विघ्नहर्ता

 विघ्नहर्ता

लेखिका सविता किरनाळे"आई आपण गणपती आणायचा का?" सहा वर्षांच्या मयुरेशने विचारले. काम करता करता माधवीचे हात थबकले. 

"बघू, आज संध्याकाळी घरी लवकर आले तर बसवू बरं. चल मला काम करू दे, उशीर होतोय कामाला जायला." डोळ्यातील पाणी निग्रहाने परतवत माधवी म्हणाली. 

तीन वर्षापूर्वीच्या साथीच्या आजाराने तिच्या नवऱ्याचे निधन झाले होते. लोकांच्या घरी घरकाम करुन तिचा निर्वाह होत होता. तरीही महिन्याच्या शेवटी हाता तोंडाची गाठ घालताना जीव टेकीला येई. त्यात आता मयुरेश मोठा होत होता. सणवार, हौसमौज त्याला समजायला लागले होते. सगळीकडे गणपतीचा उत्साह पाहून त्याने आईला विचारले होते. माधवी मात्र विचारात पडली होती. यावर्षी मुर्त्या किती महाग झाल्या आहेत हे तिने जिथे काम करायची त्या घरात ऐकले होते. पण पोराने पहिल्यांदा काही तरी मागितले होते. बरं नुसतं गणपती बसवला म्हणजे झालं असं ही नाही ना. त्याला निदान पहिल्या दिवशी तरी गोडधोड नैवद्य दाखवला पाहिजे. 

'बघू सावंत काकूंना थोडा अडवान्स मागून. दिले तर करू काही.' तांदळाच्या डब्यात ठेवलेल्या रुमालातील पैसे मोजत माधवीने विचार केला. हजार रुपये होते त्यात.

************

"सदाशिव, सगळ्या बुक केलेल्या मुर्त्या गेल्या का रे?" रामनाथने कामगाराला विचारले.

"जवळपास सगळ्या गेल्या. साहेब, जास्तीच्या म्हणून केलेल्या पण बऱ्यापैकी विकल्या गेल्यात. आता बुकिंगच्या पाच सात आणि या जास्तीच्या चार उरल्यात फक्त. यावर्षी मस्त धंदा झाला, नाही?" सदाशिव एका मूर्तीवर फडके फिरवत म्हणाला.

"हम्म, एक काम कर. साडे सात वाजेपर्यंत थांब इथे. तोपर्यंत बुकींग मूर्ती जातीलच. मग तू दुकान बंद करून जा घरी. मी निघतो, घरच्या गणपतीची स्थापना करायची आहे." रामनाथ गल्ल्यावरून उठत म्हणाला.

***********


सावंत काकूंचे काम संपल्यावर पैसे मागण्यासाठी माधवी तिथेच घुटमळत राहिली. पण काकू गणपतीसाठी घरी आलेल्या मुलं, सुना आणि नातवंडांमध्ये रमलेल्या दिसल्या. तरीही हिंमत करून तिने त्यांना पैशासाठी विचारले.

"काय ग तुझी सारखी अडचण असते. गेल्या महिन्यात असेच सांगून तू अडवांस घेतला होतास, आता परत... आणि सणासुदीच्या दिवशी कुणाला पैसे देत नाही मी. घरातली लक्ष्मी असं बाहेर जाऊ द्यायची नसते." काकू रागाने म्हणाल्या.

"काकू गणपती बसवू म्हणतोय मुलगा. त्याचं मन कसं मोडू. जास्त नको फक्त हजार रुपये द्या. पुढल्या पगारातून कापून घ्या." माधवी अजिजीने म्हणाली.

"बरोबर आहे तुझं. पण आजच्या दिवशी नाही देऊ शकत. काल मागितले असते तर नक्की दिले असते. बरं उद्या जरा लवकर ये, पाहुणे आहेत ना घरी." समारोप करत काकू म्हणाल्या. 

सगळीकडील काम उरकल्यावर माधवी घराकडे निघाली. डोक्यात विचारचक्र भिरभिरत होते. मयुरेशला काय उत्तर द्यावे याची ती मनात जुळणी करू लागली. "माधवी बेन, माधवी बेन," अशा मागून आलेल्या हाकेने तिची तंद्री भंगली. अगरवाल सुपरमार्केटचे मालक जिग्नेश अगरवाल हाका मारत होते. 'यांचे काय काम असावे?' या विचारात ती दुकानात शिरली.

"बेन, आमचे शांताबाई काई आज आले नाही. गणपतीसाठी गावी गेली मने. तू बदली काम करते काय तिच्ये? दिवसाचे हजार रूपये देईन मी. पाच सात दिवसाचे काम अशेल बग." गुजराती ढंगाच्या मोडक्या मराठीत जिग्नेश म्हणाला. 

"सेठ, येईन मी. जरा घरी जाऊन पोराला सांगून येऊ का, वाट बघेल तो माझी." माधवीने विचारले.

"हो च्यालेल. पण जल्डी कर हो. लय काम पडलाय." जिग्नेश बोलला.

माधवी धावतच घरी गेली आणि मयुरेशला निरोप देऊन निघाली.

"पण आई, बाप्पा... " 

"एक काम कर बाळा, तू सात वाजता जिग्नेश भाईच्या दुकानावर ये. बघू आजची मजुरी देतात का ते." माधवी गेली. आज सुपरमार्केटमध्ये खूप गर्दी होती. ग्राहकांनी अस्ताव्यस्त केलेले सामान परत रॅकवर व्यवस्थित रचून ठेवण्याचे काम तिला दिले गेले. आता गणेशोत्सव होईपर्यंत अशीच गर्दी कायम राहणार होती म्हणून जिग्नेशने तिला मदतीला बोलावले होते. दुकानात माधवीचे नेहमी येणे जाणे असल्याने त्याला तिच्या परिस्थितीबद्दल माहिती होती. चांगल्या स्वभावाच्या त्या व्यापाऱ्याने जमेल तशी अशा घटकांना मदत केली होती. 

घरी बाप्पाची सजावट करण्यासाठी मयुरेश उत्साहाने कोऱ्या कागदावर चित्रं काढायला लागला. बरोबर सात वाजता तो दुकानासमोर उभा राहिला.

"माधवी बेन, तुजा पोरगा आले बग." ग्राहकांच्या गर्दीतून मयुरेशला बघून जिग्नेश ओरडला. 

"काय रे, अब्यास कशे चाललाय तूजा? आणि तू इथे काय करते?" त्याने विचारले.

"सेठ अभ्यास चांगला चालू आहे. आज गणपती बाप्पा आणायचा ना म्हणून आईला न्यायला आलो. सोडा ना तिला." मयुरेश म्हणाला.

"अरे हो, पण लई उशीर झाला ने बाप्पा आणायला. जा पळ लवकर, हाय का बघ कुटला बप्पा शिल्लक. आणि माधवी बेन हे घे तुझा आजची मजुरी. उद्या पण ये हां का. ए पोरा थांब थांब, हे मोदकचा पॅकेट घेऊन जा बाप्पाला. तुला चांगली बुध्दी दे म्हणून सांग तेला." जिग्नेशने बाजूला ठेवलेल्या मावा मोदकाचे पॅकेट मयुरेशच्या हाती दिले. माधवीचे डोळे भरून आले. हात जोडून ती मुलाला घेऊन गणेश मुर्ती घ्यायला गेली. सदाशिव दुकान बंद करायच्या तयारीत होता. 

"दादा, मुर्ती घ्यायची आहे." माधवी म्हणाली.

"अरे, मुर्त्या संपल्या सगळ्या. खूप उशीर झाला तुला." सदाशिव म्हणाला.

"काका, एकही उरली नाही का? आई, तू का उशीर केलास?" रडवेल्या स्वरात मयुरेशने विचारले. त्याचा रडका चेहरा, माधवीचा थकलेला अवतार पाहून सदाशिवचा हात थांबला. 

"थांब, एक मुर्ती आहे वाटतं बघ त्या कोपऱ्यात. आज कुणीच तिला पसंद केले नाही. बघ तुला चालते का?" 

मयुरेश धावतच जाऊन ती मुर्ती घेऊन आला. छोटीशी, जेमतेम अर्ध्या फुटाची ती मुर्ती अतिशय सुंदर होती. पण कदाचित लहान आकार असल्याने कुणी घेतली नसावी. सदाशिवने अभावितपणे त्या मूर्तीच्या डोळ्यांकडे पाहिले. का कुणास ठाऊक त्यातील भाव त्याला मयुरेश आणि माधवीच्या डोळ्यातील भाव एकसारखे वाटले, आशाळभूत आणि उत्सुक.... असं वाटत होतं की जणू तो गणेश मयुरेशच्या घरी जायला आतुर आहे.

"दादा, किती द्यायचे?" माधवीने विचारले.

"ताई, शेवटची एकच राहिली आहे ती. तशीच दिली असती पण मालक ओरडेल. म्हणून दोनशे रुपये द्या फक्त." सदाशिव बोलून गेला. कमीत कमी हजार रुपयांची ती मुर्ती फक्त दोनशे रुपयांना देताना त्याला मुळीच वाईट वाटत नव्हते. माधवीने त्याला आणि गणेशाला हात जोडले. 

घरी येताना मयुरेशच्या बडबडीकडे तिचे अजिबात लक्ष नव्हते. आज संकटाच्या काळात तो विघ्नहर्ताच जिग्नेश भाई आणि सदाशिवाच्या रुपात आल्याची तिला अनुभूती होत होती. 

समाप्त

या लेखिकेची दुसरी कथा वाचण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा.वरील कथा सविता किरनाळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. 

2 Comments

  1. देव कोणत्याही रुपात येतो

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post