतली असती असा विचार तिच्या मनात आला. तेवढ्यात कपडे बदलून घे असे सांगितले म्हणून तिने आपली सुटकेस उघडली व नवीच पण साधी साडी नेसण्यासाठी काढली. शालू सोडताना तिने न राहवून त्या रुममध्ये कुठे आरसा आहे का हे पाहिले पण तिथे आरसा नव्हता. खट्टू होत तिने शालू बदलला...


  सकाळी उठल्यावर गावातील देवदर्शनाला नवरानवरी कुरवल्यांच्या लवाजम्यासह बैलगाडीतून निघाले. सगळे देवदेव करुन दमून भागून घरी आल्यावर घरी पूजेची तयारी सुरू झाली होती. तिची रवानगी परत त्याच खोलीत झाली. पूजेला बसण्यासाठी तिला बोलवण्यात आले. आजही सकाळपासून अंगावर शालू होता पण त्यात आपली छबी कशी दिसते हे तिला अजूनही पहाता आले नव्हते. 


मुकाट्याने ती नवर्याशेजारी पाटावर जाऊन बसली. पूजेचा विधी झाल्यावर जेवण झाले की , कुलदेवीचा गोंधळ जागर सुरू झाला. त्यासाठी नवरानवरी तेल घालायला गोंधळाला बसली. पहाटेपर्यंत गोंधळ जागर सुरू होता. तिला झोप आवरत नव्हती,पण तशीच अवघडत शालूचा पदर सावरत ती बसली होती. एकदाचे सगळे विधी पार पडले अन् ती आतल्या रुममध्ये गेली. आत गेल्यावर खाली अंथरलेल्या सतरंजीवर ती शालूसहीत आडवी झाली. ती इतकी दमली होती की दुसर्या मिनिटांतच तिची गाढ झोप लागली. अंगावरचा शालू चुरगळला होता पण तिला याची शुद्ध नव्हती. गेले इतके दिवस शालू नेसून आपण कसे दिसतो हे आरशात पहाण्याची तिची इच्छा मनातच राहून गेली होती.... 


आज आरशासमोर ब्युटीशिअनकडून तयार होताना तिला तो प्रसंग आठवला.आज तिच्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस होता,अन् दोन्ही मुलांनी पुढाकार घेऊन लग्नाचा पंचविसावा वाढदिवस दणक्यात साजरा करायचे ठरवले होते. तिच्यासाठी तिच्या पसंतीने शालू घेतला होता. तो नेसल्यावर तिने आरशात स्वतःला सगळ्या दिशांनी निरखले.. मागून आलेल्या नवर्याने तिची सुंदर छबी पाहून न राहवून तिला मिठीत घेत विचारले, अजूनही तू तशीच सुंदर दिसतेस जशी लग्नात दिसत होतीस. आरशात काय एवढे पहातेयस निरखून? माझ्या डोळ्यांत बघ तुझी छबी ! यावर ती उत्तरली, "पंचवीस वर्षांपूर्वीची लग्नातील शालू नेसलेली माझी छबी या आरशात तरी दिसतेय का ते शोधत होते...." 

समाप्त

वरील कथा सौ. हेमा पाटील यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे

 सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. 


आमच्या शब्द चाफा या चॅनलवर अनेक सुंदर कथा उपलब्ध आहेत. एकदा जरूर भेट द्या.

एका वेगळ्या आणि सुंदर कथेसाठी फोटोवर क्लिक करा.




Post a Comment (0)
Previous Post Next Post