गंधहीन
✍️ मिलिंद अष्टपुत्रे
J F K ...... न्यूयॉर्कमधील एक व्यस्त इंटरनॅशनल एअरपोर्ट !! सिक्युरिटी चेकचे सोपस्कार पार पाडून मी मुंबईला जाणाऱ्या फ्लाईटच्या गेट पाशी येऊन खुर्चीत विसावलो होतो. गेला आठवडा भलताच धावपळीचा गेला होता. दहा दिवसात कंपनीची खूप कामे उरकायची असल्याने माझी अवस्था अक्षरशः घाण्याला जुंपलेल्या बैलासारखा झाली होती. अखेर आज सगळ्या धावपळीतून मुक्त झालो होतो. आता न्यूयॉर्क - मुंबई "रेड आय" फ्लाइटमध्ये मस्त ताणून द्यायचा माझा विचार होता. अशा हलक्या फुलक्या मनस्थितीत मी हलकीशी शीळ घालत येणार्या जाणार्यांचे निरीक्षण करत होतो. अप टू डेट पोषाखातील गोरी मंडळी लगबगीने ये जा करत होती. दूरवरून कोणीतरी येत होते. डोळे बारीक करून मी बघू लागलो. व्हीलचेअरवर एक भारतीय मनुष्य दिसत होता. मी बसलेल्या गेटपाशीच व्हील चेअर थांबवण्यात आली. अच्छा .... म्हणजे आजोबा मुंबईला चालले आहेत वाटतं !! कोणीतरी सुटाबुटातला माणूस व्हीलचेअर बरोबर आला होता. थोडा वेळ गेल्यावर तो माणूस वाकून आजोबांच्या कानात काहीतरी कुजबुजला . आजोबांनी अर्धवट हात उचलल्यावर लगबगीने तो मनुष्य निघून गेला. मी उत्सुकतेने बघत होतो. माझी आणि आजोबांची नजरानजर झाली, आणि आजोबा हसले !! अगदी निष्पापपणे !! मी खुर्ची बदलली व व्हील चेअर शेजारील खुर्चीत येऊन बसलो.
"नमस्ते अंकल !! क्या इसी फ्लाइट्से इंडिया जा रहे हो ?" मी विचारले. तशी आजोबा हसून म्हणाले ,"होय बेटा !! पण तू तर मराठी दिसतोयस ..."
"अरेच्या..... तुम्हीपण महाराष्ट्रियन आहात काय ?" मी आनंदाने विचारले. सहाजिकच होते, बर्याच दिवसांनी कोणी तरी माझ्याशी मराठीत बोललं होतं !
" मी गुजराती आहे पण गेली चाळीस वर्षे मुंबईत राहतोय." आजोबा हसून म्हणाले.
" तुमच्या बरोबर कोण आहे ? आत्ता तुमच्या बरोबर आला होता तो तुमचा कोण ?" मी उत्कंठतेने विचारले.
" मी एकटाच आहे बेटा "!! कुठेतरी शून्यात बघत आजोबा पुटपुटले.
" आत्ता गेला तो माझ्या मुलाच्या कंपनीतील मॅनेजर आहे ."
मी काहीच बोललो नाही. या अशा वयात आजोबा एकटेच एवढ्या लांबचा प्रवास करणार होते. काही वेळ शांततेत गेला.
" एवढ्या लांबचा प्रवास मी एकटाच कसा काय करणार असा प्रश्न पडलाय ना तुला ?" शांततेचा भंग करत आजोबांनी विचारले. "मागच्या वर्षी पहिल्यांदा परत निघालो होतो ना, तेव्हा मलाही असंच वाटलं होतं .... एकट्यानं एवढ्या लांबचा प्रवास कसा काय झेपेल आपल्याला ... पण झालं सगळं व्यवस्थित ... सवय नव्हती ना रे तोपर्यंत एकट्याने काही करायची !!" आजोबा थबकले. बरोबर असलेल्या पिशवीतून छोटी पाण्याची बाटली काढून त्यांनी दोन घोट घेतले.
" माझी बायको असायची सावली सारखी बरोबर तोपर्यंत !! " अचानक गहिवरल्याने आजोबा बोलायचे थांबले. उगाचच हसून ते थोडेसे खाकरले !!
" तू पण एकटाच दिसतोयस की !! तुम्हा तरुणांची गोष्ट अर्थात वेगळीच असते ,पण सांगायचा मतितार्थ हा .. की शेवटी सगळेच एकटे असतात."
मी काहीच बोललो नाही बराच वेळ शांततेत गेला.
" त्यात एकच चांगली गोष्ट म्हणजे, हा माझा शेवटचा इतका लांबचा प्रवास आहे. यापुढे मी या देशात परत येण्याची सुतरामही शक्यता नाही. माझ्या बायकोचं पहिलं वर्ष श्राद्ध करून मी पुन्हा कधीही येथे न येण्यासाठी, भारतात परततो आहे .......... भारती बेन !! माझ्या बायकोचं नाव होतं." एकटेच बोलल्यासारखे आजोबा बोलू लागले.
" तिच्या वयाच्या विशीत ती माझ्या आयुष्यात आली, ते अगदी गेल्या वर्षापर्यंत ... माझं सारं आयुष्य व्यापून टाकलं होतं तीनं !! एकरूप झाली होती म्हण ना ... ती गेली, आणि आयुष्यातला रामच निघून गेला. मला आठवतंय ... लग्नाच्या वेळी भणंग होतो मी !!! कोठेतरी किरकोळ नोकरी होती. मग ती एकदा म्हणाली ... स्वतःचे काहीतरी सुरू करू !! मग मी कितीतरी उद्योग धंदे केले ..... सुरुवातीला माझी मदतनीस, सेक्रेटरी, टायपिस्ट, क्लार्क , सगळं काही तीच होती. नंतर यश मिळू लागलं. पैसे दिसू लागले. थोड्याच दिवसात घरात लक्ष्मी पाणी भरू लागली. नवीन ऑफिस झाले .दिमतीला स्टाफ आला."
"व्यवसायातली स्वतःची गरज संपल्यावर भारती त्यातून बाजूला झाली. घराची बाजू ती समर्थपणे सांभाळू लागली. आम्हाला एकच मुलगा !! जिग्नेश !! त्याचं शिक्षण, खेळ, खाणं, पिणं यात भारती गुंतून गेली. हा हा म्हणता दिवस गेले. जिग्नेश जात्याच हुशार !! कॉम्प्युटर इंजिनियर होऊन तो चांगल्या कंपनीत नोकरीला लागला. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. एके दिवशी जिग्नेश ने सांगितले की त्याला कंपनीच्या कामासाठी सहा महिने अमेरिकेला जावे लागणार आहे. आम्हा दोघांनाही खूप आनंद झाला. पण जिग्नेश मात्र नाराज होता. आम्हा दोघांना सोडून अमेरिकेला जाणं त्याला नको होतं.' मी नोकरी बदलू का ?' त्यानं आम्हाला विचारले.
' अरे वेडा आहेस का ?' भारती म्हणाली .
' इतकी चांगली संधी मिळते आहे तर सोडतोस कशाला ? हे बघ जिग्नेश ... आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे .छोटी सुद्धा संधी सोडायची नसते. माझं हे म्हणणं कायम लक्षात ठेव. तुझ्या बाबांकडे बघ ... आयुष्यात प्रगतीची एकही संधी त्यांनी सोडली नाही .'
'अगं पण आई .... तुम्हा दोघांना या वयात एकटं सोडून जाणं मला पटत नाही .आपल्या देशातही भरपूर संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी परका देश कशाला पाहिजे ?' जिग्नेश म्हणाला. भारती हसली म्हणाली, ' अरे सहा महिन्यांसाठीच तर जातोयस ........ असा आव आणला आहेस की कायमचाच अमेरिकेत चालला आहेस !! '"
आजोबा बोलायचे थांबले. थोड्यावेळाने मोठा सुस्कारा सोडून म्हणाले," नियतीच्या मनात काय आहे हे कधीच कोणाला कळत नाही. सहा महिन्यांसाठी म्हणून गेलेला जिग्नेश, पुन्हा कधीही भारतात फिरकणार नाही, याची जरादेखील कल्पना भारतीला असती, तर तिने जिग्नेशला कधीच इकडे येऊ दिले नसते.जिग्नेश इकडचाच झाला. एका गोर्या अमेरिकन मुलीच्या प्रेमात पडून त्याने तिच्याशी लग्न केलं. आम्हाला लग्न झाल्यावर त्यानं कळवलं. भारती हा धक्का सहन करु शकली नाही. त्या क्षणापासून तिच्या चेहर्यावरचं हास्य नाहीसं झालं ते अगदी शेवट पर्यंत !!"
सुटा-बुटातला मॅनेजर परत आला आणि आजोबा बोलायचे थांबले.
आजोबांच्या कानात काहीतरी कुजबुज करून मॅनेजरने त्यांना बाय-बाय केले आणि तो निघून गेला. आता आजोबांना विमानात त्यांच्या सीटवर बसविण्याचे काम विमान कंपनीचे लोक करणार होते.
" मी आणि भारती सहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा जिग्नेश कडे आलो तेव्हा अमेरिकेतील उन्हाळा चालू होता". आजोबा भूतकाळात हरवून पुन्हा बोलू लागले .
" मी हा असा व्हीलचेअर मेंबर नव्हतो तेव्हा ... मी आणि भारती चांगले धडधाकट होतो. जिग्नेश ने आमच्या त्या अमेरिका भेटीत खूपशी अमेरिका आम्हाला दाखविली. आमचा मुक्काम त्यावेळी जवळपास चार महिने होता. जिग्नेश आणि मरियाना ... म्हणजे त्याची बायको, दोघेही नोकरीसाठी सकाळी लवकर जायचे ते रात्री उशिराच परत यायचे . दिवसभर आम्ही दोघेच घरात असू . भारती घरात सगळी कामे करत असे. स्वयंपाकापासून, धुण्याभांड्या पर्यंत सगळी कामे तिलाच करावी लागत असतं. मला मोठे वैषम्य वाटायचे. खरे तर मुंबईत तिला इकडची काडी तिकडे करायची गरज नसे. प्रत्येक कामाला तिथे मोलकरीण होती. पण येथील परिस्थिती वेगळी !!
येथे राहणाऱ्या प्रत्येकाने स्वयंपूर्ण असणे आवश्यक आहे.येथील मुक्काम शेवटी शेवटी आमच्या अगदी अंगावर आला. नाही म्हणायला, शनिवार रविवार जिग्नेश आणि मरियाना घरी असत ... पण नावापुरतेच ! त्यातून मरियाना ची भाषा वेगळी ! तिचे इंग्रजी बोलणे आम्हा दोघांनाही काही केल्या समजत नसे. कधी एकदा परत भारतात जातोय असं झालं होतं. त्यानंतर खरं तर आम्ही पुन्हा अमेरिकेत येऊ की नाही याची आम्हाला खात्री नव्हती. पण दीड वर्षापूर्वी मरियानाला दिवस गेले आणि बाळंतपणासाठी आम्हाला पुन्हा यावे लागले."
" या गोऱ्या लोकांचं वागणं मला कधीच समजलं नाही. मरियाना चे आई वडील तिच्या बाळंतपणात कधीच मदतीला आले नाहीत. सगळी उठाठेव भारतीनेच केली.ऐन थंडीच्या दिवसात मारियानाला मुलगी झाली. गोर्या-गोमट्या नाती कडे पाहून भारती सगळे कष्ट विसरायची. पण शेवटी वयानं आपला रंग दाखवलाच ! भारती आजारी पडली.इथली हाडात भरणारी थंडी तिला सोसली नाही. मी भारतात परतण्याची घाई करू लागलो. पण भारतीची तब्येत इतकी नाजूक झाली होती, की एवढा दीर्घ विमानप्रवास तिला झेपायचा नाही असं डॉक्टर म्हणाले. ते ऐकून माझ्या पायातले त्राणच निघून गेले. भारती अंथरुणाला खिळली होती. अशक्तपणामुळे दिवसरात्र ती झोपेतच असे. जागी झाली कि माझ्याकडे पाहून ती तोंडातल्या तोंडात पुटपुटे . तोंडाजवळ कान देऊन ऐकले की कळत असे.
' मला पुन्हा भारतात लवकर घेऊन चला. मला येथे मरायचं नाहीये '. मला भडभडून येत असे . कशीबशी तिची समजूत काढावी तर माझ्याकडे केविलवाण्या नजरेने बघत ती पुन्हा झोपेच्या आधीन होई. जीवघेण्या मानसिक तणावामुळे माझीही तब्येत खालावली होती. हिवाळ्यातलं येथील उदास आणि थंड वातावरण माझ्या अंगावर येत असे . दुपारी तीन वाजताच अंधार पडू लागे . सूर्य दर्शन घडणे म्हणजे पर्वणी असायची .या काळात जिग्नेश वेळ मिळेल तेव्हा ,आई शेजारी येऊन बसे. भारती झोपेत नसली तर, माय-लेक हातात हात घेऊन बसत. तेवढाच एक विरंगुळा भारतीला मिळे. तान्ह्या मुलीला जवळ घ्यावे असे भारतीला खूप वाटे. पण मरियाना मुलीला आजारी भारतीच्या जवळ अजिबात आणत नसे. सहाजिकच होतं म्हणा !!
एके दिवशी जाग आल्यावर भारतीने मला जवळ बोलावले आणि म्हणाली 'अहो ssss गुलाबाला फुल आले का ?' मला काही कळेना. मग अचानक उलगडा झाला. भारतातून येताना आम्ही कलमी गुलाबाचे रोपटे येथे लावायला आणले होते. सुंदर वासाचे कलम होते ते ! येथे आल्यावर भारतीने ते एका कुंडीत लावले होते. दोन महिन्यात त्याची थोडी ही वाढ झाली नव्हती. जिवंत होते इतकच ... भारती सारखीच त्या रोपट्याला ही बहुतेक इथली हवा मानवली नव्हती.
' नाही अजून कळी सुद्धा आलेली नाही.' मी म्हणालो.
' कधी येणार गुलाबाला फुल ? मला तो वास घ्यायचा आहे.' भारतीने केविलवाण्या नजरेने बघत मला विचारले.
' येईल येईल लवकरच फुल येईल बरं !!' मी तिची समजूत घातली. पण दिवसेंदिवस गुलाबाचे रोपटे सुकतच चाललं होते. इकडे भारती ची तब्येत एवढी बिघडली की तिला दवाखान्यात हलवावे लागले. डॉक्टरांनी तर आशाच सोडून दिली होती. का कोण जाणे माझे अंतर्मनही अशुभाची चाहूल देत होते. शेवटी ज्याची भीती होती तेच झाले. भारतीची प्राणज्योत दवाखान्यातच मालवली. माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला." आजोबा बोलायचे थांबले. एक सलग बराच वेळ बोलल्याने बहुदा त्यांना थकवा आला असावा. मी पाण्याची बाटली उघडून त्यांना दिली. पाण्याचे दोन घोट घेऊन ते पुन्हा बोलू लागले.
" भारती गेली आणि त्या आघाताने मी एवढा खचलो की मलाही आयुष्यात राम वाटेना. सततच्या मानसिक तणावामुळे एके दिवशी घरी एकटाच असताना मला पक्षाघाताचा झटका आला. घरी कोणीच नसल्याने वेळेवर उपचार करता आले नाहीत आणि माझ्या पायातील शक्ती गेली. मी कायमचा व्हीलचेअरला जखडलो गेलो. पण जरा बरे वाटतात मी जिग्नेश कडे भारतात परतण्याचा विषय काढला.
' बाबा आता पुन्हा कुठे भारतात जात आहात ? तिकडे तुम्हाला अशा अवस्थेत कोण सांभाळणार ? त्यापेक्षा आता तुम्ही इकडेच रहा.' जिग्नेश मला म्हणाला. पण मी पक्का इरादा केला होता. त्याच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करीत मी पुन्हा भारतात परतलो .माझ्या आणि भारतीच्या भारतातील घरात सगळ्या आठवणींना पुन्हा उजाळा देत तेथेच राहिलो. आता जगतोय ते उरलेलं आयुष्य म्हणजे एक शाप आहे. जुन्या आठवणींच्या समुद्रात मनाची नौका इतकी भरकटते की दिवसेंदिवस वास्तवाचा किनाराच सापडत नाही !!"
आजोबा थबकले.सुन्न होऊन मी ऐकत होतो. बोलण्यासाठी शब्द सुचत नव्हते .काही वेळानं जड आवाजात आजोबा म्हणाले
" अरे हो !! एक गंमत सांगायची राहिली तुला... भारती गेली, आणि कुंडीतल्या गुलाबाला धुमारे फुटले. हा हा म्हणता गुलाबाच्या रोपट्यांनं बाळसं धरलं. महिन्याभरात त्याला टपोर्या कळ्या आल्या. त्यांची उमलून देखणी फुले ही झाली. पण .... पण .... त्या फुलांना कसलाही गंध नव्हता. भारतात स्वर्गीय सुगंध असलेल्या गुलाबाचे कलम येथे फुलले ते गंधहीन फुलांनी !! भारती बरोबरच माझ्या आयुष्यातला आणि गुलाबाच्या फुलांचा गंध कायमचा हरवला होता."
आजोबा बोलायचे थांबले.
विमानात बसायची वेळ झाली होती. ग्रुपनुसार प्रवाशांना आत सोडायला सुरुवात झाली . विमान कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने आजोबांच्या व्हीलचेअरचा ताबा घेतला. माझ्याकडे बघून आजोबांनी हात हलवला आणि गुड बाय केले. नकळत माझा हात हलला ..... आणि व्हीलचेअरवरून जाणाऱ्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे मी विमनस्कपणे बघत राहिलो.
समाप्त
वरील कथा श्री. मिलिंद अष्टपुत्रे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखकाच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.
आमच्या शब्द चाफा या चॅनलवर अनेक सुंदर कथा उपलब्ध आहेत. एकदा जरूर भेट द्या.
एका वेगळ्या आणि सुंदर कथेसाठी फोटोवर क्लिक करा.