एन्ड गेम

 एन्ड गेम 

✍️ मिलिंद अष्टपुत्रे

नितीन मान खाली घालून मुकाट्याने साहेबांची बोलणी ऐकत होता.एका क्षुल्लक चुकीमुळे दोन दिवसांपासून मर-मर करून केलेल्या कामाचे काहीच चीज झाले नव्हते. एका महत्त्वाच्या टेंडरची ती फाईल होती एका आयटमचा रेट चुकल्यामुळे संपूर्ण कोटेशन व्हॅल्यू चुकली होती. "नशीब ......आत्ताच लक्षात आले नाही तर टेंडर सबमिट करून काहीही उपयोग झाला नसता. तुम्हां लोकांवर विश्वास ठेवला तर कंपनीचं दिवाळं निघेल. झोपेत काम करता की काय कोण जाणे. निघा आता... ती दुसरी फाईल संध्याकाळपर्यंत माझ्या टेबलावर आली पाहिजे. एकही चूक न होता.... कळलं ?" साहेबांचा थयथयाट चालू होता. काहीही न बोलता घाम पुसत नितीन केबिन बाहेर आला. टेबलावरच्या फाईलींच्या ढिगाकडे पहात त्याने मोठा सुस्कारा सोडला. आता मान पाठ एक करून काम केले तरच ते संध्याकाळपर्यंत पुरे होणार होते. 

नितीन सामान्य कारकून म्हणून गेली तीस वर्षे या कंपनीत इमान इतबारे नोकरी करत होता. लहानपणापासून बेताचीच परिस्थिती ! वडील दुकानात पुड्या बांधायचं काम करायचे. त्यामुळे उच्च शिक्षणाची स्वप्ने बघणं सुद्धा गुन्हा होता. कशीबशी कॉमर्समधील डिग्री घेऊन नितीन या कंपनीत कारकून म्हणून चिकटला होता. बेताची नोकरी, बेताचे शिक्षण आणि सामान्य व्यक्तिमत्व ! लग्नाचं वय उलटून गेलं तरी मुलगी मिळत नव्हती शेवटी वयाच्या बत्तीसाव्या वर्षी कसेबसे लग्न ठरले ! अतिशय सामान्य अशा लताशी !!

लता ..... नावाप्रमाणेच कसल्याही प्रकारचा चार्म तिच्यात नव्हता. चार-चौघांसारखा सामान्य संसार सुरु झाला. वर्षाभरात मोनिकाचा जन्म झाला आणि लता आणि नितीनच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. लहानग्या मोनिकाच्या बाललीलांनी दोघांच्या वैराण आयुष्यात हिरवळ उगवली. आता तिचं भविष्य हेच लता आणि नितिनच्या आयुष्याचं ध्येय बनलं. मोनिका अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेची. शाळेतला पहिला नंबर तिनं कधी सोडला नाही !! अभ्यासाबरोबरच ती, बुद्धिबळही चांगलं खेळत असे. याला कारण होती ... लता !! बालपणापासून लता बुद्धिबळाची भोक्ती होती. वेळ मिळेल तेव्हा बुद्धिबळाचा डाव मांडून बसणे हा तिचा छंद होता. नितीनला मात्र या खेळातल फार काही कळत नसे. लताने  लहानपणापासूनच  मोनिकाला बुद्धिबळाचे धडे देण्यास सुरवात केली होती. बुद्धिबळाचं बाळकडू मिळाल्याने मोनीकाही चांगलं खेळत असे. रोज रात्री मायलेकींचा डाव रंगे! बहुतेक वेळा लताची सरशी होई. या एका बाबतीत मोनिका आईला हरवू शकत नसे. बुद्धिबळाच्या खेळात ओपनिंग, मिडलगेम आणि एंडगेम अशा तीन महत्त्वाच्या पायऱ्या असतात. त्यात एन्डगेम मध्ये मोनिका चांगलीच हुशार होती. एन्डगेम पर्यंत डाव गेला की समजावे मोनिका जिंकणार !! लता कौतुकाने नेहमी म्हणायची,

" प्यादी पुढे ढकलून त्याची क्वीन कशी करायची हे तुझ्या कडून शिकावे!!"

हा हा म्हणता मोनिका कॉलेजमध्ये जायला लागली.चार्मिंग व्यक्तिमत्व, कुशाग्र बुध्दीमत्ता, आणि नम्र स्वभाव यामुळे मोनिका सगळ्यांची लाडकी होती. कॉलेजमध्ये गेल्यापासून मोनिका परदेशातील उच्चशिक्षणाची आणि नोकरीची स्वप्ने पाहू लागली. तिच्या सारख्या अति सामान्य कुटुंबातील मुलीसाठी ही खरेतर दिवास्वप्नचं होती. पण लता आणि नितीनने तिची स्वप्ने पुरी करण्याचा चंगच बांधला. खर्चाचे आकडे ऐकल्यावर त्यांचे डोळे पांढरे होणेच बाकी होते, पण नितीन हार मानायला तयार नव्हता. पैसे उभे करण्यासाठी त्याचे अथक प्रयत्न सुरू होते. कधी कधी लताला खूप निराशा येई. त्यावेळी नितीन तिला धीर देताना म्हणत असे,

" लता,मी स्वतःला सुद्धा विकेन, पण तिचं स्वप्न पूर्ण करेन!!" 

भारतात बी.टेक. ची पदवी मिळवल्या नंतर मोनिकाने कॉम्प्युटर मधील उच्चशिक्षणासाठी जर्मनीला जायचे ठरवले. तिने अर्ज केलेल्या बहुतेक विद्यापीठांकडून तिला अनुकूल उत्तर मिळाले होते. त्यातील शिष्यवृत्ती देणाऱ्या विद्यापीठाची तिने निवड केली.आता खर्च जाण्याचा आणि तिथल्या वास्तव्याचाच येणार होता. दरम्यान नितीनने प्रोव्हिडंड फंड, नोकरीतील उचल, मित्रांकडून उसनवार असे सगळे मार्ग अवलंबून पैसे गोळा केले. मोनिका जर्मनीला जाण्याचा दिवस उगवला. तिला सोडायला लता आणि नितीन मुंबईच्या विमानतळावर गेले. मोनिकाने आई-वडिलांना वाकून नमस्कार केला आणि वळून ती निघाली. अचानक लताने तिला थांबवले. 

" मोनिका बेटा ... तुझ्या करिअरची ओपनिंग तर चांगली झाली आहे. येत्या दोन वर्षातला खर्चाचा मिडलगेम मी आणि बाबा संभाळतो. तुला फक्त एन्डगेम जिंकायचा आहे. आणि मला खात्री आहे की तू एन्डगेम नेहमीसारखाच खेळशील !!" लता जड आवाजात तिला म्हणाली. 

" आई आय प्रॉमिस यू !! अँड लव्ह यू बोथ !!" मुसमुसत मोनिका पुटपुटली.

खरी लढाई आता सुरु झाली. नितीनने अधिक पैसे मिळवण्यासाठी रात्रीचा दिवस करायला सुरुवात केली.लता ही जमेल तशी त्याला मदत करत होती. तिने लहान मुलांसाठी पाळणाघर सुरू केले. त्यातून वेळ मिळाला की तिचे शिवणकाम चाले. दोघांनाही वेळ पुरत नव्हता. कधीतरीच दोघे निवांत असत.त्यावेळी ते एकमेकांना बजावत

" ही दोन वर्षे सगळ्यात महत्त्वाची.या काळात आपल्याला आजारी पडायची सुद्धा परवानगी नाहिये .... लक्षात आहे ना ?" तिकडे मोनिकाने आपले पूर्ण लक्ष अभ्यासात एकवटले. चांगले मार्क मिळवून शिष्यवृत्ती टिकवून ठेवली. एका वर्षानंतर सर्व मुले मुली आपापल्या देशी सुट्टीसाठी निघून गेली. मोनिका मात्र तेथेच थांबली. येण्या-जाण्याचा खर्च परवडणारा नव्हता. आई बाबांच्या आठवणीने ती कासावीस होई, मग फोनवर त्यांच्याशी बोलून ती दुधाची तहान ताकावर भागवी !!

दुसरे शैक्षणिक वर्ष आता सुरु झाले होते. आर्थिक आघाडीवर नितीनची प्रचंड कोंडी झाली होती. जर्मनीला पाठवावे लागणारे पैसे आणि मिळकत यांच्यातील दरी दिवसेंदिवस रुंदावत होती.आता पैसे मिळवण्यासाठी काहीतरी जालीम मार्ग शोधावा लागणार होता. अचानक नितीनला एके रात्री लताने दिलेले ते प्रपोजल आठवले !! 

" पैशांचा प्रश्न नक्की सुटेल पण हे असं करणं कितपत योग्य आहे लता ?" निराशेने डोके हलवत नितीन स्वतःशीच पुटपुटला.

मोनिका खूप आनंदात होती. परीक्षेचे पेपर खूप चांगले गेले होते तिने तिचा थिसीस यशस्वीपणे डिफेंड केला होता. येत्या आठवड्यात विद्यापीठात मोठमोठ्या कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्यू होणार होते मोनिका त्यात भाग घेणार होती. परीक्षेचा निकाल लागायच्या आधीच लठ्ठ पगाराची नोकरी मिळवण्याची ती सुसंधीच होती. सर्व काही व्यवस्थित पार पडले आणि तो 'सोनियाचा दिन' उगवला . मोनिकाने परीक्षेत उत्तम यश प्राप्त केले होते. कॅम्पस इंटरव्यूमध्ये 'गुगल' या मल्टिनॅशनल कंपनीने तिची निवड केली होती. वार्षिक पगार सत्तर हजार युरो म्‍हणजेच जवळपास पंचावन्न लाख रुपये !!! मोनिकाला आकाश ठेंगणे झाले.कधी एकदा ही बातमी आई-बाबांना सांगते असं तिला झालं. तिचा फोन नितीनने उचलला, मोनिकाने सांगितलेला वृत्तान्त ऐकून त्याला इतका आनंद झाला की भावनेच्या भरात त्याला बोलताच येईना. कसाबसा तो "आईला निरोप देतो तुझा ... तुझे खूप खूप अभिनंदन  ..." एव्हढेच बोलू शकला. थोड्यावेळात लताचा फोन आला. मोनिकाने उत्साहाने सगळी माहिती पुरवली. लता मोजकच बोलली आवाज खूप खोल गेला होता.

" काय झालं आई ? तुझा आवाज असा का येतोय ?" मोनिकाने काळजीने विचारले.

" काही नाही गं ! गेले काही दिवस तापाने आजारी होते. आता बरं आहे. काळजी करू नकोस." लता म्हणाली. 

" बाबांशी बोल आता !" 

मोनिकाला नितीनशी काय बोलू आणि काय नको असं झालं होतं !

" बाबा आता मी तुम्हा दोघांना राजा राणी सारखं ठेवणार आहे. तुम्ही आता नोकरी सोडायची आणि फक्त आराम करायचा. थोड्याच दिवसात मी तुम्हा दोघांना माझ्याकडेच घेऊन येणार आहे. आईला सांगा म्हणावं, तुझ्या लेकिनं एन्डगेम जिंकला आहे. चला ठेवते फोन. आज मैत्रिणींबरोबर मोठी पार्टी आहे. बाय ... टेक केयर !"

नितीनने फोन ठेवला. हॉस्पिटलमधील पलंगावर असहाय्यपणे झोपलेल्या लताकडे पाहात तो पुटपुटला,

" मोनिका बेटा, कसं सांगू तुला ....... तुझ्या आईनं मिडलगेम खेळता खेळताच, तुझा एन्डगेम ही आधीच जिंकून ठेवला होता. तुला कुठेही पैसे कमी पडू नयेत म्हणून ....................

...…........................

म्हणून स्वतःच्या एका किडनीची आहुती देऊन !!!! "


समाप्त

वरील कथा श्री. मिलिंद अष्टपुत्रे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखकाच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.

अजून एक सुंदर कथा ऐकण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा.




Post a Comment (0)
Previous Post Next Post